पालाश किंवा Potash पिकाचे मुख्य अन्न-द्रव्य

पालाश किंवा Potash पिकाचे मुख्य अन्न-द्रव्य♥प्रगतशील शेतकरी♥

♥पालाश मुख्य अन्नद्रव्य
वनस्पतीच्या सर्वांगीण वाढीसाठी व उत्पादनासाठी एकूण 17 अन्नद्रव्यांची गरज असते. कर्ब, हायड्रोजन, ऑक्‍सिजन ही हवा व पाण्याद्वारे पिकांना मिळतात. मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद व पालाश आहेत, तर दुय्यम अन्नद्रव्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधकाचा समावेश होतो. शिवाय लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल, मॉलिब्डेनम, क्‍लोरिन व कोबाल्ट ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना लागतात. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये पालाशचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पालाश सर्व पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी अवश्‍य आहे.

♥पीक उत्पादनात पालाश अन्नद्रव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक पिकास खते देण्याअगोदर माती व पर्णदेठ परीक्षण करून अन्नद्रव्याची मात्रा ठरविणे गरजेचे आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रात पालाशचा वापर केल्यास फळबागा तग धरू शकतात.

♥पालाश एक प्रमुख पोषक घटक द्रव्य
पालाश या पोषक घटकांचा उपयोग निश्‍चित प्रमाणात केला पाहिजे, अन्यथा पीक उत्पादन कमी होईल, तसेच मातीच्या उत्पादनक्षमतेचा ऱ्हास होईल. मातीची उत्पादनक्षमता कमी होण्यामध्ये पालाश या पोषक घटकाचा असंतुलित वापर हे मुख्य कारण आहे. पालाश पिकासाठी महत्त्वाचा आवश्‍यक व प्रमुख पोषक घटक आहे. भारतामध्ये तृणधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात. तृणधान्यासाठी आदर्श रासायनिक खतांचे नायट्रोजन ः पालाश गुणोत्तर 4:1 अथवा 4:2 असावे. सर्व पिकांसाठी पालाश हा एक महत्त्वाचा घटक हे त्याच्याशिवाय पिकाची वाढ व विकास होऊ शकत नाही.

♥पालाशच्या वापरामुळे पिकांची कार्यक्षमता वाढते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व त्यामुळे पिकास पाणी कमी लागते. पीक अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरू शकते.

♥पालाश हे अल्कधर्मीय मूलद्रव्य असून निसर्गतः ते खडक व जमिनीत आढळते. जमिनीतील पालाशचे एकूण प्रमाण 2.3 ते 2.5 टक्के इतके असते. पालाश जमिनीतील धनविद्युत प्रभारित द्राव्य, विनिमय व अविनिमय स्वरूपात आढळून येते. त्यापैकी धन विद्युत प्रभारित द्राव्य तसेच विनिमय स्वरूपातील पालाशचे शोषण पिकामार्फत होते. जमिनीतील एकूण पालाशपैकी 92.98 टक्के पालाश मुळांना न मिळणाऱ्या प्राथमिक खनिजांच्या स्थिर अवस्थेत व 1.10 टक्का पालाश अविनिमय स्वरूपात असतो.

♥पालाशचे कार्य
पालाशच्या वापरामुळे पिकांची कार्यक्षमता वाढते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व त्यामुळे पिकास पाणी कमी लागते. पीक अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरू शकते. पालाशमुळे पीक लोळत नाही. शर्करा व प्रथिने यांची निर्मिती होते. रोग प्रतिकारशक्ती वाढते. नत्र या अन्नद्रव्यांबरोबर पालाश दिल्यास पिकांची चांगली वाढ होते, गुणवत्ता आणि प्रत सुधारते. शर्करायुक्त पदार्थ वाहून नेण्याची क्षमता आणि साठवण वाढते. उसातील रसाचे प्रमाण वाढते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी होते. तसेच साखरेचे प्रमाण वाढते. पिकांमधील पेशीची वाढ चांगली होते. प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियांना पालाश चालना देते, त्यामुळे पिष्टमय पदार्थ तेल व प्रथिने तयार होतात. साठपेक्षा जास्त विकरांना व संजीवकांना पालाश क्रियाशील करते व पीकवाढीच्या प्रक्रियांमध्ये हातभार लावते. प्रथिनांच्या निर्मितीला उद्युक्त करून नत्र खतांची क्रयशक्ती वाढवते. पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवते व पिके रोगराई, कीटक, वाईट हवामान यांच्याशी मुकाबला करू शकतात. जैविक नत्राची उपलब्धता व स्थिरता वाढवते.

♥पालाश व पीक गुणवत्ता
तृणधान्य पिकांच्या प्रतीमध्ये सुधारणा होते. कडधान्य पिकांत मुळांवरील गाठींची संख्या व वजन वाढीस उत्तेजन देते व जैविक नत्र स्थिरीकरणास मदत होते. तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. नत्राचा योग्य प्रमाणात वापर होऊन प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. बियांचे वजन व आकारमान वाढते.

♥पालाशच्या कमतरतेची लक्षणे
पानांच्या कडा फिकट होऊन करपतात. जुनी पाने पिवळी होऊन खाली मुडपतात. पिकांची वाढ खुंटते. मुळांची व खोडांची वाढ चांगली होत नाही. धान्य खराब निपजते व उत्पन्न घटते. पीक उत्पादनाचा दर्जा खालावतो. कीड, रोगराई, दुष्काळ, धुके यांच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती कमी होते. उसाच्या पानांची टोके मरतात. कापसाची पाने तपकिरी, जांभळ्या रंगाची व जाडसर टणक होऊन गळून पडतात. सोयाबीनची पाने पिवळसर होऊन पुढे सुकलेल्या सांगाड्यासारखी होतात. केळीमध्ये फ्युजॅरियम विल्ट, तर टोमॅटोमध्ये बॅक्‍टेरिअल ब्लाईट हे रोग वाढतात. भाजीपाला व फळांची टिकण्याची क्षमता कमी होते. गळिताच्या पिकात तेलाच्या प्रमाणात घट होते. द्राक्षाचे घड लहान होतात, तसेच घड उशिरा तयार होतात. मणी एकसारखे पिकत नाहीत.

♥पालाशयुक्त खते
पालाशयुक्त खतांमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समावेश होतो. सेंद्रिय खतात शेण खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, प्रेसमड केक (मळी), कोंबडी खत यांसारख्या भरखताचा समावेश होतो. यातील पालाश पिकांना हळूहळू उपलब्ध होतो. जोरखताचा वापर न केल्यामुळे व सतत पिके घेतल्याने जमिनीतील पालाशचा पुरवठा कमी होत जातो आणि पीक उत्पादनात घट होते. बाजारामध्ये प्रामुख्याने म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश ही दोन प्रकारची पालाशयुक्त खते उपलब्ध होतात. हे खत प्रामुख्याने खाणीतून खनिजांपासून तयार केले जाते. त्या खनिजांच्या खाणी जर्मनी, अमेरिका, रशिया, जॉर्डन, चीन, कॅनडा, ब्राझील, थायलंड, फ्रान्स, इंग्लंड, चिली, इस्राईल, इटली आणि स्पेन देशांत आहेत. भारतास दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते. ही दोन पालाशयुक्त खते 100 टक्के आयात करावी लागतात. तसेच ही खते पिकांस दिल्यानंतर संपूर्णपणे पिकाला मिळत नाहीत. निचऱ्यातून आणि स्थिरीकरणामुळे बराचसा पालाश पिकांना उपलब्ध होत नाही.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!