॥ श्रीब्रह्मचैतन्य स्तोत्र ॥ Shri Brahma Chaitanya Strotra ...
॥ श्रीब्रह्मचैतन्य स्तोत्र ॥
पुण्यशील कुणि वारकरी कुळ नांदे गोंदवले गावी ।
आले गेले घर भरलेले कीर्ती त्यांची सांगावी ॥ १ ॥
गावावरूनी वाट चालली थेट पोचली पंढरिसी ।
त्या वाटेवर उभे राहिले घर हे उघडे सर्वांसी ॥ २ ॥
घर हे कसले हे तर मंदिर येथे पंढरिनाथ उभा ।
उणे न येथे कशास काही हीच पंढरी ती शोभा ॥ ३ ॥
माण नदीचा माणदेश हा रुक्ष दिसाया डोळ्यांना ।
अमाप भक्ती पीक दाटले दिसे प्रेमळा भक्तांना ॥ ४ ॥
त्या गावीचा पांडुरंग हा कुळकर्णी लिंगोपंत ।
रखुमाईही धर्मचारिणी झाली आई गावास ॥ ५ ॥
थकली काया शिणली गात्रे पाय न चालत वय झाले ।
आता कोठली घडणे वारी लिंगोपंता मनि आले ॥ ६ ॥
तोच बोलला स्वप्नी येउन पांडुरंग कटि हात उभा ।
खंत कशाला करिसी भक्ता मळ्यात ये मी तेथ उभा ॥ ७ ॥
खणता भूमी येई हाती रखुमावर त्या मातीत ।
म्हणे घरी चल घेउन मजसी मीच आलो तुज शोधीत ॥ ८ ॥
अशा घराची सून साजिरी बाला गीता प्रिय गावा ।
सासुसासर्या देव मानिले देई आनंदा सर्वा ॥ ९ ॥
अतिथी यात्रिक अथवा साधू येवो दारी दिनी निशी ।
वंदन करणे अन्न घालणे सांभाळी कुळरीत अशी ॥ १० ॥
गोड बोलणे गोड चालणे गोड वागणे सर्वांसी ।
राम करविता आम्ही पामर हेच सांगणे गावासी ॥ ११ ॥
या पुण्ये ये उदया अंकुर गर्भांकुर ये तिच्या कुशी ।
योगिजनांचे दर्शन करिता तेच संचरे गर्भासी ॥ १२ ॥
ध्यास मनीचा तिचिया एकच दासबोध नित वाचावा ।
बोध तयातिल प्रेमळ मंगल नामासह मनि आळवावा ॥ १३ ॥
नाम चालले अखंड ओठी पाठी आहे राम उभा ।
सज्ज मारुती रक्षण करण्या चिंता कसली मग गर्भा ॥ १४ ॥
नवमासांती उगवे तो दिन श्वास सोडिला गावाने ।
नामस्मरणे रातभरीच्या उषःकाल हो जन्माने ॥ १५ ॥
पुत्रजन्म हो पंतांचे घरी फुले विठ्ठला वाहियली ।
घरोघरी जणु दीप लागले या कुलदीपाभवताली ॥ १६ ॥
दिवसा-महिन्या वाढू लागे गीता कटिवर ही कोर ।
उधाण आले वात्सल्यासी एका घरि ना हा पोर ॥ १७ ॥
मुले सौंगडी जमवुनि पुढती खेळावे नित रानात ।
खोड्या धुडगुस घाली टोळी वानरसेना ही मूर्त ॥ १८ ॥
त्रस्त जाहला या लीलांनी उभा गाव जरि ऋणवंत ।
गुरे राखण्या धाडिति रानी निष्ठुर न्यायी त्या पंत ॥ १९ ॥
शिक्षा कसली खेळ मांडिला कुणी राम कुणि हनुमंत ।
भजन रंगता श्रीरामाचे गुरे पिकामधि तृप्तीत ॥ २० ॥
