कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती
कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती ♥प्रगतशील शेतकरी♥
♥आपल्याकडे सर्वसाधारणपणे दुबार किंवा बहुविध पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, पट्टापेर, साखळी आणि आंतरपीक या पद्धती प्रचलित आहेत.
जमीन, हवामान विशेषत: पर्जन्यमान आणि सिंचन सुविधांच्या उपलब्धतेनुसार पिकांची रचना आणि त्यानुसार शेती व पीक पद्धत ठरवली जाते.
अलिकडील काळात बाजारपेठ, जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी, हंगामानुसार मालास मिळणारा बाजारभाव, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनास वाव या बाबीही शेतीपद्धती आणि पीकपद्धती ठरविण्यास कारणीभूत ठरत आहेत.
♥ दुबार किंवा बहुविध पीकपद्धती:
या पद्धतीत एका वर्षात पहिले पीक निघाल्यावर त्याच शेतात दुसरे आणि शक्य असेल तेथे दुसऱ्यानंतर तिसरे पीक घेतले जाते.
खोल, कसदार जमीन आणि हमखास पाऊस पडणाऱ्या विभागात किंवा सिंचन सुविधा असल्यास या पीक पद्धतीचा अवलंब केला जातो.
उदा. मूग, उडीद, घेवडा, तीळ, सोयाबीन यासारख्या कमी कालावधीच्या (६५ ते ९० दिवस) खरीप पिकानंतर रब्बी हंगामात रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, सूर्यफूल, रब्बी मका, गहू इ. पिके घेतली जातात.
♥अशा परिस्थितीत या पिकांना सेंद्रिय खताचा एकरी २ बॅगा याप्रमाणे बी पेरणीच्यावेळी २ चाड्याचा पाभरीने पेरून अथवा मोघडून दिले असता ते हवेतील बाष्प शोषून घेते.
त्यामुळे मुळांजवळ गारवा निर्माण होऊन जारवा वाढतो.
जमिनीत हवा, पाणी व अन्न यांचे संतुलन राखले जाते.
अशा पिकांस संरक्षित पाणी मिळाले आणि २ ते ३ अन्नद्रव्य फवारण्या घेतल्या की, पिकाच्या उत्पादनास ते उपकारक ठरते.
♥मिश्र पीकपद्धत : या पीक पद्धतीत दोन किंवा अधिक पिकांचे बियाणे ठराविक प्रमाणात एकत्र करून पेरणी केली जाते.
त्यामुळे प्रत्येक ओळीत कमी - अधिक प्रमाणात मिश्रण केलेली सर्व पिके वाढतात.
या पद्धतीचे काही फायदे असले तरी तण नियंत्रण, पीक संरक्षण, आंतरमशागत, पीक काढणी यामध्ये अडचणी येतात.
ही पीक पद्धत कालबाह्य झाली असली तरी हलक्या - उथळ आणी कमी उत्पादकता असणाऱ्या जिरायत शेतीत तिचा अवलंब केला जातो.
♥पट्टापेर पद्धत : या पद्धतीत हलक्या आणि चढ - उताराच्या जमिनीत बाजरी, नाचणी, राळा , वरई, कोद्रा इ. तृणधान्यात मटकी, कुलथी, चवळी यासारख्या जमीन झाकणाऱ्या कडधान्य पिकांचे ६ ते ८ ओळीचे पट्टे पेरले जातात.
उतारास आडवे तृणधान्यानंतर कडधन्याचा पट्टा असे एक आड एक पट्टे पेरल्याने जमिनीची धूप कमी होते, जमिनीचा ओलावा अधिक काळ टिकून राहतो आणि तृणधान्य - कडधान्याच्या एकत्रित येण्याने जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि एकूण उत्पादनात वाढ होते.
♥साखळी पीक पद्धत :
पहिले पीक काढणीस तयार होण्यापुर्वीच पिकाच्या दोन ओळीत दुसऱ्या पिकाच्या बियाण्याची टोकण केली जाते किंवा रोपे लावली जातात.
पहिले पीक तयार होत असताना शेवटच्या दोन - तीन आठवड्यात त्याला ओलाव्याची गरज नसते.
