बीटी कापूस लागवड अशी कराल

बीटी कापूस लागवड अशी कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥अयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, कपाशीचे कोरडवाहू लागवडीखालील क्षेत्र, रासायनिक खतांच्या वापराचे अयोग्य प्रमाण व वेळ, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव इत्यादी बाबी ही कपाशीची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे आहेत. बीटी कपाशी लागवडीचे तंत्रज्ञान अभ्यासून लागवड सुधारित पद्धतीने केल्यास उत्पादन व उत्पादकतेत निश्‍चित वाढ होईल.

♥कापूस लागवड मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलक्‍या ते चिबाड जमिनीत करू नये. जमिनीची खोली किमान ६० ते १०० सें.मी. असावी. सामू ५.५ ते ८.५ असावा.

♥जमिनीची मशागत ः
भारी व काळ्या जमिनीमध्ये खोल नांगरणी करावी. त्यामुळे तणांच्या काशा जमिनीवर उघड्या पडतात. काही किडी कोषरूपाने जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असतात. नांगरणीमुळे हे कोष जमिनीच्या पृष्ठभागावर आल्याने उष्णतेने किंवा पक्ष्यांचे भक्ष्य होऊन नष्ट होतात. नांगरणीनंतर मोगडणी करावी.

♥सेंद्रिय खतांचा वापर ः
सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जलधारणाशक्ती वाढते, जमिनीत हवा खेळती राहते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते. वखरपाळीपूर्वी कोरडवाहू लागवडीसाठी पाच टन (१०-१२ गाड्या) शेणखत व बागायती लागवडीसाठी दहा टन (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्टखत शेतात सम प्रमाणात पसरून टाकावे.

♥पिकांची फेरपालट ः
कोरडवाहू क्षेत्रामध्ये कापूस पिकानंतर पुढील वर्षी ज्वारी, सोयाबीन, मूग किंवा उडीद अशी फेरपालट करणे आवश्‍यक आहे. बीटी कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बीटी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीक पद्धती फायदेशीर आहे.

♥पेरणीची वेळ ः
ओलिताखालील कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी. कोरडवाहू कापूस पिकाची पेरणी मॉन्सूनचा चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी लवकर करणे आवश्‍यक आहे. कोणत्याही परिस्थितीत १५ जुलैनंतर पेरणी करू नये. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्विंटलपर्यंत घट होऊ शकते.

♥पेरणीचे अंतर ः
बीटी कपाशी लागवडीच्या अंतरासाठी घेण्यात आलेल्या प्रयोगांच्या दोन वर्षांच्या निष्कर्षावरून असे स्पष्ट होते, की कोरडवाहू लागवडीमध्ये लागवड १२० सें.मी. ु ४५ सें.मी. (४ ु १.५ फूट) अंतरावर करावी. कोरडवाहू लागवडीमध्ये दोन ओळींतील अंतर वाढविल्यास उत्पादनात घट येते असे सिद्ध झाले आहे. कापूस लागवडीमध्ये हेक्‍टरी झाडांच्या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कोरडवाहू लागवडीमध्ये हेक्‍टरी १८,५१८ (एकरी ७४०७) झाडे राहातील याची काळजी घ्यावी.

♥बागायती लागवडीमध्ये कपाशीचे अंतर १५० सें.मी. ु ३० सें.मी. (५ ु १) फूट ठेवल्यास सरस उत्पादन मिळाल्याचे आढळले आहे. कपाशीच्या ओळींमधील अंतर वाढवून झाडांमधील अंतर कमी केल्यामुळे हेक्‍टरी झाडांची संख्या समान राखली जाते. तसेच ओळीतील अंतर वाढल्यामुळे झाडांमध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते.

♥बीटी कपाशीची पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी दोन सरकी टाकाव्यात. ज्या ठिकाणी उगवण कमी असेल त्या ठिकाणी दहा दिवसांनी चुका भरून घ्याव्या. पंधरा ते वीस दिवसांनी विरळणी करावी. एका फुलीवर फक्त दोन रोपे ठेवावी. पेरणी करताना पॉलिथिनच्या पिशवीमध्ये किंवा पानांमध्ये तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या द्रोणामध्ये सरकी टाकून रोपे तयार केल्यास त्याचा चुका भरण्यास उपयोग होईल व रोपांची वाढ सारखी असेल.हेक्‍टरी रोपांची जास्त संख्या राखता येईल.

♥संरक्षक (रेफ्युज) पीक लागवडीचे नियोजन
बीटी बियाण्यास मिळणाऱ्या आश्रय पीक म्हणून दिलेल्या बिगर बीटी कपाशी बियाण्याची मुख्य पिकाबरोबरच लागवड करणे गरजेचे आहे. संरक्षक पिकाचा उपयोग फक्त बोंडअळ्यातील प्रतिरोधापुरता मर्यादित नसून, त्यास रसशोषक किडींचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.
बियाण्याचे प्रमाण ः प्रति हेक्‍टरी २.५ ते ३.० कि.ग्रॅ. बियाणे लागते.

♥बीजप्रक्रिया ः
१) बियाण्यास थायरम/ कॅप्टन/ सुडोमोनास यापैकी बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
२) बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्‍लोप्रीड या कीटकनाशकाची प्रक्रिया सामान्यतः केलेली असते. ती केली नसल्यास इमिडाक्‍लोप्रीड किंवा थायामेथोक्‍झाम यापैकी कीटकनाशकाची ७.५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
३) पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या व स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. जमिनीतील मातीच्या कणावर धरून ठेवलेले स्फुरद पिकास उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंची बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी २५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात जिवाणू संवर्धकाचे पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे. बुरशीनाशक वा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करावी.

