गायीतील आहार आणि दुध उत्पादन व्यवस्थापन

गायीतील आहार आणि दुध उत्पादन व्यवस्थापण♥प्रगतशील शेतकरी♥

♥जास्त दुध उत्पादन देण्या-या गायीतील आहार व्यवस्थापन

♥संकरीत दुधाळ गायीचे अहार व्यवस्थापनाला पशुसंगोपना मध्ये अत्यतं महत्वाचे स्थान आहे.

♥दुधाळ जनावरांना त्यांचा दुध उत्पादन प्रज़नन वाढ यासाठी आहार देणे गरजेचे आहे संकरीत गायीना दुधाच्या प्रमाणात पशुखाद्य व खाईल तेवढा चारा देणे आवश्यक आहे.

♥संकरीत दुध उत्पादन देणा-या गायी त्यांच्या वजनच्या. 3 - 3.5% प्रमाणात पाणी विरहित कोरडा भाग खाऊ शकतात विल्यानंतर गायीची भुक पहिले 45 दिवस कमी झालेली असते आणि 45 दिवसानंतर हळुहळु वाढत जाते विलयानंतर 45 दिवसापर्यंत गायीचे दुध उत्पादन वाढत जाते त्याप्रमाणात गायी अहार खात नसल्यामुळे गायी अशक्त होतात.
म्हणुन विल्यानंतर पहिले 45 दिवसा पर्यंत गायीला पोष्टीक पशुखाद्य व चारा दयावा.

♥गाभण पणाच्या 7 8 व 9 व्या महिन्यामधे वाढीव पशुखाद्य 2-2.5 किलो दररोज दयावा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

♥500 किलो वजनाच्या 20 ली. दुध देणा-या गायीचा आहार

♥500 किलो वजनाची दुधाळ गाय 3-3.5 % प्रमाणे 15 ते 17 किलो पाणी विरहीत शुष्क अहार खाऊ शकते.

♥दुध उत्पादनाच्या प्रमाणात पशुखाद्य दयावे उदा. 3 ली. दुध उत्पादनासाठी 1 किलो पशुखाद्य दयावे
म्हणजे 20 ली उत्पादनासाठी 6.5 किलो पशुखादय दयावे
आणि 1 किलो पशुखाद्य शरिरपोषणासाठी दयावे म्हणजेच 7-7.5 किलो पशुखाद्य 3 ते 4 वेळा विभागून दयावे.

♥आणखी 10 किलो गायीची भुख शिल्लक आहे.
ती आपल्याला चा-या मधून पुर्ण करावयाची आहे.

♥त्यासाठी वाळलेला चारा 60 %म्हणजेच 6 किलो वाळलेला चारा म्हणजेच कडबा प्रक्रिया केलेले गवत, ग़व्हाचे भुस्कट, सोयाबीनचे भुस्कट दयावे 10 किलो

♥पैकी 40 % शुष्क भाग हिरव्याचा-यामधून दयावा 4 किलो शुष्क भाग हिरव्याचा-यातून दयावा
म्हणजे 5 किलो हिरव्या चा-या मधुन 1 किलो शुष्क भाग मिळतो
म्हणजेच 4 किलो शुष्क भाग देण्यासाठी 20 किलो हिरव्याचारा दयावा लागेल
उदा त्यापैकी. मका, कडवळ ,वाढे ,हत्ती गवत ,मारवेल या प्रकारचा हिरवाचारा 10 किलो आणि 10 किलो हिरवाचारा मेथीघास शेवरी बरसिम या प्रकाराचा दयावा.

♥दररोज दुधाळ गायी म्हैशींना 1 ली. दुध उत्पादनसाठी 5 ग्रॅम खनिज मिश्रण दयावे.
म्हणजेच 20 ली दुध उत्पादन देणा-या गायीला 100 ग्रॅम खनिज मिश्रण दयावे (ऍग्रीमीन फोर्ट बेस्टमिन गोल्ड मिल्कमिन इ.)

♥दुधाळ गायीचे दुध काढल्यानंतर भरपुर पाणी पिण्यासाठी दयावे.

4-5 वेळा गायीना पाणी पाजावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

♥वाळलेला चारा हिरवा चारा पशुखाद्य मोजुन एकत्र मिसळुन दिल्यास अनेक फायदे होतात

1 चारा पशुखाद्य यांचे पचन शोषण जास्त प्रमाणात होते.

2 वाळलेला चारा संपुर्ण खाल्ला जातो वाया जात नाही

3 फॅट डिग्री दुध उत्पादन योग्य प्रमाणात मिळते.

