उन्हाळी बाजरीची लागवड

⭕सुधारित पद्धतीने करा उन्हाळी बाजरीची लागवड⭕

पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर व गरजेनुसार पाणी, तसेच कीड व रोगांचा कमी प्रादुर्भाव, यामुळे उन्हाळी बाजरी पिकामध्ये धान्य आणि चारा उत्पादन खरीप हंगामापेक्षा जास्त मिळते. या उन्हाळी बाजरी लागवडीसाठी सुधारित तंत्राचा वापर करावा.
उन्हाळी हंगामात सिंचनाची उपलब्धता असलेल्या क्षेत्रात सध्या उन्हाळी बाजरीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. राज्यातील पुणे, नगर, जळगाव, नाशिक, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी बाजरी लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाळी हंगामात भुईमूग, मका इत्यादी पिकांच्या तुलनेत बाजरी हे पीक कमी कालावधीत आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते.

⭕हवामान⭕
बाजरी हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकणारे असून, उष्ण व कोरडे हवामान त्यास मानवते. उन्हाळी हंगामात बाजरी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण अवस्था ते फुटवे येण्याची अवस्था या वेळी तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळूवार होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो. म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा १० ते १५ दिवसांनी उशिरा काढणीस येते.

⭕जमीन⭕
उन्हाळी बाजरी पिकासाठी जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावी.

⭕पूर्वमशागत⭕
जमिनीची १५ सें.मी.पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीआधी १२ ते १५ बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून टाकावे.

⭕पेरणीची वेळ⭕
उन्हाळी बाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. १५ फेब्रुवारीनंतर पेरणी केल्यास पुढील उष्ण हवामानात पीक सापडते. परिणामी कणसात दाणे कमी भरून उत्पादनात घट येते. तसेच पुढील वर्षी खरीप हंगामातील पेरणीसाठी विलंब होतो.

⭕बियाणाचे प्रमाण⭕
पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे.

⭕बीजप्रक्रिया⭕

अ) २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया (अरगट रोगासाठी)
बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची (२ किलो मीठ प्रति १० लिटर पाणी) प्रक्रिया करावी. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा. तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड बियाणे वेगळे काढून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवावे. त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

ब) मेटॅलॅक्झील (३५ एलडी) बीजप्रक्रिया (गोसावी रोगासाठी)
पेरणीपूर्वी 6 ग्रॅम मेटॅलॅक्झील (३५ एसडी) प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.

क) ॲझोस्पिरीलम व स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धनाची

⭕बीजप्रक्रिया⭕
२५० ग्रॅम ॲझोस्पिरीलम प्रति १० किलो बियाणास चोळून पेरणी करावी, तसेच स्फुरद विरळविणारे जिवाणूची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे नत्र खतात २०-२५ टक्के बचत होते. बियाणाची उगवणशक्ती वाढते. रोपांची वाढ चांगली होते, फुटवे जास्त फुटतात व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

⭕संकरित व सुधारित वाण⭕
- उन्हाळी हंगामासाठी श्रद्धा, सबुरी व शांती या संकरित वाणांची निवड करावी. हे वाण अधिक उत्पादनक्षम असून केवडा रोगास बळी पडत नाहीत. श्रद्धा व सबुरी या संकरित वाणाच्या कणसावर केस (लव) असल्यामुळे पक्षांचा उपद्रवही कमी प्रमाणात होतो.

- सुधारित वाणामध्ये आयसीटीपी ८२०३ व धनशक्ती या वाणाची निवड करावी.

⭕पेरणीचे अंतर⭕
दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. (एक फूट) व दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून पेरणी करावी.

⭕पेरणीची पद्धत⭕
जमीन ओलवून वापसा आल्यावर पेरणी दोन चाडीच्या पाभरीने करावी. रासायनिक खते आणि बियाणे एकाचवेळी पेरता येतात. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये.

⭕रासायनिक खते⭕
हेक्टरी ९० किलो नत्र, ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश. पैकी ४५ किलो नत्र, व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी राहिलेले अर्ध नत्र (४५ किलो नत्र) द्यावे.

⭕विरळणी⭕
१० दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे.

⭕आंतरमशागत⭕
दोन वेळा कोळपणी व गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवावे. याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते. एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये पेरणीनंतर, परंतु पीक उगवणीपूर्वी ॲट्राझिन या तणनाशकाची हेक्टरी १ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

⭕पाणी व्यवस्थापन⭕
उन्हाळी हंगामात बाजरी पेरणीनंतर पिकास चौथ्या दिवशी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास पीक वाढीच्या खालील संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे.

- पेरणीनंतर पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी)

- दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी)

- तिसरे पाणी दाणे भरण्याच्या वेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!