शेती शास्त्राशी सुसंगत हवे दैनंदिन कामकाज
शेती शास्त्राशी सुसंगत हवे दैनंदिन कामकाज♥प्रगतशील शेतकरी♥
♥शेती शास्त्राशी सुसंगत असे दैनंदिन शेती कामाचे तंत्रज्ञान विकसित करायला हवे. हे शास्त्र समजून शेती केली, तर अस्मानी संकटाशिवाय दुसरे कोणते संकट शेतीवर येणार नाही; पण या शास्त्राप्रमाणे दैनंदिन शेतीकामाचे तंत्रज्ञान विकसित करणे सोपे काम नाही.
♥शेतीचे शास्त्र निसर्गानेच तयार केले आहे. पृथ्वीतलावर सर्वप्रथम वनस्पतीसृष्टी अस्तित्वात होती. आज ज्या वनस्पती आहेत, त्या सर्व वनस्पती त्या वेळी अस्तित्वात होत्या. त्यांचा हंगाम व जीवनक्रम निसर्गानेच ठरवला आहे. पृथ्वीतलावर मनुष्यप्राणी अस्तित्वात आल्यावर त्याने निसर्गाच्या या कामाचे हजारो वर्षे निरीक्षण केले, त्यामुळे त्याने केलेल्या सूक्ष्म निरीक्षणातून त्याला शेतीचे शास्त्र समजले. शेतीचे शास्त्र समजले तरी शेती करता येत नाही. शेतीच्या शास्त्राप्रमाणे शेतीत जाऊन दैनंदिन काम करावे लागते. असे काम करण्यासाठी अवजारे बनवावी लागतात. अशी अवजारे तयार करण्यास मनुष्यप्राण्याला किती त्रास झाला असेल व किती कालावधी लोटला असेल याची कल्पनाच न केलेली बरी. अशा हजारो वर्षांच्या प्रयत्नातून त्यांनी लाकडी नांगर तयार केला. इ. स. पूर्व चारशे वर्षांच्या पूर्वी ‘कृषी पाराशर’ या संस्कृत ग्रंथातला कडी नांगराच्या विविध भागांच्या मापासह लाकडी नांगर कसा बनवतात याची माहिती सांगितली आहे. यावरून शेतकऱ्यांनी त्यापूर्वीच लाकडी नांगर बनवून दैनंदिन शेती कामातून शेतीला सुरवात केली असावी म्हणजे शेती व्यवसायाची सुरवातच मुळी दैनंदिन शेती कामातून झाली आहे.
♥यानंतरच्या हजारो वर्षांत शेतीची दैनंदिन कामे शेती शास्त्राशी सुसंगत चालवण्यासाठी शेतकरी सतत शेतीच्या अवजारात सुधारणा करत आले आहेत. सध्याच्या आधुनिक शेतीतसुद्धा याच कारणासाठी सतत शेतीच्या अवजारात (यंत्रात) सुधारणा केली जात आहे. या हजारो वर्षांच्या प्रयत्नांतून शेतकरी शेतीच्या शास्त्राशी सुसंगत दैनंदिन शेतीच्या कामाचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आले आहेत. परंपरागत शेतकरी ही कामे निसर्गाच्या सान्निध्यातच करत असल्यामुळे शेतीचे शास्त्र त्यांच्या हाडीमाशी खिळले होते; पण या शास्त्राप्रमाणे दैनंदिन शेतीकामाचे तंत्रज्ञान विकसित करणे सोपे काम नाही. शेतीचे वर्षाचे तीन हंगाम असतात. प्रत्येक हंगामाचे हवामान वेगळे असते. प्रत्येक हंगामातील पिके वेगळी. या पिकांचा जीवनक्रम वेगळा. या प्रकारे पिकाच्या लागणीपासून काढणीपर्यंतच्या पिकाच्या प्रत्येक अवस्थेतील कामाचा प्रकार वेगळा, तसेच या कामासाठी वापरावी लागणारी अवजारे वेगळी असतात. या पिकाच्या लागणीसाठी जमिनीची पूर्वमशागत व पूर्वतयारी चांगली असणे आवश्यक असते, नाहीतर संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती असते, तसेच सेंद्रिय खताची निगा त्याचे महत्त्व व शुद्ध अानुवंशिक गुणानुसार निवड पद्धतीने बियाण्याची उत्पादन क्षमता वाढवणे ही सर्व कामे अगदी ज्या त्या वेळी बिनचूक पार पाडली तरच शेतीचे उत्पन्न वाढते. इतक्या गोष्टींवर अचूक लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण वर्षाच्या ३६५ दिवसांचे शेतीकामाचे व्यवस्थापन डोळ्यांसमोर ठेवावे लागते. शेती शास्त्राशी सुसंगत शेतीच्या दैनंदिन कामाचे तंत्रज्ञान विकसित करणे व त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन शेतीकामाचे व्यवस्थापन ठेवणे अशा प्रकारे ते करत असलेल्या ३६५ दिवसांच्या कामाच्या तपशीलवार नोंदी असल्या तर शेतीचे व्यवस्थापन शास्त्र या नावाचा एक संदर्भ ग्रंथ तयार झाला असता. तो आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही उपयोगी पडला असता; पण अशा नोंदी मिळत नाहीत, त्यामुळे हे त्याचे ज्ञान त्यांच्याबरोबरच लुप्त झाले.
