लसूण घासाचा ताळेबंद
लसूण घासाचा ताळेबंद ♥प्रगतशील शेतकरी ♥
♥राहुरी तालुक्यात गावरान घास, लसूण घास या वर्षी गावरान घास क्षेत्रात किमान पंधरा ते वीस टक्के वाढ आहे. पूर्वी घरातील पशुधनाची गरज भागविण्यापुरता घास घेतला जायचा. आता वर्षभर मागणी, त्याचे चढे दर, बियाण्यास मागणी व प्रति किलो चारशे रुपये दर त्यामुळे लागवड व बीजोत्पादनासाठी घासाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकरीही चारा पिकांकडे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नगदी शेती करीत आहेत.
♥राहुरी तालुक्यात पशुपालनासाठी गावरान घासाखालील क्षेत्र प्रारंभापासून सर्वाधिक आहे. घासाचे क्षेत्र गेल्या वर्षी तीन हजार हेक्टरच्या आसपास तर त्याखालोखाल सहाशे हेक्टर क्षेत्र मक्याखाली होते. मागील वर्षी परतीचा मॉन्सून राहुरी तालुक्यात अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त झाला. गावरान घासाचे सुमारे नव्वद टक्के क्षेत्र नुकसानीत गेले. त्यामुळे घासाच्या बियाण्यास चांगली मागणी होती. यंदा त्याचे दर मागील वर्षाइतकेच, म्हणजे पाच किलोच्या पायलीस दोन हजार रुपये असे होते. गावरान घासाच्या बियाण्याची मागणी बहुतांशपणे शेतकरी पातळीवर सोडविली जाते. राहुरी तालुक्यात किमान दहा कोटी रुपयांची उलाढाल यातून होत असावी. घासपिकातील अर्थशास्त्र लक्षात घेता त्याकडे शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. एक एकरापासून ते अकरा एकरापर्यंत घासपीक घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मंदाताई चव्हाण यांनी दहा एकर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाखाली (मायक्रो स्प्रिंकलर) गावरान घासाचे पीक घेतले आहे. गेल्या पंधरा- सोळा वर्षांपासून त्या घासाचे पीक घेतात. पिंपरी अवघड येथील विजय कांबळे यांनी सात एकरावर मायक्रो सिंचनाखाली घास घेतले आहे. तांदूळवाडी येथील प्रसाद पेरणे गेल्या दहा वर्षांपासून घासाचे पीक घेतात. तीन वर्षांच्या अनुभवाबाबत ते म्हणाले, की गावरान घासाचा एकरी खर्च एक लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत येतो. प्रति वर्ष सुमारे 18 याप्रमाणे दोन वर्षांत 36 कापण्या होतात. दर एकवीस दिवसांनी कापणी होते. उत्पादन खर्च एक रुपया प्रति किलो येतो. सध्या ओल्या घासाचा दर प्रति किलो अडीच रुपये आहे. कापणीसह उत्पादन खर्च वजा केला तरी आठ हजार रुपये एका कापणीतून शिल्लक राहतात. या किफायतशीरपणामुळेच घासाखालील क्षेत्रात वाढ होत आहे. खर्च वजा जाता एकरी प्रति वर्षाला किमान एक लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे अनेक घास उत्पादकांनी सांगितले. घासाच्या बियाण्यास असलेली मोठी मागणी व प्रति किलो चारशे रुपये दर लक्षात घेता चारापिकाचे बीजोत्पादनदेखील चांगलेच किफायतशीर होत असल्याने त्या दृष्टीनेही घास उत्पादकांची संख्या वाढत आहे.
♥घासाचे बी साधारणतः तिसऱ्या वर्षी धरले जाते. मात्र त्या वर्षी घास विरळ झाल्याने उत्पादन कमी मिळते. त्यामुळे दुसऱ्या वर्षी म्हणजे एकूण 20 ते 21 महिने उत्पादन घेतल्यानंतर नंतरचे तीन-चार महिने घास बियाण्यासाठी घेण्याचे प्रमाण वाढते आहे. तिसऱ्या वर्षी बी धरले तर एकरी शंभर ते सव्वाशे किलो बियाणे मिळते. आजच्या बाजारभावाने चारशे रुपये प्रति किलो दराने त्याचे चाळीस ते पन्नास हजार रुपये होतात. दुसऱ्या वर्षी बी धरले तर वीस ते पंचवीस टक्के जादा बियाणे म्हणजे आठ ते दहा हजार रुपयांचे जादा बियाणे मिळते. बाजारात तीन वर्षांचे बियाणे घेण्याकडे कल असला तरी ते उपलब्ध न झाल्यास हे बियाणे शेतकरी घेतात. घासाच्या बियाण्याची बाजारपेठ विश्वासावरच अवलंबून आहे. हे बियाणे बाजारातील दुकानात मिळत नसल्याचे तांदूळवाडी येथील रामभाऊ वर्पे यांनी सांगितले. बियाणे विक्रीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.
