कोंबडीपालन
कडकनाथ कोंबडीपालन
देशी कडकनाथ कोंबडीपालनातून जाधवांनी मिळवले आर्थिक स्थैर्य
सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील धनंजय जाधव यांनी देशी व औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचे व्यावसायिक पालन यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे. सन 2011 च्या नोव्हेंबरमध्ये सुरू केलेल्या या उपक्रमातून त्यांचा या व्यवसायातील आत्मविश्वास उंचावला आहे.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करणाऱ्या भिल्ल आदिवासींकडे या कोंबड्या आढळतात. औषधी गुणधर्म व चविष्ट मांस यासाठी प्रसिद्ध असलेले कडकनाथ हे देशी वाण तसे दुर्मिळ आहे. उरुण इस्लामपूर येथील धनंजय जाधव यांच्या वाचनात "ऍग्रोवन'मध्ये प्रसिद्ध झालेली जळगाव येथील निखिल चौधरी यांच्या कडकनाथ कोंबडीपालनाची यशकथा आली. त्यानंतर त्यांनीही कोंबडीपालन सुरू केले.
पक्ष्यांच्या वयोमानानुसार जाधव यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. राहण्याच्या जागेखाली कोबा केला आहे. त्यावर भाताचा भुसा विस्कटला जातो. कोंबड्यांची विष्ठा त्यात मिसळते. आठवड्यातून एकदा स्वच्छ करून पुन्हा नवीन भुसा टाकला जातो. काढलेला भुसा बाजूला असलेल्या साठवणूक ठिकाणी एकत्रित केला जातो. त्याचा वापर स्वतःच्या शेतात खत म्हणून चांगल्या प्रकारे केला जातो. पोल्ट्री शेडच्या बाजूला रिकामी जागा आहे. या जागेभोवती दहा फूट उंचीची जाळी मारून घेतली आहे. सकाळी व सायंकाळी दोन तास या कोंबड्या मोकळ्या सोडल्या जातात. स्वच्छ हवा, खुल्या वातावरणाचा त्यांच्या वाढीस फायदा होतो.
कडकनाथचे औषधी गुणधर्म
या कोंबड्यांचे मांस काळसर असल्याने सुरवातीला या कोंबड्यांविषयी माहिती नसणाऱ्या ग्राहकांना ते आश्चर्य वाटते; परंतु त्याची चव चाखल्यावर ते हवेसे वाटू लागते. चविष्ट आणि आरोग्यालाही ते उपायकारक आहे. या मांसामध्ये हानिकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी, तर प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. या कोंबड्यांची अंडी "डाएट अंडी' म्हणून प्रसिद्ध आहेत.
व्यवस्थापन
जाधव सध्या सुमारे 1200 पक्ष्यांचे व्यवस्थापन पाहतात. कडकनाथ कोंबड्यांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्याने त्या रोगांना फारशा बळी पडत नाहीत. एक नर सरासरी पावणेदोन ते अडीच किलो वजनाचा भरतो. सातशे ते नऊशे रुपयांपर्यंत प्रति नग याप्रमाणे त्याची विक्री होते. जाधव यांनी नुकतेच हॅचरी यंत्र विकत घेतले आहे. एक हजार अंडी उबवण्याची त्याची क्षमता असून 21 दिवसांनी उबवण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
जाधव या व्यवसायातून महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांची उलाढाल करतात. एका पक्ष्यामागे 200 रुपये निव्वळ नफा राहतो. आपल्या कडकनाथ कोंबडीपालनाच्या विक्री व्यवस्थेसाठी जाधव यांनी विक्रीचे खास तंत्र वापरले. कडकनाथ कोंबड्यांच्या मांसाची वैशिष्ट्ये, त्यातील आरोग्यदायी घटक, त्याचे महत्त्व सांगणारी खास पत्रके काढून ग्राहकांत त्याबाबत आकर्षण निर्माण केले. ऍग्रोवन'मध्ये प्रसिद्ध जळगावच्या यशकथेच्या पानांच्या अनेक छायाप्रती (झेरॉक्स) काढून त्याही परिसरात वाटल्या.
