मत्स्य व्यवसायातील संधी अशा आहेत
मत्स्य व्यवसायातील संधी अशा आहेत♥प्रगतशील शेतकरी♥
♥मत्स्य संवर्धनाचे प्रकार-
1. गाव-तळ्यातील मत्स्य संवर्धन
2. क्षारपड भागात मत्स्य संवर्धन
3. शेततळ्यात मत्स्य संवर्धन
4. चारमाही तलावात मत्स्य संवर्धन
5. एकात्मिक मत्स्य संवर्धन
6. शोभिवंत मत्स्यपालन
7. मासळीपासून विविध पदार्थ
♥गाव-तळ्यातील मत्स्य संवर्धन -
विदर्भात माल-गुजारी तलाव, तर राज्याच्या इतर भागांत गावतळी या नावाने बऱ्याच खेड्यांमध्ये अशी तळी किंवा तलाव असतात. हे तलाव सार्वजनिक असतात किंवा काही ठिकाणी ग्राम पंचायतीच्या मालकीची असतात. गावातील लोक एकत्र येऊन येथे मत्स्य संवर्धन करू शकतात. बहुतेक वेळा असे तलाव अत्यंत सुपीक असतात. त्यामुळे येथे माशांचे भरपूर उत्पादन मिळते.
♥क्षारपड भागात मत्स्य संवर्धन -
राज्यात बऱ्याच शेत जमिनी अति पाण्याच्या वापरामुळे क्षारपड किंवा चोपण झालेल्या आहेत. या जमिनी नापिक झाल्यामुळे शेतीला उपयोगाच्या नाहीत. अशा ठिकाणी तलाव खोदून या तलावात झिंगा (कोळंबी) संवर्धन करता येते. अशा प्रकारे तलाव सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत केले असून, त्यात झिंग्याचे चांगले उत्पादन मिळते. झिंग्याला बाजारात 300 ते 500 रु. किलो एवढा दर मिळतो.
♥शेततळ्यात मत्स्य संवर्धन -
शेतीकरिता पाणी साठविण्याकरिता शेततळी करण्याकरिता सरकार प्रोत्साहन देत आहे. या शेततळ्यांचे क्षेत्र 0.05 ते 0.5 हेक्टर एवढे असते. यात योग्य पद्धतीने मासे वाढविले तर माशांचे चांगले उत्पन्न मिळते. राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी अशा शेततळ्यांमध्ये कटला, रोहू, पंकज इत्यादी माशांचे उत्पन्न घेतले आहे. तलावाची खोली कमी असेल तर माशांची बोटुकली या शेततळ्यात तयार करता येतात.
♥चारमाही तलावात मत्स्य संवर्धन -
बऱ्याच ठिकाणी पावसाळ्याचे केवळ चार ते पाच महिनेच छोट्या तळ्यांमध्ये पाणी राहते. अशा तळ्यात योग्य व्यवस्थापन केले, तर माशांच्या पिल्लांपासून (मत्स्य जिऱ्यापासून) मत्स्य बोटुकली तयार करता येते. ही बोटुकली मोठ्या तलावांमध्ये किंवा जलाशयांमध्ये वाढण्याकरिता सोडता येते.
♥एकात्मिक मत्स्य संवर्धन -
मत्स्य संवर्धनाबरोबर पाळीव पशू व पक्षी तसेच धान्य, फळपिके व पालेभाला लागवडीचे नियोजन केल्यास उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर होतो. या पद्धतीत एका उपक्रमातले टाकाऊ पदार्थ व उपपदार्थ हे दुसऱ्या उपक्रमात वापरले जातात. अशा प्रकारे टाकाऊ पदार्थ व उपपदार्थांचा पूर्ण क्षमतेने पुनर्वापर होतो. परिणामी, पर्यावरण संतुलन होते तसेच एकूण उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे पाळीव पशू व पक्षी यांच्यापासून मिळालेले शेण व विष्ठा मत्स्य संवर्धन तसेच फळपिके व धान्यपिके याकरिता खत म्हणून वापरता येते. पिकांसाठी संरक्षित पाण्यासाठी खोदलेल्या शेततळ्यात मत्स्यपालन करता येते.
