नारळ लागवड अशी करावी Coconut cultivation practice
नारळ लागवड अशी करावी♥प्रगतशील शेतकरी♥
♥नारळ लागवडीसाठी एक मीटर खोलीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. लागवड करताना रोपांची निवड करणे गरजेचे आहे.
ही रोपे नऊ ते १२ महिने वयाची, पाच ते सहा पाने आलेली असावीत.
रोप जोमदार व निरोगी असावे.
रोपाचा बुंधा आखूड व जाड असावा.
रोपे सरकारमान्य रोपवाटिकेतून खरेदी करावीत.
लागवड करताना दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर 7.5 मीटर ठेवावे.
♥लागवडीसाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यांच्या तळाशी पालापाचोळा घालून दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत, दोन कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट, चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.
रेताड जमिनीत तळाशी नारळाच्या सोडणांचे दोन ते तीन थर द्यावेत, त्यामुळे ओलावा टिकून राहतो.
हेक्टरी १७५ झाडे बसतात.
पावसाळ्यात लागवड करताना खड्ड्यात मध्यभागी जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा ३० ते ४० सें.मी खाली राहील अशा बेताने नारळाचे रोप लावावे.
♥रोपाच्या बाजूची माती घट्ट दाबून घ्यावी व वाऱ्याने रोप हलू नये म्हणून बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
रोपांची वाढ जशी होईल, त्याप्रमाणे खड्डा भरून घ्यावा.
परंतु रोपाच्या कोंबात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जोराचा पाऊस असेल, तर रोपे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात लावावीत.
फळांच्या योग्य वाढीसाठी खतांची आवश्यकता असते.
यासाठी जून, सप्टेंबर, फेब्रुवारी या महिन्यांत झाडांभोवती १.५ मीटर आळ्यात खते शेणखतात मिसळून पसरावीत व कुदळीने हलके खणून मातीत मिसळावीत.
काही वेळा उंदीर कोवळी फळे पोखरतात, त्यामुळे फळांची गळ होते.
यासाठी झाडांच्या झावळ्या स्वच्छ ठेवाव्यात.
♥जमिन
ओलिताची सोय असल्यास सर्वच प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते.
जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी.
शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते.
♥अंतर
नारळ लागवड करताना सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन माडांत योग्य अंतर असणे.
योग्य प्रमाणात उत्पादन मिळण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवावे.
शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल.
1 × 1 × 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावे.
♥लागवड वेळ
खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे किंवा पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये लागवड करावी.
♥नारळ लागवडीसाठी खड्डा करताना घ्यावयाची काळजी
रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी एक ते दोन टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी.
अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला एक ते दोन टोपल्या रेती (वाळू) घालावी; तसेच खड्डा भरताना एक ते दोन टोपल्या रेती मातीत मिसळावी, त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो.
वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडणांचा थर दिल्यास उत्तम.
त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते.
खड्डा भरताना खड्ड्यात चार ते पाच घमेली शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम फॉलिडॉल पावडर खड्ड्याच्या मातीत मिसळावी.
जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत.
♥जाती:-
बाणवली, प्रताप; संकरित टी × डी आणि डी × टी या जाती उत्तम आहेत.
उंच जाती
1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.
2) लक्षद्वीप ऑर्डिनरी - या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते.
3) प्रताप - नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.
4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात आहे. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे.
ठेंगू जाती
या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते.
संकरित जाती
1) टी - डी (केरासंकरा) - या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.
2) टी - डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.
♥रोपांची निवड, निगा महत्त्वाची
रोपे जूनमध्येच खरेदी करावीत व ती रोपे पिशवीत भरून ठेवावीत. रोपे नऊ ते बारा महिने वयाची असावीत. एक वर्षे वयाच्या रोपांना चार ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.
कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. रोपाची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार द्यावा.
पश्चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी.
त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.