या लीलांनी झाली व्याकुळ झोप उडाली मातेची ।
रीत कुळाची नित समजावी घाली संकट रामासी ॥ २१ ॥
लक्ष एक जप श्रीरामाचा नवस फेडिला सुखे स्वये ।
पुत्र गणोबा निवळे पुरता रघुपति त्यासी सन्मति दे ॥ २२ ॥
झाला जागा म्हणे मनाशी व्यर्थ जिणे हे गुरूविना ।
घरा त्यागुनी बाळ निघाला कुणा बोलता शब्दहि ना ॥ २३ ॥
वय नऊ वर्षे अवघे केवळ राजपुत्र कुणि हा संत ।
राजगुरूनी नेले सदनी म्हणती होई मम पुत्र ॥ २४ ॥
करवीरीची वारी निष्फळ ना गुरु भेटे परत निघे ।
तगमग तळमळ हो जीवाची अन्न गोड ना त्या लागे ॥ २५ ॥
तो बारावे वर्ष लागले तीव्र जाहली मनोव्यथा ।
समर्थ जणु हे देवपिसे कुणि पुन्हा लागती निजपंथा ॥ २६ ॥
राजस बाळी सरस्वति घरि पत्नी तिजसी पतिचिंता ।
मातापितरादाराबंधन तोडीं चाले गुरुपंथा ॥ २७ ॥
निबिड अरण्ये वने कंदरे धुंडियली गुरुशोधासी ।
रामनाम शुभ पाठीराखे रक्षणकर्ते बाळासी ॥ २८ ॥
साधू योगी महंत तांत्रिक भेट जाहली ना शांती ।
कुठे दिसावी कोण्या गावी केव्हां ती प्रिय गुरुमूर्ती ॥ २९ ॥
किती चालणे किती धुंडणे घोर निराशा पुरी मनी ।
कशास जगणे भारभूत मी तोच प्रकटली मृदु वाणी ॥ ३० ॥
बाळ ! ऊठ जा येहळेगावी उदास का तव मन होई ।
तुकामाय तव गुरुमाउली त्यासी शरणागत राही ॥ ३१ ॥
कुठे गाव हा कोण्या प्रांती कसे सद्गुरु कुणि सांगा ।
स्थलकालाचे तोडा बंधन तिथे पोचवा कुणी अगा ॥ ३२ ॥
वय पंधरावे बालमुनी हा पोचे येहळेगावात ।
शोधाया निज गुरुमाउली फिरू लागला ओढ्यात ॥ ३३ ॥
अस्तमान हो मनी निराशा टेके गुरुघर भिंतीसी ।
उग्ररूप गुरु तुकामाय ते पळविति सर्वां वेशीसी ॥ ३४ ॥
कठोर वाणी रूप भयानक पिशाच्च कोणी की खाते ।
गणेश धावे आनंदाने मिठी घातली चरणाते ॥ ३५ ॥
ऊठ मुला ! तू कोण कोठला ! येथे का तू आलासी ।
सांग मागणे काय तुझे ते आत येऊनी बोल मशी ॥ ३६ ॥
नऊ मासांचा श्रीगुरुघरचा वास नव्हे तो जाच खरा ।
टिपे गाळणे पदोपदी ते उसंतवार्या ना थारा ॥ ३७ ॥
एके दिवशी परी तोषला मेघ वर्षला वरि पुरता ।
अशोक वृक्षातळी बैसुनी गुरू नाम दे गहिवरता ॥ ३८ ॥
घे बाळा ही त्रयोदशाक्षरि नाम प्रभूचे जप नित्य ।
दीक्षा लोका हीच देत जा एक नाम रे जगि सत्य ॥ ३९ ॥
प्रेम करावे हीना दीना संकट समयी रक्षावे ।
विश्व भरावे रामप्रेमे भूती रामा वंदावे ॥ ४० ॥
