मिनी डाळ मिलचा प्रक्रिया उद्योग
मिनी डाळ मिलचा प्रक्रिया उद्योग ♥प्रगतशील शेतकरी♥
♥कडधान्यांपासून डाळ तयार करताना त्यावर प्रक्रिया करून प्रथम टरफले ढिली करावी लागतात. भरडून ती टरफले काढता येतात व नंतर वेगळी करतात.
मोठ्या डाळ मिलमध्ये तयार झालेल्या डाळीशी सहज तुलना करू शकेल असे उत्पादन मिनी डाळ मिल देऊ शकते.
परिवारातील व्यक्ती मिळून या मिनी डाळ मिलचा व्यवसाय चालवू शकतात.
शिवाय यातून उद्योगात लागणाऱ्या भरडण्यापूर्वीच्या प्राथमिक प्रक्रियांसाठी व भरडण्यासाठीच्या मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
♥डाळ उद्योगाची उभारणी क्षमतेच्या दृष्टीने दोन प्रकारांत विभागणी करता येईल,
1) चक्कीवर डाळ तयार करणे
2) मोठ्या डाळ मिलमध्ये डाळ तयार करणे
चक्कीतून 58 टक्केपेक्षा जास्त डाळ मिळत नाही आणि मोठ्या डाळ मिलमध्ये डाळीचा उतारा फक्त 68 ते 70 टक्के एवढाच असतो.
मोठ्या डाळ मिलमध्ये तूर जास्त वेळ रोलरच्या साहाय्याने घासल्यामुळे तिचा चुरा होऊन भुसा होतो.
चक्कीवर डाळ करण्याअगोदर तुरी रात्रभर भिजवून तीन ते चार दिवस वाळवाव्यात. त्यामुळे डाळीचा आकार बशीप्रमाणे होऊन तिच्या कडा कमजोर होतात.
चक्कीच्या जात्याचा मार लागल्याने भरपूर प्रमाणात चुरी होते. परिणामी, डाळीचा उतारा कमी येतो.
चक्कीवरील डाळीचा कमी उतारा, मोठ्या डाळ मिलसाठी लाखो रुपयांचे भांडवल व दिवसाला पाच ते 10 टन क्षमता यामुळे कमी भांडवल लागणारा आणि डाळीचा जास्त उतारा देणारा तिसरा प्रकार उदयास आला आहे.
यातूनच 'मिनी डाळ मिल'ची निर्मिती करण्यात आली.
♥उत्पादनाचा प्रकार व त्याची व्याप्ती -
जेव्हा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची डाळ आणि कमीत कमी चुरी व पावडर मिळेल, तेव्हा भरडण्याची प्रक्रिया उत्तम आहे असे म्हटले जाते. तुरीचे तीन प्रतींत उत्पादन होते.
ग्रेड-1 (फटका)
ग्रेड-2 (सच्चा नंबर)
ग्रेड-3 (साधारण)
डाळीची किंमत बाजारात त्यांच्या उतरत्या क्रमाने मिळते. चुरी आणि भुसा या दुय्यम उत्पादनाची मागणी भरपूर असल्याने या उद्योगात वाया जाण्यासारखे काही उरत नाही. इतर कडधान्ये उदा. सोयाबीन, हरभरा, मसूर, चवळी यांपासूनही डाळ बनविता येईल.
♥मिनी डाळ मिल उद्योगास लागणारी संयंत्रे -
1) प्रतवारी व पॉलिशर - धान्य स्वच्छ करून त्याची वर्गवारी करण्याकरिता सफाई, प्रतवारी व पॉलिशर या यंत्रांचा वापर करावा. या यंत्रात धान्य गोल चाळणीवर जाण्याच्या अगोदर पंख्याद्वारे धान्यातील काडीकचरा साफ होतो. चाळण्यावर धान्य गेल्यानंतर प्रथम ते धान्य प्रतीमध्ये वेगवेगळे होते. सध्या तयार झालेल्या डाळीला विक्री करण्यासाठी पॉलिश करणे गरजेचे आहे. ग्राहकाकडून नेहमी पॉलिश केलेल्या डाळीची मागणी होत असते. सर्व प्रकारच्या डाळींना पॉलिश करण्यासाठी हे संयंत्र उपयुक्त आहे. या यंत्रामध्ये तूर, मूग, उडीद तसेच इतर धान्याची प्रतवारी करता येते. डाळ तयार झाल्यानंतर या यंत्राच्या साहाय्याने तिला पॉलिश करता येते.