♥शोभिवंत मत्स्यपालन -
आपल्या देशात तसेच परदेशात रंगीत शोभिवंत माशांना चांगली मागणी आहे. अशा प्रकारचे मासे घरात, कार्यालयात, हॉटेलमध्ये, रुग्णालयांमध्ये ठेवले जातात. त्या ठिकाणची रंगीत मासे शोभा वाढवितात. असे रंगीत मासे मोठे करणे, त्यांची पैदास करणे तसेच त्यांचे खाद्य, त्याकरिता काचेच्या टाक्या बनविणे हा एक चांगला व्यवसाय आहे. याकरिता भांडवल, तसेच जागाही कमी लागते आणि म्हणूनच शेतकरी, स्त्रिया व बेरोजगार तरुण यांना चांगला पैसा मिळवून देणारा असा हा व्यवसाय आहे.
♥मासळीपासून विविध पदार्थ -
नदीतून पकडलेली मासळी किंवा मत्स्य तलावातून पकडलेली मासळी ताजी असतानाच विकावी, असे नाही तर मासळी योग्य प्रकारे सुकवून विकता येते किंवा मासळीपासून लोणचे, चटणी, वडा. पापड इत्यादी विविध पदार्थ करून ते विकता येतात. असे पदार्थ जास्त टिकतात, साठविता येतात. चांगला दर मिळेल तेव्हा विकता येतात.
♥बारमाही तलावात मत्स्य संवर्धन - शेतकरी, उद्योजक, तरुण बेरोजगार यांना एकेकट्याने किंवा एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर तलावात मत्स्य संवर्धन करता येईल यामुळे उत्पन्नाचे चांगले साधन मिळेल. अशा तलावात कटला, रोहू, मृगळ मासे एकत्रितपणे किंवा कटला, रोहू आणि झिंगे (गोड्या पाण्यातील कोळंबी) एकत्रितपणे किंवा मांगूर या माशांचे संवर्धन करता येईल. मत्स्यशेतीसाठी तलाव खोदणे, माशांचे बीज, खाद्य, मजुरी यासाठी खर्च होतो. परंतु नफाही चांगला मिळतो.
♥राज्यात मोठे, मध्यम व लहान असे तीन प्रकारचे जलाशय आहेत. हे जलाशय भाड्याने घेऊन त्यात मासे वाढविता येतात. सध्या जलाशयातील माशांचे सरासरी उत्पन्न 11.11 कि.ग्रॅ./ हेक्टर एवढे आहे. अशा जलाशयात केवळ जलद वाढणारे मासे, म्हणजेच रोहू, कटला व मृगळ या माशांची बोटुकली सोडली आणि बोटुकलीचा आकार 10 सें.मी. पेक्षा मोठा असेल तर उत्पादन वाढू शकते. इतर राज्यात असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. तेथे माशांचे उत्पादन 100 ते 300 कि.ग्रॅ. प्रति हेक्टर एवढे मिळाले आहे.
संपर्क - 02351-232995,
डॉ. जोशी - 9423291434
(लेखक मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मत्स्यपालनाच्या पद्धती♥प्रगतशील शेतकरी♥
1. एकजातीय मत्स्यसंवर्धन (मोनोकल्चर)
2. एकत्रित मत्स्यसंवर्धन (कंपोझिट फिश कल्चर)
3. मिश्र मत्स्यसंवर्धन (पॉलिकल्चर)
मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते. मत्स्यशेती करण्यापूर्वी आपल्याकडील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाचा अंदाज घ्यावा. मत्स्यशेतीच्या विविध पद्धती आहेत. आपल्या क्षमतेनुसार मत्स्यपालनाच्या पद्धतींची निवड करावी.
♥एकजातीय मत्स्यसंवर्धन (मोनोकल्चर)
1) या प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.
2) या पद्धतीमध्ये तलावाचा आकार 0.2 ते 1 हेक्टर एवढा असतो.
3) या प्रकारामध्ये कोळंबी जास्तीत जास्त 50,000 नग प्रति हेक्टर किंवा मासे 5,000 ते 10,000 बोटुकली प्रति हेक्टर या प्रमाणात संचयन केले जाते.
