गुंठ्यात पिकली एक टन मिरची ..

ज्योती रावराणे 🇮🇳प्रगतिशील शेतकरी 🏆

👉गुंठ्यात पिकली एक टन मिरची
 
कोकण आता पूर्वीसारखो राह्यलो नाय...पुण्या, मुंबईतसून येणाऱ्या मनीऑर्डरकडं डोळं लावान आता इथली माणसा बसनत नाय. मातयेत राबताना नवनवं प्रयोगही कराक लागलीत. माड, काजी, आंब्याचं बागा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात आता चांगलोच पैसो खुळखुळाक लागलो आसा. बागायती नसली तरी मालामाल करणारी माती आहे, याची पक्की खात्री आता शेतकऱ्यांना झालीय. चिपळूणच्या ज्योती रावराणे यांनी आपल्या 10 गुंठे शेतीत मिरचीची लागवड केली. अभिनव पद्धत अवलंबल्यानं त्यांना गुंठ्यात एक टन याप्रमाणं दहा टन उत्पन्न मिळालंय. हा आकडा ऐकून भल्याभल्यांना ठसका लागलाय. त्यातूनच बरेच जण आता त्यांची शेती पाहण्यासाठी येतात.

👉मिरची उत्पन्नाची परिभाषाच बदलली
कोकणात शेती करणाऱ्यांची संख्या आता हळूहळू का होईना, पण वाढू लागलीय. त्यात आंबा, काजू, सुपारी, माड यांच्या पारंपरिक लागवडीबरोबरच भाजीपाला, कलिंगड, मिरची, यांचं प्रमाण मोठं आहे. चिपळूणमधील (जि. रत्नागिरी) ज्योती रावराणे यांनी तर पॅथेलॉजीचा व्यवसाय सांभाळून शेतीत पाऊल टाकलं. सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या छोट्या जमिनीच्या तुकड्यात राबताना आधुनिकतेची कास धरली. त्यांना मिरचीच्या सितारा या जादा उत्पन्न देणाऱ्या जातीची माहिती मिळाली. मग त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर त्याची दहा गुंठ्यांत लागवड केली. आतापर्यंत त्यांना दहा टनांपर्यंत उत्पन्न मिळालंय. शेतीत सर्वसाधारणपणं उसाच्या उत्पन्नासाठी टनाचा वापर होतो. पण त्यांनी गुंठ्यात मिरचीचं एक टन  उत्पन्न मिळवून मिरची उत्पन्नाची परिभाषाच बदलून टाकलीय.

👉लहानपणापासून आवड
ज्योती रावराणे यांना शेतीची लहानपणापासून आवड होती. वडिलांकडूनच त्यांनी शेतीचे धडे गिरवले आणि लग्नानंतर सासऱ्यांनी आणि पतीनं त्यांना शेती व्यवसायात उतरण्यास प्रोत्साहन दिलं. त्यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या जागेतच आधुनिक पद्धतीनं शेती करायचं ठरवलं. त्यांच्याकडे असलेल्या 10 गुंठे जागेत मिरचीची लागवड केली आणि भरघोस उत्पन्न मिळवलं. जसं उत्पन्न वाढू लागलं तसं शेतीमध्ये मला अधिक रस येऊ लागला, अशी भावना ज्योती रावराणे यांनी व्यक्त केली.

👉कमी भांडवलात होते मिरचीची शेती
मिरचीच्या लागवडीत फार काळजी घ्यावी लागत नाही. भांडवलही जास्त लागत नाही. एकटी व्यक्तीही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून मिरचीचं उत्पादन घेऊ शकते. सितारा मिरचीचं बियाणं कृषी विभागाकडून देण्यात आलं. डिसेंबरमध्ये लागवड करण्यात आलेली ही मिरची मे महिन्यापर्यंत उत्पादन देते. सितारा मिरची चवीला एकदम तिखट नसली तरी अगदी फिकटही नाही. दिसायला अत्यंत सुंदर आणि लांबलचक अशी ही मिरची असते. रोपं, ओषधं, खतं, ठिबक सिंचन सामग्री आणि मिरची काढण्यासाठीच्या मजुरी असा मिळून ज्योती रावराणे यांना दहा गुंठ्यांसाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च आला. पण 10 गुंठ्यांमध्ये 10 टनाचं उत्पन्न मिळालं. घाऊक बाजारपेठेत मिरचीला 25 रुपये किलोचा दर सहज मिळतो. म्हणजे फक्त दहा गुंठे जागेत व्यावसायिक पद्धतीनं मिरचीची लागवड केल्यानंतर त्यांना अडीच लाखांचं उत्पन्न मिळालं. याचाच अर्थ असा होतो की, तुम्ही एकरात मिरचीची लागवड केली तर आठ लाखांचे धनी सहज होऊ शकता.

👉मिरचीला वाढती मागणी
मिरची ही जेवणात दर दिवशी लागणारी गोष्ट आहे. त्यामुळं ही मिरची मुंबई-पुण्याच्या मार्केटमध्ये पाठवण्याची वेळ ज्योती रावराणे यांच्यावर आली नाही. स्थानिक बाजारपेठेतच त्यांच्या मिरचीला चांगली मागणी आहे. गावचीच मिरची असल्यामुळं चिपळूण, गुहागरचे भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक किंवा ज्यांच्या घरात लग्नकार्य असेल त्यांच्याकडून ही मिरची उचलली जाते.

👉परसबागेतूनही मिळू शकतं उत्पन्न
स्वत:च्या मालकीची जमीन असेल तर ती न विकता त्या जागेत तुम्हाला घरात लागतात तेवढ्या भाज्या तुम्ही केलात तर घराची गरज भागवू शकता आणि दोन पैसेही मिळू शकतात, असा सल्ला त्यांनी परिसरातील महिलांना दिला आहे. महिलांकडे थोडी जास्तीची जमीन असेल तर त्यांनी व्यावसायिक शेतीत उतरावं, असं आवाहनही ज्योती रावराणे यांनी केलं आहे.

👉राज्यभरातील शेतकरी देतायत भेटी
कोकणातल्या लाल मातीत एका गुंठ्यात एक टन मिरची पिकवण्याची किमया ज्योती रावराणे यांनी साधलीय. इथल्या महिला शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरत आहे. त्यांची ही यशोगाथा पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक शेतकरीही त्यांच्या मळ्याला भेट देण्यासाठी येतात आणि भरघोस उत्पन्नाचा ठसका घेऊनच माघारी जातात.

संग्रहित ।

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!