2) शुष्कक (ड्रायर) - थोड्या प्रमाणात डाळ बनविण्यासाठी यांत्रिक शुष्ककाचा वापर करावा. अत्यल्प खर्चावर चालणारे हे ड्रायर शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे धान्य वळविण्यासाठी उपयुक्त आहे. डाळ उत्पादनासाठी आवश्यक असलेले प्लॉट (फरशीबंद ओटा) नसल्यास उत्पादक या संयंत्राचा वापर करून डाळीचे उत्पादन घेऊ शकतो. या संयंत्राचा वापर करून पावसाळ्यातही म्हणजेच वर्षभर डाळीचे उत्पादन घेता येते.
♥अ) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला निर्मित मिनी डाळ मिल -
तुरीची टरफले डाळीला घट्ट चिकटलेली असल्याने त्यापासून डाळ तयार करणे मोठे जिकरीचे काम असते.
त्यामुळे भरडण्याआधी तुरीवर प्रक्रिया करावी लागते.
प्रथम ही तूर सहा ते आठ तास भिजवून तीन ते चार दिवस वाळवितात.
याला 'पूर्वप्रक्रिया' असे म्हटले जाते. मोठ्या डाळ मिलमध्ये तेलाचा वापर करून उन्हात वाळवितात.
या प्रक्रियेत तूर चार रोलमधून भरडून त्याची डाळ तयार होते. 'पीकेव्ही मिनी डाळ मिल'मध्ये मात्र तीनच वेळा रोलमधून पाठवाव्या लागतात. त्यामुळे डाळीचा उतारा तीन ते चार टक्क्यांनी, तर ग्रेड-1 डाळीचा उतारा पाच ते सहा टक्के इतका मोठ्या डाळ मिलपेक्षा जास्त मिळू शकतो.
पीकेव्ही डाळ मिल ही तीन अश्वशक्ती विद्युत मोटारीवर चालणारी आहे.
♥डाळ मिल संरचना -
1) उद्वाहक (Elevator)
2) रोलर
3) पंखा
4) चाळणी
या चार भागांनी मिनी डाळ मिल तयार केलेली आहे.
उद्वाहकाच्या मदतीने तुरी रोलच्या वर टाकता येतात.
यामुळे डाळ मिलला सतत कच्चा माल पुरविला जातो.
रोलर हा महत्त्वाचा भाग असून, त्याचा उपयोग दाण्याची टरफले वेगळी करण्यासाठी होतो. त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट एमरी आवरण असल्याने टरफले काढणे सोपे होते.
रोलरच्या भोवती वर्तुळाकार चाळणी बसविलेली आहे.
चाळणी आणि रोलरच्या मधल्या मोकळ्या जागेतून दाणे सुलभपणे बाहेर पडण्याकरिता रोलरचा आकार कापलेल्या शंखासारखा असतो.
दाण्याचा ओघ रोलरमध्ये जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा बसविलेली आहे.
रोलरमधून बाहेर पडलेल्या मिश्रणातून टरफले वेगळे करण्यासाठी पंखा दिलेला आहे. हा पंखा पुढे विघटकाला जोडला जातो.
त्यातून टरफले खाली पडून, हवा वरील पाइपमधून बाहेर निघून जाते.
रोलरच्या चाळणीतून पावडर, छिद्र असलेल्या चाळणीवरून गोटा व तुरी वेगळ्या केल्या जातात.
खालच्या चाळणीवरून डाळ वेगळी होते.
तसेच खाली पडलेली तुरी वेगळी होते. हे तीनही भाग निरनिराळ्या तीन बहिर्द्वारातून बाहेर येतात.
तुरीला व्यवस्थित तेल लावण्याकरिता एक वाहक दिलेला आहे.
शेवटी उरलेल्या गोट्यास पाणी लावून पाच ते सहा तास ढीग करून ठेवावे.
त्यानंतर उन्हात वाळवून त्याची उद्वाहकाच्या साह्याने डाळ करावी.
♥थोडक्यात, तुरीची सर्वप्रथम सफाई व प्रतवारी करून त्यांच्या टरफलावर ओरखडे येतील अशारीतीने रोलमधून काढाव्यात.
नंतर तुरीस खाद्यतेल लावावे. ही व्यवस्थासुद्धा यंत्रातच आहे.
तुरी काही काळ तशाच अवस्थेत ठेवाव्या व नंतर वाळवाव्यात.
असे दोन वेळा करून तिसऱ्या वेळेस गोटा (टरफले काढलेली तूर) मिळेल.
जास्तीत जास्त गोटा मिळण्याची व्यवस्था रोलरमध्ये करावी लागते; म्हणजे उत्तम प्रतीची डाळ जास्त प्रमाणात (40 टक्क्यांपर्यंत) मिळते. उरलेल्या डाळीस तेल व पाणी लावून वाळवून टरफले काढावी लागतात. यात दोन प्रकारची डाळ मिळू शकते; ती एकत्र करता येते. या डाळीचा उतारा 32 ते 35 टक्के असतो.
