मौल्यवान पाणी आणि मानवी दुर्लक्षीता ...
मौल्यवान पाणी आणि मानवी दुर्लक्षीता♥प्रगतशील शेतकरी♥
♥उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईवर सर्वत्र चर्चा झडू लागतात. मुळात सर्वच ऋतूत पाणी व त्याच्या वापराबाबत आपण गंभीर असतो का? कळत-नकळत आपण पाण्याचा सर्रास गैरवापरच करीत असतो, पण ते लक्षात येत नाही. पाण्याचा वापर आणि मानवी वृत्ती या अनुषंगाने पाणीप्रश्नाचा घेतलेला हा वेध.
♥जाहिरातीचा परिणाम अत्यल्प
दुष्काळी स्थितीचे विदारक चित्र.. एकेक थेंब टिपणारा तहानलेला पक्षी.. दाढी करताना मध्येच नळाचे पाणी बंद झाल्याने चिडलेला तरुण.. अशा जाहिराती दाखवून पाणी वाचविण्याचा संदेश प्रसिद्धी माध्यमातून दिला जात असला तरी, अशा जाहिरातींचा समाजमनावर फारसा परिणाम होत नसल्याचे पाहणीअंती लक्षात आले. पाणी बचतीबद्दल जनजागृती शासकीय पातळीवर, तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत केली जात आहे. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी, पोस्टर्स, बॅनर्स, वह्य़ा-पुस्तकांचे कव्हर यावरही ‘पाणी हे जीवन आहे’ असा संदेश दिला जातो आहे, परंतु मुबलक पाणी मिळणाऱ्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य दाखविणाऱ्या आणि भविष्याची काळजी वाहणाऱ्या जाहिरातींचा परिणाम मात्र नगण्य आहे. जाहिरातक्षेत्रातील आणि सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या मतांमध्ये भिन्नता आहे, तरीही पाणी बचतीच्या जाहिरातीबाबत जवळजवळ एकवाक्यता आहे. नागपूरसारख्या ठिकाणी पाणी भरपूर आहे. महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्याला येथे पर्याय आहे. ज्या लोकांनी आयुष्यात कधी दुष्काळच बघितला नाही त्यांच्यावर पाण्याची बचत करण्यास सांगणाऱ्या जाहिरातीचा प्रभाव पडत नाही. जाहिरात बघताना पाणीटंचाईवर चर्चा होते, पण तेच लोक दाढी करताना, भांडी धुतांना, आंघोळ करताना पाण्याचा बेसुमार वापर करीत असतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या किंवा त्याकडे कल असणाऱ्यांवर अशा जाहिरातीचा परिणाम होतो. उलट, लहान मुलांवर होताना प्रभाव दिसतो, परंतु कुटुंबातील इतर मोठय़ा सदस्यांकडून होत असलेली पाण्याची नासाडी अंगवळणी पडून त्यांच्यावरील जाहिरातीचा परिणाम फार काळ टिकत नाही, असे जाहिरातक्षेत्रातील तज्ज्ञ राणी शिरपूरकर यांचे म्हणणे आहे. नळाला २४ तास पाणी न देता, एका मर्यादित वेळेत पाणी पुरवठा केल्यास, वाचवून वाचवून पाणी वापरण्याची सवय लागेल, तसेच एका विशिष्ट मर्यादेपलिकडे पाण्याचा वापर होत असल्यास त्यावर अनेक पटीने दर आकारल्यास पाण्याच्या योग्य वापराकडे लोक वळतील. लोकांना पैशापेक्षा पाणी स्वस्त वाटते. तेव्हा पाण्याच्या अपव्ययाला जबाबदार धरून त्यांच्या खिशातून पैसे वसूल केल्यास अशा गोष्टींना निश्चितच आळा बसेल, असे सामाजिकक्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे.
♥शिळे पाणी.. ताजे पाणी..
