टोमॅटो वरील रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन

टोमॅटो वरील रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन♥प्रगतशील शेतकरी ♥

♥लवकर येणारा करपा (अर्लीब्लाईट) -

हा रोग अल्टरनेरिया सोलाणी या बुरशीमुळे होतो.
लक्षणे

- पानांच्या वरील बाजूस तांबडे काळसर गोलाकार ठिपके पडतात.

- कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे काळसर गोल बनतात.

- या ठिपक्‍यांच्या मध्यभागी एकच मध्यबिंदू असलेल्या गोल वलयाकृती रेषा आढळतात.

- या रोगास उबदार दमट हवामान पोषक असते. अशा हवामानात रोगाचे प्रमाण वाढते आणि रोगाचे प्रमाण जास्त झाल्यावर पानांच्या देठांवर ठिपके आढळतात आणि सर्व झाड करपते.

नियंत्रणाचे उपाय -
- टोमॅटोचे पीक पाच ते सहा आठवड्यांचे झाल्यावर मॅन्कोझेब 1500 ग्रॅम पाण्यात मिसळणारे किंवा झायरम 1000 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 1250 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून हेक्‍टरी पंधरा दिवसांच्या अंतराने फवारावे.

♥उशिरा येणारा करपा (लेट ब्लाईट) -

लक्षणे

- हा एक महत्त्वाचा रोग असून, या रोगाचा उपद्रव झाडांवर व फळांवरदेखील आढळून येतो.

- पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात नंतर ते आकाराने वाढतात संपूर्ण पान वाळते.

- या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम खालील पानांवर आढळून येतो.

- पानांचा रोगग्रस्त भाग हात लावल्यानंतर कोलमडतो.

- हवामान दमट असेल तर संपूर्ण पान दोन ते चार दिवसांत रोगग्रस्त होते.

- या रोगाचा प्रादुर्भाव फळांवरसुद्धा होतो. फळांवर चट्टे पडतात व त्यामुळे अशा फळांना बाजारात कमी किंमत मिळते.

नियंत्रणाचे उपाय -

- या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी झायनेब, डायथेन एम-45 किंवा डायफोलटान यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी दीड ते अडीच किलो प्रति हेक्‍टरी करावी.

- रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम आणि टेब्युकोनॅझोल पाच-10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रत्येकी दोन फवारण्या आलटून पालटून कराव्यात किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड 30 ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. आवश्‍यकतेनुसार तीन ते चार फवारण्या कराव्यात. उशिरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्‍झील एम. झेड-72 किंवा फोसेटील ए.एल. (25 ग्रॅम प्रति 10 लि. पाणी) आवश्‍यकतेनुसार आलटून पालटून फवारावीत.

♥विषाणूजन्य (व्हायरस) रोग -
विषाणूंमुळे टोमॅटोत अनेक वेगवेगळे रोग येतात. परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, पर्णगुच्छ अथवा बोकड्या व मोझॅक हे प्रमुख विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळतात.

♥टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस

लक्षणे -

- टोमॅटो पिकाचे सर्वांत जास्त नुकसान या विषाणू रोगामुळे होते. रोगवाढीच्या सुरवातीच्या काळात या रोगाची लक्षणे बुरशीपासून होणाऱ्या करपा रोगासारखीच दिसतात, त्यामुळे बऱ्याच वेळा हा रोग ओळखण्यात चूक होते. विशेषतः संकरित टोमॅटोवर हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो. परंतु सध्या प्रचलित असलेल्या सर्व जातींवरही हा रोग दिसून येतो.

- रोगाची सुरवात प्रथम शेंड्याकडून होते. शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात. हा रोग पाने, देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तांबूस-काळपट चट्टे पडतात. शेवटी झाड करपते व मरते.

- रोगाचा प्रादुर्भाव लागवडीपासून एक महिन्याच्या आत झाल्यास फळधारणा न होता संपूर्ण झाड 10-15 दिवसांत करपून मरून जाते. उशिरा रोग आल्यास फळाचे काही तोडे होतात. या रोगाचा प्रादुर्भाव फळांवरसुद्धा होतो. फळावर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात. फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक लाल रंग येत नाही. या रोगाचा प्रसार फुलकिडे (थ्रिप्स) या किडीमार्फत होतो.

♥ टोमॅटो पर्णगुच्छ (बोकड्या) एकात्मिक नियंत्रण♥प्रगतशील शेतकरी ♥

लक्षणे -

- या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टोबॅको लीफकर्ल व्हायरस या घातक लसीमुळे होतो. या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते.

- झाड खुजे राहून पर्णगुच्छ किंवा बोकडल्यासारखे दिसते. आलेली फळे आकाराने लहान राहतात. या रोगाचा प्रादुर्भाव सुरवातीला झाल्यास फलधारणा होत नाही. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरीमाशीमुळे होतो.

♥टोमॅटो मोझॅक -

लक्षणे -

- टोबॅको मोझॅक व्हायरस, कुकुंमबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे टोमॅटोवर मोझॅक रोग आढळून येतो. या रोगांची लक्षणे जवळपास सारखी असल्याने व्हायरस ओळखणे कठीण जाते. या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट, पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले-फळे फार कमी प्रमाणात लागतात.

- रोगग्रस्त बियाण्यापासून तयार झालेल्या रोपांची लागवड केल्यास किंवा जमिनीतील रोगग्रस्त अवशेषामुळे रोपांच्या मुळांना लागण होऊन रोगाची सुरवात होते. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करतेवेळी, स्पर्शाने आणि मावा व किडीमार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.
नियंत्रणाचे उपाय -
विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या किडीमार्फत होतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते.
त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे. या रोगाची लागण रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीपर्यंत केव्हाही होते. म्हणून या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासून काळजी घेणे फार जरुरीचे आहे.

- बियाणे पेरणीपूर्वी इमिडाक्‍लोप्रीड किंवा कार्बोसल्फान (पाच ग्रॅम प्रति किलो) अधिक ट्रायकोडर्मा (पाच ग्रॅम प्रति किलो) यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे.

- पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर कार्बोफ्युरान 30 ग्रॅम किंवा फोरेट 25 ग्रॅम प्रति 3 x 1 मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.

- बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर 60 ते 100 मेश नायलॉन नेट किंवा मलमल कापड मच्छरदाणीसारखे टाकावे म्हणजे रोग प्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.

- फिप्रोनील 15 मि.लि. किंवा थायोमेथोक्‍झाम चार ग्रॅम किंवा डायमेथोएट किंवा मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.

- इमिडाक्‍लोप्रीड 10 मि.लि. किंवा कार्बोसल्फान 20 मि.लि. अधिक ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.

- लागवडीपूर्वी 25-30 दिवस अगोदर टोमॅटो लागवड क्षेत्राच्या सर्व बाजूने पाच ते सहा ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरी पेरल्यास पांढरी माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते.

- रोगाची लक्षण दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावीत.

- लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. किंवा थायोमेथोक्‍झाम चार ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 10 मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 20 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रीड चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दर 10-15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

संकलन!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!