डांळीब लागवड व देखभाल अशी कराल

डांळीब लागवड व देखभाल अशी कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥दुस-यांच्या अनुभवातून समजून घेणे हा कोणत्याही उद्योगातील सर्वोत्तम मार्ग आहे. केवळ यशाचे मार्ग नव्हे तर अपयश आणि चुका समजून घेणे कधीही उपयुक्त ठरते.
म्हणूनच पिकाचे नियोजन करताना टाळण्याच्या काही गोष्टी येथे दिल्या आहेत.

1. डाळिंबासाठी विनाकारण चांगली जमीन अडवणे
खरे तर डाळिंब हे हलकी जमीन, कोरडे हवामान यात परंपरेने उत्तमरित्या येणारे पीक आहे. शिवाय जे शेतकरी जास्त पैसे देणारी केळी, द्राक्षासारखी पिके घेऊ शकत नाहीत अशा कोरडवाहू शेतक-यांसाठी तर हे एक वरदानच आहे.
गेल्या काही वर्षात तर डाळिंबाला चांगले भाव मिळत आहेत, त्यामुळेच बरेच शेतकरी या पिकाकडे वळून चांगल्या, भारी जमिनितही हे पीक घेऊ लागले. याचा परिणाम नंतर मातीतून येणार्‍या किंवा जमिनी मुळे पसरणार्‍या तेल्या आणि मर रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याचे नियंत्रण करणे कठीण होऊ लागले आहे.
तरी पण तुम्हाला मध्यम किंवा भारी जमिनीत पीक घेण्यावाचून पर्याय नाही? तर मात्र तुम्हाला निच-याची व्यवस्था अगदी काळजी पूर्वक करावी लागेल आणि अथकपणे रोग व्यवस्थापन करावे लागेल.

2. पीक विस्तारत आहे, आणि त्यावरील रोग ही...
खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड होत असतानाच्या काळात, तेल्या व मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसण्यास सुरवात झाली होती. अयोग्य लागवड पद्धतीमुळे हा रोग कमी वेळात वेगाने पसरला.
नवीन लागवड करताना, रोगमुक्त रोपांची निवड करणे तसेच बागेमधे स्वच्छता राखणे महत्वाचे.
काही शेतक-यानी टिश्यू कल्चर रोपे वापरुन या रोगावर मात करण्याचा प्रयत्‍न केला पण रोप सभोवतालच्या वातावरणाशी समरस न झाल्यास अशी रोपे रोगास लवकर बळी पडली.
म्हणूनच नवी लागवड करताना रोपे/ कलमे रोग मुक्त आहेत याची खात्री करूनच लागवड करा.

3. अचूक उपायांची कमतरता
सुरवातीच्या काळात तेल्या व मर रोगाची नुकसानाबद्दल जास्त चर्चा झाली पण नेमके कारण समजत नव्हते. त्यामुळे शेतक-यानी स्वत: या रोगाविषयी जाणून घेण्यास व त्यावर उपाय शोधण्यास सुरवात केली. रोगाचे अचूक निदान करून त्यानुसार उपाय योजना केल्यास कमी खर्चात रोगमुक्त पीक मिळू शकते.
तसेच काटेकोर खत व पाणी व्यवस्थापन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये पिकाला उपलब्ध होतात. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते.
पिकातील मुख्य समस्या व त्यांचे समाधान
अनेक ठिकाणी डाळिंबामध्ये काही समान किड-रोग दिसून आलेत. या समस्या तुमच्याही पिकात आढळू शकतात.

♥सविस्तर जाणून घ्या या किड व रोगाबद्दल.
रासायनिक कीड नियंत्रणाची सविस्तर माहिती "निर्यातक्षम डाळिंबासाठी रसायने" यात दिले आहे.