काय निराळे सांगू मी तुज रामचिंतनी मन राखा ।
प्रपंच माना त्या रामाचा समर्थ वदती ते ऐका ॥ ४१ ॥
मस्तक ठेवी गुरुचरणावर नामकरण हो ही नवमी ।
माथ्यावरती रवी उभा ये रामजन्म हो भक्तजनी ॥ ४२ ॥
गुरुकृपा ते बीजारोपण रूजणे मुरणे नाम आले ।
हिमालयाच्या कुशीत वसणे गुर्वाज्ञा ही मानियले ॥ ४३ ॥
श्रीरामाची पुरी अयोध्या काशी पुण्यक्षेत्र महा ।
मथुरा वृंदावन कृष्णाचे आले कलकत्त्यास पाहा ॥ ४४ ॥
भारत म्हणजे तीर्थस्थाने किती गणावी पार न त्या ।
ज्ञानी पंडित तार्किक दांभिक पूर्ण पारखे जे सत्या ॥ ४५ ॥
नाना व्याधी देहमनाच्या दुःखे नाना बहुतासी ।
मात्रा एकच श्रीगुरू देती रामनाम घ्या प्रेमेसी ॥ ४६ ॥
कलकत्यासी हरीहाट हो वा इंदोरी सन्मान ।
राजवैभवा तुच्छ लेखिले नाम हेच मज अनुपान ॥ ४७ ॥
कुणी परिक्षा घें योगाची साधुत्वाची कुणी जिजी ।
मुलात रमणे गुंडोजींचे राजें आले ना हाजी ॥ ४८ ॥
पुरी लोटली वर्षे आठा ठावठिकाणा ना अजुनी ।
चिंता व्याकुळ मातापितरे क्षीण जहाली खंगूनी ॥ ४९ ॥
किती करावा शोध गणूचा दैवी लिहिले काय असे ।
उतार वय हे सहन करावे आल्या दुःखासी कैसे ॥ ५० ॥
साधू यात्रिक बैरागी यति मारुति मंदिर वस्तीसी ।
सांगा बाबा कुणी पाहिला गणू आमुचा वाटेसी ॥ ५१ ॥
तोच येतसे गोसावी कुणि प्रसन्न मुद्रा स्मित मंद ।
दाढिजटांकित शुभ मुखमंडळ योगिराज का कुणि वंद्य ॥ ५२ ॥
कुबडी कौपिन पदी खडावा भस्म कपाळी जपमाळा ।
ऋषिवर अथवा कुणी तापसी नजर भिडेना नजरेला ॥ ५३ ॥
तेच साकडे तेच उसासे माता वंदी पुनः पुन्हा ।
तीन खुणा मम बाळाच्या हो चतुर देखणा घे नामा ॥ ५४ ॥
शब्द मधुर हे प्रिय मातेचे श्रीगुरू वदती हासोनी ।
माय ! घेत जा नाम तयेचि येईल सुखरूप तो सदनी ॥५५ ॥
गोसावी हा लबाड मोठा याच गावचा की झाला ।
हसणे वदणे कानखूणही हाच गणोबा की अपुला ॥ ५६ ॥
तोच पोचला खातवळासी सासुरवाडी गाव भले ।
हजार चिंता ग्रमस्थांच्या गोड भाषणे मन डोले ॥ ५७ ॥
पोचे वार्ता सासुसासर्या बसती मंदिरि येऊनी ।
घोर साकडे प्रिय कन्येचे येती डोळे भरभरूनी ॥ ५८ ॥
माय करावी तिळ ना चिंता क्षेम असे हो धनी हिचा ।
नाम जपावे श्रीरामाचे तोच खरा तिज हितकर्ता ॥ ५९ ॥
शुभ शब्दे या पुनर्जन्म तिज सरली चिंता ना आसवे ।
मानसपूजा मारुतिदर्शन समर्थबोधी रंगावे ॥ ६० ॥
डांबेवाडी गाठी मग हा गोसावी प्रिय धीट भला ।