पाणी रोजच्या जगण्याचाच नव्हे, तर आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. असे असतानाही आपल्या लेखी तो फारच दुय्यम, दुर्लक्षित विषय आहे. पाण्याविषयीची मनातील भावना तपासून पाहिली तर पाण्याविषयी पाहिजे तेवढा आदर, कृतज्ञता कुणीही बाळगत नसल्याने पाणी सहजतेने फेकले जाते. नळाला पाणी आल्यावर फारच बेफिकिरीने आदल्या दिवशीचे पाणी शीळे झाले म्हणून फेकून दिले जाते. खरेच शिळे पाणी असते का? ते फेकावे का? ते पुन्हा ताजे करता येते का? ताजे पाणी कोणते? या प्रश्नांची उकल नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी केली आहे.
शिळ्या पाण्याची संकल्पना परंपरेतून आलेली आहे. ताजे पाणी म्हणजे नळाला आलेले पाणी, अशी आपल्याकडची समजूत. म्हणजे ते वापरण्याजोगे, पिण्याजोगे असल्याचे आपले मनच सांगते, पण ताजे पाणी एकच. पावसाचे. बाकी सर्व पाणी शिळेच असते. शिळे पाणी म्हणजे ज्याचा वास येतो, असे पाणी. लाखो वषार्ंपासून जमिनीत मुरलेले पाणी तेही शिळेच. नदी, नाले किंवा विहिरीतले पाणी तेही शिळेच. शिळे अन्न म्हणजे खराब झाले असावे, या भावनेतून आधी आपण त्याचा वास घेतो. तसेच पाण्याचे. पाण्याला वास यायला लागला म्हणजे त्यात हमखास जीवाणूंची उत्पत्ती झाली, असे समजावे. वास येणे म्हणजे विज्ञानाच्या भाषेत त्यात काही जैविक पदार्थांवर जीवाणूंचा अधिवास असल्याचे अधोरेखित होते. अन्न एकदा खराब झाल्यावर ताजे करता येत नसले तरी शिळ्या पाण्याला ताजे करता येतं. कारण, पाणी शिळे असो की ताजे, त्यातील एकमेव घटक ‘एचटूओ’च राहणार. मात्र, अन्नाचे तसे नसते म्हणून ते ताजे करता येत नाही. कारण, त्यात प्रथिने, काबरेदके आदींचे ‘पॉलिमर’ विभक्त झालेले, तुटलेले असतात. ते पुन्हा जोडणे शक्य नसते. म्हणून विटलेले अन्न आपल्याला फेकावे लागते.
मात्र, पाण्याला ताजे करून त्याचा पुनर्वापर शक्य आहे. पाणी स्वच्छ होईल, असे त्यात काहीही टाकून पाणी ताजे करता येते. पाण्यावर तुरटी फिरवणे किंवा क्लोरिनसारखा एखादा दुसराही घटक टाकून पाणी शुद्ध म्हणजे पिण्याजोगे, वापरण्याजोगे करता येते. आदल्या दिवशीचे पाणी फेकून भांडे किंवा पिंप आतून धुणे योग्यच. कारण, आतल्या बाजूला चिकटपणा घालवायचा असतो, पण केवळ शिळे पाणी म्हणून ते फेकून देण्यापेक्षा त्याला ताजे करून पाणी वाचवणे योग्य नव्हे का?
♥श्रद्धा-अंधश्रद्धा
अन्न-वस्त्र-निवारा या माणसांच्या गरजा आहेत, असे आपण मानत असलो तरी पाण्याचे महत्त्व त्याहून अधिक आहे. पाण्याची बचत करा, अशी जनजागृती केली जात असली तरी पूर्वी घरातील नळ गळका असला आणि त्यातून सतत पाणी पडत असेल तर ते चांगले लक्षण नसल्याचे बोलले जात होते. आता त्यामागे पाण्याविषयीची श्रद्धा होती की अंधश्रद्धा, हा चर्चेचा विषय आहे.