रोपांना भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते; परंतु पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे आवश्यक आहे, त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी; तसेच पपई यांची लागवड करावी.
♥गुणवत्तापूर्ण नारळ रोपनिर्मिती
नारळ लागवडीतून चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. कारण नारळ बियाण्याच्या निवडीत झालेली चूक ही काही वर्षांनंतरच लक्षात येते. यासाठी दर्जेदार मातृवृक्षापासून उत्पादित झालेल्या नारळापासून रोपांची निर्मिती करावी.
ज्या बागेत अधिक उत्पादन देणाऱ्या नारळाच्या झाडांची संख्या जास्त आहे. अशाच बागेची निवड बियाण्यासाठी करावी. कारण या बागेत नारळावरील मादीफुले ही अधिक उत्पादन देणाऱ्या झाडाच्या परागकणांद्वारे तयार झाल्याने त्यांच्यातील चांगले गुण पुढील पिढीत येतात. बाग रोगमुक्त असावी, त्याचप्रमाणे किडीचा प्रादुर्भाव कमी असावा. बागेतील झाडाची योग्य वेळी आंतरमशागत करून खते व पाणीपुरवठ्याची योग्य सोय असावी.
1) मातृवृक्षांची निवड - उत्कृष्ट नारळ रोपांच्या निर्मितीसाठी जातीनुसार उत्तम प्रतीचे मातृवृक्ष आवश्यक आहेत. व्यापारीदृष्ट्या उपयुक्त ठरणाऱ्या शाखीय अभिवृद्धीचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने बियाण्यापासून रोपनिर्मिती करावी लागते. त्यासाठी मातृवृक्ष निवडताना खालील मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे ः
अ) उत्पन्न -
मातृवृक्ष नियमित उत्पन्न देणारा असावा. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यास वर्षाला किमान 70-80 नारळ, तर मुबलक पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणच्या मातृवृक्षापासून 100-120 नारळ मिळाले पाहिजेत. प्रति नारळ सरासरी 150 ग्रॅमपेक्षा अधिक खोबरे निघायला हवे. माडावर असलेल्या पेंडीच्या संख्येवरून येणाऱ्या उत्पन्नाची अटकळ बांधता येते.
ब) मातृवृक्षाचे वय -
मातृवृक्षाचे वय शक्यतो 22 वर्षे अगर त्यापेक्षा जास्त असावे. बागेतील मातृवृक्षांच्या वयाबाबत माहिती नसल्यास जे झाड चांगले उत्पादन देण्याच्या पूर्ण अवस्थेत आहेत आणि मागील चार वर्षे सातत्याने चांगले उत्पन्न देणाऱ्या मातृवृक्षाची निवड करावी. अति जुन्या झाडाचे (60 वर्षांपेक्षा जास्त) बियाणे शक्यतो घेऊ नये. नवीन लागवड केलेल्या बागेतील मातृवृक्षांबाबत संपूर्ण माहिती असल्यास त्या बागेतील बियाणे घेण्यास हरकत नाही.
क) पानांची संख्या आणि रचना -
मातृवृक्षावर 30 पेक्षा अधिक पाने असावीत. झावळ्यांचे देठ आखूड आणि खोडाकडे रुंद असावे. देठ खोडाला घट्ट चिकटलेले असावे. झावळ्यांचे देठ लांब आणि बारीक असल्यास अशा झावळ्या पेंडीच्या (घडाच्या) वजनाने वाकतात अगर मोडतात. त्यामुळे अशी झाडे मातृवृक्ष म्हणून निवड करू नयेत. मातृवृक्षाच्या झाडावरील पानांची रचना अशा प्रकारे असावी, की त्याला छत्रीसारखा आकार यावा. ज्या झाडाची हिरवी पाने लोंबकळत असतील अशा झाडाची निवड मातृवृक्ष म्हणून करू नये.
