पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन

पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन♥प्रगतशील शेतकरी♥

♥शेतीचे प्रकार खालीलप्रमाणे.....   
१. फळबाग शेती
२. भाजीपाल्याची शेती
३. फुलशेती
४. पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती
५. मिश्रशेती
६. मत्स्य शेती
७. बागायती शेती

♥शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरुन शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात.
नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तृहेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना ह्यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.

♥पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत शेती किंवा जिराईत शेतीशिवाय पर्याय नसतो.

♥१. फळबाग शेती
या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल, तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

♥२. भाजीपाल्याची शेती
भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरुपाची शेती आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनसामगीचा पुरेपूर उपयोग करुन घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरुपाचा असल्याने त्याची विकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. मजुरांची उपलब्धता असणे हेही महत्त्वाचे आहे.

♥३. फुलशेती
फुलशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे; परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्घतीने घेतले जाते.

♥४. पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती
यापूर्वी उल्लेख केलेल्या पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांत किंवा परिस्थिती अनुकूल असूनही जर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या बाबतीत तो प्रदेश पिकांच्या शेतीपेक्षा जास्त किफायतशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरु केलेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरांना वैरण, चारा, धान्यादी खाद्य किफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. शिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती या शेतीप्रकाराला पोषक असते. सामान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. मोठ्या शहरांचे सान्निध्य आणि वाहतुकीची चांगली सोय अत्यंत आवश्यक आहे.

जेथे अत्यंत विशेषीकृत पशुधन प्रधान अशी शेती केली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी विकत घेतल्या जातात आणि संवर्धित पशुधन आणि दुग्धोत्पादन हे विकले जाते. ज्या शेती प्रकारामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. हे शेतीप्रकार ऑस्ट्रेलियात आणि पाश्चिमात्य देशांत सर्व ठिकाणी आढळतात. पशुधन प्रधान शेतीच्या प्रकारात आता कुक्कुटपालनाचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे

♥५. मिश्रशेती
‘पिके आणि पशुधनासह शेती’ असेही या प्रकाराला संबोधण्यात येते. रोख विक्री करुन द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात आणि पशुधन संवर्धनही करतात. पशुधन संवर्धन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रमाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची विक्री करता येते. त्यामुळे शेतमाल आणि पशुधन ही दोन्ही उत्पादने महत्त्वाची आणि एकमेकांना पूरक असतात.या प्रकारच्या शेती मध्ये लावलेल्या पिकांचा शेतीवरील जनावरांना दाणा वैरण म्हणून उपयोग होतो.पिकांना जनावरांच्या मलमूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चांगले येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसामगीचा पूर्णपणे उपयोग करण्याची संधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणि जोखीम कमी असते. काही मिश्रशेतींत पिकांच्या शेतीला प्राधान्य असते. काहींत पिके व पशुधन यांमध्ये भांडवल सारख्या प्रमाणात गुंतविलेले असते, तर काहींमध्ये पशुधनाला पिकांपेक्षा जास्त प्राधान्य दिलेले असते. हा शेतीप्रकार जगातील अनेक देशांत आणि विशेषतः भारतात रुढ आहे. या शेतीप्रकाराचे यांत्रिकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे.

♥६. मत्स्य शेती
हा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चांगलाच रुढ होऊ लागला आहे. मत्स्य शेती करण्यासाठी शेतातील माती खोदून, मोठ्या आकाराची तळी तयार करुन त्यांत पाणी सोडतात. या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्घतीने त्यांचे संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात पाण्याच्या अती वापरामुळे पाणथळ आणि क्षारपड झालेल्या जमिनीत इतर पिके घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी मत्स्य शेती फायद्याची ठरते. माशांच्या प्रमाणेच गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळंबीचे उत्पादन सुद्घा काही ठिकाणी घेतले जाते.

♥७. बागायती शेती
वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.
हंगामी बागायती शेती : पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हंगामी असेल तर हंगामी बागायती शेती पद्घतीचा अवलंब करावा लागतो. यात सामान्यतः खरीप आणि रब्बी या हंगामांत संरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके बहुतांश पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करुन पीक घेतले जाते.

बारमाही बागायती शेती : या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.
बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात.

पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरुन बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!