शेतमजूर ते सीईओ चा प्रवास (स्रीच्या आर्थिक स्वातंत्रतेची सफल कहाणी) LABOUR TO CEO
शेतमजूर ते सीईओ चा प्रवास (स्रीच्या आर्थिक स्वातंत्रतेची सफल कहाणी)
♥तेलंगणातली एक शेतमजूर. शिक्षण जेमतेम दहावी, आज अमेरिकेत सीईओ म्हणून काम पाहतेय हि काही साधी गोष्ट नाही .
♥‘इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीवर अनिला ज्योती रेड्डीचा प्रचंड विश्वास. तेलंगणामधल्या एका छोटय़ाशा खेडय़ात एका गरीब कुटुंबात जन्मलेली ज्योती चार भावंडांमध्ये दुसरी. ज्योतीला घरापेक्षा अनाथालयातच दिवस काढावे लागले. केवळ दोन वेळचं जेवणं मिळणंही मुश्कील झाल्यावर ज्योतीच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आणखी एका बहिणीला अनाथालयात टाकून दिलं. तेव्हा ज्योती पाचवीत शिकत होती. ज्योतीला शिकून मोठं व्हायचं होतं. चांगले पैसे कमवायचे होते. श्रीमंत व्हायचं होतं. एखाद्यावर प्रेम करून लग्न करायचं होतं. तिच्या नावाची पाटी असलेलं स्वत:चं घर करायचं होतं. पण नशीब आडवं आलं.
♥वडिलांनी दहावी झाल्यानंतर सोळा वर्षाची असतानाच एका शेतक:याशी लग्न लावून दिलं. ज्योतीचं लग्न झालं ते तिच्यापेक्षा दहा वर्षानी मोठय़ा माणसाशी.
दिवसभर शेतात फक्त पाच रुपयांवर तिला शेतमजुरी करावी लागायची. घरी आल्यावर चूल फुंकून स्वयंपाक रांधावा लागायचा. वयाची अठरा वर्षे होत नाही तोच ज्योतीच्या पदरात दोन मुलींची जबाबदारी आली. शेतमजुरीच्या तुटपुंज्या कमाईत मुलींना धड खायला प्यायला नाही की औषधपाणी नाही.
♥पण याही परिस्थितीत ती ‘मोठं’ होण्याचं स्वप्न मनाशी बाळगूनच होती. आहे त्या शिक्षणाच्या बळावर तिनं काम करायला सुरुवात केली. मुलांच्या रात्रशाळेत तिला शिकवायची संधी मिळाली. दरम्यान, तिनं तेलंगणातल्या मुक्त विद्यापीठातून बीएडची डिग्री मिळवली. तिला तालुक्याला बायकांना व्यावसायिक शिक्षण देण्याचं काम मिळालं. 12 रुपये पगार मिळू लागला. ज्योतीच्या थोडय़ा तरी गरजा भागू लागल्या.
♥एकदा तिला तिची अमेरिकेतली चुलत बहीण भेटली. तिच्याकडे बघून ज्योतीच्या मनात एक नवीन स्वप्न उमललं. तिलाही तिच्याप्रमाणो अमेरिकेत जाऊन नोकरी करायची होती, तिथे स्थायिक व्हायचं होतं.
♥मग तिनं हैदराबादमधे जाऊन कम्प्युटर डिप्लोमाला अॅडमिशन घेतली. ज्योती जे काही करत होती त्याला नवर्याचा पूर्ण विरोध होता. पण ज्योतीनं तो जुमानला नाही. तिनं नोकरीसोबत शिकणं चालू ठेवलं. पासपोर्टसाठी पैसे बाजूला ठेवू लागली. पासपोर्ट तर मिळाला पण अमेरिकेच्या व्हिसासाठी बरीच खटपट करावी लागली. तीही तिनं केली. व्हिसा मिळवला. नवरा तिला पाठवायला तयार नव्हता. पण आपण जे काही करतोय ते आपल्या मुलींच्या भविष्यासाठीच याची ज्योतीला जाण होती. ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली.
मुलींना सोडून ती अमेरिकेला गेलीच. नातेवाईक आपल्याला आधार देतील असा विश्वास वाटणा:या ज्योतीकडे तिच्या नातेवाइकांनी पाठ फिरवली.
♥न्यू जर्सीमध्ये एका गुजराती कुटुंबाकडे पेइंग गेस्ट म्हणून ती राहू लागली. तिथे राहून एका व्हिडीओ शॉपमध्ये सेल्समन म्हणून, तर उरलेल्या वेळेत एका डे केअर सेंटरमध्ये काम करू लागली. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून ती ज्या ठिकाणी राहत होती तिथल्या एका गृहस्थानं तिला अमेरिकेतल्या एका कंपनीत काम मिळवून दिलं. पण काही महिन्यांनंतर तिच्याकडे एच वन व्हिसा नसल्या कारणानं कंपनीनं ज्योतीला राजीनामा देण्यास भाग पाडलं.
♥पुढे नोकरीसाठी म्हणून तिचा प्रवास अमेरिकेतून रशियामध्ये सुरू झाला. मास्कोमधल्या एका कंपनीकडून ज्योतीला चांगली ऑफर मिळाली.
♥दरम्यानच्या काळात ज्योती हैदराबादला येऊन मुलींना आणि नव-याला सोबत घेऊन मास्कोला गेली.
ज्योतीला आता स्वत:चा व्यवसाय उभा करायचा होता. तिनं अमेरिकेत स्वत:ची ‘की सॉफ्टवेअर सोल्यूशन’ नावाची एक आयटी कंपनी सुरू केली. ती घोडदौड करत आज ती दीड कोटी मालमत्तेच्या कंपनीची सीईओ म्हणून काम बघते आहे. आता ज्योतीकडे एच वन व्हिसा आहे, अमेरिकेत एक घर आहे. तिचं गाडी चालवण्याचं स्वप्न होतं तेही तिनं पूर्ण केलं आहे. आपल्या मुलींना तिला खूप शिकवायचं होतं तिचं तेही स्वप्नं पूर्ण झालं आहे. आज तिच्या दोन्ही मुली सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.
ज्योती सांगते की, ‘1995 च्या काळात शेतात मजुरी करताना 2015 मध्ये आपण अमेरिकेत एका कंपनीच्या सीईओ असू असं कोणाला सांगितलं असतं तरी ऐकणारा पोट धरून हसला असता. पण माझा स्वत:च्या क्षमतांवर आणि स्वप्नांवर विश्वास होता. मी जर निर्णयासाठी माङया वडिलांवर किंवा माङया नव:यावर अवलंबून राहिले असते तर कधीच पुढे गेले नसते. मला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं होतं. कारण मला माहीत होतं की बाईला जर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं तर ती तिच्या आयुष्यात काहीही करू शकते. आणि आज मी ते सिद्ध करून दाखवलं !’
♥शेतमजूर ते सीईओ हा ज्योती रेड्डीचा प्रवास केवळ नशिबानं झाला नाही, तर नशिबाशी लढून झाला. कारण ज्योतीच्या मते नशीब हा यशापयशातला एक छोटासा भाग असतो. शेवटी भिस्त स्वत:वर आणि स्वत:च्या कर्तृत्वावर ठेवावी लागते
ज्योती रेड्डीच्या या प्रवासाला आणि संघर्षाला “आधुनिक शेतीची कार्यपद्धति आणि यशोगथा” चा सलाम.
(संकलीत)
Comments
Post a Comment