दर्जेदार सेंद्रिय खत असे तयार करा

दर्जेदार सेंद्रिय खत असे तयार करा♥प्रगतशील शेतकरी♥

♥जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनांचा संयुक्तपणे वापर करावा.
या पदार्थांपासून ढीग पद्धत, खड्डा पद्धत, नाडेप कंपोस्ट आणि पीडीकेव्ही कंपोस्ट पद्धतीने खतनिर्मिती करता येते.
या खतामध्ये अन्नद्रव्यांचे चांगले प्रमाण असते.

♥कंपोस्ट खतनिर्मिती
अ) ढीग पद्धत :
1) ही पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये उपयोगी ठरते. शेताच्या बांधाजवळ मोकळ्या पड जागेची निवड करावी. ढिगाची लांबी दोन मी. किंवा आवश्‍यकतेप्रमाणे रुंदी 2 ते 2.5 मी. ठेवावी.
2) आखलेल्या जागेभोवती जवळपास 30 सें.मी. उंचीचा मातीचा थर चारही बाजूंनी द्यावा.
3) त्यानंतर सेंद्रिय पदार्थांचे बारीक बारीक तुकडे करून 20 ते 30 सें.मी. जाडीचा थर आखलेल्या भागात एकसारखा पसरावा. या थरावर तो ओलसर होईल इतके पाणी शिंपडावे.
4) त्यावर 100 किलो शेण अधिक एक किलो कंपोस्ट जीवाणू संवर्धक प्रति एक टन सेंद्रिय पदार्थ या प्रमाणात प्रत्येक थरावर योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून पसरावेत. अशा प्रकारे थरावर थर टाकत जावेत.
5) जेव्हा ढिगाची उंची 1 ते 1.5 मी. होईल, तेव्हा थर टाकणे बंद करून शेवटचा थर निमुळत्या आकाराचा करावा. त्यावर शेण व पाण्याच्या मिश्रणाने लेपावे. त्यामुळे ढिगामधील उष्णता बाहेर पडत नाही. कुजण्याची प्रक्रिया जलद होते.
6) साधारणपणे 2 ते 2.5 महिन्यांनी या ढिगाची उलथापालथ करावी. त्यामुळे सर्व सेंद्रिय पदार्थ एकसारखे कुजतात. जर थरांमधील पाण्याचे प्रमाण कमी वाटल्यास योग्य त्या प्रमाणात पाणी शिंपडावे.
7) या पद्धतीने जर सेंद्रिय पदार्थ कुजविले तर 4 ते 5 महिन्यांत चांगले कंपोस्ट खत तयार होते.
खतामध्ये 0.77 टक्के नत्र, 0.44 टक्के स्फुरद आणि 0.38 टक्के पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

♥खड्डा पद्धत

1) या पद्धतीचा अवलंब कमी पावसाच्या प्रदेशात करावा. या पद्धतीमध्ये इंदोर आणि बंगलोर पद्धत अशा दोन पद्धती आहेत.
2) खड्डा खोदण्यासाठी उंच ठिकाणी जेथे पाणी साचत नाही, अशी जनावरांच्या गोठ्याजवळ जागा निवडावी.
3) खड्ड्याची लांबी साधारणतः 6 मीटर ते 10 मीटर, रुंदी 1.5 मीटर ते 2 मीटर आणि खोली एक मीटरपेक्षा जास्त असू नये. खड्डा खोदल्यावर खड्ड्याचा आतील भागात पाणी शिंपडावे. धुम्मस करून पक्का करावा. त्यानंतर अंदाजे 25 ते 30 सें.मी. जाडीचा बारीक केलेल्या सेंद्रिय पदार्थांचा थर टाकून तो थर पाण्याने ओला करून घ्यावा. त्यावर जनावरांच्या मूत्राने ओली झालेली माती, शेण आणि पाण्याचे आवश्‍यक तेवढे द्रावण यांचा पाच सें.मी. जाडीचा थर टाकावा.
4) या थरावर प्रति टन सेंद्रिय पदार्थांस एक किलो कंपोस्ट जीवाणू संवर्धन व शेण यांचे पाण्यात मिश्रण करून योग्य प्रमाणात शिंपडावे. नंतर त्यावर 2.5 ते 3 सें.मी. जाडीचा गाळलेल्या मातीचा थर टाकावा. वरीलप्रमाणे क्रमाक्रमाने थरावर थर टाकावेत.
5) जेव्हा थर जमिनीच्या अर्धा मीटर वर येईल, तेव्हा थर टाकणे बंद करावे.
6) शेवटच्या थरास निमुळता आकार देऊन ढीग शेणा-मातीच्या काल्याने लिंपून घ्यावा.
7) खड्डा पूर्ण भरल्यापासून 1.5 ते 2 महिन्यांनी शक्‍य झाल्यास थर वरखाली करावा. हे शक्‍य नसल्यास खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थ कोरडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
8) खड्डा भरल्यानंतर 3.5 ते 4.5 महिन्यांत कंपोस्ट खत तयार होते.
खतामध्ये 1 ते 1.25 टक्के नत्र, 0.5 ते 0.6 टक्के स्फुरद आणि 1 ते 1.2 टक्के पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

