रेशीम उद्योग व तुती लागवड Sericulture & Tuti Plantation
रेशीम उद्योग व तुती लागवड🇮🇳 प्रगतशील शेतकरी 🏆
♥रेशीम उद्योग करण्यासाठी तुतीची लागवड करणे गरजेचे आहे.
♥जमीनची निवड
तुती लागवडीसाठी हलक्या ते भारी प्रकारची जमीन चालते, मात्र डोंगर-उताराची, निचरा न होणाऱ्या जमिनीत तुतीची लागवड करू नये.
तुती लागवडीअगोदर जमिनीचे मातीपरीक्षण करून घ्यावे. जमिनीचा सामू 6.5 ते 7 पर्यंत असणे गरजेचे आहे.
♥तुतीची लागवडपुर्वी घ्यावयाची दक्षता
तुतीची लागवड सतत 15 वर्षांपर्यंत अखंडपणे उत्पादन देत असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ठिकाणी लागवड करावी.
तुतीची लागवड रस्त्यालगतच्या शेतात करू नये, अशी लागवड केल्यास तुती पाल्यावर धूळ साचून पाल्याची प्रत कमी होते.
कीटकसंगोपनास ही पाने खाद्य म्हणून देणे अयोग्य आहे.
तुती लागवड करायच्या शेताजवळ तंबाखू व मिरची ही पिके लावलेली नसावीत किंवा कमीतकमी तुती लागवडीपासून 100 मीटर अंतरावर तंबाखू व मिरची पिके असतील याची दक्षता घ्यावी.
♥तुती आंतरमशागत अशी करावी
तुतीची लागवड करताना जमीन नांगराने 30 ते 35 सें. मी. खोल नांगरट करावी.
जमिनीची नांगरट उभी व आडवी दोन्ही बाजूंनी करावी.
जेणेकरून जमिनीचा कठीणपणा जाऊन ती मोकळी व भुसभुशीत होईल.
एप्रिल व मे महिन्यात नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील कीड मरते.
नांगरणी झाल्यावर एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून वखरणी करून घ्यावी.
तुती लागवड करताना 5 बाय 2 बाय 1 फूट अंतर मध्यम जमिनीसाठी व 6 बाय 2 बाय 1 हे अंतर भारी जमिनीसाठी लागवडीसाठी वापरावे.
या पद्धतीमुळे एकरी 10,890 इतकी झाडे बसतात.
♥ तुतीच्या लागवडीसाठी वाणाची निवड आणि दक्षता अशी घ्यावी
तुती लागवडीसाठी एम - 5, एस - 54, एस - 36, व्ही - 1, एस - 30, विरवा, एस - 135 व्ही - 1, एस - 13, एस - 34 अशा सुधारित जातीचे बेणे वापरावे.
बेणे तयार करताना 6 ते 8 महिने वयाच्या तुतीच्या झाडांची 10 ते 12 मि. मी. जाडीच्या फांद्या निवडाव्यात.
बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी.
त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत.
तुकडे धारदार कोयत्याने करावेत.
कोवळ्या फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरू नयेत.
लागवडीअगोदर थायमेट 1 टक्का द्रावणात हे बेणे बुडवून ठेवावे.
तुतीच्या बेण्याला मुळे लवकर फुटण्यासाठी रुटेक्य पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी, त्यामुळे मुळे लवकर फुटतात व झाडांची वाढ जोमदार होते.
जुलै ते नोव्हेंबर महिन्यात लागवड पूर्ण करावी.
कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे.
♥तुतीलागवडीपासून 2 ते 2.5 महिन्यांनी एकरी 24 किलो नत्र बांगडी पद्धतीने द्यावे.
दुसरा हप्ता 3 ते 4 महिन्यांनी एकरी 24 किलो पालाश द्यावे.
♥रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांच्या जातीपैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक जात आहे.
या अळ्यांचे संगोपन तुतीच्या पानांचे उत्पादन आणि वाढ यांच्याशी निगडित असते.
हवामानानुसार वर्षातून एकदा, दोनदा किंवा अनेकदा अळ्यांचे संगोपन केले जाते.
रेशीम अळ्यांची वाढ त्यांना खाऊ घातलेल्या पानांच्या दर्जावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.
पाने रसरशीत आणि गर्द हिरव्या रंगाची असायला हवीत. यासाठी बागेची काळजी घ्यायला पाहिजे.
♥कीटकांच्या संगोपनासाठी साधनसामग्री -
ज्या घरामध्ये आवश्यक ते तापमान (24 ते 27 अंश सेल्सिअस) आणि आर्द्रता (70 ते 90 टक्के) राखता येईल, असे घर संगोपनासाठी आदर्श असते.
वायुवीजन होऊन हवा खेळती राहील असे घर असावे.
आवश्यक त्या वेळी निर्जंतुकीकरण करता येईल अशी रचना असावी.
घराचे छत साधारणपणे 3 मीटर उंच असावे.
♥मंच पद्धतीने कमी जागेत अधिक फायदेशीररीत्या संगोपन करणे शक्य होते. लाकडापासून किंवा बांबूपासून बनविलेल्या संगोपन मंचामध्ये गाळ्यांमध्ये सोईस्कर आकाराचे ट्रे ठेवले जातात.
हाताळण्यास सुलभ अशा हलक्या लाकडापासून ट्रे केले जातात व त्यामध्ये अळ्यांचे संगोपन केले जाते.
♥अळ्यांची वाढ तुतीच्या पानांवर होते.