धनंजय जाधव - 9673787444
देशी पिल्लेनिर्मिती व्यवसाय ठरतोय फायदेशीर
कुक्कुटपालन व्यवसायात एक दिवसाची पिल्ले खासगी कंपनीकडून घ्यावी लागतात. यामध्ये काही कंपन्यांची मक्तेदारी असल्याने ब्रॉयलरच्या एका पिल्लासाठी 22 ते 35 रुपये मोजावे शेतकऱ्याला मोजावे लागतात. पिल्ले खरेदीचा खर्च एकूण उत्पादन खर्चाच्या 25 टक्के होतो. त्यातही कंपन्या संकरित पिल्ले पुरवितात. गावरान कोंबड्यांच्या मांसाला तसेच अंड्याला प्रचंड मागणी आहे. परंतु मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. सुधारित गावरान कोंबड्यांचे उत्पादन घेण्यासाठी लातूरच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, अर्थात "आत्मा'मार्फत सन 2009-10 मध्ये हेमंत वैद्य यांनी आपल्या कुक्कुटगृहामध्ये अंडी उबवणी यंत्रणा उभी केली. शेतकऱ्याला परवडेल असे प्रति दिन 400 अंडी उबवणारे यंत्र हैदराबाद येथून 49 हजार 500 रुपयांना "आत्मा'ने खरेदी केले. या यंत्राला सातत्याने वीजपुरवठा करण्यासाठी जनरेटरही विकत घेतले. तसेच सुरवातीला सुवर्णधारा या सुधारित गावरान कोंबड्यांची अंडी बंगळूर येथील कर्नाटक पशू व मत्स्य पशुवैद्यकीय विद्यापीठाकडून खरेदी करण्यात आली. उबवणी यंत्रात ती उबवून पिल्लांचे व त्यानंतर कोंबड्यांचे संगोपन, त्यापासून अंडी व एक दिवसीय पिल्लांची निर्मिती व त्यांची विक्री असे चक्र विकसित करण्यात आले. या प्रयोगास सव्वा लाख रुपये खर्च आला
प्रयोगाचा झाला विस्तार :
मुरूड (जि. लातूर) येथील भीमराव आल्टे यांनी पशुसंवर्धन खात्याकडून माहिती घेऊन हैदराबाद येथून पाच हजार क्षमतेचे अंडी उबवणी कम हॅचर साडेतीन लाख रुपयांना त्यांनी विकत घेतले. प्रथम सुवर्णधारा पक्ष्याची अंडी उबवण्यास सुरवात केली. त्यानंतर एक दिवसीय पिल्लांची विक्री अन्य कुक्कुटपालकांना करू लागले. एका पिल्लाची किंमत 21 रुपये ठेवली. पिल्लांची मागणी वाढल्याने अंडी उबवणी यंत्राची क्षमता दहा हजार अंड्यांपर्यंत वाढवली असून यासाठी आणखी दोन लाख खर्च आला. आता ते "सुवर्णधारा'बरोबरच वनराज व कलिंगा ब्राऊन या जातींच्या अंड्यांपासून एक दिवसीय पिल्ले तयार करत आहेत. या पिल्लेनिर्मिती व्यवसायातून चांगला फायदा मिळत असून, गावरान सुधारित कोंबड्या पालन हा व्यवसाय ग्रामीण भागात वाढत आहे.
संपर्क - भीमराव आल्टे, 7507900085
सुधारित जातींच्या कोंबड्यांचे पालन हे पोल्ट्री फार्म असणारे, तसेच परसदारात कोंबडीपालन करणाऱ्यांसाठी फायद्याचे आहे. कलिंगा ब्राऊन व वनराज या जातीची अंडी व एक दिवसीय पिल्ले उस्मानाबाद व औरंगाबाद येथे विकत मिळतात. सुवर्णधारा व गिरिराज या कोंबड्यांची अंडी व एक दिवसीय पिल्ले अनुक्रमे बंगळूर व हैदराबाद येथे विकत मिळतात. सुधारित जातींपासून चांगला फायदा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्यास हरकत नाही.
डॉ. ए. डी. तेरखेडकर, पशुधन विकास अधिकारी, कुक्कुट प्रशिक्षण केंद्र, मुरूड (जि. लातूर).
संपर्क - 9273335436
गिरिराज कोंबडीपालनातून महिला झाल्या स्वावलंबी
सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील सौ. मनीषा चंद्रकांत शिंदे व सौ. वंदना मोहन देसाई या महिलांनी गिरिराज कोंबडीपालन व्यवसायातून स्वावलंबी बनण्याची किमया साध्य केली आहे. त्यांनी कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रातून गिरिराज कोंबडीपालन व्यवसायाचे सहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्या वेळी गिरिराज गावरान जातीच्या कोंबडीची 20 पिल्ले मोफत मिळाली. अन्य महिलेकडून वीस पिल्ले विकत घेत संगोपनाला सुरवात केली. अडीच महिन्याने पक्ष्यांची सव्वा ते दीड किलो वाढ झाल्यानंतर कराड व कासेगाव येथील आठवडा बाजारात हातविक्री केली. खर्च वजा जाता चार हजार 638 रुपये हाती आले. यातून व्यवसायातील आत्मविश्वास आणखीनच वाढला. किरकोळ दुरुस्त्या करून जनावरांचे शेड पिल्ले व मोठ्या पक्ष्यांचे संगोपन करण्यासाठी वापरात आणले. आता लहान पिल्ले आणल्यानंतर लगेचच 30 दिवसांनी दुसरी बॅच भरली जाते. या सातत्यामुळे व्यवसायातून दरमहा उत्पन्न सुरू आहे. त्यांच्या प्रमाणेच सौ. देसाई यांना प्रशिक्षणानंतर 40 पिल्ले मिळाली. त्यातील पाच पिल्लांची मर झाली. उर्वरित पिल्लांचे संगोपन करत हातविक्री केल्याने एका पक्ष्यास सरासरी 225 रुपये भाव मिळाला. यातून 11 हजारांचे उत्पन्न मिळाले. आता घराऐवजी स्वतंत्र शेड बांधून त्यात व्यवसाय सुरू केला असून शंभर पक्ष्यांच्या बॅच आणल्या जातात.
