१० जुलै - सद्गुरूस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम ॥

१० जुलै - सद्गुरूस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम ॥

♥राम ठेवील जी स्थिति । त्यात समाधान राखे ज्याची वृत्ति । त्या नाव खरी विरक्ति ॥

♥रामाआड जें जें कांही । तेथून दूर ठेवी वृत्ति । या नांव विवेकाची प्राप्ति ॥

♥वृत्ति न होऊं द्यावी विषयीं फार । चित्तीं चिंतावा रघुवीर ॥

♥जेव्हां वृत्ति होते विषयाकार । तेथें न राहे सारासार विचार ॥

♥वृत्ति राही अभिमानाला धरून । तेथें न कधीं अनुसंधान ॥

♥जें जें पाहावे तें तें रामच होईजे । ऐसी ठेवावी वृत्ति । रघुनंदन आणावा चित्तीं॥

♥काळोख अत्यंत मातला । घालवावयास उपाय दुजा न सुचला ।
होतां सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥

♥तैसें 'राम कर्ता' हा भाव ठेवता चित्तीं । उपाधीरहित बनते वृत्ति ॥

♥वृत्ति असावी शुद्ध, संतसज्जनांना प्रमाण । त्याने संतुष्ट होईल नारायण ॥

♥जग स्वार्थमूलक खरें । हे आपले वृत्तीवरून ओळखणें बरे॥

♥वृत्ति अलग करावी सर्वांहून । आलेली ऊर्मि करावी सहन । सर्व कर्ता जाणून रघुनंदन ॥

♥निःसंशय करावी वृत्ति आपण । सद्गुरूस जावें शरण ।
संशयविरहित वृत्तिने घ्यावें नाम । जें सुखाचे आहे धाम ॥

♥शुद्ध ज्याचे अंतःकरण । शुद्ध ज्याचे आचरण ।
परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ति । त्याच्याहून दूर न राहे रघुपति ॥

♥सर्व कांही करावें आपण । पण वृत्तीनें त्यांत न गुंतावे आपण ॥
नामांत ठेवावें प्रेम । तेथें प्रकटेल पुरुषोत्तम ॥

♥देहाचें चलन ज्याचे सत्तेनें । त्या रघुपतीचें स्मरण असावे आनंदाने ॥

♥वासना नामापायीं जडली । धन्य धन्य सज्जनीं मानिली ॥

♥पाणी माती एक झाले । वेगळें नाही करतां आले ।
निवळी घालावी पाण्यांत । पाणी स्वच्छ होते जाण ॥

♥तैसा विषयांत राहून जगती । नामाची ठेवावी संगती ॥
विषयाचें विष शोषून घेई । ऐसी आहे नामाची प्रचीति ॥

♥शक्य तितकें राहावें नामांत । याहून दुसरे न आणावे मनांत ॥
परा पश्यंती वैखरी वाणी । याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणीं ॥

♥नामापरती उठेल वृत्ति । तेथें सावध असावें तुम्ही ॥
जो नामांत राहिला दंग । त्याने लुटला रामरंग ॥

♥रामनाम बोलावें वाचा । काळ न येऊं द्यावा काळजीचा ॥

♥नामाविण राम । जैसें पाकळ्याविण फूल जाण ॥
नाम ज्यानें घेतले सर्वकाळ । जिंकला त्यानें एक अंतराळ ॥

♥भगवंत ठेवील त्यांत हित मानावें । अखंड नामस्मरण घ्यावें॥
नामांत स्वतःचा विसर । हेंच देईल रघुवीर ॥

♥भगवंताची प्राप्ति, संतांची संगती, नामाचे प्रेम, ।
हे भगवत्कृपेवांचून नाही साधत जाण ॥

♥सतत करावे नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥

♥त्राता राम जाणून चित्ती । निर्भय करावी आपली वृत्ति ॥

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!