♥एकत्रित मत्स्यसंवर्धन (कंपोझिट फिश कल्चर)
1) या प्रकारामध्ये दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते. या प्रकारात आपल्याकडील तलावातील उपलब्ध जास्तीत जास्त घटकांचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला जातो. पूर्वी फक्त भारतीय कार्प माशांचे एकत्रित संवर्धन होत होते; परंतु आता चायनीज कार्पचे बीज उपलब्ध असल्याने त्यांचेही एकत्रित संवर्धन केले जाते.
2) या संवर्धनामध्ये तीनही थरांमधील माशांचे संवर्धन केल्यास तीनही थरांमधील तलावातील उपलब्ध अन्नाचा वापर होतो, शिवाय तलावामध्ये शेवाळ किंवा वनस्पती असतील तर गवत्या मासा त्यांना खातो.
3) भारतीय कार्प साधारणतः वर्षामध्ये 800 ग्रॅम ते 1,000 ग्रॅम वाढतात, तर चायनीज कार्प 1,500 ते 2,000 ग्रॅमपर्यंत वाढतात. भारतीय व चायनीज कार्पसच्या संकरित जातीही उपलब्ध आहेत.
♥मिश्र मत्स्यसंवर्धन (पॉलिकल्चर)
1) या प्रकारच्या संवर्धनामध्ये भारतीय व चायनीज कार्पबरोबर गोड्या पाण्यातील कोळंबीचे (पोचा कोळंबी/ झिंगा) संवर्धन केले जाते. (तक्ता क्रमांक दोन पाहावा).
2) कोळंबी खालच्या थरात राहत असल्याने खाद्य व वावरण्यासाठी जागा यासाठी स्पर्धा होऊ शकते. म्हणून मृगल व कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करू शकत नाही.
3) कोळंबी आठ महिन्यांमध्ये 60 ते 100 ग्रॅम वजनाची होते. मासे साधारणतः 500 ते 1500 ग्रॅमचे होतात.
4) बाजारपेठेतील आवकेनुसार माशांना साधारणतः 40 ते 60 रुपये प्रति किलो, तर कोळंबीला 350 ते 550 रुपये प्रति किलो दर मिळतो. या प्रकारामध्ये साधारणतः तीन ते चार टन प्रति हेक्टरी प्रति वर्ष मत्स्योत्पादन मिळू शकते.
5) या पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तलावाचा आकार 0.5 ते 5.0 हेक्टर एवढा असतो. तलावामध्ये सोडण्यात येणाऱ्या मत्स्यबीजाची घनता 5,000 ते 10,000 प्रति हेक्टर आणि कोळंबी बीजाची घनता (पीएल- 15 ते 20) 20,000 ते 50,000 प्रति हेक्टर एवढी असावी.
संपर्क - श्री. साटम - 9552875067
मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
छोट्या क्षेत्रातही केले यशस्वी कोळंबी उत्पादन♥ वासुदेव रामचंद्र नार्वेकर♥
♥राज्यातील बरेच मत्स्य उत्पादक जंबो कोळंबीचे उत्पादन घेण्याचे प्रयत्न करत आहेत. जंबो कोळंबीच्या शेतीकरिता मोठा म्हणजेच किमान अर्धा एकराचा तलाव लागतो, असा अनेकांचा गैरसमज आहे;
मात्र मुरादपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वासुदेव रामचंद्र नार्वेकर हे केवळ 60 चौरस मीटर क्षेत्रातून गेली तीन वर्षे जंबो कोळंबीचे चांगले उत्पादन घेत आहेत.
♥गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी (मॅक्रोब्रॅचिअम रोझेनबर्गी) इतर सर्व जातींच्या कोळंबीच्या तुलनेत जलद वाढते.
या कोळंबीला देश-परदेशात मागणी असून त्याला दरही चांगला मिळतो.
ही रोगालाही सहजासहजी बळी पडत नाही.