100 पक्ष्यांच्या बॅचमधून अडीच महिन्यांनंतर नऊ ते दहा हजारांचे उत्पादन हाती येते.
कोंबडीपालनातून दोघींच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. व्यवसायातून संसार चालवला जातो. त्यातून उरलेली रक्कम वैभवलक्ष्मी महिला बचत गटाकडे दिली जाते.
सौ. मनीषा शिंदे,
"वनराजा' कुक्कुटपालन फायदेशीर उद्योग
पुणे जिल्ह्यातील मावडी (ता. पुरंदर) या छोट्या गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वनराजा कोंबडीचे परसबाग कुक्कुटपालन सुरू केले आहे. यातून त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार तर दिला आहेच, शिवाय महिन्याला अंडी आणि कोंबडीविक्रीतील शिल्लक बाजूला काढून तीन लाखांहून अधिक खेळते भांडवलही जमविले आहे.
कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्याकडून गेल्या पाच-सहा वर्षांपासून अधिक मांस उत्पादनासाठी सशक्त वनराजा कोंबडीची पिल्ले या गटाला योग्य दरात उपलब्ध करून दिली जातात. बचत गटामार्फत वर्षातून दोनदा पक्ष्यांची नोंदणी "केव्हीके'कडे केली जाते. गटाच्या अध्यक्षा सरिता पोटे व त्यांच्या सहकारी महिला याबाबत म्हणाल्या, की गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन केल्याने पैशांची चांगली बचत होऊ लागली आहे. घरखर्चाला हातभार लागत आहे. एकत्रित पैसे जमविल्याने त्यातून अल्पदराने कर्ज मिळते. वनराजा कोंबडीपालन कमी भांडवलात करता येते. घराच्या बाजूलाच 40 ते 50 पक्षी सांभाळता येतात. ग्राहक घरी येऊन अंडी घेऊन जातात. या पैशांतून महिन्याचा घरखर्च सुटतो. आर्थिक मोबदला मिळतोच शिवाय घरच्यांसाठीही अंडी खाण्यास मिळतात, त्यामुळे घरच्या कुटुंबाच्या पोषणास मदत होते. परसबाग कुक्कुटपालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. थोड्या जागेत करता येतो. यातून आमचा आत्मविश्वास वाढला आहे. गटाच्या माध्यमातून पैशांच्या बचतीची सवय लागली, त्यातून कुटुंबाच्या गरजा भागविता येऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील अर्थकारण बदलण्यासाठी परसबाग कुक्कुटपालन हा अतिशय चांगला मार्ग आहे.
सध्या उन्हाळा जाणवत असून पाण्याची टंचाई भासू लागली आहे. महिनाभर पिण्याला पुरेल एवढेच पाणी आहे. त्यामुळे कोंबड्यांचा मोठा लॉट विकला आहे. ज्या महिलांकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी थोडेफार पक्षी ठेवले आहेत. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी "केव्हीके'कडे मे महिन्यात पक्ष्यांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. पाणी नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सरिता पोटे यांनी सांगितले.
वनराजा कोंबडीपालनाचे फायदे -
1) या कोंबड्या गावठी कोंबड्यांप्रमाणे दिसतात.
2) दुष्काळी वातावरणात एकरूप होतात.
3) रोगप्रतिकारक्षमता चांगली असते.
4) कोंबड्यांपासून मांस व अंडी भरपूर मिळतात. (एक कोंबडी वर्षभरात 160 ते 180 अंडी देते.)
5) या कोंबड्या अडीच ते तीन वर्षे सतत अंडी देतात, खुडूक बसत नाहीत.
"केव्हीके'विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्रामार्फत साधारणतः पुणे जिल्ह्यांत 35 गावांमध्ये परसातील कुक्कुटपालनाचे तंत्रज्ञान पोचले आहे. तसेच कोकणात पेण, रोहा आणि माणगाव या तालुक्यांत प्रत्येकी दोन गावांतही याचा प्रसार करण्यात आला आहे. वनराजा पक्ष्यांना मागणी वाढत आहे. प्रतिसाद चांगला मिळत आहे. उत्पादक साधारण चारशे ते पाचशे रुपयांना एक वनराजा नर पक्षी विकतो. मादी पक्षी अंड्यांसाठी ठेवले जातात. समजा 50 मादी पक्षी असतील तर दररोज 30-35 अंडी मिळतात. पाच रुपयाला एक अंडे विकले जाते. त्यातून दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. 50 पक्ष्यांसाठी खाद्यावर दररोज 30 ते 35 रुपये खर्च येतो.
- डॉ. रतन जाधव, 9422519193
🌾🌾🌾आधुनिक शेतीची कार्यपद्धति आणि यशोगथा🌾🌾🌾
Comments
Post a Comment