बुळकांडी(हागवण/संडासी) शेळ्या, मेंढ्यांमधील होणार्या रोगावरील उपाय
बुळकांडी(हागवण/संडासी)
शेळ्या, मेंढ्यांमधील होणार्या रोगावरील उपाय♥प्रगतशील शेतकरी♥
-
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) रोग कसा होतो?
रोगी जनावरांपासून निरोगी शेळ्या- मेंढ्यांच्या शरीरात हे विषाणू हवेमार्फत शिरकाव करतात.
त्यानंतर ते घशातील, मानेजवळील लिंफनोंड मध्ये वाढतात व तेथून पूर्ण शरीरभर पसरतात. तीन दिवसांत हे विषाणू शरीरातील दुसऱ्या लिंफॉईड पेशी, पेशींचा संच आणि श्वसनसंस्थेच्या आणि पचनसंस्थेच्या आतील आवरणात प्रवेश करतात आणि आपले कायमस्वरूपी वास्तव्य करून तेथील पेशींना कमी करतात / मरतात.
परिणामी पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण कमी होते, जनावर अशक्त होते आणि आतड्यांत विषाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रोगी शेळ्या-मेंढ्यांना हागवण लागते.
तसेच शरीरभर रक्ताद्वारे पसरल्याने ताप येतो. नाका-तोंडातून पाणी येते.
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) रोगाचा प्रसार हवेमार्फत रोगी जनावरांपासून निरोगी जनावरांना होतो. रोगी शेळ्या- मेंढ्यांच्या शिंकण्यातून, खासणे, खोकल्यातून होतो. रोगाचा उद्रेक बहुतांशी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. रोगाची लक्षणे दिसताच त्वरीत उपाय करावेत.
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) रोग विषाणूजन्य असून यालाच पी.पी.आर. किंवा "शेण्यांतील प्लेग' असेही म्हणतात.
हा रोग मॉर्बिली संवर्गातील, पॅरामिक्झोपिरीडी नावाच्या विषाणूंच्या वर्गातील विषाणूमुळे होतो.
भारतामध्ये पी.पी.आर. हा रोग पहिल्यांदा सन १९८७ मध्ये आढळून आला.
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) रोगाचा प्रसार
या रोगाचा प्रसार हवेमार्फत रोगी जनावरांपासून निरोगी जनावरांना होतो. रोगी शेळ्या- मेंढ्यांच्या शिंकण्यातून, खासणे, खोकल्यातून होतो. रोगाचा उद्रेक बहुतांशी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतो.
तसेच रोगी जनावरांच्या नाकातील, तोंडातील व डोळ्यांतील स्रावापासून या रोगाचे विषाणू निरोगी जनावरात संचार करतात आणि मोठ्या प्रमाणात या रोगाची लागण एक किंवा दोन जनावरांपासून देखील कळपात होते व मरतुकीचे प्रमाण जास्त असल्याने कधीकधी पूर्ण कळप अचानक नष्ट होण्याची भीती असते.
याप्रमाणे आजारी शेळ्या- मेंढ्यांच्या विष्ठेद्वाराही या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) रोगाची लक्षणे
या रोगाचा प्रादुर्भाव शेळ्या-मेंढ्यांमध्ये झाल्यावर सहा दिवसांनंतर रोगाची लक्षण दिसून येतात. रोगी जनावराच्या शरीराचे तापमान १०६ अंश फॅ. ते १०७ अंश फॅ.पर्यंत वाढते व रोग मुक्ततेच्या आधी ते सामान्य होते किंवा जनावराच्या मृत्यू अगोदर शारीरिक तापमान सामान्य तापमानाच्या पातळीपेक्षा कमी होते.
नाकातून, डोळ्यांतून पाणी गळते. हा नाकातून व डोळ्यांतून वाहणारा स्राव चिकट स्वरूपाचा असून नाकपुड्या बंद करतो, तसेच त्यात तुकडे दिसून येतात व डोळ्याला चिकटून बसतात.
विषाणू रोगी जनावराच्या लहान व मोठ्या आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात व आतड्याचे श्लेष्मल आवरण हे सडके होऊन त्यावर व्रण, जखमा आढळतात व त्यामुळे रोगी जनावराला बुळकांडी (हागवण) लागते.