♥1. तेलकट डाग, बॅक्टेरिया मुळे होणारा करपा किंवा तेल्या
2007 ते 2012 या काळात तेल्याचे डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडले. सुरुवातीला हे फळांवरील ठिपके आहेत असा सर्वांचा गैरसमज झाला. मात्र आता ते तेलकट डाग किंवा तेल्या म्हणून ओळखले जावू लागलेत, ते त्यांच्या फळांवरील विशिष्ट तेलकट डागांमुळे. याचे कारण झॅन्थोमोनास ऍक्सोनोपोडीस pv पुनिकी हा बॅक्टेरीया आहे, ज्याचा भाउबंद लिंबूवर्गीय फळातील कॅंकरमध्ये दिसून येतो. त्याचा प्रसार झाडावरील जखमा आणि झाडाच्या नैसर्गिक छिद्रामधून होतो.सुरुवातीला पाण्याने भरलेले फोड येऊन 2-3 दिवसात पाणी सुकून गडद लाल व तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. जुलै-सप्टेंबर व ऑक्टोबर मधील कालावधीत याचा प्रसार वेगाने होतो. नियंत्रणाचे उपाय पुढील प्रमाणे:

प्रतिबंध: रोगट गोष्टींचा झाडाशी संबंध येऊ न देणे, बागेत वापरलेली उपकरणे , हत्यारे डेटाॅल किंवा मोरचुदच्या द्रावणाने(50g/L) स्वच्छ करूनच वापरणे, या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या. ओलसर जमिनीत शेणखत/ कम्पोस्ट मध्ये मिसळून जैविक बुरशीनाशकांचा चांगला उपयोग होतो. 5kg ट्रायकोडर्मा किंवा 2.5 kg ट्रायकोडर्मा+ 2.5kg पॅसिलोमयसिस प्रती हेक्टर वापरावा.

रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाय: मातीतील रोगकारक जीवाणूंची संख्या कमी करणे महत्वाचे असते. त्यासाठी सुरुवातीला बुरशिनाशकांची भिजवणी आणि नंतर जैविक बुरशिनाशकांचा वापर फायदेशीर ठरते. जैविक बुरशीनाशके रासायनिक बुरशीनाशकासोबत किंवा त्यानंतर 8 दिवसात वापरु नयेत.
स्ट्रेप्टोसाइक्लिन किंवा ब्रोनोपोल (250g/100L पाण्यात) + 2.5 g/L कॅप्टन 50 WP किंवा COC; पहिल्या फवारणीच्या 10-15 दिवसानी फवारावे. स्ट्रेप्टोसाइक्लिन किंवा ब्रोनोपोल किंवा PMBS (पोटॅशियम मेटा बाय सल्फाइट) 40% फॉस्फनिक ऍसिड सॉल्ट्स युक्त बॅक्टेरीया नियंत्रकय नाशक(प्रॉफीलॅलीक्झीन) आलटून पालटून वापरा.
सूत्रकृमी आणि इतर प्रादुर्भावांचे नियंत्रण करा आणि पिक रोगमुक्त ठेवल्यानेही या रोगाचे नियंत्रण सुधारते किंवा संक्रमण वाढत नाही.

♥2. पिकातील मर
मर रोगात फांद्या सुकून पीक मेल्यासारखे दिसते, त्याची कारणे सेराटोसायटीस फिमब्रियाटा, फ्युसारियम ऑक्सीस्पोरम, रायझोक्टोनिया सोलानी या विविध बुरशिंचा प्रादुर्भाव तसेच सूत्रकृमी अशी बरीच आहेत. सुरुवातीला पाने आणि फांद्या पिवळट, तपकिरी दिसतात आणि नंतर सुकून जातात,कालांतराने पूर्ण झाडही वाळून जाते. हा रोग निचरा न होणा-या आणि भारी जमिनीत होतो.
कार्बेनडाझिम (बावीस्टिन/सहारा) 2gm/Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल (रडार,टिल्ट) 1.5ml/Ltr पाण्यात मिसळून आळवणी करा.
कार्बेन्डॅझीम भिजवणीनंतर एक महिन्याने 1kg/acre ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसीस + 40kg शेणखत हे मिश्रण करून खोडाजवळ पसरा.
पिक सूत्रकृमी मुक्त ठेवा,सूत्रकृमीमुळे मुळांना बाधा पोहोचते व रोगांना शिरकाव मिळतो .

