ठिबक सिंचन संच सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी Precautions before starting drip irrigation
ठिबक सिंचन संच सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी 💧💧🌾
💧💧 संच बसवल्यानंतर प्रथम मुख्य व उपमुख्य लाइनचे फ्लश व्हॉल्व्ह उघडे करून जोडणीच्या वेळी पाइपलाइनमध्ये राहिलेला कचरा व माती काढून टाकावी. हा कचरा ड्रीपरमध्ये अडकू शकतो.
स्वच्छ पाणी आल्यानंतर सर्व फ्लश व्हॉल्व्ह बंद करावेत.
💧फिल्टरचा बॅक फ्लश व्हॉल्व्ह बंद असल्याची खात्री करून घ्यावी.
💧बायपास आणि मुख्य कंट्रोल व्हॉल्व्ह उघडून पंप चालू करा. बायपास व्हॉल्व्ह हळूहळू बंद करत पूर्ण ठिबक संचामध्ये आवश्यक पुरेसा दाब निर्माण होईल, तिथे तो स्थिर ठेवावा.
💧 गाळण यंत्रातील दाबाचा फरक तपासून पाहावा.
💧ठिबक संचाच्या शेवटच्या टोकास आवश्यक दाब आहे, याची खात्री करून घ्यावी.
💧लॅटरल (ठिबक नळी)चे फ्लशिंग करताना नळीच्या टोकावर असणारी कॅप काढून नळीतील पाण्याचा प्रवाह मोकळा करावा.
स्वच्छ पाणी झाल्यानंतर ती लॅटरल कॅप बसवून ठेवावी. एकानंतर एक किंवा एकाच वेळी दोन-चार लॅटरल (नळ्या) फ्लश करावीत; परंतु अशा वेळी सिंचन प्रणालीतील दाब 20-30 टक्के वाढवावा.
सिंचन प्रणालीतील दाब तपासणी -
ठिबक सिंचन संच चालू असताना निरनिराळ्या ठिकाणी असणारा दाब हा दाबमापकाने तपासून पाहणे गरजेचे आहे.
संचामधील दाबामध्ये फेरबदल झाल्यास झाडाला पाणी मिळण्याच्या प्रमाणात बदल होतो.
साधारणतः लॅटरलच्या शेवटी, मधे व सुरवातीस, याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी दाब तपासावा.
💧गाळण यंत्रणा -
आपल्याकडील पाण्याच्या प्रतिनुसार, योग्य ठरेल अशी गाळण यंत्रणा बसवावी.
खालील प्रकारच्या गाळण यंत्रणा उपलब्ध आहेत.
गाळणयंत्राचा प्रकार - उपयोग
-💧 स्क्रिन फिल्टर - पाण्यातील तरंगणारा काडीकचरा वेगळा करण्यासाठी. उघड्यावरील पाणवठ्यासाठी.
-💧 हायड्रोसायक्लोन फिल्टर - सिंचनाच्या पाण्यातून वाळूचे कण वेगळे करण्यासाठी.
-💧 सन्ड फिल्टर - शेवाळासारखे अशुद्ध द्रव्ये व सेंद्रिय अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी.
💧- डिस्क फिल्टर - सिंचनाच्या पाण्यातून अतिसूक्ष्म घन कण काढून टाकण्यासाठी.
💧स्क्रिन फिल्टरची सफाई -
ठिबक सिंचन पाण्याच्या दुय्यम गाळणीसाठी स्क्रिन फिल्टर वापरतात. सामान्यतः 120 मेश (0.13 मिमी) आकाराचे छिद्रांची जाळी वापरलेली असते.
1) प्रथमतः संच बंद करून स्क्रिन फिल्टर दाबविरहित करावे.
2) फिल्टरचे बाहेरील आवरण खोलून फिल्टरची जाळी वेगळी करावी.
3) फिल्टरची जाळी स्वच्छ पाण्याने साफ करावी.
4) रबर सील जाळीपासून काढून आवश्यकता असल्यास नवीन बसवावे. सील व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी.
5) सर्व यंत्रणा पूर्वीप्रमाणे फिट करून बसवावी.
6) फिल्टरच्या तळाशी असलेल्या व्हॉल्व्हचा उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी.
💧हायड्रोसायक्लोन फिल्टरची सफाई -
फिल्टर नरसाळ्याच्या आकाराचे असून, त्याचा निमुळता भाग तळाशी एका आडव्या टाकीला जोडलेला असतो. टाकीमध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते. टाकीला असलेला व्हॉल्व्ह उघडून टाकीमध्ये जमा झालेली वाळू काढून या फिल्टरची सफाई करावी.
💧सन्ड फिल्टरचे फ्लशिंग -
धरणे, नद्या, खुले कालवे यांतील पाण्याच्या साठ्यांमधून थेट घेतलेल्या पाण्याच्या प्राथमिक गाळणीसाठी सन्ड फिल्टर वापरतात. त्यामुळे मुख्यतः सेंद्रिय पदार्थ, कचरा इ. काढून टाकता येतो.
1) सिंचनप्रणाली चालू असताना बायपास व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करावा.
2) बॅक फ्लशिंग व्हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.
3) मुख्य कंट्रोल व्हॉल्व्ह बंद करावा.
4) आऊटलेट व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद करावा.