भीमाताई ! वाढा भिक्षा चकित करी तो भगिनीला ॥ ६१ ॥
समर्थ श्रीगुरु मम आईचे आम्हावरि उपकार किती ।
त्रिरात्र वस्ती करुनि गडावर निघती रामेश्वर यात्री ॥ ६२ ॥
तिरुपति दर्शन झाले चाले कावड रोग्यामिषे पुढे ।
पदी घालिता देह अचानक देवाचरणी प्राण उडे ॥ ६३ ॥
किती पाहावी सुखदुःखे ती मोहबंधने मायावी ।
झाले मडके पक्के याची ग्वाही श्रीगुरु मज द्यावी ॥ ६४ ॥
तुकामायगुरु झाले दर्शन आले श्रीगुरु गावासी ।
घट्ट दह्याचे निमित्त करऊनी खूण दाविली आईसी ॥ ६५ ॥
कोण ? गणुबुवा ? आला आपुला ? देवा आली तुला दया ।
आली भरती आनंदासी चला त्याजला भेटूया ॥ ६६ ॥
किती आठवणी सुरम्य भीषण यात्रा ना ती जन्म नवा ।
श्रीगुरु निकटी जमले सारे रात्र उजाडे या गावा ॥ ६७ ॥
तोच जानकी-तपपूर्ती हो स्वये भेटले तिज राम ।
आनंदाने भरे अयोध्या आले परतुनि श्रीराम ॥ ६८ ॥
खाण गुणांची गीतामाई हिरे जसे बहु मोलाचे ।
पैलू पडता नाजुक हस्ते मोल वाढले कर्माचे ॥ ६९ ॥
काकड-आरती भजन निरूपण दासबोध प्रिय ग्रंथ महा ।
गाथा तुलसी नाथभागवत श्रवणा गर्दी या गेहा ॥ ७० ॥
धन्य गणू मी झाले बाळा पाहुनि गुण तव एकेक ।
सोडणूक तव पित्यास देणे बाळा माझे हे ऐक ॥ ७१ ॥
किती पहावे दफ्तर अजुनी वय झाले रे तू कर्ता ।
वृत्ती आपुली कुळकर्ण्याची सांभाळावी मजकरिता ॥ ७२ ॥
आज्ञापालन प्रिय मातेचे पुत्रधर्म हा श्रेष्ठ महा ।
पूर्ण ओतले चित्त तिथेही लिंगोपंतचि हा गावा ॥ ७३ ॥
परी रमेना चित्त दफ्तरी मना टोचणी दिनराती ।
म्हणती आई देतो बदली जातो मी श्रीगुरुभेटी ॥ ७४ ॥
सरस्वती पतिछाया जैशी कशी राहावी पतीविना ।
सत्त्वपरिक्षा उतरे चाले जशी जानकी पतिचरणा ॥ ७५ ॥
वाटचाल बहु शीण मुळी ना येहळेगावी ते येती ।
तोंडी साखर घालुन श्रीगुरु निरोप देता तिज म्हणती ॥ ७६ ॥
माग मुली तू आलिस येथे बाळे ! देऊ काय तुला ।
पुत्र मागता हसले दोघे कारण कळले ना तिजला ॥ ७७ ॥
तेथुनि आले नाशिक-क्षेत्री तीरी गंगेच्या वास ।
वस्त्र पांढरे झाली जोगिण माळेसोबत रुद्राक्ष ॥ ७८ ॥
पुन्हा जाहल्या दिशा दोन मग पुसती मातापितर तिला ।
बोल लाविता म्हणे पतीसी हिरा खरा गे तो मजला ॥ ७९ ॥
काशी इंदूर आणि अयोध्या निमिषारण्यी शीत हवा ।
डोंब उसळला दुष्काळाचा श्रीगुरू येती निज गावा ॥ ८० ॥
शेतामधुनी वाहाणे माती दीड हजारा अन्न मिळे ।