♥3. शॉट होल बोरर/ खोडकिडा
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी गेरु (लाल माती) 400gm/Ltr पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी, दुस-या दिवशी त्यामध्ये लिंडेन 20 ईसी 2.5ml किंवा क्लोरपायरीफॉस 20 ईसी 5 ml आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 gm/Ltr याप्रमाणे मिसळून त्याची स्लरी तयार करावी व ती ब्रशच्या साहाय्याने खोडावर लावावी. त्याचबरोबर लिंडेन 20 ईसी 2.5ml किंवा क्लोरपायरीफॉस 20 ईसी 5 ml आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 gm/5Ltrपाणी याप्रमाणे प्रती झाड मुळांच्याजवळ भिजवणी करावी.
क्लोरपायरीफॉस (स्काउट, ट्रायसेल)2ml/Ltr किंवा स्पिनोसॅड (सक्सेस, ट्रेसर) 0.5ml/Ltr पाण्यातून फवारा. PHI 40,28 दिवस अनुक्रमे

♥4. सूत्रकृमी
सूत्रकृमीमुळे केवळ मुळांना बाधा पोहचते असे नाही तर अनेक रोगांचे ते मूळ कारण बनतात.
यांच्या प्रतिबंधासाठी झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करावी, त्याचबरोबर निंबोळी पेंड (1 टन /हे) मातीमधून द्यावे. टोमॅटो, मिरची व वांगी या सूत्रकृमिला बळी पडणा-या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड टाळावी.

रासायनिक नियंत्रण: 10% दाणेदार फोरेट 10-20gm प्रती झाड किंवा कार्बोफ्यूरान3G @20-40gm प्रती झाड बांगडी पद्धतीने जमिनीत मिसळून द्या आणि मातीने झाकून घ्या.
5. फळे तडकणे
खताच्या व पाण्याच्या अयोग्य व्यवस्थापनाने फळ तडकण्याची समस्या उद्भवते, तसेच विविध रोगांमुळे सुद्धा फळे तडकतात.
अ) संपूर्ण पीक व्यवस्थापानमध्ये नियमीत खत व पाण्याचे नियोजन करावे,पिकाला कोणत्याही प्रकारे कसलाही ताण पडू देऊ नये. त्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ति वाढते व तडकण्याची समस्या कमी होते. आच्छादन पद्धतीचा अवलंब करावा त्यामुळे पीक हवामानातील बदल वा ताणामुळे होणार्‍या समस्येला तोंड देते . मातीमधील सेंद्रिय घटक ही वाढतात. याशिवाय विंड ब्रेक्स (वारा अडवणा-या झाडांचा पट्टा) असेल तर जोराचा वारा, पाऊस आणि अन्य हवामानाच्या ताणापासून पीक वाचते
ब) नेहमी जमिनीतल कोरडेपणा जास्त राहणे , तसेच पाणी साठणे टाळा. जमिनीमध्ये योग्य तो ओलावा राहील याकडे लक्ष द्या, त्याचबरोबर पाण्याचा अनियमीत पुरवठा हे फळ तडकण्याचे सर्वात मुख्य कारण आहे. ठिबकद्वारे पिकाचे व्यवस्थापन केल्यास पीक त्याला चांगला प्रतिसाद देते, कारण त्यामुळे खताचा व पाण्याचा पुरवठा पिकाला नियमीत होतो व फळ तडकणे ही थांबते.
क) बोरान आणि कॅल्षियमच्या कतरतेने फळे तडकतात, नियमीत निरीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची 1 फवारणी, फुलो-यापूर्वी,फुलो-यात व फळ तयार होताना करावी, त्यामुळे फळ तडकण्याची समस्या कमी होते व किड रोगांपासूनही नियंत्रण होते.
किंवा प्रत्येकी 2 gm MgSo4, FeSo4, MnSo4 आणि 1 gm सोल्यूबोर प्रति ली. पाण्यात मिसळून 3 वेळा फवारावे: फुलो-यापूर्वी, फुलो-याच्या वेळी आणि फळे तयार होताना
ड) बुरशिजन्य रोगांचा नियमीत प्रतिबंध करा कारण या रोगांमुळे पाने कमी होऊन अन्नद्रव्ये तयार करण्यावर आणि अर्थातच फळाच्या विकासावर परिणाम होतो.
इ) फळ काढणी अवस्थाही फळ तडकण्यामध्ये मुख्य भूमिका बजावते. जास्त पिकलेली फळे अंतर्गत समस्या(बिया खराब होणे) वा फळाची साल तडकणे सोपे करतात.
काटेकोर पीक पोषण : यशाची गुरुकिल्ली
डाळिंब पिकाची लागवड हलक्या जमिनी आणि कोरडवाहू भागात होत असल्याने पिकाला जास्तीत जास्त पोषणमुल्ये, चांगल्या वाढीसाठी देणे महत्वाचे ठरते. हे पीक नत्र व पालाश खताना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते. कॅल्षियम, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, झिंक, लोह, बोरॉन आणि कॉपरसारख्या सूक्ष्मअन्न द्रव्याचा वापर केल्यास चांगल्या प्रतीची फळे मिळतात. सर्व साधारणपणे सर्व बुरशीनाशकांमधे कॉपर असल्यामुळे हे स्वतंत्रपणे देण्याची गरज पडत नाही.
मॅंगनीज, झिंक, बोरॉन, आणि कॉपर चे पाना वरील फवारे मातीत देण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतात, शिवाय परवडतात ही. Fe(लोह) मात्र चिलेट्स च्या रूपात जमिनीतून देणे जास्त प्रभावी ठरते.