4 अपचन पोटफुगी यासारखे विकार होणार नाहीत
याप्रमाणेच 10-15 लिटर दुध उत्पादन देणा-या गायीचा अहार ठरवावा.

ज्यावेळेस मुबलक प्रमाणात हिरवाचारा उपलब्ध असेल त्यावेळेस 10 किलो एकदल हिरवाचारा मका, कडवळ, हत्ती गवत, मारवेल जादा देउन 1 किलो पशुखाद्य कमी करावे किंवा 5 किलो द्विदल हिरवाचारा जादा देउन असल्यास 1 किलो पशुखाद्य कमी करावे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

♥ दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे.

♥दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिज द्रव्ये, जीवनसत्त्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. 

♥दुधातील स्वाद हासुद्धा बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशांवर अवलंबून असतो.

♥दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी व त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी दुधातील स्निग्धांशांस अनन्यसाधारण महत्त्व आहे.

♥म्हैस वर्गातील दुधातील स्निग्धांश व स्निग्धविरहित घटक हे जास्त आहेत.
गाईंच्या बाबतीत विचार केल्यास देशी गाईच्या तुलनेत संकरित गाई विशेषतः होल्स्टिन फ्रिजियनमध्ये स्निग्धांशांचे प्रमाण कमी आहे; परंतु दुधातील घटकांबरोबर, दुग्ध उत्पादन देखील महत्त्वाचे असल्याने शेतकऱ्यांची होल्स्टिन फ्रिजियन गाईला पसंती आहे.

♥दुधातील स्निग्धांश घटण्याची कारणे :

1) गाईंचा आनुवंश
2) संतुलित आहाराचा अभाव
3) दूध काढण्याच्या वेळेतील फरक
4) धारा काढण्याच्या चुकीच्या पद्धती
5) जनावरांचे वय व वेतांची संख्या
6) दुधातील दिवसांचे टप्पे
7) जनावरांतील आजार
8) ऋतुमान

1) गाईंचा आनुवंश

गाईंचा आनुवंश किंवा वंशावळ व जात हे एक महत्त्वाचे कारण स्निग्धांशाच्या दृष्टीने मानले जाते. दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशांचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्रांद्वारे नियंत्रित केले जातात. देशी गाईंमध्ये स्निग्धांशांचे प्रमाण चार टक्‍क्‍यांच्या पुढे आढळते. जर्सी गाईंच्या दुधात पाच टक्के, तर होल्स्टिन फ्रिजियन गाईंच्या दुधात तीन ते 3.50 टक्के एवढ्या कमी प्रमाणात स्निग्धांश आढळतात. दूध उत्पादन आणि स्निग्धांशांचे प्रमाण यांचा निकटचा संबंध आहे. होल्स्टिन फ्रिजियन गाईचे दूध उत्पादन जास्त असले, तरी दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण कमी असते.

2) संतुलित आहाराचा अभाव :
जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. पशुपालक आपल्याकडे वर्षभर जो चारा उपलब्ध असेल, तो जनावरांना खाऊ घालतात. खरे तर चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा. दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वाढविण्यासाठी ऍसिटिक आम्ल महत्त्वाचा घटक आहे. हे आम्ल तयार होण्यासाठी सुक्‍या चाऱ्यातील सेल्युलोज महत्त्वाचे आहे. त्यासाठी गाई - म्हशींना हिरव्या चाऱ्याबरोबर सुका चारा देणे गरजेचे आहे. जनावरांच्या आहारात उसाचा अतिरेकी वापर टाळावा. कारण जनावरांच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढले, तर दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. खाद्यातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढल्यास पचनक्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधातील प्रथिनांमध्ये घट येते.

3) दूध काढण्याच्या वेळेतील फरक :
सर्वसाधारणपणे पशुपालक सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळेस गाई - म्हशींचे दूध काढतात. दूध काढण्याच्या या दोन्ही वेळांचा, दूध उत्पादन व फॅटशी खूप जवळचा संबंध असतो. दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त 12 तासांचे अंतर असावे, हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

4) धारा काढण्याच्या चुकीच्या पद्धती :
गाईच्या धारा काढण्यापूर्वी कास चांगली स्वच्छ घुसळून धुवावी, जेणेकरून कासेच्या वरील भागातील दुधातील स्निग्धांशांचे कण घुसळले जातील व दुधात उतरतील. गाईचे दूध काढताना दुधातील सुरवातीच्या धारांमध्ये सर्वसाधारणपणे एक टक्का इतके फॅट असते, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असते. म्हणून जनावरांचे घाईघाईत अर्धवट दूध न काढता शेवटच्या धारांपर्यंत संपूर्ण दूध काढावे; तसेच वासरांना, धारा काढल्यानंतर शेवटचे दूध पिण्यासाठी सोडू नये.