ड) पोयीची रचना आणि संख्या -
प्रत्येक पानाच्या खोबणीतून एक पोय असावी. त्याचप्रमाणे पोयीमध्ये फळधारणा झालेल्या काड्या अधिक असाव्यात. त्यावर एक किंवा दोन मादीफुले असावीत. प्रत्येक फुलोऱ्यात 25 हून अधिक मादीफुले असावीत. मातृवृक्षावर निरनिराळ्या अवस्थेतील म्हणजे पक्व होण्याच्या बेतात असलेल्या फळांच्या पेंडीपासून ते नुकतेच उमलत असलेल्या पोयीपर्यंत 12 घड असावेत. पेंडीचे देठ आखूड, मजबूत आणि खोडास घट्ट चिकटलेले असावेत. त्यामुळे ही पेंड देठात न मोडता, खालच्या पानांवर व्यवस्थित टेकली जाते. लांब आणि बारीक देठ असलेली पेंड खालच्या पानावर व्यवस्थित न टेकता बाजूला सरकून हवेत लोंबकळत राहिल्यामुळे फळे पक्व होण्यापूर्वीच गळून पडतात. परंतु फळे गळून न पडल्यास देठ पिचलेला असल्याने फळांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही. परिणामी ही फळे सुरकुतलेली दिसतात. ही फळे रोपे तयार करण्यासाठी निरुपयोगी ठरतात.
ई) फळांचा आकार आणि स्वरूप -
काहींना मोठ्या आकाराची फळे देणारा माड हवा असतो, तर काहींना लहान फळे देणारा माड हवा असतो. परंतु मध्यम आकाराची, गोल आणि लांबट-गोल स्वरूपाची फळे देणारे माड निवडावेत. अतिशय लहान, बारीक, लांबट आणि बेढब फळे निवडू नयेत. तसेच सोललेल्या नारळाचे वजन 570 ग्रॅम तर खोबरे जाड असावे.
2) बियाण्यांची निवड - अ) हंगाम -
बियाण्यांसाठी नारळ शक्यतो सप्टेंबर ते मे या हंगामातील निवडावेत. सदर हंगाम स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतो. काही ठिकाणी नोव्हेंबर ते जूनअखेर या हंगामातील फळे निवडली जातात. परंतु सप्टेंबर ते मे हंगामात निवडलेली फळे आकाराने मोठी असून, त्यात खोबरे अधिक असते. अशा बियाण्याची उगवण चांगल्या प्रकारे होते.
ब) फळांची पक्वता -
बियाण्यासाठी 12 महिने पक्वतेची नारळ फळे निवडावीत. फळाची पक्वता ओळखण्यासाठी खालील चाचण्या कराव्यात ः
1) फळांचा रंग तांबूस-तपकिरी असतो.
2) फळावर टिचकी मारली असता, खणखण असा आवाज येतो.
3) पक्व फळाच्या काथ्याचा रंग तपकिरी असतो.
4) फळ वजनाने हलके लागते, हलवून पाहिले असता आतील पाण्याचा खळखळ असा आवाज येतो.
क) फळे काढण्याची पद्धत -
मातृवृक्ष मध्यम उंचीचा असेल आणि त्याखालील जमीन वाळूची किंवा मऊ व भुसभुशीत असेल तर झाडावर चढून नेहमीच्या पद्धतीने फळे काढावीत. परंतु झाड अधिक उंच असेल, जमीन कडक असेल तर मात्र पेंडी दोरीच्या साह्याने उतरवून घ्याव्यात. हे शक्य नसल्यास माडाखाली गोणपाट, भाताचा पेंडा किंवा गवत भरून त्यावर नारळ पाडावेत.
ड) फळांची निवड -
पेंडीतील सर्वच फळे बियाण्यासाठी योग्य नसतात. पेंडीत फळांची संख्या अधिक असल्यास काही फळे बारीक वा बेढब आकाराची होतात. अशा फळांचा बियाणे म्हणून वापर करू नये.