♥अन्नद्रव्यांची सर्व साधारण गरज
सुरवातीच्या 3 वर्षांमध्ये N,P आणि K समान हप्त्यामध्ये द्यावे. त्यामुळे या काळात ठिबक मधून (फर्टीगेशन) किंवा जमिनीतून समान NPK% देण्याची शिफारस आहे. त्यानंतर N आणि K हे 1:1.5 च्या प्रमाणात अल्कधर्मी जमिनी(लागवडीचे क्षेत्र या जमिनीत अधिक आहे) साठी द्या.
शेणखत आणि NPK ची पिकाची गरज पुढील प्रमाणे:
पिकाचे वय(वर्षे ) शेण खत(Kg) नत्राची गरज (Kg/ha.) स्फुरदची गरज (Kg/ha.) पालाशची गरज (Kg/ha.)
1 10 250 125 125
2 20 250 125 125
3 30 500 125 125
4 40 500 125 250
5 + 50 625 250 250

स्रोत: ICAR- NRC डाळिंब
तक्त्यामधे नमूद कलेल्या खताची मात्रा युरीया, CAN(कॅल्शियम अमोनियम नायट्रेट), SSP(सिंगल सुपर फाॅस्फेट) व MOP(म्युरेट आॅफ पोटॅश) मध्ये रुपांतरित करण्यासाठी युरीयाला 2.16ने, CAN ला 4 व SSP ला 6.24 व एमओपीला 1.68 ने गुणा.
पिकाला खते देताना माती आणि पाने परीक्षणानुसार द्या आणि जेवढे लागेल तेवढेच जास्तीचे खत द्या.

♥काही फर्टिगेशन बाबत
एकदा खतांची गरज समजली की आपापल्या ठिकाणी असलेल्या विद्राव्य खतांच्या प्रमाणे फर्टीगेशन चे तंत्र बसवता येते. लागणार्‍या खतांचा पूर्ण डोस दिलेल्या कालावधीसाठी विभागून घ्यावा आणि ठरलेल्या पाण्याच्या बरोबर द्यावा. जास्तीत जास्त खत विभागणी आणि वरचे वर दिलेल्या छोट्या खत मात्रा जास्त प्रभावी ठरतात.
वाढीच्या काळातील खतांची माहिती यापूर्वी दिली आहे.
बहारासाठीचे खत व्यवस्थापन ठिबकद्वारे (फर्टीगेशन) (स्रोत ICAR: NRC डाळिंब)
पानगळीनंतरचे दिवस पिकाची अवस्था खताचे व्यवस्थापन
0 -7 पान गळ शेणखताच 2/3 डोस + सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, लोह, बॉरॉन, मॅंंगनीज प्रत्येकी 25 ग्राम प्रती झाड)+ निम पेंड 1-2 किलो /झाड + वर्मी कॉम्पोस्ट 1 किलो/झाड+ फोरेट 10G @25ग्राम/झाड किंवा कार्बोफुरान 3G@40ग्राम/झाड ओलसर जमिनीत झाडाभोवती रिंग खणून. नत्राचा 1/4 डोस + स्फुरदचा 1/3 डोस आणि पालाश चा 1/3 डोस खते दिल्यावर हलके पाणी द्या.
15-21 पहिली पाने पाणी द्या
25 - 50 फूल धरणे पासून 100% फुलो-या पर्यंत जमिनीत नत्राचा 1/4 डोस द्या N:P:K खत 12:61:00 चे फर्टीगेशन एका वेळी 8 किलो हेक्‍टरी द्या. महिनाभरात 15 वेळा पाण्यासोबत द्या. सिंचन द्या.
50-63 60-47 फळ धारणे पासून पूर्ण फळे धरे पर्यंत नत्राचा 1/4 डोस द्या N:P:K खत 19:19:19 चे फर्टीगेशन एका वेळी 8 किलो हेक्‍टरी द्या. महिनाभरात 15 वेळा पाण्यासोबत द्या. सिंचन द्या.
71-126 100% फळ धारणा,फळे मोठी होताना N:P:K खत 00:52:34 मोनो-पोटॅशियम फॉस्फेटचे फर्टीगेशन एका वेळी 2.5 किलो हेक्‍टरी द्या. महिनाभरात 15 वेळा पाण्यासोबत द्या. सिंचन द्या. सुमारे 50% फळधारणा वेळी जमिनीत नत्राचा 1/4 डोस द्या
200-214 फळे तयार होणे हेक्‍टरी 12.5 किलो कॅल्षियम नाइट्रेटचे फर्टीगेशन 15 दिवसांच्या अंतराने द्या