मानवी जीवनात पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. धार्मिक जीवनात, संस्कारात पाण्याचे मोठे स्थान आहे. पाणी नसेल तर अन्नधान्य नाही, दूध नाही. जसे कापसाशिवाय वस्त्र नाही, तसे घर बांधणीसाठी पाणी हवेच. पूजाविधी आदी कार्य पाण्याशिवाय होऊच शकत नाही. घरात पाणी वाया जात असेल तर ते अशुभ मानले जात होते. काही वयोवृद्ध महिलांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, साधारणत घरातील नळ गळका असल्यावर त्यातून टप टप पाणी पडत असेल, तर घरी दारिद्रय़ येते, असे म्हणतात. त्यामुळे ते लगेच दुरुस्त केले जात होते. शिवाय, घरातील दररोज पाणी भरण्याचे भांडे सुद्धा ते रिकामे ठेवले जात नव्हते. त्यामुळे घरात पाणी भरपूर असले तरी भांडे पाण्याने भरून ठेवण्याची पद्धत होती. आंघोळीच्या आधी पाणी भरून ठेवणे चांगले लक्षण नाही. जोपर्यंत आंघोळी होत नाही तोपर्यंत पाणी भरायचे नाही. कधी कधी सकाळी नळाला पाणी राहत नसल्यामुळे सायंकाळी नळ आला की पाणी भरत असत. सायंकाळी भरलेले पाणी दुसऱ्या दिवशी वापरायचे नाही. त्यामुळे ते पुन्हा सकाळी फेकून देणे आणि पुन्हा नव्याने पाणी भरून ठेवले जात होते. सोवळ्याचे पाणी भरताना सुद्धा कटाक्ष होता. सोवळे घालून ते भरले जात होते. त्या पाण्याला कोणाचा हात लागणार, याचीही काळजी घेतली जात होती. त्यामुळे सुरक्षित अशा ठिकाणी ते ठेवले जात होते. विशषेत धार्मिक सणाला हे आजही अनेक घरी पाळले जात असल्याचे चित्र दिसून येते. पूर्वी महालक्ष्मीचे जेवण झाल्यावर हात धुताना ते घराबाहेर एक खड्डा करून त्यात धुवावे लागत होते. हाताला लागलेले अन्नकण बाहेर जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता.
दररोज घराच्या समोर असलेल्या अंगणात सडासंमार्जनासाठी पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात होता. दिवसातून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, अशा तीन वेळा सडा टाकला जात होता. पावसाळ्यात सुद्धा अंगणात सडा हा पडला पाहिजे, असा आग्रह होता. पर्यावरणाच्या दृष्टीने घरोघरी तुळस असणे आवश्यक असले तरी त्याचा पाण्याशी संबंध आहे.
ज्याच्या घरी तुळस फुललेली, त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा राहत नाही, असे म्हणतात. त्यामुळे घरी तुळस असलीच पाहिजे, असा आग्रह केला जायचा. काळानुरूप आता अनेक बदल झाले आहेत. तरीही काही ठिकाणी जुन्या चालीरिती आणि परंपरा आजही टिकून असल्यामुळे घरोघरी त्याचे पालन केले जात असल्याचे दिसून येते.
♥पाणी मुरवावेच लागेल
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यातील संकट टाळा’ अशा घोषणा दिल्या जात असल्या तरी त्याला सिमेंटीकरणामुळे त्याला हरताळ फासला जात आहे. जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजलसाठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून असतात. पाऊस चांगला झाल्यास धरणे, शेततळे व तलाव, तसेच पाणी जिरल्यामुळे भूजलसाठय़ात वाढ होते, परंतु सध्या पाणीच साठवून राहात नाही, त्यामुळे भूगर्भात पाणी साठून राहात नसल्याचे पाणी तज्ज्ञांचे मत आहे.
ठराविक असलेल्या जमिनीवर दिवसेंदिवस घरे, इतर इमारती, सिमेंट व डांबरी रस्ते बांधण्यात येत असल्याने जमीन कमी होत आहे. परिणामी, जमिनीत पाणी मुरत नाही. घराचे अंगणही आता रस्त्यासोबतच सिमेंटचे होत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी जिरण्यापेक्षा वाहून जाते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. त्याचे परिणाम मात्र आता दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे घराच्या अंगणाचे सिमेंटीकरण तर करायचे, पण पाणी साठवण्यासाठी काही उपाययोजना केली पाहिजे, या कल्पनेतून अंगणातील कोपऱ्यात काही जागा शिल्लक ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे घराचे अंगण, कार्यालयापुढील जागा, लॉन, उद्यानात टाईल्स लावताना दोन टाईल्समध्ये अंतर सोडले जाते. ही बाब चांगली असली तरी त्याचे प्रमाण फारच अल्प दिसून येते.
