भात लागवड नियोजनक्रम (Schedule/शेड्यूल)

भात लागवड नियोजन क्रम(Schedule/शेड्यूल)♥प्रगतशील शेतकरी♥

♥भात लागवडीसाठी जमिनीचा सामू सहा ते आठच्या दरम्यान असावा.

♥लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करावी. पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.

♥भाताच्या अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित, संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून किंवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे.

♥लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. 

♥भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्यप्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

♥पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.

♥जमिनीची उभी-आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत हेक्‍टरी 10 मे. टन या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
लावणी पद्धतीमध्ये भात रोपे रोपवाटिकेत तयार करून चिखलणी केल्यानंतर विशिष्ट मुदतीत लावणी केली जाते.

♥लावणी पद्धतीसाठी ३० ते ४० किलोग्रॅम प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे.
संकरित जातींसाठी हेक्‍टरी २० किलो बियाणे लागते.

♥पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम याप्रमाणे कार्बेन्डाझिम किंवा थायरम बुरशीनाशक चोळावे.
त्यानंतर २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रति दहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

♥भाताची पेरणी १५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी.

♥पेरणीकरिता एक ते १.२० मी. रुंद व आठ ते दहा सें.मी. उंच आणि आवश्‍यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत.

♥एक हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी दहा आर क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. वाफे तयार करताना एक आर क्षेत्रास २५० किलोग्रॅम शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद व ५०० ग्रॅम पालाश मातीत मिसळावे.

♥पेरणी ओळीत व विरळ करावी.

♥रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति आर ५०० ग्रॅम नत्र द्यावे.

♥सेंद्रिय खतांचा वापर
नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी १० ते १२.५ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.

♥चिखलणीच्या वेळी हेक्‍टरी दहा टन हिरवळीचे खत जमिनीत गाडावे.

याकरिता धैंचा अथवा ताग वापरावा.

दुसरा मार्ग म्हणजे गिरिपुष्पाची शेताच्या बांधावर लागवड करावी.
लागवडीनंतर दुसऱ्या वर्षापासून या झाडाचा पाला भात लावणीच्या आठ ते दहा दिवस अगोदर शेतात गाडावा.
गिरिपुष्पाची हिरवी पाने दहा टन प्रति हेक्‍टरी शेतात गाडल्यास नत्र खताकरिता लागणाऱ्या खर्चात खूप बचत होते.

♥विविध जैविक खते जशी निळे - हिरवे शैवाल प्रति हेक्‍टरी २० किलोग्रॅम हे भात लागणीनंतर आठ ते दहा दिवसांनी शेतात मिसळावे

किंवा ऍझोला (चार ते पाच क्विंटल प्रति हेक्‍टर) चिखलणीच्या वेळी शेतात टाकावे.

♥रासायनिक खतांचा वापर

भात लागवडीसाठी हेक्‍टरी १०० किलोग्रॅम नत्र, ५० किलोग्रॅम स्फुरद व ५० किलोग्रॅम पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे.

ही खतमात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे.
लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र
आणि २० टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

संकरित जातींकरिता हेक्‍टरी १२० किलोग्रॅम नत्र, ५० किलोग्रॅम स्फुरद व ५० किलोग्रॅम पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे.
ही खतमात्रा लागणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश
आणि उरलेले २५ टक्के नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी
आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

♥पुनर्लागवड
भात लागवडीची रोपे प्रति एकर २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात २० मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर पुनर्लागवड करावी.

♥रोपांच्या पुनर्लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीने किंवा यंत्राच्या साह्याने चिखलणी करावी.

हळव्या जातींची लागण पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी,

निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी व

गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी.

एका चुडात तीन ते चार रोपे ठेवावीत.

संकरित जातींसाठी एका चुडात फक्त एक ते दोन रोपेच ठेवावीत.

हळव्या जातींच्या रोपांची लावणी १५ X १५ सें.मी.,

तर निमगरव्या व गरव्या जातींची २० X १५ सें.मी. अंतरावर करावी.