5) बायपास व्हॉल्व्ह अंशतः बंद करावा.
6) सामान्य दाबापेक्षा फ्लशिंग करते वेळेचा दाब सुमारे 30 टक्के अधिक होईपर्यंत बायपास व्हॉल्व्ह बंद करावा.
7) बॅक फ्लश व्हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.
💧डिस्क फिल्टरची सफाई -
1) फिल्टर उघडून त्यामधील सर्व चकत्या मोकळ्या करून वेगळ्या करा.
2) सर्व वेगळ्या चकत्या एका दोरीने एकत्र बांधून पाण्याखाली स्वच्छ करून घ्याव्यात.
3) मोठ्या आकाराच्या बादलीत तयार केलेल्या दहा टक्के तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक आम्लाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणामध्ये या चकत्या सुमारे अर्धा तास ते तीन तास बुडवून साफ करून घ्याव्यात. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात.
4) सर्व चकत्या पूर्वी होत्या त्याच स्थितीमध्ये ठेवून फिल्टरची जोडणी करावी.
💧आम्ल प्रक्रिया -
लॅटरल व ड्रीपरमध्ये साचलेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया केली जाते.
आम्ल प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त ऍसिड -
1) सल्फ्युरीक ऍसिड (65 टक्के)
2) हायड्रोक्लोरीक ऍसिड (33 टक्के)
3) नायट्रीक ऍसिड (60 टक्के)
4) फॉस्फेरीक ऍसिड (85 टक्के) (पाण्यात लोहाचे प्रमाण 0.5 पीपीएमपेक्षा जास्त असल्यास वापरू नये.)
💧आम्ल द्रावण तयार करण्याची पद्धत -
1) एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन, त्यात ऍसिड मिळवत जावे.
2) आम्ल मिसळताना मध्येमध्ये पाण्याचा सामू पीएच पेपर किंवा कलर चार्टने मोजावा.
3) पाण्याचा सामू 3 होईपर्यंत पाण्यात ऍसिड मिसळत जावे.
4) संचामधून पाणी वाहण्याचा दर लक्षात घेऊन 15 मिनिटांत त्या संचामधून किती पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्याचा हिशेब करून त्यासाठी लागणारे ऍसिड काढावे. त्यासाठीचे सूत्र खालील प्रमाणे.
एकूण 15 मिनिटांत संचामधून सोडायचे आम्ल (लिटर) = 15 मिनिटांत संचातून होणारा पाण्याचा विसर्ग (लिटर) x 1 लि. पाण्याचा सामू 3 होण्यासाठी लागणारे आम्ल (लिटर)
💧आम्ल प्रक्रिया करण्याची पद्धत -
1) आम्ल प्रक्रिया करण्यापूर्वी, अंशतः किंवा पूर्ण बंद पडलेले ड्रीपर्स खूण करून ठेवणे. तसेच फिल्टर, मेन आणि सबमेन लाइन फ्लश करून घ्यावे.
2) सिंचन संच सामान्य दाबाने चालू ठेवावा.
3) वरील सूत्राप्रमाणे मिळवलेले आम्लाचे द्रावण तयार करून घ्यावे.
4) पाण्याचा संचामधून किती प्रवाह चालू आहे, ते तपासून पाहा. त्याप्रमाणे प्रवाह निश्चित करा.
5) आम्लाचे द्रावण प्रणालीमध्ये सोडायला सुरू करा.
या वेळी आम्लाच्या द्रावणाचा दर पूर्ण प्रवाहाचा सामू हा 3 राहील अशा प्रकारे निश्चित करावा.
6) आम्ल द्रावण साधारणतः 15 मिनिटे संचातून सोडणे चालू ठेवावे.
7) आम्ल द्रावण संपल्यावर फर्टिलायझर पंप किंवा व्हेंच्युरी बंद करावी.
8) ठिबक संच 24 तास बंद ठेवावा.
9) निर्धारित वेळेनंतर संपूर्ण ठिबक सिंचन प्रणाली 15 ते 20 मिनिटे चालवून फ्लश करून घ्यावी.
10) आधी खूण केलेल्या ड्रीपर्समधून पाणी पूर्ण क्षमतेने ठिबकत आहे का, ते तपासून घ्यावे. जर पूर्ण क्षमतेचे पाणी बाहेर पडत नसेल तर वर सुचविलेली प्रक्रिया पुन्हा करावी.
💧क्लोरिन प्रक्रिया -
ठिबक संचामध्ये शेवाळ वाढू नये म्हणून क्लोरिन प्रक्रिया करावी लागते.
साहित्य -
1) ब्लिचिंग पावडर मुक्त क्लोरिन (89 टक्के)
2) सोडियम हायपोक्लोराईड (15 टक्के)
पद्धत -
1) संपूर्ण ठिबक संच स्वच्छ फ्लश करून घ्यावा.
2) आम्ल प्रक्रियेची गरज असल्यास ती क्लोरिन प्रक्रियापूर्वीच करावी.
3) ठिबक संचाच्या विसर्ग दराप्रमाणे पूर्ण संचातून 30 ते 50 पीपीएम क्लोरिन जाईल एवढे क्लोरिन द्रावण संचात सोडावे.
4) संच 24 तास बंद ठेवावा.
5) नंतर संपूर्ण ठिबक संच फ्लश करून घ्यावा.
Comments
Post a Comment