9 फेब्रुवारी - नित्यनेम करणे म्हणजे काय ?
९ फेब्रुवारी - नित्यनेम करणे म्हणजे काय ?
卐 नित्यनेम करणे म्हणजे सर्वकाळ नित्यात राहणे.
卐 आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत.
卐 नित्य जो परमात्मा त्याला विसरून, विषय जे अनित्य त्यांत पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात.
卐 आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही;
卐 म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे, म्हणजे त्याची सवय होते.
卐 जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो.
卐 नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंदबुवांनीच.
卐आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा.
卐 याकरिता गुरूआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे.
卐 गुरू सांगेल तोच नित्यनेम होय.
卐 त्याला शरण जावे.
卐 रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण, आणि शेवटी गुरूस अनन्यशरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे, आणि हाच त्याचा नित्यनेम होय.
卐 आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे.
卐 केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये; साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे.
卐 साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे.
卐 श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय.
卐 समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी.
卐 ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे.
卐 साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते.
卐 लोकेषणा, मान, फार घातक आहेत. मोठमोठे साधकसुद्धा त्यांच्यापायी अधोगतीला जातात.
卐 तसेच, पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात.
卐 जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात.
卐 भगवंताचा पाश हाच खरा पाश.
卐 तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचालाभ मिळवून देतो.
卐 जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये.
卐 पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सावध असावे.
卐 जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर "हे भगवंताचे देणे आहे" असेमनापासून समजावे.
卐 जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही, आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही.
卐 आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल.
卐 जाता-येता देवाला नमस्कार करावा, "राम, राम" म्हणावे.
卐 भगवंताचेप्रेम एकदा लागले की ते पुनः सुटणार नाही.
★भगवंताचा पाश हा पाशच खरा. पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो.
Comments
Post a Comment