बटाटा लागवड नियोजन असे कराल

बटाटा लागवड नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥मध्यम प्रतीची, मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन बटाटा पिकासाठी जास्त चांगली असते. भारी, चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये. कारण या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याच्या फोडी (बियाणे) लागवडीनंतर ताबडतोब कुजणे किंवा सडण्याची शक्‍यता असते. त्यामुळे बटाट्याची उगवण अतिशय कमी होऊन, झाडांची हेक्‍टरी संख्या कमी मिळते, पर्यायाने उत्पादन घटते.

♥बटाटा लागवडीसाठी फक्त प्रमाणित अथवा सत्यप्रत व निरोगी बियाणे वापरावे.
खरीप हंगामातील बटाटा ताबडतोब रब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये.
या आणि इतर महत्त्वाच्या बाबींचे लागवड करताना योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होईल.

♥पूर्वमशागत -
खरिपातील पिकांची काढणी होताच जमिनीची उभी-आडवी नांगरणी करावी. काही दिवस जमीन उन्हात तापल्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्‍टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे किंवा खरिपात हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा जमिनीत गाडणे, रब्बी बटाट्याचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फारच फायद्याचे आढळले आले. सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोत कायम टिकून राहतो.

♥बटाटा बेणे -
बटाटा बेणे हे कीड व रोगमुक्त असावे. बेणे बटाटे पूर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुगलेले, ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत. लागवडीसाठी वापरावयाचे बटाटे बेणे हे 25 ते 30 ग्रॅम वजनाचे, पाच सें.मी. व्यासाचे, संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे असावे. बटाटे कापून फोडी करताना विळा व तेथील जागा जंतू विरहित करावी. त्यासाठी विळा/ चाकू मॅन्कोझेबच्या 0.2 टक्का द्रावणात बुडवून वापरावा. कापलेल्या फोडी कमीत कमी 10 ते 12 तास सावलीत सुकवून घ्याव्यात व नंतरच लागवडीस वापराव्यात. एक हेक्‍टरसाठी 15-20 क्विंटल बेणे लागते.

♥हवामान व हंगाम -
बटाटा हे पीक राज्यात रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते असे संशोधनावरून दिसून आले आहे. पीक वाढीच्या काळात दिवसाचे सरासरी तापमान 21 अंश से.पेक्षा कमी असावे. बटाटा पोसण्यास 20 अंश से. तापमान आदर्श असते. जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असावे. जमिनीचे तापमान 17 ते 20 अंश से. असल्यास बटाटे चांगले पोसतात. यापेक्षा जास्त तापमान पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते.

♥दिवसाचे तापमान 32 अंश से.पेक्षा अधिक असल्यास बटाटे कमी लागतात व पिकाची वाढ चांगली होत नाही. रब्बी हंगामात 15 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते. 15 नोव्हेंबरनंतर बटाटा लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिमाण होतो. खरीप हंगामात जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावी. अधिक उत्पादनासाठी वेळेवर बटाटा लागवड करणे फार महत्त्वाचे आहे.

♥लागवड पद्धत -
लागवडीसाठी फक्त प्रमाणित अथवा सत्यप्रत व निरोगी बियाणे वापरावे. खरीप हंगामातील बटाटा ताबडतोब रब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये, कारण जवळ जवळ तीन महिने बटाटा सुप्त अवस्थेत असतो. शीतगृहातून बटाटे बाहेर काढल्यानंतर 7-20 दिवस सावलीत विरळ पसरून ठेवावेत. या कालावधीत बटाट्यांना मोड आलेले असावेत अथवा डोळे फुगलेले असावेत. मोड न आलेले किंवा अधिक सुकलेले बटाटे लागवडीस वापरू नयेत. लागवडीसाठी 60 सें.मी. (दोन फूट) अंतरावर सरी वरंबा पाडून त्यात 15 ते 20 सें.मी. अंतरावर लागवड करावी. रब्बी हंगामातील लागवडीसाठी जमीन ओलावून घेणे आवश्‍यक आहे. लागवड जमीन वाफशावर आल्यावर करावी म्हणजे बटाट्याची उगवण चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते. प्रथम दोन फूट अंतरावर सलग सऱ्या पाडाव्यात. त्यात 15 ते 20 सें.मी. अंतरावर लागवड करावी आणि लगेच सरी फोडून घ्यावी म्हणजे वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होते आणि बटाट्याच्या खापांवर वरंबा तयार होतो. लागवड वाफशावर केली असल्याने उगवण झाल्यावर पाणी द्यावे.

♥रासायनिक खते -
पिकास 5 किलो अमोनियम सल्फेट व 50 किलो सल्फेट ऑफ पोटॅश खते द्यावीत, देऊन पिकाची खांदणी करून मातीची भर द्यावी. हे काम 45 दिवसाचे आत पुर्ण करावे.
पिकावर सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची जसे मल्टीन्युट्रीयंट, विपुल, मल्टीप्लेक्स, 10 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे 15 दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात, अधिक उत्पादन मिळण्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा. पिकास माती परीक्षणानुसार 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 120 किलो पालाश प्रति हेक्‍टरी खतांची मात्रा द्यावी. यापैकी नत्राची 100 किलो मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी द्यावा व उरलेली नत्राची 50 किलो मात्रा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर प्रति हेक्‍टरी द्यावी किंवा सुफला 15: 15:15 द्वारे वरील खताची मात्रा द्यावयाची झाल्यास लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी सुफला (15:15:15) च्या आठ बॅगा तसेच युरिया व म्युरेट ऑफ पोटॅशच्या दोन बॅगा द्याव्यात व लागवडीनंतर एक महिन्याने युरियाच्या दोन बॅगा द्याव्यात. खते दिल्यानंतर पिकास लगेच पाणी द्यावे. रासायनिक खते बटाट्यावर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी अन्यथा बटाटे सडू शकतात. त्यासाठी रासायनिक खते जमिनीत पेरून दिल्यास फायदेशीर ठरते. एक महिन्याचे द्यावयाचा युरिया सरीत टाकावा.

♥तसेच लवकर येणारा व ऊशिरा येणारा करपा रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम, एम-45 20 ग्रॅम, बाविस्टीन 20 ग्रॅम, डायथेन झेड-78 20ग्रॅम रिडोमिल 4 मिली प्रती 10 लिटर याप्रमाणे आदलून बदलून फवारणी करावी.

♥रस शोषण करणा-या किडीच्या नियंत्रणासाठी- रोगर 25 मिली + एन्डोसल्फान 15 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 8 मिली + नुवान 7 मिली किंवा मेटासिस्टॉक्स 10 मिली किंवा कॉन्फीडॉर 4 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

♥आंतरमशागत -
आंतरमशागतीत खुरपणी, खांदणी किंवा वरंब्यास माती लावणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यासाठी वरंब्यास भरपूर माती लावावी म्हणजे बटाटे हिरवे होत नाहीत. कारण बटाटा सूर्यप्रकाशात आल्यास ताबडतोब हिरवा होतो. लागवडीपासून एक महिन्याच्या आत तणनियंत्रणासाठी एक ते दोन खुरपण्या देऊन शेत स्वच्छ ठेवावे किंवा तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने वापर करावा.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!