नंतर या सर्व डाळीला पॉलिश करावे.
हरभरा, सोयाबीन, मसूर, चवळी इ. कडधान्याची डाळ तयार करावयाची असल्यास त्यांचा ओलावा 12 टक्केपर्यंत असेल, असे भिजवून वाळवावे.
यांची एकदाच रोलरमधून काढून डाळ मिळते.
♥पीकेव्ही मिनी डाळ मिलची वैशिष्ट्ये -
1) डाळ मिलची परिमाणे
लांबी 1500 मि.मी.
रुंदी 1600 मि.मी.
उंची 1800 मि.मी.
2) डाळीचा उतारा : तूर - 72 ते 75 टक्के, मूग व उडीद - 82 ते 85 टक्के
3) क्षमता (आठ तास/ दिन) - तूर - 8 ते 10 क्विंटल, मूग व उडीद - 10 ते 12 क्विंटल
4) ऑपरेटिंगचा वेग - 1440 आर.पी.एम.
5) मोटर - 3 एच.पी.
6) शक्ती (पॉवर) - 2.2 कि.वॉ.
7) सुकविण्यासाठी जागा - 20 x 8 चौ.मी.
8) मशिन शेड जागा - 5 x 3 चौ.मी.
9) अंदाजे किंमत - रु. 70,000/-
10) संपूर्ण कार्य धूळ विरहित, तूर, मूग, उडीद, हरभरा डाळ करण्यासाठी उपयुक्त
♥ब) सी.एफ.टी.आर.आय. मिनी डाळ मिल -
केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, म्हैसूर द्वारा निर्मित एक अश्वशक्ती विद्युत मोटर चलित मिनी डाळ मिल संयंत्र हे लघु व्यावसायिक, ग्रामीण भागातील उद्योजकांकरिता व स्वयंसाहाय्यता गटाकरिता अत्यंत उपयुक्त आहे.
या डाळ मिलचे वैशिष्ट्य म्हणजे कडधान्य भरडण्याची म्हणजे टरफले काढण्याची व डाळ तयार करण्याच्या क्रिया एकावेळी पार पाडल्या जातात. तसेच तयार केलेली डाळ, भरडले न गेलेले दाणे, तुरी आणि टरफले वेगळी करण्याची स्वयंचलित यंत्रणा यात उपलब्ध आहे.
♥सी.एफ.टी.आर.आय. मिनी डाळ मिलची वैशिष्ट्ये -
1) कडधान्य क्षमता (कि./तास) :
हरभरा 125-150
सोयाबीन 125-150
तूर 100-140
मसूर 100-125
उडीद 60-80
मूग/ मटकी 60-80
2) डाळीचा उतारा - 78-80 टक्के
3) तुरीचे प्रमाण - एक ते तीन टक्के
4) संपूर्ण कार्य धूळ विरहित
5) अंदाजे किंमत - रु. 65,000
♥क) सी.आय.ए.ई. डाळ मिल -
केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ द्वारा निर्मित डाळ मिल संयंत्र हे दोन अश्वशक्ती, थ्री फेज विद्युत मोटार चलित आहे. तूर, मूग, उडीद, मसूर या कडधान्यांची टरफले काढून डाळ तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. भरड्यापूर्वी कडधान्य पूर्वप्रक्रियेसाठी भिजवून उन्हात वाळवितात. यानंतर पूर्णपणे भरडून डाळ तयार करण्यासाठी दोन वेळा रोलमधून पाठवतात. ही डाळ मिल खालील भागांनी बनलेली केलेली आहे,
1) कार्बोरॅन्डम रोलर
2) कडधान्यासाठी अंतर्द्वार
3) कॉन्केव्ह
4) डाळीसाठी बहिर्द्वार
♥सी.आय.ए.ई. डाळ मिल वैशिष्ट्ये -
1) डाळ मिलची परिमाणे -
लांबी 770 मि.मी.
रुंदी 630 मि.मी.
उंची 1020 मि.मी.
2) वजन - 90 कि.ग्रॅ.
3) उतारा - 88 टक्के
4) तुरीचे प्रमाण - तीन ते पाच टक्के
5) क्षमता - 100 कि./तास
6) ऑपरेटिंगचा वेग - 900 आर.पी.एम.
7) मजुरांची गरज - एक मजूर तास/क्विंटल
8) खर्च - रु. 17 क्विंटल
9) अंदाजे किंमत - रु. 30,000
मला ऑटोमॅटिक डाळ मिल हवी आहे त्या बरोबर फॉलीश आणि ड्रायर पॅकिंग मशीन चांगल्या प्रतीचा
ReplyDelete