अशावेळी जमिनीतील ओलाव्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय होत असतो, शिवाय पहिले पीक निघाल्यावर दुसऱ्या पिक्साठी मशागत करत असताना आणि दुसऱ्या पिकाची उगवण आणि वाढ होऊन जमीन झाकली जाईपर्यंत सूर्यप्रकाशामुळे जमिनीतील ओलावा फारच कमी होतो आणि त्याची झळ पुढील पिकास बसते.
शिवाय एकानंतर दुसरे पीक घेण्याने एकूण कालावधी वाढतो.
भात काढण्यापूर्वीच भात खाचरात वाल, हरभरा, लाख (लाखोळी) या पिकाची टोकण करणे फायदेशीर ठरते.
या पद्धतीचे दुसरे उत्तम उदाहरण म्हणजे रोपवाटिकेत बीजप्रक्रिया करून तुरीची रोपे तयार करून भुईमूग, सोयाबीन, मूग किंवा उडीद पिकात आंतर मशागतीची कामे झाल्यानंतर (पेरणीनंतर ३५ ते ४० दिवस) या पिकांच्या २ - ३ ओळीनंतर तुरीच्या रोपांची एक ओळ लावणे.
अर्थात त्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
♥आंतरपीक पद्धत : कोरडवाहू शेतीती सर्वार्थाने ही पद्धत सर्वोत्तम आहे. या पीक पद्धतीत एका हंगामात एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके एकाच वेळी आगाऊ निश्चित केलेल्या प्रमाणात (२:१, ४:२ किंवा ६:२) वेगवेगळ्या ओळीत पेरली जातात.
♥आंतरपीक पद्धतीचे दोन प्रकार आहेत :
१) पीक ओळ वाढ पद्धत : या आंतरपीक पद्धतीत मुख्य पिकाच्या दोन ओळीतीन अंतर कमी करून हेक्टरी रोपांची संख्या सलग पिकाइतकीच ठेवून उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत आंतरपिकाची ओळ/ओळी समावून घेतल्या जातात.
उदा: बाजरी किंवा खरीप ज्वारीचे सलग पीक :
दोन ओळीत ४५ सें.मी. आणि रोपात १० ते १२ सें.मी. अंतर ठेवून पेरले जाते. तसेच मध्यम कालावधी (१६० ते १८० दिवस) असणाऱ्या तुरीचे सलग पीक ९० x २० सें.मी. अंतरावर पेरले जाते. बाजरी/खरीप ज्वारी + तूर आंतरपीक घेताना दोन फणातील अंतर ३० सें.मी. असणारी तिफण किंवा रुंद वरंबा - सरी टोकण यंत्र वापरावे. तिफणीच्या/टोकाण यंत्राच्याकडेच्या दोन्ही फणातून बाजरी अथवा जवारी आणि मधल्या फणातून तूर पेरावी. तिफणीच्या साहाय्याने पेरणी करत असताना मधल्या फणाचे चाड्याचे छिद्र कापसाच्या बोळ्याने किंवा चिंधीने बंद करावे आणी त्या फणामागे मोघणाच्या सहाय्याने मध्यम कालावधीची तूर (विपुला, राजेश्वरी, बीडीएन ७११, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ पैकी कोणतीही एक) मोघावी आणि चाड्यातून दोन्ही कडेच्या फणात बाजरी किंवा खरीप ज्वारी पेरावी. रुंद वरंबा - सरी टोकण यंत्राने पेरणी केल्यास दोन ओळीतीलच नव्हे तर ओळीतील दोन रोपांमधील अंतर देखील एक सारखे आणि हवे तेवढे राखता येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक फणासाठी खताचा वेगळा कप्पा असल्याने बाजरी/ज्वारीसाठी त्यांची शिफारसीत मात्रा आणि तुरीसाठी तुरीची शिफारसीत खत मात्रा देता येते. बियाणे पेरणीची खोलीदेखील आवश्यकतेनुसार कमी/जास्त करता येते. या टोकण यंत्राच्या दोन्ही कडेला रिजर बसविलेले असल्याने रुंद वरंबा (गादीवाफा) आणि सारी काढली जाते आणि लागलीच वरंब्याच्या मध्यभागी तूर आणि कडेला (सऱ्यांशेजारी) बाजरी किंवा ज्वारीची हव्या त्या अंतरावर टोकण केली जाते. यामुळे बाजरी किंवा खरीप ज्वारीची पेरणी/टोकण ३० सें. मी. अंतर असलेल्या जोड ओळीत होईल आणि दोन जोड ओळीत ६० सें.मी. अंतर असेल. या ६० सें. मी. च्या मध्यभागी म्हणजेच दोन्ही जोड ओळीपासून ३० सें.मी. अंतरावर तुरीची एक ओळ पेरली जाईल. यानुसार बाजरी/ज्वारीमध्ये ३० - ६० सें.मी. तर तुरीच्या दोन ओळीत ९० सें.मी. अंतर राहील.
