हळद लागवड व्यवस्थापन
हळदीची लागवड अशी कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीसाठी योग्य त्या पद्धतींचा अवलंब करावा.
पाटाने किंवा सोड पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी, तर आधुनिक सिंचन (ठिबक किंवा तुषार) व्यवस्था उपलब्ध असल्यास रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धतीने लागवड करावी.
1) सरी - वरंबा पद्धत -
हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा व रुंद वरंबा पद्धतीने करणे फायदेशीर ठरते. सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास 75 ते 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीमध्ये टाकून घ्यावे. खते वरंबा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी पट्टापेर पद्धतीने टाकून घ्यावीत, जमिनीच्या उताराप्रमाणे पाच ते सहा सरी वरंब्यांचे एक वाकोरे याप्रमाणे वाकोरी बांधून घ्यावीत. वाकोऱ्याची लांबी चार ते पाच मीटर ठेवावी. सोईप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाट पाडावेत.
2) रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत
रुंद वरंबा पद्धतीने लागवड करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. याचे कारण मध्यम काळ्या व भारी जमिनीमध्ये रुंद वरंबा, गादी वाफा पद्धतीने लागण करून पाणी दिल्यास जमीन पाझरून घट्ट होत नाही. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे गड्डे चांगले पोसून उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. परंतु या पद्धतीत जमीन समपातळीस असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना भारी जमिनीमध्ये 180 सें.मी. अंतरावर प्रथम सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजरून 120 सें.मी. माथा असलेले 30 सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी-रुंदीचे सरी-वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करावा. मध्यम आणि हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये 120 सें.मी.वरील सऱ्या प्रथम पाडाव्यात, त्या सऱ्या उजरून 60 ते 70 सें.मी. माथा असलेले 30 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. या पद्धतीने हळद लागवड केल्यास यांत्रिक पद्धतीने हळदीची काढणी करणे सोपे जाते, त्यामुळे मजुरीत बचत होते.
♥हळद लागवड
हळद काढणीनंतर मिळणारे बियाणे एप्रिल ते मे महिन्यात लागवडीसाठी वापरले जाते आणि हे बियाणे उत्तम मानले जाते. कारण काढणीनंतर लागवड करेपर्यंत जवळ जवळ अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत बियाण्याची सुप्तावस्था संपून डोळे फुगलेले व न कुजलेले बियाणे लागवडीस वापरणे फायद्याचे असते. सरी-वरंबा पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूंस 30 सें.मी. अंतरावर गड्डे कुदळीने आगाऱ्या घेऊन लावावे किंवा वाकोरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात तीन व पाच सें.मी. खोल दाबून घ्यावेत. रुंद वरंबा पद्धतीने पहिले पाणी देऊन जमीन वाफशावर आल्यानंतर 30-30 सें.मी. अंतरावर गड्डे लावावेत. गड्डे पूर्ण झाकले जातील व लागवड करताना डोळे बाहेरच्या बाजूला राहतील याची काळजी घ्यावी. डोळे खाली किंवा वरच्या बाजूला राहिल्यास हळदीची वाढ चांगली होत नाही.
♥ हळदीवर बीजप्रक्रिया
हळद पिकामध्ये कंदमाशी ही कीड व कंदकूज रोगामुळे 50 ते 75 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हळदीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची बीजप्रक्रिया केली जाते.
रासायनिक बीजप्रक्रिया -
हळद लागवडीपूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये सुकवावे. यामध्ये कोणतेही एक आंतरप्रवाही कीटकनाशक उदा. क्विनॉलफॉस दोन मि.लि. प्रति लिटर आणि बुरशीनाशक कार्बेन्डाझिम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरावे. त्यामध्ये बियाणे 10 ते 15 मिनिटे बुडवावे. नंतर बियाणे सावलीत सुकवावे.
जैविक बीजप्रक्रिया
ही बीजप्रक्रिया प्रामुख्याने हळद लागवड करतेवेळी करावी. यामध्ये ऍझोस्पिरीलियम दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी + स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि व्हॅम (VAM) 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन त्यामध्ये बियाणे 10 ते 15 मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. ही बीजप्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत रासायनिक बीजप्रक्रियेच्या अगोदर करू नये. अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवूनच जैविक बीजप्रक्रिया करावी.
