झेंडू लागवड

झेंडू लागवड व्यवस्थापन

झेंडूचे डूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत आणि निरनिराळ्या प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे घेता येते. दसरा - दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. झेंडूचे झाड १५ सेंटिमीटर ते १ मीटर उंचीपर्यंत वाढते. झेंडूचे खोड गोल, ठिसूळ असून त्यावर तंतुमय मुळे असतात. खोडावर अनेक फांद्या व उपफांद्या फुटतात. फांद्यांच्या टोकाला फुले लागतात. झेंडूची फुले अनेक प्रकारची असून त्यांना विविध रंग व आकार असतात. काढणीनंतरही ही फुले चांगली टिकतात.

महत्त्व : कमी दिवसात, कमी खर्चात, कमी त्रासात पण खात्रीने फुले देणारे पीक म्हणून झेंडूचा उल्लेख केला जातो. कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही हे पीक तग धरून वाढते. झेंडूच्या फुलांत अनेक प्रकार असून रंगांत आणि आकारातही विविधता आहे. झाडावर तसेच झाडावरून तोडल्यानंतरही झेंडूची फुले चांगली टिकतात. या फुलांना थोडा उग्र स्वरूपाचा वास असतो. झेंडूच्या फुलांना नेहमीच मागणी असते. विशेषत: दसरा - दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. उन्हाळ्यात लग्नसराईत इतर फुले दुर्मिळ असताना झेंडूच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुणे बाजारपेठेचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे की, तेथे वर्षातून सर्वांत जास्त उलाढाल झेंडूची होते व त्यापासून दीड कोटी रुपयांच्या व्यवहार होतो.

झेंडूच्या पिकाचा दुसरा फायदा म्हणजे झेंडूच्या पिकामुळे जमिनीतील सूत्रकृमींचा (निमॅटोड) त्रास कमी होतो. विशेषत: भाजीपाला व फळझाडांत झेंडू हे आंतरपीक घेतल्यास निमॅटोडचा उपद्रव फार कमी होतो. फळझाडांच्या बागेतही सुरूवातीच्या काळात झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करता येते. म्हणजेच झेंडूची लागवड तीन प्रकारे करता येते. एक म्हणजे झेंडूची स्वतंत्र लागवड, दुसरी म्हणजे भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक म्हणून झेंडूची लागवड आणि तिसरा प्रकार म्हणजे फळबागांत आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड. आपल्याकडील हवामानात झेंडूच्या पिकाला वर्षभर फुले येऊ शकतात म्हणूनच वर्षभरात केव्हाही झेंडूची लागवड करता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन, आकर्षक फुलांच्या सुधारित जातींमुळे झेंडूच्या पिकाची लागवड फायदेशीर होऊ लागली आहे.भरपूर मागणी, चांगला भाव, कमी खर्च आणि खर्चाच्या तुलनेत भरपूर उत्पदान यामुळे झेंडू पिकाच्या लागवडीस आपल्या भागात भरपूर वाव आहे.

क्षेत्र आणि उत्पादन : झेंडूची लागवड पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर, अकोला इत्यादी जिल्ह्यांतून कमी - जास्त प्रमाणात केली जाते. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली, पुरंदर, दौंड इत्यादी तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यात नगर व पारनेर तालुक्यात आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा झेंडूची लागवड केली जाते. महाराष्ट्रात झेंडू लागवडीखाली सुमारे २०० हेक्टर क्षेत्र आहे.

हवामान आणि जमीन : महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक वर्षभर घेता येते. हे पीक उष्ण - कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले वाढते. जोराचा पाऊस, कडक ऊन आणि कडक थंडी या पिकाला मानवत नाही. अती थंडीमुळे झाडाचे आणि फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अति तपमानामुळे झाडाची वाढ खुंटते. फुलांच्या उत्पादन प्रक्रियेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. फुलांचा आकार अतिशय लहान होतो. अलीकडच्या काळात झेंडूच्या काही संकरित बुटक्या जाती विकसित करण्यात आल्या असून त्या थंड हवामानात उत्तम वाढतात.

झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढू शकते. हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकास मानवते. भारी आणि सकस जमिनीत झेंडूची झाडे खूप वाढतात. परंतु फुलांचे उत्पादन फारच कमी मिळते. तसेच फुलांचा हंगामही उशीरा मिळतो. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि ७ ते ७.५ पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा असते तेथे गाजर, गवत या ताणाचा फैलाव दिसतो. अशा ठिकाणी कमी श्रमात व कमी खर्चात झेंडूचे पीक घेता येईल व त्यामुळे तणांचा उपद्रवही कमी होईल.

जाती : झेंडूमध्ये अनेक प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत. झेंडूच्या झाडाची उंची, झाडाची वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरून झेंडूच्या जातीचे आफ्रिकन प्रकार आणि फ्रेंच प्रकार असे दोन प्रकार पडतात.

अ) आफ्रिकन झेंडू : या प्रकारातील झेंडूची झाडे १०० ते १५० सेंटीमीटर उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारात पांढरी फुले असलेली जातही विकसित करण्यात आली आहे. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हारासाठी वापरली जातात. या प्रकारातील प्रमुख जाती पुढीलप्रमाणे आहेत.

१) क्रेकर जॅक २) आफ्रिकन टॉंल डबल मिक्सड ३) यलो सुप्रीम ४) गियाना गोल्ड ५) स्पॅन गोल्ड ६) हवाई ७) अलास्का ८) आफ्रिकन डबल ऑरेंज ९) सन जाएंट

आ) फ्रेंच झेंडू : या प्रकारातील झाडे बुटकी ३० ते ४० सेंटीमीटर उंचीची आणि झुडूपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते. या प्रकारातील प्रमुख जाती पुढीलप्रमाणे आहे.

१) स्पे २) बटरबॉल ३) फ्लेश ४) लेमन ड्रोप्स ५) फ्रेंच डबल मिक्स्ड या प्रकारातील जातींची रोपे प्रामुख्याने उद्यानातील फुलांच्या ताटव्यांमध्ये लावतात.

इ) फ्रेंच हायब्रिड : या प्रकारातील झाडे मध्यम उंचीची परंतु भरपूर फुले देणारी असतात. थंडीचा काळ वगळता इतर हंगामात याप्रकारातील झेंडू चांगला फुलतो. या प्रकारातील काही महत्त्वाच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत.

१) पेटीट २) जिप्सी ३) हार्मनी हायब्रिड ४) रेड हेड ५) कलर मॅजीक ६) क्वीन सोफी ७) हार बेस्टमून

ई) झेंडूच्या प्रचलित जाती :

१) मखमली : ही जात बुटकी असून फुले लहान आकाराची असतात. या जातीची फुले दुरंगी असतात. ही जात कुंडीत लावण्यासाठी अथवा बागेच्या कडेने लावण्यासाठी चांगली आहे.

२) गेंदा : या जातीमध्ये पिवळा गेंदा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार आहेत. या जातीची झाडे मध्यम उंच वाढतात. फुलांचा आकार मध्यम असून हारासाठी या जातीच्या फुलांना चांगली मागणी असते.

३) गेंदा डबल : यामध्येही पिवळा आणि भगवा असे दोन प्रकार आहेत. या जातीची फुले आकाराने मोठी आणि संख्येने कमी असतात. कटफ्लॉवर म्हणून या जातीला चांगला वाव आहे.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : झेंडूची लागवड बी पेरून रोप तयार करून केली जाते बियांपासून रोपे तयार करण्यासाठी २ x १ चौरस मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. या वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून घेऊन २.५ सेंटीमीटर अंतरावर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया (३० मिली जर्मिनेटरचे १ लिटर पाण्यातून) करून बी पेरावे व ते मातीत झाकावे. बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती व राक यांचे मिश्रण टाकावे व हाताने सारखे करून नंतर झारीने पाणी द्यावे. बी उगवेपर्यंत सकाळ - संध्याकाळ झारीने पाणी द्यावे व नंतर वाफ्यातून पाटाने पाणी द्यावे.