थोडक्यात काय तर या आंतरपीक पद्धतीत १००% बाजरी/ज्वारी आणि १००% तुर अशाप्रकारे एकूण रोपांची संख्या २००% असणार आहे. सुरूवातीचे दोन महिने तुरीची वाढ संथ गतीने होत असल्याने तिचा बाजरी किंवा खरीप ज्वारीच्या वाढीवर विपरीत परिणाम होत नाही, तसेच बाजरी/ खरीप ज्वारीचाही तुरीच्या वाढीवर विशेष परिणाम होत नाही, तसेच बाजरी/खरीप ज्वारीचाही तुरीच्या वाढीवर विशेष परिणाम होत नाही. एक हेक्टर शेतातून १.७५ ते २ हेक्टर क्षेत्राइतके उत्पदान मिळते. शिवाय जमिनीचे आरोग्य आणि सुपीकता टिकून राहते.
उदा.२: कपाशी + मूग/उडीद/ सोयाबीन
जिरायत क्षेत्रात अमेरिकन कपाशीच्या संकरित वाणाची पेरणी ९० सें.मी. तर सुधारित वाणाची पेरणी ६० सें.मी. अंतरावर (दोन ओळीतील) केली जाते. तुरी प्रमाणेच कपाशी पिकाचा देखील कालावधी अधिक (१६० ते १८० दिवस असल्याने कपाशीत तूर पिकाऐवजी मूग, उडीद किंवा सोयाबीन आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते. दोन ओळीत ९० सें.मी. अंतर असणाऱ्या अमेरिकन संकरित वाणात ४५ सें.मी. अंतरावर सोयाबीनची आणि दोन ओळीत ६० सें.मी. अंतर असलेल्या अमेरिकन सुधारित वाणात ३० सें.मी. अंतरावर मूग किंवा उडीदाची एक वाढीव ओळ पेरावी. यामुळे कपाशीच्या उत्पन्नात काहीही घट न येता सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांचे सलग पिकाच्या निम्मे उत्पन्न मिळण्यास काहीच अडचण नाही.
२) पिकांची ओळ बदल पद्धत : या पद्धतीत मुख्य पिकांच्या ओळींची संख्या कमी करून त्या ठिकाणी आंतरपिकांच्या ओळी पेरतात. यामुळे मुख्य पिकाच्या उत्पन्नात घट आली तरी दोन्ही पिकांपासून मिळणारे एकूण उत्पन्न मुख्य पिकाच्या सलग पिकापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक असते.