अशा अनेक कारणांमुळे जंबो कोळंबी ही संवर्धनाकरिता सर्वांत लोकप्रिय जात आहे. महाराष्ट्रातही बरेच मत्स्योत्पादक तसेच नव-नवीन उद्योजक जंबो कोळंबीच्या शेतीचे प्रयत्न करत आहेत. मोठे म्हणजे किमान अर्ध्या एकराचे क्षेत्र असेल तरच कोळंबी उत्पादन घेता येत असल्याचा अनेकांचा समज असतो; मात्र छोट्या तलावातून कोळंबीचे यशस्वी उत्पादन घेऊन मुरादपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वासुदेव रामचंद्र नार्वेकर यांनी हा समज खोटा ठरविला आहे.
♥श्री. नार्वेकर यांचा मूळ व्यवसाय सोनारकीचा. ते चांगले आंबा बागायतदारही असून त्यासोबत नारळ, लिंबू आदी फळांची लागवडही त्यांनी केली आहे. त्याला जोड म्हणून गेल्या तीन वर्षांपासून ते आपल्या शेतातील तळ्यात जंबो कोळंबी संवर्धन करत आहेत. तळ्याची लांबी, रुंदी आणि खोली अनुक्रमे दहा मीटर, सहा मीटर आणि दोन मीटर आहे.
♥सुरवातीला त्यांनी मुंबईतून सायप्रिनससारखे मासे आणून तळ्यात पाळले होते. त्यानंतर जंबो कोळंबीची माहिती मिळाल्यावर त्याचे पालन तीन वर्षांपूर्वी सुरू केले. रत्नगिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातून जंबो कोळंबी उत्पादनाविषयीचे तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी घेतले.
♥तळ्याचे व्यवस्थापन
श्री. नार्वेकर यांनी तळ्याच्या तळाशी मातीचा 30 सें.मी. जाडीचा थर टाकला आहे. प्रति वर्षी संपूर्ण तळे रिकामे करून तळ उन्हात तापवला जातो. त्यानंतर तळ्यात दोन घमेली शेणखत, दोन किलो युरिया आणि तीन किलो चुना टाकला जातो. त्यानंतर ते पाण्याने भरण्यात येते. त्यात प्लवंगांच्या वाढीकरिता 10-12 दिवसांचा अवधी दिला जातो. जंबो कोळंबीचे एक हजार शुद्ध बीज सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातून आणले जाते. बीजाचा प्रवासाचा कालावधी केवळ दीड तास असल्याने बीजाची जगणूक 100 टक्के मिळते. या बीजाचे अनुकूलन करून ते तळ्यात सर्वत्र विखुरले जाते. हे बीज ऑगस्ट महिन्यात सोडले जाते. तीन महिन्यांनी पुन्हा एकदा शेणखत व प्रत्येकी एक किलो युरिया आणि चुना तळ्यात दिला जातो. तळ्यात श्री. नार्वेकर यांनी कमळाची रोपे लावली असल्याने तळे सुशोभित तर झाले आहेच, शिवाय कोळंबीला लपण्यास चांगला आसरा निर्माण झाला आहे. मे महिन्यात संपूर्ण कोळंबी, पाणी काढून तळे रिकामे केले जाते.
♥खाद्य व्यवस्थापन
कोळंबीला खाद्य देण्यासाठी श्री. नार्वेकर यांनी तळ्यात तीन ठिकाणी "फीड ट्रे टांगून ठेवले आहेत. त्यामध्ये सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सहा वाजता खाद्य ठेवण्यात येते. कोंडा, भुसा, भाकरी, भात, भुशी, जवळ्याची भुकटी, कांडी खाद्य आणि कोंबडीचे आतडे अशा प्रकारचे खाद्य कोळंबीला दिले जाते. हे सर्व सहज उपलब्ध आणि स्वस्त आहे. "फीड ट्रे'मध्ये उरलेले खाद्य दुसऱ्या दिवशी काढून ट्रे स्वच्छ करून नवे खाद्य भरून तळ्यात टांगले जातात.