ग्रामीण भागातही आता प्रत्येक गावातील रस्ते सिमेंटने बांधले जात आहेत. मातीच्या अंगणाऐवजी सिमेंटचे अंगण बघावयास मिळत आहे. त्यामुळे जेथे कधीच पाण्याची टंचाई जाणवत नव्हती, अशा गावातही पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पावसाचे पाणी भूगर्भात न जिरता ते वाहून जात असल्याने केवळ १ टक्का पाणीसाठा भूगर्भात आहे. त्यामुळे त्याचा पुढील काळात व्यवस्थित वापर न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहे. एका अंदाजानुसार २०२५ पर्यंत देशात पाण्याची समस्या बिकट होणार आहे. भविष्यकाळात पावसाच्या पाण्याचे व छतावरील पाण्याचे पुनर्भरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे मात्र निश्चित.
♥हॉटेल्स अन् उद्योगही मागे नाहीत
पाण्याचा सर्वाधिक दुरुपयोग कुठे होत असेल तर तो फाईव्ह स्टार, थ्री स्टार आणि आता तर अगदी लहानलहान हॉटेल्समध्येसुद्धा! फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार हॉटेल्समध्ये भांडी धुण्यासाठी डिशवॉशरचा उपयोग केला जातो. हातानी भांडी घासली तर जितके पाणी लागते त्याहून दुपटीने पाणी या डिशवॉशरमध्ये लागते. येथील सिंकमध्ये सतत पाणी सुरू राहते. हॉटेल्समध्येच अलिकडे लाँड्री ही संकल्पना रुजली आहे. यातही लागणारे पाणी हे पूर्वी धोबीघाटावर धुतल्या जाणाऱ्या कपडय़ांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा दुपटीने लागते. तीच स्थिती औद्योगिकरणातही आहे. औद्योगिकरणात पाण्याचा अमाप वापर केला जातो. एक हजार घरांना जेवढे पाणी लागते, तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक पाणी एका कारखान्याला लागते. पाण्याच्या गैरवापरात शासकीय कार्यालयेसुद्धा तेवढीच आघाडीवर आहेत. उपराजधानीत शीतगृहांमध्येसुद्धा पाण्याचा मोठय़ा प्रमाणात कोणत्याही सक्षम यंत्रणेची परवानगी न घेता गैरवापर होत आहे. पाण्याच्या व्यावसायिक वापराबद्दल सुमारे २१ शीतगृहांना नोटिसासुद्धा बजावण्यात आल्या आहेत. हा झाला घराबाहेरचा भाग, पण घरातून वाया जाणाऱ्या पाण्याचे काय? घरांची जागा आता पाच-सहा घरे मिळून असणाऱ्या उंच इमारतींनी घेतली आहे. यातील १०० इमारतींपैकी किमान ७० टक्के इमारतींमध्ये दररोज सकाळी पाणी वाया जाते. पंप सुरू करून टाकी भरण्याची जबाबदारी प्रत्येक घराने वाटून घेतली असते खरी, पण ते जबाबदार घर पंप बंद करण्यास विसरले असेल, तर दुसरे घर ते बंद करण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे हमखास सकाळी या ७० टक्के इमारतींवरून टाकी भरून पाणी खाली वाहत असल्याचे दृश्य दररोजचे आहे. लग्नसमारंभ, तसेच कार्यक्रमस्थळी बिसलेरीच्या २०-२० लिटरच्या कॅन्स भरून ठेवतात. या ठिकाणीसुद्धा हीच स्थिती कायम आहे. पाणी पेल्यात भरल्यानंतर मागचा येईल म्हणून कुणी ते भरण्याची तसदी घेत नाहीत आणि कॅनचा नळ तसाच सुरू राहतो. त्यामुळे या २० लिटरच्या कॅनमधून किमान पाच लीटर पाणी वाया जाते.
विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे पासबुक
एका व्यक्तीची दररोजची पाण्याची गरज ही किमान १०० ते कमाल १२० लीटर इतकी आहे. धावते पाणी रांगते करा, रांगते पाणी थांबते करा आणि थांबते पाणी जिरते करा. आज प्रत्येकाने या त्री सुत्रीचा वापर केला तर वैयक्तिक पातळीवर तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. या त्री सुत्रीचा वापर करण्यासाठी आधी महिलांना शिक्षित करावे लागेल. कारण, त्यानंतरच त्या संपूर्ण घराला शिक्षित करू शकतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ व ‘पर्यावरण प्रथम’ या संस्थेचे संस्थापक अपरूप अडावदकर यांनी सांगितले. पारंपरिक पद्धतीत राजेमहाराजांच्या काळात अमाप विहिरी होत्या आणि इतरांसाठी त्या पाण्याचे स्त्रोत होत्या. मात्र, राजेमहाराजांसोबतच त्या विहिरींचेही दहन झाले, असे म्हटले तर हरकत नाही. जल हे जीवन आहे, असे मोठय़ा अभिमानाने म्हटले जाते. पाण्याविषयीची बेफिकिरी वृत्ती पाहिल्यानंतर पाण्याची स्थितीही पेट्रोलसारखीच होणार आहे. त्यामुळे लहान मुलांना जशी निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख करून दिली जात आहे, तशीच ओळख आता त्यांना पाण्याविषयीचीसुद्धा करून द्यावी लागणार आहे. त्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे पासबुक ही संकल्पना राबवणे अत्याधिक गरजेचे आहे. यात दररोज मुले त्यांनी किती पाण्याचा किती वापर केला आणि किती पाणी वाचवले, याची नोंद करतील आणि या नोंदीतूनच ते पाणी बचतीविषयी शिकतील, असेही अपरूप .
♥पाणी कर वाचवायचा तर..
पावसाचे पाणी हा खरे तर पाणीटंचाईवरचा एक उत्तम उपाय आहे. मात्र, आपण या पावसाच्या पाण्याकडे दुर्लक्ष करतो आणि पावसाचे स्वच्छ पाणी वाया घालवतो. पाण्यासाठी महापालिकेला कर देऊन एकप्रकारे पाणी विकत घेतो. हल्ली सगळीकडेच मोठमोठय़ा इमारती आहेत आणि त्यावरील टेरेसदेखील मोठे आहे. पावसाचे पाणी त्या टेरेसवर अडवून पाईपच्या माध्यमातून ते जमिनीत साठवता येऊ शकते. त्यासाठी जमिनीखाली एक मोठे टाके तयार करावे लागेल. पावसाचे पाणी या पद्धतीने जमिनीमधील टाक्यात साठवले तर वर्षभरात किमान १२०० चौरस फुटाच्या टेरेसमधून एक लाख लीटर पाणी मिळू शकेल. चार फ्लॅट मिळून एक इमारत असेल तर किमान तीन हजार चौरस फुटाचे तरी टेरेस असते. त्यातून पावणे तीन लाख लीटर पाणी साठेल आणि वर्षांतून तीन महिन्याची पाण्याची गरज भागवता येईल. एका अर्थी सरकारच्या १५ टक्के पाण्याची बचत आपल्याला करता येईल. हे १५ टक्के पाणी आपल्याला महापालिकेकडून विकत घ्यावे लागणार नाही. यात सरकारचाही फायदा आहे आणि आपलाही! टाकीपर्यंत हे पाणी पोहोचवून ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेला जेवढी वीज लागते, ज्या विजेचा खर्च वाचवता येईल. त्याच वेळी नागरिकांना पाण्यासाठी जो कर द्यावा लागतो, त्यातही बचत करता येईल. पाण्याचा गैरवापर करून या पद्धतीने पाण्याचे संवर्धन केले तर पुढे कधी पाण्याची कमतरता भासणार नाही.
संकलित!
Comments
Post a Comment