♥वाळलेल्या घासाला मागणी
मुंबईत रेसकोर्सला घोड्याचे खाद्य म्हणून वाळलेल्या घासाला मागणी आहे. त्यामुळे हा घास कुट्टी करून वाळवून त्याची पंधरा किलोच्या पॅकिंगमध्ये विक्री करण्याचे काम मंदाताई चव्हाण यांनी सुरू केले आहे. एका आठवड्याला एक टन वाळलेला घास त्या मुंबईला देतात. सध्या वाळलेल्या घासाच्या पावडरीचा दर पंचवीस रुपये प्रति किलो असा असला तरी मागणीनुसार त्यात पन्नास ते साठ रुपयांपर्यंत वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढी गरज पूर्ण करण्यासाठी दररोज स्वतःच्या शेतातील सहाशे ते सातशे किलो घास त्या वापरतात. त्याचबरोबर दोन ते अडीच रुपये प्रति किलो दराने दररोज दोन ते तीन टन ओला घास त्या खरेदी करतात. त्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा त्याचा मानस आहे. सडे येथेही अशाच स्वरूपातील घास वाळविण्याचा प्रकल्प खासगी पद्धतीने सुरू झाला आहे. घास पिकाकडे नगदी पीक म्हणूनच आता शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे असे मंदाताईंचे म्हणणे आहे.
♥घास पिकासाठी मायक्रो सिंचनासाठी एकरी पंचवीस हजार रुपये खर्च येत असला तरी त्यामुळे पाण्यात पन्नास टक्के बचत होते. तण व्यवस्थापनाचा प्रश्न कमी होतो. ही सिंचन व्यवस्था दहा वर्षे टिकते. याचा विचार करता एकरी तीन हजार रुपये खर्च होत असला तरी पाण्यात होणारी बचत व त्याचे फायदे याचा विचार करता या सिंचन व्यवस्थेचा पर्याय अधिक फायदेशीर असल्याचे मंदाताईंनी सांगितले. राहुरी तालुक्यात घास पिकात या सिंचन व्यवस्थेखालील क्षेत्रात वाढ होत आहे. प्रवाही पद्धतीपेक्षा मायक्रो सिंचनामुळे घासाची गुणवत्ता व उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्याचे त्यांनी अनुभवाअंती सांगितले. घासावर रोग, कीड नियंत्रणाचा फारसा खर्च नाही. विक्रीचा प्रश्नही गेल्या काही वर्षांत उद्भवला नाही. भावात घसरण होण्याचा प्रश्न नजीकच्या काळात येणार नाही. राज्यातील काही भागात मोठ्या दुष्काळाच्या संकटाचे सावट आहे. चारा खरेदी करण्याची सरकारची योजना आहे. मागील वर्षी दीड रुपये किलो असलेला ओला घास सध्या दुपटीच्या जवळपास म्हणजे अडीच रुपये किलो असा झाला आहे. काही ठिकाणी तो चार रुपये असाही आहे. याचा विचार करता घासपिकातील अर्थशास्त्राकडे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे असे त्यांना वाटते.
♥लसूण घासाचा ताळेबंद-
लसूण घास शेतीचा मंदाताईंचा प्रातिनिधिक स्वरूपातील एकरी ताळेबंद-
(घासाचा सध्याचा दर कायम राहील अशी शक्यता आहे. कारण सध्या चाराटंचाई आहे.)
♥पहिल्या वर्षाचा खर्च (रू.)
- बियाणे- 25 किलो (चारशे रुपये प्रति किलो) - 10,000
- सुपर फॉस्फेट 2,400
- हॅरो- 600 रु. (चार वेळा) 2,400
- नांगरट 1200 (दोन वेळा) 2,400
- युरिया 1,800
- रोटाव्हेटर 1,200
शेणखत- दहा ट्रेलर- 20,000
कापणी प्रति किलोस पन्नास पैसे मजुरी
(वर्षभरात कापणी 18)
- प्रति वर्ष एकूण कापणीतून मिळणारा हिरवा घास 80,000 किलो
(काही वेळा तो सहा हजार ते दहा हजार किलो असाही असू शकतो)
- घास मजुरी पन्नास पैसे प्रति किलो- 40,000
- पाणी मजुरी-दर सप्ताहास एक -52 वेळा 5,200
- मायक्रो सिंचनाचा वार्षिक खर्च 3,000
- इतर खर्च 6,600
................................................................
♥एकूण खर्च 95,000 रु.
- पहिल्या वर्षाचे कापणीचे उत्पादन
80,000 किलो - (2.50 रुपये प्रति किलो) 2,00,000
- दुसऱ्या वर्षाचे घास उत्पादन
100,000 किलो - (2.50 रु. प्रति किलो) 2,50,000
तिसरे वर्षाचे उत्पादन
60,000 किलो - (2.50 रुपये प्रति किलो) 1,50,000
तिसऱ्या वर्षाच्या कापणीनंतरचे बीजोत्पादन 100 किलो एकरी
बियाणे भाव चारशे रुपये प्रति किलो प्रमाणे 40,000 रू.
संकलित!
Comments
Post a Comment