कोथिंबिर, चुका, चाकवत, शेपू लागवड Coriander cultivation practice

♥कोथिंबिर, चुका, चाकवत, शेपू लागवड

♥कोथिंबिर लागवड

♥कोथिंबीर ही रोजच्‍या आहारात वापरली जाणारी महत्त्‍वाची पालेभाजी आहे. भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांमध्‍ये कोथिंबिरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबिरीच्‍या वड्या, चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे.
♥ हवामान आणि जमीन-
कोथिंबिरीची लागवड कोणत्‍याही प्रकारच्‍या हवामानात करता येते त्‍यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्‍टड्ढातील हवामानात वर्षभर कोथिंबिरीची लागवड करता येते. कोथिंबिरीच्‍या पिकासाठी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात असल्‍यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत कोथिंबिरीचे पीक चांगले येते.
♥ जाती -
को-१, डी-९२ डी-९४, जे २१४, के ४५, करण इत्यादी जातींची लागवड करावी.
♥लागवडीचा हंगाम-
कोथिंबिरीची खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात. उन्‍हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्‍यात कोथिंबिरीचे उत्‍पादन घ्‍यावे.
♥ लागवड पध्‍दती -
कोथिंबिरीच्‍या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरून चांगले भुसभुशीत करून ३ बाय २ मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्‍यावे. प्रत्‍येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्‍यावे. वाफे सपाट करून बी सारखे पडेल या बेताने फेकून पेरावे. बी, खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. तणांचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात होत असल्‍यास सपाट वाफ्यांमध्‍ये १५ ते २० सेंमी अंतरावर खुरप्‍याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्‍यावे. उन्‍हाळी हंगामात पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्‍यावे आणि वाफसा आल्‍यावर बियाणे पेरावे. कोथिंबिरीच्‍या लागवडीसाठी ऐकरी १० ते १२ किलो बी लागते. पेरणीपूर्वी बियाण्‍ाांवर चांगली उगवण होण्‍यासाठी प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्‍यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी धन्‍याचे बी १२ तास पाण्‍यात ऊबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. त्‍यामुळे उगवण १५ ते २० दिवसा ऐवजी ८ ते १० दिवसांत होऊन कोथिंबिरीच्‍या उत्‍पादनात वाढ होते आणि काढणी लवकर होण्‍यास मदत होते.
♥ खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन -
कोथिंबिरीच्‍या पिकाच्‍या चांगल्‍या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्‍टरी ३५ ते ४० गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. कोथिंबिरीच्‍या पिकाला पेरणीच्‍या वेळी ५० किलो १५-५-५ हे मिश्रखत द्यावे. बी उगवून आल्‍यावर २०-२५ दिवसांनी हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीचा खोडवा घ्‍यावयाचा असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे. कोथिंबिरीला नियमित पाणी देणे आवश्‍यक आहे.
♥ पीक संरक्षण -
कोथिंबिरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाहीत. काही वेळा मर व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. शिफारशीनुसार फवारण्या करून त्यांचे नियंञण करावे.
♥ काढणी आणि उत्‍पादन -
पेरणीपासून दोन महिन्‍यांनी कोथिंबिरीला
फुले येण्‍यास सुरुवात होते. म्‍हणून त्‍यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबिरीची काढणी करावी. साधारणपणे १५ ते २० सेंमी उंच वाढलेली परंतु फुले सृयेण्‍यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी. नंतर कोथिंबिरीच्‍या जुड्या बांधून गोणपाटात किंवा बांबूच्‍या टोपल्‍यांमध्‍ये व्‍यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्या.
****************************************************

♥ चुका, चाकवत, शेपू लागवड
या पालेभाज्यांच्या स्थानिक जातींचा लागवडीसाठी वापर केला जातो.

♥ लागवड पद्धत -
या भाजीपाला पिकांची लागवड सपाट वाफ्यात लागवड करतात. ३ बाय २ मीटर आकाराचे वाफे तयार करून प्रत्येक वाफ्यात २० सें.मी. अंतरावर ओळीत बी पेरावे. प्रत्येक वाफ्यात चुक्‍याचे २५ ते ३० ग्रॅम, चाकवताचे ४५ ग्रॅम आणि शेपूचे ३० ग्रॅम बी पेरावे.
♥ चुका -
पेरणीनंतर सुमारे ५० ते ६० दिवसांनी कापणीसाठी तयार होतो. या वेळी जमिनीलगत कापणी करावी. या पालेभाजीचे ४ ते ५ तोडे मिळू शकतात. जुड्या बांधून भाजी विक्रीसाठी पाठवावी.
♥चाकवत -
बी पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांत भाजी काढणीसाठी तयार होते. भाजी कापून किंवा उपटून जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवाव्यात.
♥ शेपू -
पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी काढणीस तयार होते. पालेभाज्यांची काढणी शक्‍यतो सायंकाळच्या वेळी करावी. काढणीच्या २ ते ३ दिवस अगोदर पाणी द्यावे. काढणीनंतर जुड्या विक्रीसाठी लवकर पाठवाव्यात, त्यामुळे भाजीतील ताजेपणा टिकून राहतो.
खत व्यवस्थापन -
या सर्व पालेभाज्यांकरिता लागवडीपूर्वी एकरी ४ ते ५ टन शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार १५ किलो नत्र, १५ किलो स्फुरद आणि १५ किलो पालाश प्रति एकरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने १५ किलो नत्र प्रति एकरी द्यावे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!