♥१९४०-१९५० या काळात आमच्या मळ्यात परंपरागत शेती कामात कुशल व अनुभवी शेतमजूर कामाला होते. गुरूमंत्र मला या शेतमजुरांकडून मिळतो. ज्येष्ठ कृषी संशोधक डॉ. राहुडकर यांनी ‘कृषी पाराशर’ या संस्कृत ग्रंथाची माहिती असलेला लेख ‘ॲग्रोवन’ (१ ऑक्टोबर २०११) मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या लेखात अनेक ऋषींनी अनेक संस्कृत ग्रंथांत शेतीसंबंधी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. ही माहिती आजही शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने, शेती शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी ‘कृषी पाराशर’ हा ग्रंथ अवश्य वाचावा, असे लिहिले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने १९५३ मध्ये या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला आहे. यानंतर मात्र या संशोधनाची फारशी दखल घेतल्याचे दिसत नाही. यामुळे आधुनिक शेतीच्या योजना तयार करताना या संशोधनाची व शेतकऱ्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेता आली नसावी.
♥शेतकरी हा एकटा शेती करू शकत नाही. शेतकरी व शेतीचा परिवार (परंपरागत शेतीतले बारा बलुतेदार) या सर्वांनी मिळून करावयाचा शेती व्यवसाय आहे. परंपरागत शेतीत शेतकरी व शेतीचा परिवार यांची कामे एकमेकांच्या कामाशी सुसंगत व समन्वयाने चालत. शेतकरी शेतीचे उत्पन्न निघेल त्या मानाने या परिवाराच्या कमी-अधिक कामाची मजुरी समन्यायी पद्धतीने शेतीतील उत्पन्नाच्या स्वरूपातच देत असे. त्याला बलुते म्हणत. यामुळे शेतीची सर्वांचीच कामे शेती उत्पन्न वाढले पाहिजे या एकाच उद्देशाने चालत असे. उत्पन्न वाढले म्हणजे त्याचा फायदा सर्वांनाच होत असे. रोख पैशाचा व्यवहार त्या वेळी नव्हता.
♥त्या वेळच्या सरकारांचे शेतकऱ्याचे शेतीतील दैनंदिन कामात फारसे लक्ष नसे. भीषण दुष्काळासारख्या अस्मानी संकटात मात्र अनेक सार्वजनिक कामे काढून व इतर अनेक प्रकारे शेतकऱ्यांना साह्य केल्याचे दाखले आहेत.
♥शेतकऱ्यांनी अनादी काळापासून गेली हजारो वर्षे अनेक भीषण दुष्काळाशी टक्कर देत दैनंदिन शेती कामात कुणाच्याही मदतीशिवाय शेती व्यवसाय चालवला आहे. जमिनीचे आरोग्य उत्तम ठेवून सुस्थितीत असलेला शेती व्यवसाय आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सोपवला आहे.
♥आधुनिक शेतीत शेती शास्त्राशी सुसंगत दैनंदिन शेती कामाचे तंत्रज्ञान विकसित करणे व त्याप्रमाणे आपल्या शेतीकामाचे उत्तम व्यवस्थापन ठेवणे या कामाची परंपरागत शेतीपेक्षाही अधिक गरज आहे; पण शासनाची धोरणे व आधुनिक शेती परिवाराचे असहकार्य यामुळे शेतकऱ्यांना अशी कामे करण्यासच अनेक अडथळे निर्माण केले आहेत व याच आज आपल्या शेती व्यवसायापुढच्या समस्या आहेत. त्या समस्या कशा दूर करायच्या याचा विचारही व्हायला हवा.
संकलित!
Comments
Post a Comment