हुमणी किडीचा जीवनक्रम, नुकसानीचे स्वरुप आणि एकात्मिक नियंत्रण
हुमणी किडीचा जीवनक्रम,
नुकसानीचे स्वरुप आणि एकात्मिक नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी♥
♥हुमणी :-
आपल्या भागात दोन प्रकारच्या हुमणी आढळतात.
नदीकाठच्या भागात लिकोफोलिस ल्युटिडोफोरा आणि माळ भागात होलोट्राकिया ही हुमणीची प्रजाती दिसून येते.
कोल्हापूर जिल्ह्यात हुमणीची नवीन प्रजाती फायलोग्यथस डायोनासिस दिसून आली आहे.
याचे भुंगे होलोट्राकियापेक्षा लहान आहेत, नर भुंग्याला गेंड्यासारखे शिंग आहे.
♥जीवनक्रम :-
१) वळवाचा किंवा मॉन्सूनपूर्व पाऊस साधारणतः ६० ते ७० मि.मी. पडला, की हुमणीचे भुंगे जमिनीतून सायंकाळी साधारण ६.४५ ते ८.१५च्या दरम्यान बाहेर पडतात आणि नजीकच्या कडुनिंब, बाभळ, बोराच्या झाडांवर जातात.
२) नर आणि मादीचे तेथेच मिलन होते. मिलनानंतर नर लगेच मरतो, मादी जमिनीत अंडी घालते.
३) एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. त्या वेळी जमिनीत पिके नसतात; पण सेंद्रिय खत मिसळलेले असते. अंडी साधारणतः १५ ते १८ दिवसांनी उबतात. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, नंतर ती पिकाच्या मुळांकडे वळते.
४) अळीच्या तीन अवस्था आहेत. पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस आणि तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते.
५) पूर्ण वाढ झालेली हुमणीची अळी जमिनीत ७० सें.मी. खोल कोषावस्थेमध्ये जाते. २० ते २२ दिवस ही कोषावस्था असते.
त्यानंतर भुंगा बाहेर पडतो.
पाऊस पडल्यानंतर हे भुंगे पुन्हा बाहेर पडतात.
साधारणपणे एक पिढी पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो.
♥नुकसानीचे स्वरूप :-
१) हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ आणि त्यानंतर पिकाची मुळे खाते, त्यामुळे पिके वाळतात.
२) हुमणी भात, भुईमूग, सोयाबीन, उसाचे नुकसान करते.
३) मुळे नष्ट झाल्यामुळे रोप किंवा ऊस वाळतो. भात, भुईमूग आणि सोयाबीन वाळते.
४) सध्याच्या परिस्थितीमध्ये हुमणीचा आडसाली उसामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
♥नियंत्रणाचे उपाय :-
१) हुमणीने केलेल्या नुकसानीचे स्वरूप लक्षात घेता उभा ऊस किंवा खोडव्यामध्ये पहारीने उसाच्या बुंध्यालगत खड्डा काढावा.
२) ४० मिलि क्लोरपायरिफॉस १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत तयार केलेल्या खड्ड्यात या द्रावणाची आळवणी करावी किंवा एकरी १० किलो फोरेट (१० जी) किंवा १० किलो फीप्रोनिल (दाणेदार) हे १० किलो मातीत मिसळून कच्च्या घातीवर टाकावे.
३) नुसते सरीतून कीटकनाशक सोडून हुमणीचे नियंत्रण होणार नाही. कारण, हुमणी ही बोधात असते. त्यामुळे उसाच्या बुंध्यालगत केलेल्या खड्ड्यात या कीटकनाशकाच्या द्रावणाची आळवणी करावी.
♥एकात्मिक नियंत्रण :-
१) वळवाचा पाऊस पडल्यावर (मार्चपासून मेपर्यंत) हुमणीचे भुंगे एकाच वेळी बाहेर पडून बाभूळ, कडुनिंबाच्या झाडावर जमा होतात. काठीच्या साहाय्याने फांद्या हलवून भुंगे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
२) अळी सुरवातीला सेंद्रिय पदार्थावर जगते. तेव्हा, खरीप हंगामात जमिनीत शेणखत मिसळताना त्यात २५ किलो मेटारायझम ॲनिसोफिली किंवा बिव्हेरीया बॅसियाना बुरशी मिसळावी. हे मिश्रण एक हेक्टर जमिनीत मिसळून द्यावे.
संकलित!
Comments
Post a Comment