5) जनावरांचे वय व वेतांची संख्या :
जनावरांचे वय जसजसे वाढते, तसतसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होत जाते. पहिल्या वितात फॅटचे प्रमाण जास्त मिळते, नंतर ते कमी होत असते. साधारणपणे सात ते आठ वितांनंतर दुधातील फॅटच्या प्रमाणात लक्षणीय घट होते.

6) दुधातील दिवसांचे टप्पे :
साधारणपणे गाय व्यायल्यापासून 21 दिवसांमध्ये तिचे दूध वाढते आणि 50 ते 60 दिवसांपर्यंत टिकून राहते; परंतु दूधवाढीबरोबर या काळात फॅटचे प्रमाण कमी होत जाते. याउलट गाय जसजशी आटत जाते, तसतसे दूध उत्पादन कमी होऊन दुधातील फॅटचे प्रमाण वाढत जाते. म्हणजे एकाच वितात दुधातील फॅटचे प्रमाण हे सारखे राहत नाही.

7) जनावरांतील आजार :
संकरित गाईमध्ये स्तनदाह, कासेचा दाह आजार जास्त दिसून येतो. स्तनदाहसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या गाईंचे दुधातील फॅटचे प्रमाण सरासरीपेक्षा जवळ जवळ निम्म्याने कमी झालेले असते.

8) ऋतुमान
सर्वसाधारणपणे दूध वाढले की फॅटचे प्रमाण कमी होते, तर दूध उत्पादन कमी झाले की दुधातील फॅट वाढते. पावसाळा, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने जनावरांचे दूध उत्पादन वाढते आणि दुधातील फॅटचे प्रमाण कमी आढळते. याउलट उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश वाढलेले दिसून येते. उन्हाळ्यामध्ये तापमानात जास्त वाढ झाल्यास जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात. अशा वेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि स्निग्धांशांचे प्रमाण कमी होते.

♥दुधातील स्निग्धांश वाढविण्यासाठी उपाय :

1) जर्सी संकरित गाईच्या दुधात स्निग्धांशांचे प्रमाण जास्त असल्याने दर दहा गाईंत त्यांचे प्रमाण तीन यानुसार संगोपनास गाई ठेवल्यास एकत्रित दुधात स्निग्धांशांचे प्रमाण सामान्य प्रमाणात ठेवता येईल; तसेच म्हशींच्या दुधात स्निग्धांशांचे प्रमाण सात टक्‍क्‍यांच्या वर असल्याने अधिक स्निग्धांशांसाठी म्हशी पाळाव्यात.

2) जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा, तसेच उसाच्या वाढ्यांचा अति वापर टाळावा. उसाचे वाढे, भाताचा पेंढा, गव्हाचे काड असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश कमी होतात. या चाऱ्याचे पोषणमूल्य युरिया, मळी, खनिज मिश्रण आणि मीठ वापरून वाढविता येते, त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

3) गाई - म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका भरडा, तूर, हरभरा, मूग - चुणी, भात - गव्हाचा कोंडा इ. योग्य प्रमाणात द्यावा. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.

4) जनावरांच्या दैनंदिन आहारात 25 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रणाचा वापर करावा. क्षार चाटण विटा गोठ्यात बांधाव्यात, तसेच आहारात जीवनसत्त्वांचा देखील वापर करावा.

5) दूध दोहनातील अंतर समान असावे (जर सकाळी सहा वाजता दूध काढले, तर सायंकाळी सहा वाजता दूध काढावे). अंतर वाढले तर दूध वाढते; पण फॅट कमी होतात.

6) दूध काढताना कास चांगली घुसळून धुवावी, म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणात देखील वाढ होईल.

7) गाईचे दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे. आपल्या गोठ्यात स्वच्छ दुग्धोत्पादनाचा अवलंब करावा, जेणेकरून कासदाहसारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाहीत; तसेच कासदाह झाल्यास त्वरित उपचार करावेत.

8) दुधाळ जनावरांना शक्‍य असल्यास मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईंच्या दूध उत्पादनात व फॅटच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.

9) जास्त वयस्क गाई, म्हणजेच सातव्या विताच्या पुढील गाई गोठ्यात ठेवू नयेत.

संकलित!

-----------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!