आंबामोहर संरक्षणाकडे लक्ष द्यावे
🍒मोहर संरक्षणाकडे लक्ष द्यावे...
केसर आंबा सल्ला -
- सद्यःस्थितीत बहुतांश ठिकाणी आंबा बागा या मोहरलेल्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी मोहर बाहेर पडत आहे. सध्या असलेल्या दमट हवामानामुळे मोहरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे फूल व फळगळ होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवते. या बुरशीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २ ग्रॅम अथवा डिनोकॅप १ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाण त्वरित फवारणी करावी.
- सध्या राज्यातील काही विभागांमध्ये ढगाळी व पावसाळी वातावरण तयार होऊ पाहत आहे, त्यामुळे सघन लागवडीमध्ये काही ठिकाणी कमी प्रकाशामुळे व कोंदटपणा निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी तुडतुडे या रसशोषक किडीचा मोहरावर प्रादुर्भाव होऊ शकतो. ही कीड राखाडी रंगाची असून, किडीचा मोहरावर प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. ही कीड आंबा मोहरातून व कोवळ्या फळातून रस शोषण करते, त्यामुळे फुले व फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी, व्हर्टीसिलीयम लेकॅनी ४० ग्रॅम किंवा अॅसिटामाप्रीड ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- बऱ्याच आंबा बागांमध्ये डिसेंबरमध्ये फूलधारणा झाली आहे. या ठिकाणी फळे बाजरीच्या आकाराची झालेली आहेत. मध्यंतरीच्या काळात पुन्हा थंडीची लाट परतल्याने पुनर्मोहराची शक्यता नाकारता येत नाही. पुनर्मोहरामुळे फळगळीचे नुकसान संभवते. पुनर्मोहर टाळण्यासाठी जिबरेलिक आम्ल (५० पीपीएम) ५० मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास फायदा होईल.
- काही केशर बागांमध्ये फळे गोटी ते अंड्याच्या आकाराची झालेली दिसून येत आहे. अशा ठिकाणी ताबडतोब प्रति झाड ६० ते ८० लिटर पाणी दर १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. त्याचा फळांचे आकारमान वाढ व फळगळ टाळण्यासाठी फायदा होईल.
- ज्या बागांमध्ये आता मोहर बाहेर पडत असेल, अशा बागाईतदारांनी संपूर्ण मोहर बाहेर पडून फळे बाजरी आकाराची होईपर्यंत बागेस पाणी देण्याची घाई करू नये. अन्यथा नुकसान होवू शकते.
- आंबा फळांची फळगळ टाळण्याकरिता २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) अधिक एनएए (२० पीपीएम) २० मिलिग्रॅम अधिक पोटॅशियम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे फायदेशीर ठरेल.
- आंबा बागेतील मोहरलेल्या फांद्या हळुवारपणे हलवाव्यात. चांगली फळधारणा होण्यास मदत होईल.
- येणाऱ्या काळात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान कलमांच्या प्रखर उन्हापासून संरक्षणासाठी प्रयत्न करावेत. तसेच कलमांवर येणारी फूट वेळोवेळी काढून कलमास येणारा मोहर खुडून टाकावा. त्यामुळे आंबा कलमांची वाढ जोरदार होण्यास मदत होईल.
- नवीन लागवड केलेल्या केशर आंबा कलमांना वाढत्या वेगवान वाऱ्यामुळे जोड ढिला होण्याची शक्यता असते. अशा कलमांना ताबडतोब बांबूचा आधार देऊन कलमे सुतळीच्या साहाय्याने हळुवारपणे बांधावी .
Comments
Post a Comment