ई) बियाण्याची साठवण -
नारळ बियाण्यास रुजत घालण्यापूर्वी विश्रांती द्यावी लागते. परंतु या विश्रांतीच्या कालावधीत फळातील पाणी आटणार नाही याची काळजी घ्यावी. बियाण्याची साठवण करून ठेवण्यासाठी आवश्यक लांबी, रुंदी, खोलीचे खड्डे खणून त्यामध्ये बियाणे साठवावे. बियाण्याने खड्डा भरल्यानंतर त्याला वेळोवेळी पाणी द्यावे जेणेकरून बाहेरील आवरण ओले राहील आणि आतील पाणी आटणार नाही. जास्त कडक उन्हाळा असल्यास खड्ड्यावर सावलीची व्यवस्था करावी. अशाप्रकारे सप्टेंबर ते मेपर्यंत साठवण केलेल्या बियाण्याची लागवड जून-जुलैमध्ये करता येते. यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन आणि पाण्यावरील खर्चाची बचत करता येते. परंतु वर्षभर लागवड करावयाची झाल्यास नारळ पाडप केल्यानंतर बियाण्याला एक महिन्याची विश्रांती देण्याची गरज आहे.
3) बियाणे लागवड आणि निगा - अ) जागेची निवड -
पावसाळ्यात पाण्याचा उत्तम निचरा होणारी कोणत्याही प्रकारची जमीन नारळ रोपवाटिकेत चालते. अतिशय चिकट जमिनीत नारळाची रोपवाटिका तयार केली असता रोपे सहजपणे खोदून काढता येत नाहीत. रेताड वालुकामय जमिनीत नारळ रोपे चांगली तयार होतात.
ब) लागवड पद्धत -
रोपवाटिकेत नारळाचे बियाणे लावताना लागण चार किंवा पाच रांगांमध्ये करावी. या रांगांच्या प्रत्येक गटात 75 सें.मी. अंतर असावे. दोन रांगांमध्ये 40 सें.मी., तर रांगेतील दोन फळांत 30 सें.मी. अंतर ठेवावे. जमिनीच्या उतारानुसार रांगांची लांबी कमी-अधिक करावी. 1000 नारळ रोपे लागवडीसाठी 120 चौ.मी. जागेची आवश्यकता असते. नारळ बियाणे रांगेत लावताना उभे फळ मावेल इतक्या रुंदी व खोलीचा चर खोदावा. त्यानंतर फळाचा देठाकडील भाग वर करून ते चरात उभे करावे आणि चर मातीने भरून घ्यावा. भरतेवेळी प्रत्येक बियाण्याच्या फळाचा किंचितसा भाग वर दिसला पाहिजे अशी काळजी घ्यावी. नारळ बियाण्याचा आकार लहान-मोठा असतो. अशा वेळी जर नारळाचे फळ चराच्या खोलीहून लहान असेल तर फळांच्या बुडाखाली माती घालावी. याउलट जी नारळ फळे चरापेक्षा मोठी असतील, त्यांच्या खालची माती कोरून काढावी. अशा तऱ्हेने रांगेतील सर्व नारळ फळे चरात ठेवून झाली, की चर मातीने बंद करावा. वालुकामय जमिनीत लागवड करताना 40 सें.मी. x 30 सें.मी. अंतरावर उभ्या-आडव्या रेषा माराव्यात. रेषा एकमेकींना छेदतील अशा ठिकाणी नारळाच्या आकारानुसार फावड्याने खड्डा करून लागवड करता येते. नारळ फळे उभी किंवा आडवी लावता येतात. फळे उभी लावल्यास वाहतुकीत रोपांना इजा होत नाही.
क) लागवडीचा हंगाम -
पावसाळ्याच्या सुरवातीस शक्यतो जूनमध्ये लागवड करावी. त्यामुळे पहिले चार-पाच महिने (जून ते ऑक्टोबर) पाणी देण्याची गरज पडत नाही.