त्यामुळे रोगी जनावर दिवसेंदिवस अशक्त होत जाते.
शिवाय या आजारामध्ये श्वासोच्छ्वासाचा वेग समतोल राहत नाही, तसेच जनावर नेहमी शिंकते, त्यामुळे रोगी जनावरास श्वासोच्छ्वास अडचण होऊन फुफ्फुसांवर ताण पडतो. गाभण जनावरांमध्ये गर्भात होण्याची शक्यता असते. शि
वाय शेळ्या- मेंढ्यांचा चेहरा सुजतो.
वरील लक्षण दाखविणाऱ्या शेळ्या- मेंढ्या नेहमीच्या औषधोपचाराने बऱ्या न झाल्यास रोगी शेळ्या- मेंढ्यांचे तोंड उघडून पाहावे.
तोंडाच्या आतील भागावर पांढऱ्या काळ्या बारीक रवा सांडल्यासारख्या जखमा दिसून येतात. तसेच शेळ्या- मेंढ्यांच्या करड्यांमध्ये कधी कधी वरील लक्षणे दिसत नाहीत तर फक्त किरकोळ ताप येतो, हागवण लागते आणि दुसऱ्या दिवशी ते दगावतात.
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) रोगाचे निदान असे कराल
- रोगाचे निदान वरील लक्षणे आढळल्यास, लक्षणांवरून करता येते.
- योग्य निदानासाठी प्रयोग शाळेत कळपातील मृत जनावरांचे शवविच्छेदन करून करता येते.
- निरीक्षणाकरिता खालील नमुने १२ तासांच्या आत प्रयोगशाळेत पाठवावेत.
- नाकातील, तोंडातील, डोळ्यांतील स्रावात बुडवून घेतलेले कापसाचे बोळे. (जिवंत जनावरांचे)
- रक्त न गोठू देणाऱ्या रसायनाबरोबर उदा. ईडीटीए रक्त पाठवावे. (जिवंत जनावरांचे)
- रक्तद्रव्य (जिवंत जनावरांचे)
- विष्ठा (जिवंत जनावरांची)
- मृत जनावरांचे मोठ्या व छोट्या आतड्यांचे काप, गलकंडाचे काप, प्लिहाचे काप, फुफ्फुसाचे काप इत्यादी दहा टक्के फॉरमॅलीनमध्ये प्रयोगशाळेत पाठवून रोगाचे निदान करता येते.
♥ बुळकांडी(हागवण/संडासी) उपचार
हा रोग विषाणूजन्य असल्याने उपचार नाहीत.
लक्षणानुरूप पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करून योग्य ती काळजी घेतल्यास या रोगाचा प्रसार आटोक्यात आणता येऊ शकतो.
शक्य तेवढ्या लवकर मरतुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी या रोगात होणाऱ्या दुसऱ्या जिवाणूंची, परोपजीवींची पर्यायी वाढ कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
♥प्रतिबंधक उपाय व नियंत्रण
- वरील लक्षण आढळल्यास रोगी जनावरांस निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. ताबडतोब उपचार सुरू करावा.
- उपचार होत नसल्यास रोगी जनावरांचा नायनाट करावा.
- मृत जनावरांची योग्य ती विल्हेवाट करून त्यांना वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे, पिण्याच्या भांड्याचे तसेच बांधण्यात येणाऱ्या जागेचेही निर्जंतुकीकरण करावे. जेथे रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तिथून जनावरांची ये- जा निषिद्ध करावी.
- नवीन शेळी-मेंढीपालन व्यवसाय सुरू करताना, व्यवसायासाठी घेतलेल्या नवीन शेळ्या-मेंढ्यांना माहीत असलेल्या ठिकाणीच खरेदी करावी. खरेदी केलेली नवीन जनावरे अगोदर घेतलेल्या किंवा घरच्या कळपात मिसळू नये, तर त्यांना सात ते आठ दिवसांपर्यंत देखरेखीखाली ठेवावे.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार वयाच्या तिसऱ्या महिन्यात शेळ्या व मेंढ्यांना या रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे.
(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत!)
संकलित!
Comments
Post a Comment