वेलवर्गीय भाजीपाला मंडप उभारणीचे काम व वेलाचे व्यवस्थापण असे कराल

वेलवर्गीय भाजीपाला मंडप उभारणीचे काम व
वेलाचे व्यवस्थापण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥पाणी चांगले बसण्याच्या दृष्टीने जमिनीच्या उतारानुसार दर 20 ते 25 फूट अंतरावर आडवे पाट पाडावेत.

♥पाणी एकसारखे बसेल अशा पद्धतीने रान बांधून घ्यावे.

♥कारले, दुधी भोपळा, दोडका, पडवळ या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी मंडप, ताटी पद्धतीचा अवलंब करावा.

♥मंडप पद्धतीमध्ये दोन ओळींतील अंतर 10 ते 12 फूट आणि दोन वेलींतील अंतर तीन फूट ठेवून या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात, त्यासाठी 10 ते 12 फूट अंतरावर रीजरच्या साह्याने सरी पाडावी.

♥मंडपाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूंनी प्रत्येक पाच ते सहा फूट अंतरावर दहा फूट उंचीचे, चार इंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूने झुकतील अशा पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत, त्याचप्रमाणे प्रत्येक सरीच्या प्रत्येक दहा फुटांवर, दहा फूट उंचीचे व तीन इंच जाडीचे लाकडी डांब जमिनीत दोन फूट गाडावेत.

♥म्हणजे शेतामध्ये 10 X10 चौरस फुटांवर लाकडी बल्ल्या उभ्या राहतील.

♥लाकडी बल्ल्या कमी असल्यास एक आड एक बल्लीच्या ठिकाणी दहा फूट उंचीचा, दीड इंच जाडीचा भरीव बांबू उभा करावा.

♥सर्व बल्ल्या व बांबू आडवे- उभे सरळ रेषेत घ्यावेत.

♥डांब गाडण्यापूर्वी डांबाचा जो भाग जमिनीत गाडावयाचा आहे, त्या भागावर डांबर लावावे, म्हणजे डांब कुजणार नाहीत.

♥प्रत्येक डांबाच्या बाहेरील बाजूने आठ गेज जाडीच्या तारेने ताण द्यावा.

♥त्यासाठी एक ते दीड फूट लांबीच्या दगडास दुहेरी तार बांधून तो दगड दोन फूट जमिनीत पक्का गाडावा.

♥नंतर डांब बाहेरील बाजूस ओढून 6।। फूट उंचावर ताणाच्या तारेने पक्का करावा, तेथे तार खाली घसरू नये म्हणून डांबावर यू (ण) आकाराचा खिळा ठोकून तार पक्की करावी.

♥डांबांना ताण दिल्यानंतर आठ गेजची दुहेरी तार पीळ देऊन 6।। फूट उंचीवर (ण) आकाराचा खिळा ठोकून त्यातून ओढून घ्यावी.

♥मंडपाची तार ओढण्यापूर्वी मंडपाच्या चार कोपऱ्यांतील चार डांब भक्कम असावेत.

♥त्यांना आठ गेजच्या तारेने बाहेरच्या दोन्ही दिशेला दुहेरी ताण द्यावा.

♥तारा लोखंडी पुलरच्या साह्याने व्यवस्थित ताणून घ्याव्यात.

♥नंतर दहा गेजची तार लाकडी बल्ल्या व बांबू उभ्या केलेल्या ओळीवर जमिनीपासून 6।। फूट उंचीवर "यू' आकाराच्या खिळ्याने पुलरच्या साह्याने ओढून पक्की करावी, त्यानंतर दोन फूट अंतरावर 16 गेजची तार ताणलेल्या तारेवर आडवी- उभी पसरावी म्हणजे जमिनीपासून 6।। फूट उंचीवर 2 - 2 फूट आकाराचा तारेचा वरील मंडपाचा भाग तयार होईल.

♥मंडप उभारणीचे काम वेल साधारण एक ते दीड फूट उंचीचे होण्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.

♥मंडप तयार झाल्यानंतर आठ फूट उंचीची सुतळी घेऊन त्याचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावे.

♥त्या सुतळीस पीळ देऊन दुसरे टोक वेलावरील तारेस बांधावे. वेल सुतळीच्या साह्याने वाढत असताना बगलफूट व ताणवे काढावेत, पाने काढू नयेत.

♥वेलाची पाच फूट उंची झाल्यावर वेलाची बगलफूट व ताणवे काढणे थांबवावे.

♥मुख्य वेल मंडपावर पोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.

♥हे साहित्य तीन ते चार हंगामांसाठी वापरता येते.

-02426 - 243342
अखिल भारतीय भाजीपाला सुधार योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!