♥पाण्याचे व्यवस्थापन
कोळंबीची वाढ भरपूर होत असल्यामुळे दर पंधरा दिवसांनी तळ्यातील पाणी बदलले जाते. तळ्यातील 30 टक्के पाणी काढून तेवढेच पाणी नव्याने भरले जाते. काढलेले पाणी आंबा बागेला दिले जाते. असे केल्यामुळे तळ्यातील पाण्याचा दर्जा चांगला राहतो. दहा महिन्याच्या (ऑगस्ट ते मे) संवर्धन कालावधीत कोळंबी जगणुकीचे प्रमाण सुमारे 50 ते 70 टक्के एवढे मिळते. प्रत्येक कोळंबीची लांबी सरासरी पाच इंच तर वजन सुमारे 50 ते 60 ग्रॅम (सरासरी 56 ग्रॅम) एवढे मिळत असल्याचा श्री. नार्वेकर यांचा अनुभव आहे. सहा महिन्यांचा संवर्धन कालावधी गेल्यानंतरच मोठ्या कोळंबीची काढणी केली जाते. गेली तीन वर्षे त्यांना प्रति वर्षी सुमारे चाळीस किलोपर्यंत कोळंबी उत्पादन मिळते आहे. या कोळंबीची चव सागरी कोळंबीपेक्षाही चांगली असल्याचे ते सांगतात.
♥अर्थशास्त्र
श्री. नार्वेकर यांना आतापर्यंत छोट्या क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळत आहे; मात्र त्यांनी त्याची विक्री केलेली नाही. घरात खाण्यासाठी, तसेच शेजारीपाजारी, नातेवाईक आदींना देण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला आहे; मात्र बाजारभावानुसार त्यांच्या उत्पादनाचे आर्थिक गणित मांडता येऊ शकेल. त्यांना मिळणारे उत्पादन सुमारे चाळीस किलो आहे. स्थानिक बाजारात विक्री केल्यास जंबो कोळंबीची किंमत प्रति किलो सव्वाशे ते दीडशे रुपये आहे. किमान सव्वाशे रुपये हिशेबाने चाळीस किलो कोळंबीपासून पाच हजार रुपये उत्पन्न मिळते. श्री. नार्वेकर वापरत असलेले कोळंबी खाद्य सहज उपलब्ध असलेले आणि स्वस्त आहे. तसेच व्यवस्थापनासाठीची सर्व कामे ते स्वतः करतात, त्यामुळे मजुरीचाही खर्च वाचतो. कोळंबी व्यवस्थापनासाठी त्यांना येणारा एकंदर खर्च सुमारे एक हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे केवळ साठ चौरस मीटर क्षेत्रातून चार हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना कोळंबी उत्पादनातून मिळते, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या तीन वर्षांचा अनुभव चांगला असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून यंदापासून ते व्यावसायिक उत्पादन घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी ऑगस्ट महिन्यात दोन हजार बीज तळ्यात सोडले असून दोन महिन्यांत कोळंबीची लांबी दीड इंचांपर्यंत पोचली आहे. तसेच यंदा तळ्यात अन्य कोणत्याही प्रकारचे मासे नसून केवळ कोळंबीच सोडली आहे. त्यामुळे वाढीचे प्रमाण चांगले आहे. जंबो कोळंबीच्या निर्यातीलाही चांगली किंमत मिळते. 100 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या कोळंबीला 150 ते दोनशे रुपये किलो तर 100 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाच्या कोळंबीला तीनशे ते चारशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. जंबो कोळंबी संवर्धनाकरिता प्रत्येक वेळी खूप मोठे क्षेत्रच आवश्यक आहे असे नाही, तर काळजीपूर्वक व्यवस्थापन केल्यास
♥लहान
क्षेत्रातही कोळंबी संवर्धन करणे शक्य आहे हे श्री. नार्वेकर यांच्या उदाहरणातून सिद्ध होते. कोकणात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. तसेच घाटावर अनेक ठिकाणी शेतामध्ये छोटी छोटी पाणथळ क्षेत्रे असतात. काही ठिकाणी कोणतीही पिके घेणे शक्य नसते; मात्र यापैकी कोणत्याही ठिकाणी क्षेत्र लहान असले तरीही जंबो कोळंबी संवर्धन यशस्वीपणे करणे शक्य आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
- श्री. नार्वेकर 9423293062
- डॉ. जोशी 9423291434
(लेखक रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
संकलित!
Comments
Post a Comment