कांदा बिज माहिती
कांदा बिज माहिती ♥प्रगतशील शेतकरी♥
आणि अधिकृत संपर्क क्रमांक
♥ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीजोत्पादनासाठी वापरता येतात.
कारण या कांद्यांना पाच ते सहा महिने विश्रांती मिळालेली असते, त्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात.
कांदा पीक बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे.
कंद लावल्यापासून ते फुलांचे दांडे निघेपर्यंत थंड हवामान हवे असते.
♥मधमाश्यांचा वापर केल्यास पराग सिंचन चांगले होऊन बीजोत्पादन चांगले होते.
पराग सिंचन चांगले झाले, तापमान चांगले राहिले, खते व पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले, तर बियांचे चांगले उत्पादन मिळू शकते.
♥फलधारणा ते बी तयार होण्याचा काळ एक ते दीड महिन्याचा असतो.
♥या काळात रात्रीचे तापमान 15 ते 20 अंश व दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर राहिल्यास वाढ चांगली होते व बी लवकर तयार होते.
♥पाणी नियोजन करताना जमिनीचा मगदूर व पिकाची वाढीची अवस्था यानुसार पाणी द्यावे.
कांदा बीजोत्पादन साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्यामुळे दोन पाळ्यांत आठ ते दहा दिवसांचे अंतर ठेवावे.
♥प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे.
कांदा पिकाची मुळे 15 ते 20 सें.मी. खोलीवर जातात.
तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते.
पाणी जास्त झाले, तर कंद सडतात व नांगे पडतात.
म्हणून हलक्या जमिनीत पाणी सहा ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे.
♥नोव्हेंबर ते जानेवारी या काळात थंडी असल्यामुळे पाण्याची गरज कमी असते.
या काळात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे.
♥फेब्रुवारी-मार्च या काळात फुलांचे दांडे निघून फलधारणा होते.
या काळात पाण्याचा अजिबात ताण पडू देऊ नये, म्हणून पाणी सात ते आठ दिवसांनी द्यावे. एप्रिल महिन्यात फलधारणा होऊन बी पक्व होते.
♥ठिबक सिंचन केल्यास बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते.
कांदा बीजोत्पादन पिकात वाळलेले गवत, गव्हाचा कोंडा किंवा भाताचे तूस याचे आच्छादन केले, तर पाण्याची बचत होते व तणांचा उपद्रव कमी होतो.
याशिवाय पाण्यातून विद्राव्य खते देण्याची सोय असल्यामुळे खतांचीदेखील बचत होते. कांदे लावल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी खुरपणी करावी.
♥जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण -
कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते.
दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही.
तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते.
♥अधिक माहिती करिता संपर्क - 02135 - 222026
कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे
संकलित!
Comments
Post a Comment