♥नाडेप कंपोस्ट

1) नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी टाकी बांधावी. टाकी बांधण्यासाठी पाणी न साचणारी उंच ठिकाणची जमीन निवडावी.
2) टाकी बांधण्याकरिता आतून 12 फूट लांब व 5 फूट रुंदी अशा आयाताकृती जागा 1 फूट लांब व 1 फूट खोल खोदून घ्यावी.
3) टाकी बांधण्यास साधारणतः 1200 विटा, 100 टोपले माती, 20 टोपले वाळू, दगड व एक गोणी सिमेंट एवढी सामग्री लागते.
4) खोदलेली जागा दगड व मातीने भरून जमिनीला समांतर करून घ्यावी. मधील पूर्ण जागा धुम्मस करून टणक करावी किंवा खालची जागा सिमेंट कॉंक्रीटने पक्की करावी.
5) त्यानंतर 9 इंच रुंदीची भिंत येईल अशा प्रकारे विटांचे दोन थर मातीमध्ये बांधावेत.
6) टाकीत मोकळी हवा खेळती राहावी म्हणून टाकी बांधताना चारही बाजूंच्या भिंतींना प्रत्येक दोन विटांच्या थरानंतर तिसऱ्या थराची बांधणी करताना दोन विटांमध्ये चार इंचांची जागा रिकामी सोडून बांधणी करावी. टाकीची उंची तीन फूट ठेवून शेवटचे दोन थर सिमेंटमध्ये बांधावेत, जेणेकरून टाकीला मजबुती येते.
7) नाडेप कंपोस्ट तयार करण्यासाठी टाक्‍याजवळ अंदाजे 1500 किलो काडीकचरा, पालापाचोळा, धसकट, सालपटे इत्यादी मिसळून सेंद्रिय पदार्थ, 10 टोपले शेणखत, 120 ते 130 टोपले गाळलेली माती, 2000 लिटर पाणी तसेच गाई-म्हशींचे किंवा इतर जनावरांचे मूत्र 30 ते 35 लिटर, गाईचे शेण 90 ते 100 किलो, इत्यादी साहित्य जमवून ठेवावे.

♥पहिली भराई

1) टाकी भरण्याचे काम सुरू करण्यापूर्वी टाकीच्या आतील भिंती व तळ शेण व पाणी यांच्या मिश्रणाने ओला करून घ्यावा. त्यानंतर पहिला 15 सें.मी. जाडीचा थर जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थांचा टाकावा.
2) या थरावर 125 लिटर पाणी व 4 किलो शेण अधिक कंपोस्ट जीवाणू संवर्धन यांचे मिश्रण शिंपडावे. जेणेकरून संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थ ओले होतील. त्यानंतर वाळलेली व गाळलेली साफ माती 60 किलो समप्रमाणात मिसळावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे.
3) प्रत्येक वेळी तीन थर देऊन टाक्‍याच्या वर 45 सें.मी. म्हणजेच 1.5 फूट उंच थर येतील याप्रमाणे टाकी भरावी. याकरिता साधारणतः 11 ते 12 थर आवश्‍यक असतात. शेवटच्या थरावर जवळपास 7.5 सें.मी. जाडीचा 400 ते 500 किलो स्वच्छ मातीचा थर पसरावा. त्यावर शेण व पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून घ्यावे. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला भेगा पडल्यास पुन्हा शेण व पाण्याच्या मिश्रणाने लिंपावे.

♥दुसरी भराई

1) 15 ते 20 दिवसांनंतर या टाक्‍यात भरलेली सामग्री आकुंचन पावून साधारणतः 8 ते 9 इंच खाली दबलेली दिसून येईल, तेव्हा पुन्हा पहिल्या भराईप्रमाणेच काडी-कचरा व इतर वनस्पतीजन्य पदार्थ, शेण व पाण्याचे मिश्रण आणि गाळलेल्या मातीच्या थराने पुन्हा रचना करून टाक्‍याच्या वर 45 सें.मी. उंचीपर्यंत पहिल्यांदा जसे टाके भरले होते, त्याचप्रमाणे पुन्हा भरून घ्यावेत आणि त्यावर तीन इंच मातीचा थर देऊन शेण व माती यांचे मिश्रणाने लिंपून बंद करावे.