या पद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणजे सोयाबीन पिकाच्या दोन ओळीनंतर तिसरी ओळ तुरीची पेरणे. या पद्धतीत सोयाबीनच्या दोन ओळीत नेहमी प्रमाणे ४५ सें.मी. अंतर ठेवावे. त्यानंतर ४५ सें.मी. अंतरावर मध्यम कालवधीची तुरीची एक ओळ पेरावी आणि पुन्हा ४५ सें.मी. अंतरावर सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्या. २ फणातील अंतर ४५ सें.मी. असणाऱ्या रुंद वरंबा - सरी टोकण यंत्राच्या सहाय्याने किंवा तिफणीने अशी पेरणी करणे खूपच सोपे असते. अर्थात रुंदवरंबा - सरी टोकण यंत्रणाने पेरणी केल्यास उत्पन्नात आणखी वाढ होते. यामुळे सोयाबीनच्या दोन ओळीत ४५ सें.मी. तर दोन जोड ओळीत ९० सें.मी. अंतर राहते आणि या ९० सें.मी. जागेत तुरीची एक ओळ आल्याने तुरीच्या दोन ओळीत १३५ सें.मी. अंतर राहते. ही पीक पद्धत हमखास पाऊस पडणाऱ्या अमरावती आणि लातूर विभागातील खोल व मध्यम खोल जमिनीत वापरल्यास सोयाबीन निघाल्यावर तुरीचे पीक चांगलेच फोफावते आणि दोन्ही पिकांपासून सोयाबीन किंवा तुरीच्या सलग पिकांपेक्षा दिड पटीहून अधिक उत्पन्न मिळते. जिरायत क्षेत्रात अशाच प्रकारे कमी कालावधीच्या आणि कमी उंचीच्या इतर पिकातही तुरीचे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते. मुख्य पीक निघाल्यावर तुरीला फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत ३० दिवसांच्या अंतराने दोन संरक्षित पाणी दिले आणि २ ते ३ फवारण्या केल्या असता शेंगा पोखरणाऱ्या अळी व शेंगांवरील माशीपासून संरक्षण होवून उत्पादनात हमखास वाढ होते. महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी कदाचित ही सर्वोत्तम पीक पद्धती ठरू शकते. विविध पिकात तुरीचे आंतरपिक घेतल्यास मुख्य पीक आणि तूर पिकापासून मिळणारे उत्पादन तक्त्यामध्ये दिले आहे.
♥विविध पिकात तुरीचे २:१ या पद्धतीने आंतरपीक घेतल्याने मुख्यपीक व तूर पिकापासून मिळालेले उत्पादन
आंतरपीक पद्धत धान्य उत्पादन (क्विंटल/हे.)
मुख्यपीक तूर
बाजरी + तूर २०.१० १५.३४
सुर्यफूल + तूर १५.६८ १३.७८
भुईमूग + तूर ७.३३ २२.६३
उडीद + तूर ६.४४ १८.८३
सोयाबीन + तूर १८.५९ २१.४६
मूग + तूर ४.८२ १९.१७
तीळ + तूर ३.११ २०.०३
खरीप ज्वारी + तूर ४१.०९ १५.८१
सलग तूर -- २४.०२
♥आंतरपीक पद्धतीसाठी पिकांची निवड :
आंतरपीक पद्धतीपासून जास्तीत - जास्त फायदा मिळण्यासाठी योग्य पिकांची निवड महत्त्वाची आहे. मुख्य पीक आणि आंतरपीक एक दुसऱ्याचे सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य आणि ओलाव्यासाठी स्पर्धक नसून सहाय्यक असावेत.
१) मुख्य पीक आणि आंतरपीक ही वेगवेगळ्या कालावधीची असावीत, दोन पिकांच्या काढणीतील अंतर जेवढे जास्त तेवढे उत्पादन अधिक, दोन पिकांच्या काढणीत किमान ४० दिवसाचे अंतर असावे ते ६० ते ७० दिवस असेल तर अधिक चांगले परंतु त्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. संरक्षित सिंचनाची सोय असेल तर उत्तम.
२) मुख्य पीक आणि आंतरपिकांच्या उंचीत फरक असावा किंवा त्यांचा मुख्य वाढीचा कालावधी वेगळा असावा. उदा. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग ही पिके तुरीपेक्षा कमी उंचीची आहेत. शिवाय ती लवकर पक्व होतात. त्यांना अन्नद्रव्य, जमिनीतील ओलावा आणि सूर्यप्रकाशाची गरज असते त्या वेळी तूर अतिशय संथ गतीने वाढत असते. लवकर पक्व होणारी पिके निघाल्यावर तुरीची वाढ होते आणि फांद्या, फुले शेंगा लागतात आणि आंतरपिकास वाढण्यास भरपूर वाव मिळतो. जबळपास सलग पिकाइतकेच आंतरपिकापासून उत्पादन मिळते. हीच बाब कपाशीतील मूग, उडीद, आणि सोयाबीन या पिकात दिसून येते. परंतु तुरीत नाही, कपाशी आणि तूर ही पिके एक दुसऱ्यास सहाय्यक न होता स्पर्धक ठरतात आणि म्हणून कपाशीत तुरीचे आंतरपीक न घेता लवकर पक्व होणारी मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घ्यावीत.