सुमारे तीन-चार आठवड्यांत पूर्ण वाढलेली अळी 7 ते 8 सें.मी. लांब असते.
या काळात ती चार वेळा कात टाकते.
कात टाकण्यापूर्वी प्रत्येक वेळेस अळी पाने खाणे थांबविते.
अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती कोषावस्थेत जाण्यासाठी तयारी करते.
अशा वेळी ती खाणे थांबविते.
तिचा रंग बदलून ती किंचित आकुंचन पावते.
डोक्याकडचा भाग उंचावून ती या बाजूकडून त्या बाजूकडे सावकाशपणे हलविते.
या अवस्थेमध्ये अळी कोष करण्यासाठी तयार झाली असे समजावे.
अशा अळ्यांना नीट कोष तयार करता यावेत म्हणून 1.8 मीटर लांब व 1.2 मीटर रुंदीच्या बांबूच्या तट्ट्यावर, बांबूच्या 5 ते 8 सें.मी. रुंदीच्या पट्ट्यापासून बनविलेल्या चक्राकार चंद्रिकेवर सोडण्यात येते.
अळी त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराभोवती रेशमाचे आवरण तयार करते व
या आवरणामध्ये कोष तयार करते.
कोषावरणासाठी वापरला जाणारा रेशमी धागा अखंड असून, त्याची लांबी 800 ते 1200 मीटर असते.
कोषावस्था 10 ते 12 दिवस टिकते.
कोषामधून पतंग बाहेर पडण्यापूर्वीच वाफेच्या साह्याने किंवा इतर तंत्राचा अवलंब करून आतील पतंग मारण्यात येतो.
♥संगोपनगृह आणि उपकरणांचे वरचेवर निर्जंतुकीकरण करावे.
मेलेल्या अळ्या त्वरित जाळाव्यात.
संगोपनाचे काम संपल्यानंतर संगोपनगृहे स्वच्छ धुऊन कोरडी करावीत आणि 2 ते 4 टक्के फॉरमॅलिनचा फवारा द्यावा.
जंतुनाशक फवारणीनंतर सुमारे 15 ते 20 तास संगोपनगृह बंद ठेवावे.
त्यानंतर 24 तास उघडे ठेवावे.
♥रेशीम पतंगाचे रोगमुक्त अंडीपुंज ग्रामोद्योग बोर्डाच्या वाई येथील रेशीम पैदास केंद्रामधून मिळतात. तसेच ते पुणे, अंबोली आणि सुळेरान येथेसुद्धा मिळतात. अंडी उबविण्याची क्रिया प्रामुख्याने सकाळी सुरू होते. अळ्या बाहेर यायला सुरवात झाल्यावर अंडीपुंज असलेल्या कागदावर तुतीचा कोवळा पाला पसरावा. अळ्या आपोआप पाल्यावर येतील. त्यानंतर हा पाला संगोपनगृहामध्ये घ्यावा. बऱ्याचशा अळ्या सकाळी 8 वाजेपर्यंत बाहेर पडतात.
♥रेशीम अळ्यांची भरवणी
अळ्यांच्या योग्य वाढीसाठी त्यांना वेळच्या वेळी भरपूर आहार देणे आवश्यक आहे. साधारणपणे 50 अंडीपुज्यांतून (20,000 अंडी) बाहेर पडलेल्या दुबार जातींच्या अळ्यांच्या पूर्ण वाढीसाठी सुमारे 600 ते 700 किलो पाला लागतो.
यापैकी पहिल्या वेळी अवस्थेत 1 ते 2 किलो, दुसऱ्या अवस्थेत 5 ते 6 किलो, तिसऱ्या अवस्थेत 20 ते 25 किलो, चौथ्या अवस्थेत 80 ते 90 किलो आणि शेवटच्या अवस्थेत 450 ते 475 किलो पाला लागतो.
बहुवार जातींसाठी एकूण 350 ते 400 किलो पाला लागतो.
साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेत दिवसातून तीन वेळा भरवणी करावी.
परंतु नंतरच्या अवस्थेसाठी दिवसातून 4 ते 5 वेळा भरवणी करावी.
लहान अळ्यांसाठी नाजूक, मुलायम, लुसलुशीत आणि तंतूहीन पाने निवडावीत.
मोठ्या अळ्यांसाठी रसरशीत, परंतु जून पाला वापरणे चांगले.
सुरवातीस पाल्याचे लहान तुकडे करावेत, प्रौढ अळ्यांसाठी संपूर्ण पाने वापरावीत.
अळ्या जसजशा वाढत जातात, तसतशी त्यांना जास्त जागेची आवश्यकता असते. साधारण प्रत्येक पुढच्या अवस्थेला पाठीमागच्या अवस्थेच्या दुप्पट किंवा तिप्पट जागा द्यावी.
कात टाकतेवेळी अळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते.
या काळात ट्रेमध्ये आर्द्रता कमी असावी.
कात टाकण्यासाठी सुमारे 15 ते 30 तास लागतात.
सर्व अळ्या कात टाकून बाहेर आल्यानंतरच भरवणी करावी.
कोषावस्थेत जाण्यासाठी तयार झालेल्या अळ्या उचलून चंद्रिकेवर ठेवाव्यात.
कोष तयार करण्यासाठी अळीला सुमारे 72 तास लागतात.
साधारणपणे पाचव्या दिवशी सर्व कोष चंद्रिकेवरून काढावेत.
असे कोष विक्रीसाठी तयार असतात.
Good info
ReplyDelete