हीच कसोटीची वेळ .. Now is our examination! ...

श्री स्वामी समर्थ
आपण मानवप्राणी स्वतःला नेहमी कमजोर, कमकुवत समजतो. अश्या न्यूनगंडात जगण्याची सवयच असते आपल्याला आणि त्याचे भूषणही वाटते. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला अश्या समजुतीत आयुष्य सरते.
बघा ना!! जरा काही संकट आले की आपण सर्वप्रथम दोन गोष्टी करतो. एक म्हणजे स्वतःचे हातपाय गाळणे मग नंतर स्वामींकडे धाव घेणे. त्या संकटाशी दोन हात करायला धीराने कितीजण उभे राहतात. माझे नशीबच फुटके म्हटले की झाले... उरलेले, सर्व स्वामी तुम्ही बघा... अशी धारणा असते.... का?... कारण अश्यावेळी नेमकी संपूर्ण शरणागती आठवते...
कितपत खरे आणि वास्तव आहे हे? संकटे कोणावर नसतात. आणि मला सांगा तो आपला स्वामी, आपली परीक्षा घेणार तरी कसा? संकटात आपला कसा निभाव लागतो? आपली भक्ती विश्वास किती टिकतो? हीच तर परीक्षा असते. हीच कसोटीची वेळ असते. एक पाउल आपण धीराने पुढे टाकण्याचा फक्त अवकाश असतो, आपले स्वामी त्यानंतरची दहा पाउले आपल्याकडून चालवून घेतात. पण माझ्यासारखे करंटे, देवा तुझी इतके वर्षे मनोभावे (हे ही मीच ठरवलेले असते) भक्ती केली ह्याचे हेच काय रे फळ? असा हिशोब मांडतात.
शिष्यात, आपल्या गुरूस वश करण्याची क्षमता असते. मानवात, देवास आपला, करण्याची क्षमता असते. पितामह भीष्मांनी, भगवान श्रीकृष्णास " या युद्धात मी शस्त्र उचलणार नाही" ही प्रतिज्ञा मोडण्यास भाग पाडले. " कुठे रे होतास इतके दिवस? काही चुकले का माझे?" हे आपल्या स्वामींचे उद्गार आहेत श्री बाळाप्पा महाराजाना प्रथम पाहिल्यावर,किंवा स्वामीसुतांचे उदाहरण घ्या. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. काय होते हे सर्व?
ही होती पराकोटीची भक्ती. संपूर्ण शरणागती. एवढे प्रेम की, भगवंत त्या प्रेमात तगच धरू शकला नाही आणि पुरता वाहून गेला. बर.... ही सर्व माणसेच होती ना?
लहान तोंडी मोठा घास... पण कधीकधी येते मनात... की माझ्यात असे काय नाही, जे श्री बाळाप्पा महाराजांकडे होते. अर्थात उत्तरही लगेच मिळते. यादी लांब नाही पण जेवढी आहे तेवढीच पुरेशी आहे. ते आत्मसात करण्यास केवढे कठीण आहे ह्याची कल्पनाही करवत नाही.
पण म्हणून मी प्रयत्नच करू नयेत का? नाही.... ह्याचा अर्थ असा होत नाही. प्रत्येक युगात आणि काळात भगवंतास भक्तांची आस असतेच. मग ह्या युगातील तो भक्त, मी का नसावे?
का माझ्या स्वामीनी, फोटोतून बाहेर येउन मला ओरडू नये? का मी रात्री झोपताना त्यांच्या अंगावर चादर घालू नये? का आम्ही दोघांनी मिळून गाणी म्हणू नयेत? एक ना दोन, हजार प्रश्न येतात. काही पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. मग त्या अपूर्ण प्रश्नावर मी का काम करू नये?
समजा, माझ्याशी स्वामी बोलतात, ही गोष्ट मला ज्यावेळेस, ४ जणांना सांगावीशी वाटेल तो दिवस त्या संभाषणाचा शेवटचा दिवस असेल. मी संपूर्ण शरणागत आहे ह्याचा ज्या दिवशी मी दिंडोरा पिटेन तो दिवस त्या शरणागतीचा शेवटचा दिवस समजायला हवा.
मग....कशी करू मी भक्ती?
मुळात भक्ती करावी लागते का? आईला मुलावर कसे प्रेम करावे हे कोण शिकवते? आईने जवळ घेतल्यावर तिच्या कुशीत शिरायला लहान अर्भकास कोण शिकवते? मग मला माझ्या आराध्याची भक्ती का कोणी शिकवावी?
का माझ्या आराध्यास मी सर्वत्र पाहू शकत नाही? त्याचे वचन मी मोठ्या श्रद्धने लिहितो, फेसबुकवर मिळालेले लाइक्स एन्जोय करतो पण तेच वचन जेव्हा जगायची वेळ येते तेव्हा कुठे जाते माझी श्रद्धा? का सिलेक्टिव होतो मी तेव्हा?
झाडाला पाणी देताना, डुलणाऱ्या पानात हसताना, मला माझा समर्थ का दिसत नाही? आभाळात पाहिल्यावर ढगात मला तो का दिसत नाही? आजूबाजूस, सर्वत्र मला का दिसत नाही? का नाही, माझा स्वामी मला माझ्यात जाणवत?
ह्याचे कारण एकच की मी संपूर्ण शरणागत नाही. मी आणि माझा स्वामी असे मी दोन वेगळे मानतो. ज्यादिवशी हा पडदा फाटेल तेव्हा मला अक्कलकोटला किंवा मठात जायची गरजच भासणार नाही. फोटो किंवा मूर्ती लागणार नाहीत. तो दिवस आणणे फक्त माझ्या हातात आहे. कारण स्वामी जरी करवून घेत असले तरी भक्ती मलाच करावी लागणार आहे. शरणागत मलाच व्हावे लागणार आहे.
एका गाण्याचे कडवे आठवले ते लिहून थांबतो
तुमही सबमे, है तुममे सब
तुमही भव हो, हो तुमही रब
अश्रू हमारी, आंखोमे तुम
तुम होठोपर, हास्य हमारे.... रामा
तुम आशा विश्वास,,,हमारे... तुम धरती, आकाश हमारे....
श्री स्वामी समर्थ

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...