♥चार सूत्री लावणी तंत्रज्ञान
सूत्र १ :     भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश                                या   अन्नद्रव्यांचा फेरवापर
सूत्र २ :      गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर
सूत्र ३ :      नियंत्रित लावणी
सूत्र ४ :      युरिया - डीएपी ब्रिकेटचा वापर

♥पहिले सुत्र :
भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर:

१ अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी.
भाताच्या तुसाची राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरस मीटर एक किलोग्रॅम या प्रमाणात चार ते सात सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी.
नंतर बीजप्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.

१ ब) भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा.
भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन या प्रमाणात शेतात गाडावा.

♡फायदे : १) भात पिकांना सिलिका व पालाश यांचा पुरवठा होतो.
(पालाश : २०-२५ किलोग्रॅम. सिलिका : १००-१२० किलोग्रॅम.)

२) रोपे निरोगी व कणखर होतात.

३. रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

♥दुसरे सूत्र :
गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर :

गिरिपुष्प हिरवळीचे खत (दोन ते चार गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने किंवा अंदाजे ३० कि.ग्रॅ. / आर) चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत व
नंतर चिखलणी करून रोपांची लावणी करावी.

हिरवळीचे खत वापरण्याची सोपी पद्धत :
गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात.
त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी सहा ते आठ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात.
उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात.
चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात व्यवस्थित मिसळावीत,
नंतर लावणी करावी.

♡फायदे : १) भातरोपांना सेंद्रिय - नत्र (हेक्‍टरी १० ते १५ किलोग्रॅम) वेळेवर मिळाल्यामुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. खाचरात सेंद्रिय पदार्थ मिळाल्यामुळे जमिनीची जडणघडण सुधारून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. २) सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडल्यामुळे भात खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण (म्हणजेच हवेचे प्रदूषण) कमी होते.

♥तिसरे सूत्र  :
नियंत्रित लावणी :

नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५ सें.मी. व १५ सें.मी. आलटून-पालटून (२५-१५-२५-१५ सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात.
सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे प्रति चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा.
त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा.
अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून ४० सें.मी. दोरी मागे सरकवावी.
पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात अनेक १५ X १५ सें.मी. चुडांचे चौकोन व २५ सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात. लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे लावावीत.

संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे.
रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत.

♡फायदे :

प्रचलित पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३० टक्के बचत होते व त्याच प्रमाणात रोपे तयार करण्याचे श्रम व पैसा वाचतो.

त्याच प्रमाणात लावणी व कापणी करावी.
कापणीवरील मजुरीचा खर्चही कमी होतो,

त्यामुळे उत्पादन फायदेशीर होण्यास मदत होते.

शेतकऱ्यांना ब्रिकेट्‌सचा (खताच्या गोळ्यांचा) कार्यक्षम वापर करणे शक्‍य होते.

♥चवथे सूत्र  :
युरिया - डीएपी ब्रिकेटचा वापर :

नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया - डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने सात ते दहा सें.मी. खोल खोचावी.

१) युरिया - डीएपी खत (६० : ४० मिश्रण) वापरून ब्रिकेट्‌स (२७ ग्रॅ. / १० ब्रिकेट्‌स) उशीच्या आकारात तयार करता येतात.

२) या रासायनिक मिश्र खतात नत्र  व स्फुरद ही अन्नद्रव्ये ४ : २ या प्रमाणात असतात.

३) एका आरला ६२५ ब्रिकेट्‌स (१.७५ कि.ग्रॅ.) पुरतात.

४) खताची मात्रा (प्रति हेक्‍टरी) ५७ कि.ग्रॅ. नत्र + २९ कि. ग्रॅ. स्फुरद.

♡नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी ब्रिकेट (युरिया - डीएपी) हाताने ७  ते  १० सें.मी. खोल रोवण्याचे फायदे :

लावणी भातासाठी नत्र व स्फुरद वापरण्याची ही कार्यक्षम पद्धत आहे.

पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही.

खतामुळे होणारे प्रदूषण टळते.

दिलेल्या खतापैकी ८० टक्‍क्‍यांपर्यंत नत्र भात पिकास उपयोगी पडते.

खतात ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते ब्रिकेट्‌स खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत.

तणाचा त्रास कमी होतो.

भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्‍चित वाढते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!