♥विश्रांती काळातील व्यवस्थापन
बागेचा विश्रांतीचा काळ हा सुद्धा महत्वाचा काळ आहे. याकाळात बाग, फळधारणेसाठी तयार केली जाते. नियमीत सिंचन, खत व्यवस्थापन व पीक संरक्षणासाठी योग्य उपाय योजल्यास बाग रोगमुक्त व निरोगी राहते.
बहार व्यवस्थापनातील कळीचे तीन मुद्दे

♥शेतकरी 3 हंगामात बहार धरू शकतात,मृग बहार(पावसाळ्यात),हस्त बहार (पावसाळ्यानंतर)आणि आंबे बहार (आंब्याच्या हंगामात). योग्य पीक व्यवस्थापन करून वर्षाला एक बहार धरावा व हंगाम नसताना पिकाचे योग्य व्यवस्थापन करावे.

♥1. कोणता बहार घ्यायचा(आणि का?)
बहार धरण्याचा काळ, बाजाराच्या मागणीनुसार, स्थानिक परीस्थितीनुसार आणि शेतक-याच्या सोयीनुसार निश्चित केला जातो.
पाण्याची कमतरता असल्यास आणि कमी पावसाच्या प्रदेशात मृगबहार घ्यावा. मृगबहारामध्ये कीड व रोगाचा जास्त प्रादुर्भाव होत असल्याने या बहाराची जास्त शिफारस नाही. तसेच कमी प्रकाश असल्यामुळे या बहारात फळाना आकर्षक रंग येत नाही.
मध्यम पाण्याच्या प्रदेशात हस्त बहाराची शिफारस आहे. पण या हवामानात पाण्याचा ताण व्यवस्थित न बसल्याने पानगळ नीट न होण्याची समस्या उद्‍भवते.
जिथे पाण्याची मुबलक प्रमाणात सोय आहे तिथे आंबेबहार घ्यावा. या बहारात किड व रोगाचे प्रमाण कमी असते. जास्त काळ सूर्यप्रकाश मिळाल्याने व कोरडे हवामान यामुळे फळांची प्रत सुधारते.

