अहंकार आला की, दुःख आले
विचार करायला लावणारी कथा
~~~~~~~~~s~~~~~
🌹अहंकार आला की, दुःख आले !🌹
एका गावात रथोत्सव चालू असतो. भाविक तो रथ एका गावातून दुसर्या गावात वाजत-गाजत नेत असतात. मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात.
त्यांना प्रश्न पडतो, रथातील देवाला दुसर्या गावाला कसे पोहोचवायचे ?
भाविक पर्याय म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही.
मार्गात मध्येच भाविकांना एक बैल दिसतोे.
सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात. रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्व जण दुसर्या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागा रहात नाही; म्हणून लोक बैलालाही भक्ती-भावाने हार घालू लागतात.
मार्गाने जातांना बैल विचार करतो आतापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे ?
भाविक देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे बैल मानू लागला आणि त्यामुळे तो अधिकच आनंदी झाला. काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला,
मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. हा विचार आल्यावर तो स्वतःचे अंग झाडतो.
त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. हे पाहून भाविक भडकतात आणि बैलाला धोपटतात.
तात्पर्य :
जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे,
तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे.
ज्या क्षणी अहंकार बळावतो आणि हे सर्व माझ्यामुळे आहे, माझ्यासाठी आहे, असे विचार येऊ लागतात, त्या वेळी आपली स्थिती त्या बैलापेक्षा वेगळी रहात नाही; म्हणून देवाला विसरू नये. अहंरहित रहावे.
सर्व मानसन्मान आणि कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करावे. तसेच नेहमी कृतज्ञता अन् शरणागत भावात रहावे..
~~~~~~~~s~~~~~
संकलीत!
Comments
Post a Comment