♥आंतरपिके :
बीटी कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन व तूर या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केल्यास फायदेशीर उत्पादन मिळते. कपाशीच्या आठ ओळींनंतर तुरीच्या दोन ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. त्याचबरोबर मूग, उडीद व सोयाबीन यापैकी कोणतेही एक पीक बीटी कपाशीमध्ये १:१ या प्रमाणात घेण्यात यावे. सोयाबीन हे आंतरपीक घेताना लवकर पक्व होणारा वाण निवडावा.

♥अन्नद्रव्य व्यवस्थापन :
बीटी कपाशीमध्ये सुरवातीच्या बहराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्‍यक आहे. शिवाय बीटी कपाशीमध्ये अन्नद्रव्ये शोषण्याचे प्रमाण विना बीटी कपाशीपेक्षा (नॉन बीटी) अधिक असल्याचे आढळत आहे. विना बीटी कापूस पिकापेक्षा बीटी कापूस रासायनिक खताच्या वाढीव मात्रेस फायदेशीर प्रतिसाद देत असल्याचे निष्कर्ष मिळत आहेत. दोन वर्षांच्या प्रयोगावरून कोरडवाहू व बागायती बीटी कापूस पिकास रासायनिक खताच्या मात्रा देण्याच्या प्रयोगाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत ः

♥कोरडवाहू पद्धती
मराठवाड्यात कोरडवाहू पद्धतीच्या लागवडीमध्ये बीटी कापूस पिकास १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्‍टर देण्यात यावे. कोरडवाहूमध्ये ५० टक्के नत्र पेरणीवेळी व उर्वरित ५० टक्के नत्र एक महिन्यानंतर विभागून द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.

♥बागायती पद्धती :
बागायती बीटी कपाशीसाठी १५०:७५:७५ नत्र, स्फुरद, व पालाश प्रति हेक्‍टर दिल्याने फायदेशीर ठरते. यापैकी पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी. उर्वरित नत्रापैकी ४० टक्के नत्र एक महिन्यानंतर व ४० टक्के नत्राची मात्रा दोन महिन्यांनंतर द्यावी. बाजारात उपलब्ध असलेल्या खतांनुसार विविध पर्याय पुढे देण्यात आलेले आहेत. कोरडवाहू व बागायती कापूस पिकासाठी प्रति हेक्‍टर खताची मात्रा यानुसार पुढे देण्यात आलेल्या आहेत. बाजारातील उपलब्धतेनुसार तक्‍त्यात दिल्याप्रमाणे खतांचा कोणताही पर्याय निवडावा. बऱ्याच वेळा असे दिसून येते की शेतकरी खताची पहिली मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यानंतर देतात. अशा वेळी मजुराची उपलब्धता नसल्यास किंवा पावसाची उघडीप असल्यामुळे हा कालावधी आणखी जास्त वाढू शकतो. दिलेल्या खतामधील स्फुरद व पालाश पिकास उपलब्ध होण्यास तीन चार आठवडे लागतात. कपाशीचे पीक पहिल्या दोन महिन्यांत ६० टक्के अन्नद्रव्य शोषण करते. यामुळे शिफारस करण्यात आलेली खताची मात्रा वरीलप्रमाणे विभागून देण्यात यावी.

♥कपाशीला फुले लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर साधारणत: ६० दिवसांनंतर) आणि त्यानंतर १५ दिवसांनी दोन टक्के युरिया किंवा डीएपी खताची पाण्यात मिसळून (२०० ग्रॅम खत प्रति दहा लिटर पाणी) पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते. त्याच बरोबर ०.२ टक्का मॅग्नेशिअम सल्फेटची (२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी) फवारणी करावी. दोन टक्के पोटॅशिअम नायट्रेटची (२०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी) फवारणी ४५ व ७५ दिवसांनी केल्यामुळे उत्पादन व धाग्याच्या गुणधर्मात वाढ होते.

♥सूक्ष्म मूलद्रव्ये : बीटी कपाशीस रासायनिक खताच्या मात्रेबरोबरच काही सूक्ष्म मूलद्रव्यांची आवश्‍यकता असते. याकरिता मातीमध्ये मॅग्नेशिअम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या मूलद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्नेशिअम सल्फेट १५ ते २० किलो प्रति हेक्‍टर व बोरॉन पाच कि.ग्रॅ. (प्रति हेक्‍टर) आवश्‍यकतेनुसार जमिनीतून द्यावे. सूक्ष्म मूलद्रव्ये शेणखतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर एक महिन्यातच द्यावी. रासायनिक खतासोबत सूक्ष्म मूलद्रव्ये देऊ नयेत.

♥पाणी व्यवस्थापन : कापूस पिकास वाढीच्या विभिन्न अवस्थेत लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
उगवणीपासून पाते लागण्यापर्यंत - २० टक्के
पातेलागणे ते फुले लागणे - ४० टक्के
फुले लागणे ते बोंडे लागणे - ३० टक्के
बोंडे लागणे ते शेवटची वेचणी - दहा टक्के
म्हणजेच सुरवातीच्या काळात कापसाची पाण्याची गरज फार कमी असते. पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीसाठी पाण्याची गरज सर्वाधिक असते. त्यानंतर परत पाण्याची गरज कमी होते. सुरवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडाची व मुळांची वाढ खुंटते.

संकलीत!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!