ड) पाणी व्यवस्थापन -
नारळ रोपवाटिकेला जमीन सतत ओलसर राहील अशा बेताने ऑक्टोबरपासून पाणी द्यावे. गरजेपेक्षा अधिक पाणी देण्याचे टाळावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात पाच-सहा, तर उन्हाळ्यात दोन-तीन दिवसांनी पाणी द्यावे.
इ) निगा -
वेळोवेळी तण काढून रोपवाटिकेत स्वच्छता राखावी. वाळवीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 0.05 टक्का क्लोरपायरिफॉस द्रावणाची जिरवणी करावी. कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
इरिओफाईडच्या कोळी किडीचे आक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोकणात हे प्रमाण आता 40 टक्के झाले आहे. त्यामुळे बागायतदारांनी "निमपेट‘ या औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच योग्य पाणी आणि खत घालून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यावर मात करणे शक्य आहे. याची मात्रा दिल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या घडाच्या फळधारणेमध्ये दिसून येतो; मात्र "निमपेट‘ हे दर्जेदार औषध असेल तर तो परिणाम दिसतो. काही औषधांमध्ये भेसळ झाल्याचेही दिसून येते; परंतु त्यावर नियंत्रण होत नाही.
4) उगवणक्षमता - लागवड केल्यानंतर दोन ते चार महिन्यांत बियाणे रुजण्यास सुरवात होते. पहिल्या पाच महिन्यांत 80-90 टक्के बियाणे रुजून येते. लागवडीनंतर पाच महिन्यांत रुजून येणारी रोपे लागवडीसाठी योग्य असतात. त्यानंतरची रोपे कमजोर राहतात. अशा रोपांची लागवड करून तयार होणारा माड उशिरा व कमी उत्पन्न देतो.
5) रोपांची निवड - पाच महिन्यांत रुजून येणाऱ्या रोपांपैकी खालील प्रकारची रोपे लागवडीसाठी वापरावीत :
1) रोप निरोगी व जोमदार असावे.
2) रोपांची उगवणक्षमता चांगली असावी.
3) एक वर्ष वयाच्या रोपाला किमान सहा पाने असावीत.
4) रोपांचा बुंधा जाड व दणकट असावा.
6) रोपांची काढणी - ज्या वेळी लागवड करावयाची असेल त्याचवेळी शक्यतो रोपे रोपवाटिकेतून काढावीत. रोपे काढताना फळाभोवतालची जमीन टिकावाने खोदून काढावी. अर्धवट जमीन खोदून रोपे उपटून काढू नयेत किंवा काढताना ती पिरगळू नये त्यामुळे रोप बुंध्यात मोडण्याची शक्यता असते. रोप काढल्यानंतर शक्यतो लवकर लागवड करावी. ढगाळ हवामानातही रोपे काढल्यानंतर आठ-10 दिवस चांगल्या स्थितीत राहू शकतात. परंतु हवा कोरडी असल्यास चार ते पाच दिवसांत रोपांची लागवड करावी. काळजीपूर्वक रोपे ठेवल्यास चार आठवडे चांगल्या स्थितीत राहू शकतात.
संकलीत
सर्व जातीचे नारळ रोपे मिळेल, 1 वर्षां पासून 3 वर्षां पर्यंत रोपे मिळेल, 35 एकर जागेत नर्सरी, महाराष्ट्र मधील नंतर -1 नर्सरी ,सल्ला व मार्गदर्शन, रोपे घरपोच मिळेल संपर्क -9822050489 / 9763396793
ReplyDeleteफिलिपिन्स ऑर्डीनरी नारळाची जात मिळेल का,यवतमाळ मध्ये पाहिजे होती,
Deleteकुठे मिळेल।।
Deletedashrath bhor nashik naral/sag lagwad karane ahe 200 rope havi bhao kay denar 9823357099
ReplyDelete