♥2. बहार कसा घ्यायचा
बहार धरण्यासाठी, मध्यम ते भारी जमिनीत 45दिवस आणि हलक्या जमिनीत 30-35 दिवस फुले येण्याआधी पाण्याचा ताण द्यावा. यामुळे पानगळ होते.
पानगळ समाधानकारक न झाल्यास इथ्रेल@2-2.5ml/Ltr ची फवारणी करा. झाडाना 40-45 दिवसानंतर पाण्याचा ताण दिल्यानंतर मध्यम स्वरूपाची छाटणी करा.
छाटणी केल्यानंतर लगेचच खताचा हफ्ता देऊन पाणी द्या. यानंतर फूल व फळधारणा होते.
फळांचे पोषण होऊन चांगली वाढ व्हावी यासाठी छाटणी करणे महत्वाचे. छाटणी न केल्यास फळे फक्त फांदीच्या शेवटी येतात. फळांची विरळणी अशा पद्धतीने करा की त्यामुळे प्रत्येक फांदी व फळाना पुरेशी जागा, प्रकाश मिळेल तसेच फळांची जास्त दाटी न होता हवा खेळती राहील.
जुन्या, वांझ आणि रोगट फांद्या छाटणीच्या वेळी काढून टाका. डाळिंबासाठी झाडाचा फुलदाणीसारखा आकार ठेवून केलेली छाटणी जास्त फायदेशीर ठरते.
3. कशामुळे दर्जेदार फळे मिळतात
फुलोरा व फळे येण्याच्या काळात काटेकोर व्यवस्थापन केल्यास, चांगल्या प्रतीची फळे अधिक प्रमाणात मिळतात. बहाराच्या काळात योग्य पोषणद्रव्याचे फर्टीगेशन जरुरीचे आहे. कीड व बुरशीनाशकांचा वापर आवश्यकते प्रमाणे करावा. रसायनांचा अवास्तव वापर केल्यास, खर्च वाढतो तसेच किड व रोग या रसायनांना सरावतात. त्यामुळे आगामी काळात त्यांचे नियंत्रण अजूनच कठीण बनते.
सक्रिय मुळ्यांच्या जवळ कायम ओलावा ठेवणे आणि विभागून दिलेल्या लहान खत मात्रा फळ पोसण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
निर्यातक्षम डाळिंबासाठी संतुलित रसायने
निर्यातक्षम फळे मिळण्यासाठी पुढील तक्त्या मध्ये नमूद केल्याप्रमाणे किटकनाशके,बुरशीनाशके व अन्य रसायने फवारा. रसायनांच्या मात्रा आणि त्यांचा काढणीपूर्व कालावधी (PHI) याकडे काळजीपूर्वक लक्ष दया.
(स्रोत : निर्यातक्षम डाळिंबासाठी जाहीर केलेल्या अपेडा RMP Guidelines )

♥कीड/ रोग रसायने डोस EU MRL (mg/kg) PHI
तेल्या बोर्डो मिश्रण 0.5-1.00% 20 15
तेल्या, पाने आणि फळांवरील ठिपके, बुरशीजन्य करपा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50%WP 2.5 g/L 20 35
बुरशीजन्य मर प्रोपिकोनॅझोल 25%EC 1.5 mL/L (माती भिजवण) 0.05 20
बुरशीजन्य मर कारबेंडॅझीम 50%WP 2 mL/L (माती भिजवण) 0.1 100
बुरशीजन्य मर ट्रायडेमोर्फ 80%EC 1 mL/L (माती भिजवण) 0.05 40
पाने आणि फळांवरील ठिपके, बुरशीजन्य करपा मॅन्कोझेब 75%WP 2 g/L 0.05 90
पाने आणि फळांवरील ठिपके प्रोपिनेब 70%WP 3 g/L 0.05 90
पाने आणि फळांवरील ठिपके झायरम 80%WP 2 g/L 0.05 90
पाने आणि फळांवरील ठिपके, बुरशीजन्य करपा कॉपर हाइड्रॉक्साइड 77%WP 2 g/L 20 35
पाने आणि फळांवरील ठिपके कॅप्टन 50%WP 2.5 g/L 0.02 35
पाने आणि फळांवरील ठिपके क्लोरोथॅलोनील 75%WP 2 g/L 0.01 40
पाने आणि फळांवरील ठिपके डीफेनकोनॅझोल 25%EC 1 g/L 0.1 45
पाने आणि फळांवरील ठिपके ट्रायडिमेफाॅन 25% WP 0.5-1.0 g/L 0.1 45
पाने आणि फळांवरील ठिपके सल्फर 80%WP 2.5 g/L 50 10
पाने आणि फळांवरील ठिपके कारबेंडॅझीम 50% WP 1 g/L 0.1 100
पाने आणि फळांवरील ठिपके थियोफेनेट मिथाइल 80%WP 1 g/L 0.1 50
बुरशीजन्य करपा मेटॅलॅग्ज़िल 8% + मॅन्कोझेब64% (मेटॅलॅग्ज़िल MZ72%WP) 2.5 g/L 0.05 66
बुरशीजन्य करपा सायमोक्सॅनिल 0.08 + मॅन्कोझेब 64% (कर्झेट M8) 2 g/L 0.05 66
बुरशीजन्य करपा फॉज़ीटील-अल 80%WP 2 g/L 2 30
बुरशीजन्य करपा डायमिथोमाॅर्फ 50%WP 1 g/L 0.05 66
फळ, खोड पोखर किड, शॉट होल बोरर, पाने खाणारी अळी इनडोक्साकार्ब 14.5%SC 0.5 mL/L 0.02 30
फळ, खोड पोखर किड, शॉट होल बोरर, पाने खाणारी अळी स्पिनोसॅड 45 %SC 0.5 mL/L 0.02 28
फळ, खोड पोखर किड, शॉट होल बोरर, पाने खाणारी अळी सायपरमेथ्रिन 25%EC 1 mL/L 0.05 40
खोड पोखर किड, शॉट होल बोरर, पाने खाणारी अळी, पिठ्या ढेकूण क्लॉरपायरिफाॅस 20%EC 2 mL/L 0.05 40
पिठ्या ढेकूण, फूलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी डायमेथोएट 30 %EC 1 mL/L 0.02 100
पिठ्या ढेकूण, फूलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी इमीडाक्लोप्रिड 17.8% SL 0.3 mL/L 0.05 60
पिठ्या ढेकूण, फूलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी थायामेथोक्झॅम 25% WG 0.25 g/L 0.05 40
कोळी प्रॉपर्गाइट 57% EC 1 mL/L 0.01 15
कोळी ऍबामेक्टिन 1.9% EC 0.5 mL/L 0.01 30
कोळी अझाडिरॅक्टीन 1% 2 mL/L 0.01 3
सूत्रकृमी अझाडिरॅक्टीन 1% 2 mL/L 0.01 3

