पुत्र व्हावा ऐसा
पुत्र व्हावा ऐसा
तो मुलगा म्हणजे एक चमत्कार आहे !
शालेय जीवनातच त्याने ठरवले होते की आयुष्यात आपण काय करायचे आहे ! त्याला इंजिनीअर, डॉक्टर,वकील, सीए असे रुळलेल्या मार्गाने जायचेच नव्हते तर त्याला पदार्थविज्ञान म्हणजे फिजिक्स मध्ये संशोधन करायचे होते. त्याचे पालक त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, अन् त्याने आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी आठवीपासूनच रात्रंदिवस मेहनत करायला सुरुवात केली. आणि.................
आणि बारावीनंतर फिजिक्स मध्ये संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या सिनसिनाटी विद्यापीठाने त्याला तब्बल ऐंशी हजार डॉलर्स म्हणजे अठ्ठेचाळीस लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली ! दहावीपर्यंत चक्क मराठी माध्यमात शिकलेल्या या मुलाला बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी एखाद्या परदेशी विद्यापीठाने इतक्या प्रचंड प्रमाणावर शिष्यवृत्ती देणे हा चमत्कार नाही तर दूसरे काय ?
ज्ञानेश प्रशांत कुलकर्णी हे त्या मुलाचे नाव ! साता-यातील सुप्रसिद्ध पी. कुलकर्णी क्लासेसच्या संस्थापक संचालिका सौ शुभांगी प्रशांत कुलकर्णी आणि कोकणातील एका प्रसिद्ध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत गणेश कुलकर्णी यांचा हा मुलगा ! हुशार मुले नेहमीच आपल्या आजुबाजुला वावरत असतात कारण आजची सम्पूर्ण पिढीच निसर्गाने तशी घडवली आहे. पण जीनियस विद्यार्थी कसा असतो हे पहायचे असेल तर तुम्हाला ज्ञानेशलाच भेटावे लागेल. ख्रिसमस च्या सुट्टीसाठी तो नुकताच भारतात आला होता तेंव्हा त्याला भेटायला गेलो. आणि त्याचा तेथील पराक्रम ऐकून वासलेला "आ" अजूनही मिटलेला नाही ! त्याच्या आईवडीलाना " ज्ञानेश " हे नाव ठेवताना त्याचा भविष्यकाळ दिसला होता की काय, देव जाणे ! पण अमेरिकेत गेल्यावर त्याने आपल्या अभ्यासू वृत्तीने विद्यापीठालाही जिंकून घेतले आहे. या ऐशी हजार डॉलर्स व्यतिरिक्त त्याने तेथील वेगवेगळ्या परीक्षा देऊन अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या आहेत. त्यामुळे पी. एच. डी. पर्यंतचा, राहण्या जेवण्या सहीतचा त्याचा सम्पूर्ण खर्च सिनसिनाटी विद्यापीठ उचलणार आहे.
आता तुम्ही म्हणाल की, असतो असा लाखात एखादा ! त्याला जमते असे पराक्रम करायला ! सगळ्यांना कसे जमावे ? अहो, आपल्या यादीच्या 'श्री' कारा खाली सगळे नकारच असतात. पण ज्ञानेशचे मात्र म्हणणे असे की अभ्यासू वृत्तीच्या कोणाही विद्यार्थी-विद्यार्थिनीला सातत्यपूर्ण प्रयत्नाने हे साध्य करता येऊ शकते. हे खुप काही अवघडही नाही आणि सहजसाध्यसुद्धा नाही ! जो अभ्यासाचा 'अभ्यास' करतो आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतो त्याच्याकडे किंवा तिच्याकडे असे यश स्वत:हून चालत येते !
अमेरिकेसारख्या देशात संशोधन करण्यासाठी आवर्जुन सर्व प्रकारचे पाठबळ दिले जाते. सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळेच असेल कदाचित्, सर्व शोध हे पाश्चिमात्य देशातच लागतात. विद्यार्थ्यांमधली संशोधक वृत्ती सतत जागृत असावी यासाठी एक पद्धतच निर्माण केली गेली आहे. त्या पद्धतीचा फ़ायदा ज्ञानेशने घेतला आणि स्वत:मधला शास्त्रज्ञ परिश्रमपूर्वक तयार करत आहे. जेंव्हा इतर सहाध्यायी इंटरनेटचा वापर गेम किंवा नवे चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी अथवा क्रिकेटची मॅच ऑनलाईन बघण्यासाठी करत होते तेंव्हा हा पोरगा तासन् तास जगभरातल्या विद्यापीठांचा सर्च मारत होता. संशोधनासाठी कोणते विद्यापीठ काय मदत करते, तेथे प्रवेश मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा असतात, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो, तो भारतात कुठे शिकवला जातो, आणि मुख्य म्हणजे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काय करावे लागते याचे संपूर्ण अध्ययन त्याने आणि त्याच्या पालकांनी केले. आणि शालेय जीवनामध्येच आयुष्याची दिशा ठरवून टाकली.
