काळ्या मातीत मातीत

काळ्या मातीत मातीत

काळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो      ~धृ~

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला       ~1~

सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते    ~2~

भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते          ~3~

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली ~4~

अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन           ~5~

गव्हां-जोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते              ~6~

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं     ~7~

काळ्या ढेकळात डोळा हिर्वं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो      ~8~

काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिर्वं सपान फुलतं           ~9~

काळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो       ~धृ~

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!