♥वरील तक्यात दिलेल्या सर्व मात्रा हाय वॉल्यूम स्प्रेयर्स साठीच्या आहेत, नेहमीच्या स्प्रेची क्षमता 1000 ली/हेक्टर असते. स्प्रेची क्षमता स्प्रेयर प्रमाणे बदलून घ्यावी. मात्र रसायनांचे 1 हेक्टरसाठी दिलेले प्रमाण काटेकोर रीतीने पाळणे गरजेचे आहे, तरच किडनाशकांचे अंश फळात राहणार नाहीत.

♥काढणी व बाजाराबाबत थोडे
डाळिंबाला त्यातील अॅंटीऑक्सीडंट आणि अन्य आरोग्यास हितकारक गोष्टींमुळे "सूपरफ्रूट" म्हटले जाते. यामुळे जागरूक ग्राहकांमध्ये याची मागणी वाढते आहे , आणि अर्थातच त्यामुळे चांगला बाजारभाव मिळतो आहे.
मोठी, गोलाकार आणि एकसमान लाल/भगवा रंग असलेल्या फळाना चांगला बाजार भाव मिळतो.
फळांची साल जाडसर असते तसेच याची टिकवण क्षमता चांगली आहे त्यामुळे याला वेगळ्या प्रक्रियेची जसे की सफरचंदमधे वॅक्सचे आवरण देणे, अशी खास गरज भासत नाही.
फळे शीतगृहात 8 ते 10 आठवडे 5 अंश सेल्सिअस तपमानाला आणि जास्त काळासाठी 10 अंश सेल्सिअस तापमान आणि 95% आर्द्रतेला साठवली जातात, यामुळे फळाचे वजन कमी होणे आणि कमी तपमानाने होणारी बाधा टाळली जाते.
श्रिंक पॅकिंग: प्रत्येक फळाला श्रिंक पॅकिंग केल्याने आणि 8 अंश सेलसियस तापमानाला साठवल्याने फळे 1 महिना जास्त टिकू शकतात असे प्रयोगात आढळले आहे.
बाजारात जास्त विकल्या जाणार्‍या जाती
गणेश,गोड दाण्यासाठी बाजारात अधिक काळ मागणी असलेली एक सुप्रसिद्ध जात आहे. भगवा(केशर), आरक्ता, रूबी सारख्या अनेक जाती दाण्याच्या व फळांच्या आकर्षक रंगासाठी प्रसिद्ध आहेत.
भगवा या जातीला योग्य आकार, रंग आणि चव यामुळे चांगला भाव मिळतो तसेच या जातीला बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच याची मोठ्या प्रमाणात निर्यातही केली जाते.
भारतातील मुख्य बाजार
बाजारातील डाळिंबाची अावक ही मुख्यत: लागवडीच्या जवळपास च्या मार्केटमध्ये आढळते, ज्यात सांगोला, सोलापूर, पुणे, नासिक मार्केट्स चा समावेश आहे. मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगलोर आणि अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहराच्या बाजारात वर्षभर डाळिंबाची अावक असते.
महाराष्ट्रात सर्वाधिक 66% उत्पादन होते आणि पाठोपाठ कर्नाटका(19%) मध्ये होते. अन्य राज्ये जसे आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश येथे ही आता लागवड वाढत आहे.
गेल्या काही वर्षात बाजारात काही विशिष्ट असे चढउतार न आढळता खूप विविधता दिसली आहे. मात्र पावसाळ्यात येणारी फळे कमी प्रतीची आणि कमी किमतीची नेहमीच आढळली आहेत.