♥खतनिर्मिती
1) या पद्धतीने चांगले कंपोस्ट खत तयार होण्यासाठी 90 ते 120 दिवस लागतात. या कालावधीत जर ढिगाऱ्याला भेगा पडल्यास शेण, माती व पाण्याचे मिश्रण शिंपडावे, जेणेकरून टाकीमध्ये आर्द्रता कायम राहील याची दक्षता घ्यावी.
2) उन्हाळ्यात ऊन जास्त असल्यास टाकी गवत किंवा चटई किंवा गोणपाटाने झाकून टाकावी. या आकाराच्या टाकीमधून जवळपास 3.5 ते 5 टन नाडेप कंपोस्ट मिळते.
3) अशी टाकी बांधण्यास अंदाजे 5000 रुपये लागतात.
उपलब्ध अन्नद्रव्ये

4) खतामध्ये साधारणतः 0.5 ते 1.0 टक्के नत्र, 0.5 ते 0.8 टक्के स्फुरद आणि 1.2 ते 1.4 टक्के पालाशाबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.
पीडीकेव्ही कंपोस्ट पद्धत ः
1) या पद्धतीत 10 फूट x 6 फूट x 3 फूट आकाराचा खड्डा उंच ठिकाणी व पाणी साचणार नाही, अशा ठिकाणी खोदावा. खड्ड्यामध्ये ओलावा राखण्यासाठी पाण्याचा स्रोत जवळ असावा.
2) खड्ड्याच्या मधोमध 1 फूट x 1 फूट x 4.5 फूट आकाराची चारही बाजूंनी हवेसाठी छिद्र असलेली चिमणी तयार करावी.
3) खड्ड्याचे तोंड पावसात खचू नये यासाठी शक्‍य असल्यास खड्ड्याच्या वरचा भाग तीन ते चार विटांच्या थराने बांधकाम केल्यास खड्डा दीर्घकाळ वापरता येतो.
4) उपलब्ध गवत, काडीकचरा किंवा पिकांच्या अवशेषांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. या सेंद्रिय पदार्थांचा सहा इंच जाडीचा थर पसरवून पाण्याने चांगला ओला करावा.
5) यानंतर पीडीकेव्ही कचरा कुजविणारे जीवाणू खत 1 किलो प्रति 1 टन कचरा या प्रमाणात वापरण्यासाठी 1 किलो जीवाणू खत 90 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून ठेवावे. त्यानंतर यातील थोडे थोडे द्रावण शेण व माती यांच्या मिश्रणात मिसळून सेंद्रिय पदार्थांच्या थरावर सर्वत्र सम प्रमाणात शिंपडावे. यात गोमूत्र मिसळावे.
6) काडीकचऱ्यात ओल्या पानांचा थर टाकल्यास सेंद्रिय पदार्थ लवकर कुजण्यास वेग येतो.
7) या पद्धतीने खड्डा जमिनीच्या वर एक फूटपर्यंत भरावा. शेण व मातीच्या मिश्रणाने संपूर्ण खड्डा लिंपून टाकावा.
8) या पद्धतीने सोयाबीन, मूग, उडीद व गाजर गवत इत्यादी पीक अवशेषांपासून 60 ते 90 दिवसांत तसेच तुराट्या व पऱ्हाट्यापासून 120 ते 150 दिवसांत चांगल्या प्रतीचे खत तयार होते.
9) शक्‍य असल्यास किमान एकदातरी पलटी मारून खड्डा पुन्हा भरल्यास चांगले सेंद्रिय खत लवकर तयार होण्यास मदत होते. खड्ड्यामध्ये ओलावा कायम राहील याची दक्षता घ्यावी.

♥सेंद्रिय खतांचे महत्त्व

1) सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. जमिनीचे भौतिक गुणधर्म उदा. जमिनीची घडण (मातीच्या कणांची रचना), निचरा, जलधारणक्षमता, खेळती हवा, जमिनीतील समतोल तापमान इत्यादींमध्ये सुधारणा होऊन उत्पादकता वाढीस मदत होते.
2) सेंद्रिय खतांद्वारा मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात केला जातो.
3) जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये उपलब्ध अवस्थेत येण्यास मदत होते.

♥खत ओळखण्याची पद्धती

1) सेंद्रिय पदार्थांचे आकारमान कमी होऊन 30 ते 60 टक्‍क्‍यांवर येते.
2) तयार खतास दुर्गंधी येत नाही. खताच्या ढिगाऱ्यात हात खालून पाहिल्यास आतील उष्णतामान कमी लागते.
3) सेंद्रिय पदार्थाचा रंग तपकिरी किंवा गर्द काळा होतो.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!