आडसाली उसाची नियोजन असे कराल Sugercane cultivation practices

आडसाली उसाची नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥आडसाली हंगामासाठी फुले 265, को 86032 किंवा को व्हीएसआय 9805 या जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत करावी.
मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी.
या पद्धतीमुळे उसाची जोमदार वाढ होते.

♥उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी.
जमिनीची मशागत करून सपाट केल्यानंतर रिजरच्या साह्याने भारी जमिनीत 120 ते 150 सें.मी. व मध्यम जमिनीत 100 ते 120 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत.
पट्टा पद्धतीसाठी 2.5 - 5 किंवा 3 - 6 फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी.
पट्टा पद्धतीचा आंतरपीक आणि ठिबक सिंचन संचनासाठी चांगला उपयोग होतो.
पॉवर टिलरचा वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर 120 ते 150 सें.मी. (चार ते पाच फुटांपर्यंत) ठेवावे.

♥लागवडीचे तंत्र
1) लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.
2) लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
3) लागणीसाठी हेक्‍टरी दोन डोळ्यांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास चार फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट ठेवावे किंवा पाच फूट अंतरावर सऱ्या काढून लागवड करताना दोन रोपांतील अंतर 1.5 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील.

♥सरी अंतरानुसार ऊस लागवड
लांब सरी पद्धत -
या पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. हलक्‍या जमिनीत तीन फूट अंतरावर सरी पाडावी. भारी जमिनीमध्ये 3.25 ते 4 फूट अंतरावर सरी पाडावी. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी.

♥पाणी देताना दोन ते तीन सऱ्यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4 टक्‍क्‍यापर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी. उतार 0.4 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असल्यास उतारावा आडव्या सऱ्या पाडून ऊस लागण करावी.
फायदे -
1) या पद्धतीमध्ये आवश्‍यक तेवढेच पाणी देता येते. त्यामुळे जमीन खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
2) पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो व उत्पादनात वाढ होते.
4) योग्य प्रकारे आंतरमशागत करता येते.

♥पट्टा पद्धतीने ऊस लागवड (2.5 फूट x 5 फूट किंवा 3 फूट x 6 फूट) -
जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागण करावी. हलक्‍या जमिनीत 2.5 फूट अंतरावर रिझरच्या साह्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळींत पाच फूट पट्टा रिकामा राहील. मध्यम भारी जमिनीत सलग तीन फूट अंतरावर सऱ्या पाडून पहिल्या दोन सऱ्यांत उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडावी म्हणजे दोन जोड ओळींत अंतर सहा फूट पट्टा तयार होतो.

♥फायदे -
1) भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते.
2) पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
3) ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे.
4) ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे. या पद्धतीत यंत्राच्या साह्याने ऊस तोडणी करता येते.
5) पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते.
6) बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 30 ते 35 टक्के बचत होते.

♥बेणेप्रक्रिया
1) काणी रोगनियंत्रण तसेच कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी बेणेप्रक्रिया महत्त्वाची आहे.
2) बेणेप्रक्रियेसाठी 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात बेणे 10 मिनिटे बुडवावे.
3) या प्रक्रियेनंतर ऍसिटोबॅक्‍टर 10 किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 1.25 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
4) जिवाणू संवर्धकाच्या बेणेप्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते.

♥माती परीक्षणानुसारच करा खतांचा वापर

आडसाली उसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्‍टरी 50 ते 60 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन फुलोऱ्यापूर्वी जमिनीत गाडावीत.
स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत.
नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत.
युरियाचा वापर करताना निंबोळी पेंडीचा 6:1 या प्रमाणात वापर करावा.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्‍टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगेनीज सल्फेट आणि पाच किलो बोरॅक्‍स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

♥रासायनिक खते -

आडसाली हंगामासाठी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रतिहेक्‍टरी)

अ.नं. +खते देण्याची वेळ +नत्र (युरिया) (कि./हे.) +स्फुरद (सिं.सु.फॉ.) (कि./हे.) +पालाश (म्यु.ऑ.पो.) (कि./हे.)
1 +लागणीच्या वेळी +40 (88) +85 (530) +85 (140)
2 +लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी +160 (350) +-- +--
3 +लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी +40 (88) +-- +--
4 +बांधणीच्या वेळी +160 (350) +85 (350) +85 (140)
+एकूण +400 (876) +170 (1060) +170 (280) .

♥को 86032 ही जात रासायनिक खतांच्या जादा खतमात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रतिहेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची 25 टक्के जादा मात्रा द्यावी.

♥आडसाली उसामध्ये घ्या आंतरपिके

1) 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान आडसाली उसाची लागण केली जाते.
या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला ही आंतरपिके घेता येतात.
भुईमुगाच्या फुले प्रगती, टॅग-24, टी.जी.-26 या जाती निवडाव्यात.
सोयाबीन आंतरपीक घेतल्यास जे.एस.-335 किंवा फुले कल्याणी या जातींचा वापर करावा.

2) उसाची लागण करताना पट्टा पद्धतीने 2.5 - 5 किंवा 3 - 6 फूट अशा जोडओळ पद्धतीने लागवड केल्यास पट्ट्यामध्ये आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते.

3) उसामध्ये आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार व व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे.
आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी.

4) ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो.
बाळबांधणीच्या वेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते.
यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.

♥आंतरमशागत व तणनियंत्रण
उसाच्या उगवणीनंतर शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करून आवश्‍यकतेनुसार तणांचे नियंत्रण करावे.
कृषिराज अवजाराच्या साह्याने लागणीनंतर तीन महिन्यांनी बाळबांधणी करावी.
पीक 4.5 ते 5 महिन्यांचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर रसायन कुळव चालवून आंतरमशागत करावी.
रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी.
पाणी देण्यासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत.

♥असे असावे ऊस लागवडीचे नियोजन
प्रत्येक साखर कारखान्याने उसाचे उत्पादन आणि साखर उतारा वाढविण्यासाठी एकूण गळीत क्षेत्राच्या 15 ते 20 टक्के क्षेत्रावर आडसाली ऊस, 30 ते 35 टक्के क्षेत्रावर पूर्वहंगामी ऊस आणि 15 ते 20 टक्के क्षेत्रावर सुरू ऊस लागवड करावी. उर्वरित 30 ते 40 टक्के क्षेत्रावर खोडवा ऊस ठेवून उसाच्या पक्वतेनुसार गाळपाचे नियोजन करावे.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!