बी तयार करण्यासाठी चांगली उमललेली, एकाच रंगाची, सारख्या आकाराची व एकाच जातीची फुले आणावीत व ती सुकवून घ्यावीत. फुले सुकल्यानंतर हाताने कुस्करून बी मोकळे करावे. खालच्या बाजूला काळे असणारे बी चांगले उगवते. बी तयार करणे शक्य नसल्यास खात्रीच्या ठिकाणा हून बी अथवा रोपे आणावीत. झेंडूमध्ये पर - परागीकरण होत असल्यामुळे बी राखणे आणि निवडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या शेतातच बी धरणे योग्य ठरते. त्यासाठी झेंडूचे पीक फुलांवर असताना निवडक झाडांवर न उमललेल्या फुलांस कापडी पिशवी बांधावी. ही सुरक्षित फुले झाडावर पुर्ण तयार होऊन उमलल्यावर तोडून त्यांचा हार करून सुरक्षित ठिकाणी वाळवावा. नंतर फुले कुस्करून बी मोकळे करून ते कापडी पिशवीत बांधून ठेवावे. असे बी पुढील हंगामात रोपे तयार करण्यासाठी वापरावे. झेंडूचे बी लांबट व वजनाने हलके असते. एक ग्रॅम वजनात झेंडूच्या सुमारे ३०० ते ३५० बिया असतात. एक हेक्टर लागवडीसाठी ७५० ते १२५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी निवडलेले बियाणे शक्यतो मागील हंगामातील असावे. फार जुने म्हणजे २ हंगामापुर्वीचे बियाणे चांगले उगवण नाही. जुने बियाणे वापरावयाची वेळ आलीच तर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया अवश्य करावी. त्यामुळे उगवण चांगली होईल.

रोपांना ५ - ६ पाने आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर ३ - ४ आठवड्यांनी रोपांची शेतात पुन्हा लागवड करावी. झेंडू फुलांचा हंगाम निवडताना फुलांना मागणी असलेल्या काळात फुले निघतील. या हिशेबाने लागवड करावी.

झेंडू लागवडीसाठी पुढीलपैकी पद्धत वापरावी:

१) नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून पट्टा पद्धत

२) भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणून

३) कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर

४) झेंडूची स्वतंत्र लागवड

झेंडूची स्वत्रंत्र लागवड करताना जमीन हलकी नांगरून घ्यावी. नंतर दर हेक्टरी २० ते २५ गाड्या शेणखत आणि २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत जमिनीत मिसळून सपाट वाफे अथवा सारी वाफे तयार करून या वाफ्यांमध्ये रोपांची लागवड करावी.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : लागवडीपुर्वी जमिनीचा मशागत करून वरीलप्रमाणे खते आणि २५ किलो १०% लिंडेन अथवा कार्बारिल मातीत मिसळून सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात पुढीलप्रमाणे अंतर राखावे.

हंगामानुसार झेंडू लागवडीचे अंतर  हंगाम  प्रकार  लागवडीचे अंतर  पावसाळी  उंच   मध्यम उंच६० x ६० सेंटिमीटर
६० x ४५ सेंटिमीटरहिवाळी  उंच 
मध्यम उंच
बुटका६० x ४५ सेंटिमीटर
४५ x ३० सेंटिमीटर
३० x ३० सेंटिमीटरउन्हाळी  उंच 
मध्यम उंच४५ x ४५ सेंटिमीटर 
४५ x ३० सेंटिमीटर

लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक असे एकच रोप लावावे. रोपे लावताना १० लि. पाण्यामध्ये १०० मिली. जर्मिनेटर घेऊन या द्रावणात रोपे बुडवूनच लागवड करावी.

Comments

  1. अतिशय चांगली माहिती आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!