कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती

*** कलौ श्रीपादवल्लभ: ***

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती !
भगवान श्रीदत्तप्रभू दर्शश्राद्धाच्या दिवशी क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंडसौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, " जननी, काय हवे ते माग ! " असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, " स्वामी, हेच बोल सत्य करा ! " असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पावनदिनी, सूर्योदय समयी पीठापूरमध्ये, श्री. अपळराज व सौ. सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात जो कलियुगात  अवधूत होतील, असा उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच अाहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात " कलौ श्रीपादवल्लभ: । " असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण श्रीदत्तावतार असून त्यांचे वय कायमच १६ वर्षांच्या कुमाराएवढे असते.भगवान श्रीदत्तात्रेयांची कलियुगातील गुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते.
भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज रूपात दर्शन झालेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या हृदयात झालेल्या त्या दर्शनानुसार योगिराज श्री. वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपादांचे सुंदर चित्र काढलेले आहे. तसेच एक भव्य तैलचित्र प. पू. सद्गुरु. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील माउली आश्रमात आहे. त्याचाच फोटो या लेखासोबत शेयर केलेला आहे.
त्यांनी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी अनेक दिव्य लीला केल्या.
भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम " दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा " हा दत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. पुढे प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तच्या चातुर्मास्यात, प्लेगपासून संरक्षण व्हावे म्हणून सात नाम सप्ताह करवून घेतले होते. त्यांपैकी एका सप्ताहात पुन्हा याच महामंत्राचा  सर्वांना उपदेश करून " दिगंबरा..." महामंत्र सर्वत्र प्रचलित केला.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी आपला देह कुरवपूर येथे कृष्णामाईत अदृश्य केला, पण देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा  " नित्य अवतार " आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत चालूच राहणार आहे.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून " श्रीपादचरित्रामृतम् " ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे.
श्रीनृसिंहवाडी, गाणगापूर स्थानांवर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव(जामोद) येथेही त्यांचे वास्तव्य झाले होते. आजमितीस तेथे त्यांचे भव्य मंदिर श्रीपाद सेवा मंडळाने उभारले आहे.
त्यांनीच पुन्हा आपला आशीर्वाद खरा करण्यासाठी, अंबा-माधव या दांपत्याच्या पोटी कारंज्याला भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन आपले भक्तानुग्रह कार्य चालू ठेवले.
आजच्या परम पावन दिनी, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
विमला: कीर्तयो यस्य श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण जयति स्वेष्टकामधुक् ॥
ज्यांची यश-कीर्ती अत्यंत उज्ज्वल असून, साक्षात् श्रीदत्तप्रभूच कलियुगामध्ये श्रीपादरूपाने निरंतर कार्य करीत आहेत ! त्यांच्या श्रीचरणारविंदी अनंतानंत दंडवत प्रणाम  !!

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...