नवग्रह स्तोत्र मराठी अर्थ
नवग्रह स्तोत्र मराठी अर्थः
१) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.
२) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.
३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.
४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.
५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.
६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.
७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.
८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.
९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.
१०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.
११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.
१२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.
अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.
Comments
Post a Comment