३) मख्य पीक आणि आंतरपीक ही वेगळ्या कुळातील असतील, उदा. बाजरी, ज्वारी ही एकदल पिके असून त्यांची मुळे फार खोलवर जात नाहीत. ही जमिनीच्या वरच्या थरातून पाणी व अन्नद्रव्य घेतात तर तूर हे द्विदल पीक असल्याने त्याची मुले जमिनीत खोलवर जातात आणि जमिनीतील खालच्या स्तरातील ओलाव्याचा अधिक चांगला उपयोग करून घेतात. वेगळ्या कुळातील असल्याने मुख्य अन्नद्रव्याविषयीच्या गरजाही वेगळ्या आहेत. रोग व किडीही बऱ्याच अंशी वेगळ्या आहेत. तूर आणि सर्वच द्विदल धान्याच्या बियास बिजप्रक्रिया करून पेरली असता हवेतील नत्र मुळांवर साठवून ते स्वत:च्या आणि आंतरपिकाच्या तसेच नंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या वाढीसाठी उपयोग करून घेतात. जमिनीची सुपिकता वाढविण्यात मदत करतात. तर एकदल पिके जमिनीतील बुरशीच्या वाढीला अटकाव करून द्विदल पिकांवर येणाऱ्या मर रोगास काही अंशी प्रतिबंध करतात.
♥आंतरपीक पद्धतीचे फायदे:
१) आंतरपीक पद्धतीमुळे आपल्याकडे मुळातच कमतरता असलेल्या जमीन आणि पाणी (जमिनीतील ओलावा) या नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो.
२) एक पीक सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये निघते तर दुसरे डिसेंबर/जानेवारीपर्यंत शेतात राहते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाच्या जमिनीत शिल्लक राहिलेल्या ओलाव्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय न होता त्याचा उपयोग जमिनीत उभ्या असलेल्या पिकाची वाढ आणि उत्पादनासाठी होतो.
३) दुबार पीक पद्धतीत दुसऱ्या पिकासाठी पूर्व मशागत करत असताना जमिनीतील औलावा कमी होतो. हे आंतरपीक पद्धतीत टाळले जाते. एक पीक निघाले तरी जमीन दुसऱ्या पिकाने झाकलेली राहिल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
४) सलग पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीत तण, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
५) एका पिकाचा दुसऱ्या पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार आधार व सावली मिळू शकते.
६) आंतरपीक पद्धतीत संपूर्ण शेत पिकाच्या छायेखाली येत असल्याने जमिनीची धूप टाळण्यास मदत होते.
७) ज्या क्षेत्रात सिंचनाची सुविधा नाही म्हणून दुबार पीक घेता येत नाही. अशा क्षेत्रात आंतरपीक पद्धतीच्या माध्यमातून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम पीक उत्पादनासाठी वापरले जात असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात सातत्य राहण्यास मदत होते.
८) वर्षातून एकच पीक घेण्याऐवजी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेतल्याने शेतकऱ्यांची स्वत:ची विविध पिकाविषयीची कौटुंबिक गरज तर भागतेच शिवाय एकूण आर्थिक उत्पादनात भरीव वाढ होते.
९) कोरडवाहू शेतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे उशिरा पेरणी, पावसातील खंड, हंगामाच्या शेवटी पाऊस न होणे किंवा अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक जाण्याचे धोके अलीकडील काळात वाढले आहेत. हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धत घेणे हा उत्तम मार्ग आहे. लवकर किंवा उशिरा येणाऱ्या पिकांपैकी एका पिकाचे नुकसान झाले तरी एक पीक वाचण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे संपूर्ण नापिकीपासूने शेतकरी वाचू शकतो.
संकलित
Comments
Post a Comment