♥हळदीमध्ये पाणी व्यवस्थापन
हळद हे कंदवर्गीय पीक असल्याने त्याच्या उत्तम पोषणास आणि भरपूर उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने पाण्याचे नियोजन केले पाहिजे. कारण जास्त पाणी दिले तर त्याचा जसा अनिष्ट परिणाम होतो, तसाच पिकास योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर उत्पादनावर परिणाम होतो. पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा पाहून पाणी द्यावे. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये दोन पाण्यातील अंतर 12 ते 15 दिवस ठेवले तरी चालते. शेवटी नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक काढण्याअगोदर 15 दिवस अजिबात पाणी देऊ नये. पाऊस समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम प्रतीच्या पाण्याच्या 13 ते 15 पाळ्या द्याव्या लागतात, रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. ठिबकचा वापर करायचा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी आणि दोन लॅटरलमधील अंतर चार ते पाच फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. हलक्या माळरानाच्या जमिनीत पाण्याची उभी हालचाल जोरात होते व आडवी कमी होते. त्यामुळे दोन तोट्यामधील अंतर 30 ते 40 सें.मी. ठेवावे. मध्यम प्रतीच्या जमिनीत आडवी आणि उभी हालचाल सारखीच होते त्यामुळे दोन तोट्यांमधील अंतर 50 ते 60 सें.मी. ठेवावे तर भारी काळ्या खोल जमिनीमध्ये पाण्याची आडवी हालचाल जलद होते तर उभी हालचाल कमी होत असल्यामुळे दोन तोट्यांमधील अंतर 70 ते 75 सें.मी. ठेवावे. जमिनीतील ओलाव्यानुसार संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. त्यामुळे सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. या पद्धतीने पाणी दिल्याने 10 ते 15 टक्के उत्पादन जास्त मिळाल्याचे दिसून आले आहे. तुषार पद्धतीचा अवलंब करताना मानवी शक्तीने हलविल्या जाणाऱ्या पोर्टेबल पद्धतीचा किंवा क्षेत्र मोठे असेल तर स्प्रिंकलर गन पद्धतीचा वापर करावा.
♥हळदी खतांचे नियोजन
हळद पिकाला खतामधील सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते. मात्र हळद पिकासाठी रासायनिक खते वापरल्याने हळदीच्या कंदावरती अनिष्ट परिणाम होतो, असा काही शेतकऱ्यांचा समज आहे. वास्तविक पाहता संशोधन केंद्रांनी शिफारस केलेली खते योग्य वेळी न दिल्यास हळदीच्या कंदाची वाढ होण्यापेक्षा फक्त झाडांची पालेदार वाढ जास्त होते. हळद पिकास ज्याप्रमाणे रासायनिक खतांची व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते, त्याचप्रमाणे सेंद्रिय खतांचीसुद्धा नितांत गरज असते.
हळदीत तणनियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर करावा लागत असल्याने या शेणखतातून मोठ्या प्रमाणात तणांचे बी शेतात येते.
या तणांचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे.
त्यासाठी हळद लागवडीनंतर ओलीवरती दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ऍट्राझीन (50 डब्ल्यू.पी.) तणनाशक एक लिटर पाण्यात तीन ते चार ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
फवारणी करताना उलट दिशेने चालावे.
फवारणीसाठी घ्यावयाचे रसायन वजन करून घ्यावे.
तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी हळद बियाणे/गड्डे उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
तणनाशक फवारणीनंतर 20 ते 25 दिवस कोणत्याही आंतरपिकाची लागवड करू नये. तणनाशक फवारताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे.
हळदीची उगवण 15 दिवसांनंतर सुरू होते.
त्यानंतर मात्र कोणतेही तणनाशक वापरू नये.
(सुचना- वरिल शिफारस वापरकर्त्याने स्वत:च्या जबाबदारीवर वापरावीत!)
संकलित!
♥आंतरपिकांची लागवड
आंतरपिके ही सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा न करता उत्पादनात वाढ घडविणारी असावीत. हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत एका खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. 25 टक्के सावलीमध्ये हळदीचे पीक चांगले वाढते. हळकुंडे येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी होणे फायदेशीर ठरते. म्हणून हळद पिकामध्ये मिश्रपिके घेतल्यामुळे हळदीच्या उत्पादनावर काय परिणाम होतो, हे आजमावण्यासाठी एक प्रयोग घेण्यात आलेला होता. त्यामध्ये मिश्रपीक घ्यावयाचे असल्यास घेवडा किंवा झेंडू घेणे चांगले दिसून आले. मात्र मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण त्यामुळे हळद उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट होते. त्याप्रमाणे हळद पीक हे ऊस, द्राक्ष बागेमध्ये किंवा इतर फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून घेता येते. हळद पिकात उसाची लागवड करावयाची असल्यास एप्रिल-मे महिन्यामध्ये लागवड करून नंतर त्यामध्ये एकआड एक सरीला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. द्राक्ष बागेत हळद लागवड केल्यास हळदीवरील कीडनाशकांच्या फवारणीत बचत होते.
♥फर्टिगेशन
हळदीचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करूनच विद्राव्य खतांचा वापर करावा. एखादा अन्नघटक जास्त झाला अथवा कमी पडला तरी त्याचा परिणाम लगेचच पिकाच्या वाढीवर झालेला दिसून येतो. उदाहरणच द्यायचे झाले तर हळदीला नत्र घटक जास्त झाल्यास हळदीची शाकीय वाढ खूप जास्त होते आणि हळद काडावरती जाते. फर्टिगेशन करताना प्रामुख्याने 80:40:40 किलो नत्र - स्फुरदः पालाश प्रति एकर या प्रमाणात द्यावे. प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक ऍसिड आणि पांढरा पोटॅशचा वापर फर्टिगेशनसाठी करावा.
संकलित!
Comments
Post a Comment