मॉन्सूनच्या पावसाची शक्यता
हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर
- विदर्भ, मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. १२) जाहीर केला.
या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
सलग तीन वर्षे पावसाने आेढ दिल्यानंतर यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याने देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस पडण्याचा समाधानकारक संकेत हवामान विभागाच्या महासंचालकांनी या वेळी व्यक्त केले.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एल. एस. राठोड यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.
उत्तर अॅटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तापमान, हिंदी महासागराच्या विषुववृत्ताजवळील पृष्ठभागाचे फेब्रुवारी महिन्यातील तापमान, पूर्व आशियातील फेब्रुवारी व मार्च महिन्यांतील समुद्रसपाटीवरील हवेचा दाब, वायव्य यूरोपमधील भूपृष्ठावरील हवेचे जानेवारी महिन्यातील तापमान व विषुववृत्तीय भागातील प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रमाण या घटकांच्या नोंदींवरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मॉन्सूनच्या हंगामात १९५१ ते २००० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८९ सेंटिमीटर म्हणजेच ८९० मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ८८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ८६ टक्के (उणे १४ टक्के) पाऊस पडला होता.
जूनमध्ये दुसऱ्या टप्प्यातील अंदाज
हवामान खात्यामार्फत मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
या अंदाजात मॉन्सून हंगामातील पाऊस, जुलै व ऑगस्ट महिनानिहाय पावसाचा अंदाज, मॉन्सूनची वाटचाल आणि भारताच्या चारही विभागांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण स्पष्ट करण्यात येणार आहे.
मॉन्सून मिशन मॉडलनुसार
१११ टक्के पावसाचा अंदाज
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीच्या (आयआयटीएम) मॉन्सून मिशन प्रोजेक्टअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या मॉडेलनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या १११ टक्के पावसाचा अंदाज आहे.
या अंदाजात पाच टक्के उणे-अधिक फरक होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर इन्व्हायर्मेंटल प्रिडिक्शने तयार केलेल्या ‘कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम’ (सीएफएस) वापर करून फेब्रुवारी महिन्यातील स्थितीचा अभ्यास करून मॉन्सूनचा हा प्रायोगिक अंदाज देण्यात येत आहे.
तापदायक "एल निनो'ओसरतोय
विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये गतवर्षी एप्रिल २०१५ मध्ये एल निनोची स्थिती निर्माण झाली होती.
जुलै महिन्यात एलनिनोची तीव्रता वाढून, डिसेंबर महिन्यात सर्वोच्च पातळी गाठली होती. प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक असले तरी एल निनो ओसरण्यास सुरवात झाली आहे.
माॅन्सून मिशन कपल्ड क्लायमेट मॉडेलनुसार मॉन्सूनच्या पाहिल्या टप्प्यात एलनिनो स्थिती मध्यम पातळीवरून हळूहळू नाहीशी होत जाणार आहे.
हिंद महासागरामध्ये सध्या न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती अस्तित्वात आहे.
माॅन्सून कालावधीमध्ये आयओडी स्थिती सर्वसामान्य होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मॉन्सूनच्या पावसाची शक्यता
पावसाचे प्रमाण ---- शक्यता
९० टक्क्यांहून कमी --- १६ टक्के
९० ते ९६ टक्के --- १७ टक्के
९६ ते १०४ टक्के --- ३३ टक्के
१०४ ते ११० टक्के --- १६ टक्के
११० टक्क्यांहून अधिक --- १७ टक्के
दृष्टिक्षेपात मॉन्सून अंदाज
मॉन्सूनच्या हंगामातील जून ते सप्टेंबर कालवधीसाठीचा हवामान विभागाने दिलेले अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची स्थिती
वर्ष -- प्रथम अंदाज (एप्रिल)-- द्वितीय अंदाज (जून)-- पडलेला पाऊस
२०११--९८ टक्के--९८ टक्के--१०२ टक्के
२०१२--९९ टक्के--९९ टक्के--९३ टक्के
२०१३--९८ टक्के--९८ टक्के--१०६ टक्के
२०१४--८८ टक्के--९५ टक्के--८८ टक्के
२०१५--९३ टक्के--८८ टक्के--८६ टक्के
मॉन्सूनच्या पावसाची शक्यता
♥जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला.
♥मॉन्सूनच्या हंगामात १९५१ ते २००० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८९ सेंटिमीटर म्हणजेच ८९० मिलिमीटर आहे.
♥गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ८८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस पडला होता.
Comments
Post a Comment