♥परदेशातील निर्यात
भारत हा डाळिंबाचा मुख्य निर्यातदार असून यूएई,बांग्लादेश,नेदरलॅंड्स,इंग्लंड,सौदी अरेबिया,रशिया,थायलंड,नेपाळ आणि काही अन्य देशात निर्यात करतो.
निर्यातीत स्पेन आणि ईराणशी स्पर्धा आहे,कारण ते युरोपियन देशांच्या जवळ आहेत. यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविल्यास जागतिक बाजारात टिकाव धरणे सोपे जाईल. पणन मंडळ आणि अन्य काही संबंधित अधिकारी पॅक हाउसेस, वाहतूक सुविधा यात सुधारणा करणे आणि विविध देशात डाळिंब लोकप्रिय करणे, ब्रॅँडिंग करणे यासाठी प्रयत्नशील आहेत.

♥डाळिंब लागवडीतील काही नव्या गोष्टी
विविध संशोधक आणि शेतकरी त्यांच्या पातळीवर विविध प्रयोग करत असतात. असे काही प्रयोग आम्ही आपल्यासाठी सांगू इच्छितो. मात्र हे प्रयोग शिफारसी नाहीत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारी वर थोड्या प्रमाणात करून पहावे आणि नंतरच मोठ्या प्रमाणावर करावे.

♥सघन लागवड
राजस्थान कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरच्या काही संशोधकानी 2X2 मी च्या सघन लागवडीचे प्रयोग केले. विविध खत मात्रा आणि ठिबक सिंचनचा वापर करून त्याना आढळले की 100% खत मात्रा आणि एक दिवसा आड पाणी/ खते दिल्याने सर्वाधिक उत्पादन आणि प्रत मिळाली.
काही संशोधकानी मात्र सघन लागवडीने लहान फळे मिळाल्याचे म्हटले आहे, त्यामुळे हे विचारात घेऊन लागवड नियोजन करणे महत्वाचे आहे.
पारंपरिक पद्धतीने लागवड केल्यास ठिबक आणि फर्टिगेशन मुळे 60% एवढेच खत लागते असे आढळले.

♥बागेत सेंद्रिय प्रयोग
प्रोबायोटिक्स(ज्यात चांगले सूक्ष्मजीव वाढवून रोगकारक जीवांची संख्या कमी केली जाते)चा वापर करण्यात काही शेतक-याना यश मिळाले. EM सोल्यूशन, ट्रायकोडर्मा+ , पॅसिलोमयसिस यांचे नियमीत ड्रेन्चिंग त्याना उपयोगी पडले.
काही शेतक-यांच्या मते जोमदार आणि सशक्त झाडे हेच निरोगी असण्याचे सूत्र आहे. संतुलित अन्नद्रव्ये देणे आणि हवामानामुळे तसेच अन्य कोणताही ताण येऊ न देणे हे महत्वाचे मानतात. कोणताही ताण हा झाडांची अन्न घेण्याची क्षमता कमी करून त्याना नाजूक बनवतो असे ते म्हणतात.
फळांना पिशव्यानी झाकणे
फळे विकसित होताना त्याना पिशव्यानी झाकणे हे आफ्रिका, युरोप मधील देश तसेच चीन मध्ये महत्वाचे मानले जाते. संशोधकाना यामुळे फळ तडकणे आणि फळांवरील विविध कि़डींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळले. याशिवाय कीडनाशकांचे अंश, जड धातू अशा विषारी गोष्टींचा फळांवर अवशेष अर्थातच नव्हता.
फळावर पिशव्या कापड, कागद किंवा पाॅलिथीनच्या बसवता येतात. मात्र पाॅलिथीन जास्त सोयीस्कर वाटले. पाॅलिथीन वापरताना त्याला 3-4 छिद्रे पाडणे महत्वाचे आहे. तसेच फळ गोटीच्या आकाराचे असल्यापासून पिशव्या बांधणे सुरू करावे.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!