अमेरिकेबाहेरील विद्यार्थ्याना तेथे जर बीएस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स करायचे असेल तर 'सॅट' ही चार हजार गुणांची अतिशय अवघड परीक्षा द्यावी लागते. त्याचे सर्व मार्गदर्शन पुण्यात मिळते. तरीही स्वत्:चा अभ्यास स्वत्: करणे चांगले असे ज्ञानेशचे अनुभवाने बनलेले मत आहे. प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जासोबत नववी ते बारावी पर्यंतची शैक्षणिक प्रगती व इतर क्षेत्रातील कामगिरी यांची कागदपत्रे जोड़ावी लागतात. त्याहुन महत्वाचे म्हणजे शिक्षकांची अभिप्रायपत्रेही जोडणे गरजेचे असते. ही परीक्षा दोन विभागात होते. पहिल्या विभागात विद्यार्थ्याचे इंग्रजीचे सर्वंकश ज्ञान तपासले जाते. यात कोणत्याही विषयावर बारां गुणांचा निबंध लिहायला दिला जातो. व नंतर कोणत्याही एका वाक्याचा पंचवीस मिनिटांत विस्तार करायला सांगितला जातो. उर्वरित प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. इंग्रजी आणि गणित या विषयाला २४०० गुण असतात. दुस-या विभागात तुमच्या आवडीच्या दोन विषयाची प्रत्येकी आठशे गुणांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत ज्ञानेशने ४००० पैकी ३८७० गुण (यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्समध्ये २४००पैकी २४००गुण आणि इंग्रजी मध्ये १६००पैकी १४७० गुण ) मिळवले. या गुणांमुळेच तर विद्यापीठाने त्यांचे सर्वोच्च पॅकेज देऊ केले.
अमेरिकेतील शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर तर ख-या अर्थाने ज्ञानेशने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. त्याच्या बुद्धीची झेप पाहुन गणित हा विषय डबल मेजर म्हणून देण्यात आला. तसेच मायक्रो इकोनॉमिक्स, सायकॉलॉजी आणि इंग्रजी या विषयात तर त्याने पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्याच्या आवडत्या पदार्थविज्ञान या विषयात तर त्याला व्यक्तिगत संशोधन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सध्या तो अमेरिकेतील जगप्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ डॉ. फिलिप आर्जिरिस आणि डॉ. इस्पोसिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आंतरराष्ट्रीय विषयांवर काम करतो आहे. (येत्या काळात ज्ञानेशकडून संशोधन क्षेत्रातल्या मोठ्या संशोधनाची अपेक्षा करुयात!) त्यासाठी त्याला जादाची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. इतकेच काय पण विद्यापीठात ज्यूनियर्सना शिकविण्याची कामगिरीही ज्ञानेशवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्याला वेगळे मानधन मिळते. शियाय पुढील वर्षिसाठी विद्यापीठाने त्याला सप्लीमेंटल इंस्ट्रक्टर म्हणून पद दिले आहे आणि सिनसिनाटी विद्यापीठाचा भौतिकशास्त्राचा अंबॅसीडर म्हणून नेमणूक केली आहे. त्याने त्या देशात एवढे नाव कमावायला सुरुवात केली आहे की अनेक संस्थानी त्याला मानद सभासदत्व देऊ केले आहे.
एवढे मोठे यश मिळूनही ज्ञानेशचे पाय जमिनीवर आहेत. या यशाबद्दल आम्ही त्याचा सत्कार आयोजित करायचे ठरवले तर तो आणि त्याचे आईवडिल म्हणाले की सत्कार आमचा नको तर ज्ञानेशला बालवाडीपासून ज्या शिक्षकानी शिकवले त्यांचा सत्कार करुया कारण त्यांच्यामुळेच तो आज आहे ! आणि खरोखरच ते सर्व ६५ शिक्षक शोधून काढले आणि त्यांचा सत्कार ज्ञानेशच्या हस्ते केला.
हा लेख लिहिण्याचा उद्देश म्हणजे फक्त ज्ञानेशचे कौतुक करणे हां नसून तर ईतर विद्यार्थ्यांच्या मनात सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्फुल्लिंग जागवणे हा आहे. ज्ञानेश म्हणतो की बुद्धिमत्ता ही प्रत्येकात सारख्याच प्रमाणात आहे. ती कोणत्याही जाती-धर्माची बटीक नाही. फक्त त्या बुद्धिमत्तेचा वापर करता आला पाहिजे. पहिलीपासून ते बारावी पर्यन्त आपण फक्त मार्कांशीच लढतो. तो विषय मनापासून समजाऊनच घेत नाही. त्यामुळे आपण बाहेरच्या स्पर्धेत टिकत नाही. जगातली कोणतीही स्पर्धापरिक्षा ही बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावरच असते. त्यामुळे विषय मुळातून समजावून घेतला आणि तो इंग्रजीमध्ये व्यक्त करता आला तर असे यश मिळवणे तसे अवघड नाही. हा लेख वाचून एका जरी विद्यार्थ्याला वाटले की ज्ञानेशने आखून दिलेल्या मार्गाने आपण जाऊया तरी या लेखाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.
Comments
Post a Comment