आंबा लागवडीचा प्रथमच ‘इस्त्रायली’ प्रयोग अनुभव

आंबा लागवडीचा प्रथमच ‘इस्त्रायली’ प्रयोग अनुभव♥प्रगतशील शेतकरी♥

♥कोकणात प्रथमच इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करीत घन पद्धतीने आंबा लागवड करण्याचा प्रयोग देवगड तालुक्यातील वाघोटनच्या कातळावर यशस्वीपणे करण्यात आला आहे. देवगड येथील प्रगतशील आंबा बागायतदार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जनार्दन तेली यांनी हा प्रयोग केला आहे. अवघ्या अर्ध्या एकरात तब्बल 300 केसर जातीच्या आंबा रोपांची लागवड करण्यात आली असून लागवड केल्यानंतर अवघ्या तिसऱया वर्षीपासून आपण उत्पादन घेण्यास निश्चितपणे सुरुवात करणार असल्याचा विश्वास तेली यांनी व्यक्त केला आहे.

♥शेती तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या इस्त्रायल देशाचा आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी, शेतकऱयांनी दौरा केला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पिक घेण्यासाठी इस्त्रायल हा देश संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कोकणातूनही अनेक शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकऱयांनी इस्त्रायलला भेटी दिल्या. परंतु ते तंत्रज्ञान कोकणात आणण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणी केला नव्हता. मात्र देवगड-वाघोटन येथील अभ्यासक, आंबा बागायतदार जनार्दन तेली यांनी मात्र इस्त्रायलला न जाताच खास इस्त्रायली शेती प्रयोग वाघोटनच्या कातळावर केला.

♥सामान्यपणे हापूस वा केसरची एकरी 40 या पद्धतीने झाडे लावली जातात.  त्यातून चौथ्या, पाचव्या वर्षीपासून सुमारे तीन टन उत्पादन मिळते. तेली यांनी इस्त्रायली लागवड पद्धतीचा वापर करीत अर्ध्या एकरात केसर आंब्याची तब्बल 300 झाडे लावली आहेत. प्रत्येकी पाच फुटावर एक अशा पद्धतीने ही लागवड करण्यात आली असून त्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जूनमध्ये ही लागवड करण्यात आली असून तिसऱया वर्षीपासून या झाडांकडून आपण उत्पादन मिळवणारच आणि ते देखील एकरी सहा टन या हिशोबाने, असा विश्वासपूर्ण दावा त्यांनी केला आहे.

♥तेली यांनी वाघोटनच्या कातळावर सुरुवातीला अर्ध्या एकरात हा प्रयोग केला असून जून 14 पासून ते आतापर्यंतच्या आठ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी या आंब्याच्या बरोबरीने मिरची, झेंडू, तुर, काकडी, चिबुड व कलिंगड अशी तब्बल सहा आंतरपिके यशस्वीपणे घेऊन दाखविली. तूर्त या प्रायोगिक प्लॉटवर केसरची लागवड करण्यात आली असली, तरी भविष्यात अशाच इस्त्रायली पद्धतीने हापूस लागवडीचा प्रयोगदेखील आपण लवकरच करणार असल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सध्याच्या केसर लागवडीबाबत बोलताना ते म्हणाले, कटिंग व प्रोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करीत या झाडांची उंची पाच ते सहा फुटापर्यंत ठेवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपला हा प्रयोग निश्चितपणे यशस्वी होईल, असेही ते म्हणाले व तसे झाले तर हेच तंत्र वापरून कोकणातील शेतकऱयाला कमीत कमी जागेत, कमीत कमी खर्चात, कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने तब्बल दुप्पट ते तिप्पट उत्पन्न घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

♥आपल्या या प्रयोगाबाबत बोलताना तेली म्हणाले, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रा. ता. गुंजाटे तसेच कृषी तज्ञ डॉ. शिरोडकर यांनी आपणास सांगली येथील इस्त्रायली पद्धतीच्या आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग दाखवला. जर सांगलीसारख्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर करून आंब्याचे यशस्वी उत्पादन घेतले जाते, तर आंब्यासाठी साऱया जगात प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गात हा प्रयोग का नाही यशस्वी होणार, असा विचार करून मोठय़ा जिद्दीने हा प्रयोग मी सिंधुदुर्गात केलाय. यात मला यश मिळाले, तर पुढे संपूर्ण कोकणातील शेतकऱयांच्या मार्गदर्शनासाठी तब्बल दहा एकरात अत्याधुनिक पद्धतीचा अशाच प्रकारचा पायलट प्रयोग आपण करणार असल्याचे तेली यांनी शेवटी सांगितले.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!