डोळे गळती जनदुःखाने दामाजी हा-पेव खुले ॥ ८१ ॥
तोच पसरला याचक होऊन दारी मरणाने हात ।
पुत्र हरपला गेली पत्नी खचली आई दुःखात ॥ ८२ ॥
किती वर्णावे गावे गुण ते सरस्वतीसम हो न सती ।
पतिचरणांचे तीर्थ घेउनी शांत जाहली ती ज्योती ॥ ८३ ॥
नित्य हिंडणे श्रीस्वामीसी पालन करणे गुर्वाज्ञा ।
राम चालवी राम बोलवी काय सांगणे वरि सुज्ञां ॥ ८४ ॥
तो इंदूरी केले मुंडन कळे न लोका या नवला ।
तीर्थरूप आजि आमुचे गेले म्हणती जाणे आम्हाला ॥ ८५ ॥
अकस्मात घरि आले श्रीगुरू नवल जनासी आश्चर्य ।
पितृकर्म हो यथाशास्त्र मी पुत्र म्हणूनी हे कार्य ॥ ८६ ॥
तीर्थरूप हो ! प्रपंच केला कमलपत्र जळि तुम्ही तसे ।
आस मनाची एकच होइन लीन प्रभुशी ज्योतीसे ॥ ८७ ॥
शास्त्रवचन मज पूज्य वंद्य हो विवाह करणे वर्षात ।
कसे तुला मी सांगू आई मन ना घेते लग्नास ॥ ८८ ॥
गणू ! बाळ मी वृद्ध जाहाले ऐक मनीचा मम बेत ।
कुलधर्मासी पाळायासी विवाह करणे ही रीत ॥ ८९ ॥
पसंत कर तू वधू स्वतःही मी ना काही म्हणायची ।
करुनी विवाहा आले श्रीगुरु अंध बधु आटपाडीची ॥ ९० ॥
विवाहबंधन बाधे कोणा दास नसे जो रामाचा ।
अखंड यात्रा नाम सोबती प्रभु ना जवळी त्या कैसा ॥ ९१ ॥
अखेर आले श्रीरामामनि जावे राहाण्या गोंदवली ।
राम प्रेरणा देई सांगे बांधी मंदिर मी जवळी ॥ ९२ ॥
राम करविता दाता प्रेमळ निमित्त आम्ही काय हाती ।
गडी गवंडी सुतार जमले हां हां मंदिर ये वरती ॥ ९३ ॥
एके दिवशी पै ना जवळी पगार तटला बाजार ।
पैसे नसता कामकरी मुखदर्शन कैसे देणार ॥ ९४ ॥
तोच बोलले श्रीगुरु थांबा भोजन आता येथ करा ।
सांगा रामा तुझेच मंदिर बांधत आम्ही द्या धीरा ॥ ९५ ॥
भजनामाजी गेले रंगुनि कामकरी ते भाव मनी ।
चालुनि आले धन दाराशी पाहा कशी ती प्रभुकरणी ॥ ९६ ॥
मंदिर झाले सुंदर गावा दिसती मूर्ती ना अजुनी ।
जनहो चिंता वृथा कशासी येणे रामा धावोनी ॥ ९७ ॥
भक्तलाज बहु प्रिय रघुराया म्हणे तडवळी कुलकर्ण्या ।
चल गोंदवली मज घेऊनी कार्य अडे हे तू करण्या ॥ ९८ ॥
प्राणप्रतिष्ठा हो मूर्तींची तेज झगमगे प्रभुवदनी ।
मी तर झालो गोंदवल्याचा प्रभू बोलती हासोनी ॥ ९९ ॥
या भक्तांनो या प्रभुचरणी पहा एकदा मुखकमला ।
टेका मस्तक प्रभुचरणावर तुम्ही तयाचे जन झाला ॥ १०० ॥
किती सोहळा होमहवन ते पवित्र होई ही भूमी ।
रामाचरणी गोंदवल्यासी सुखशांतीला काय कमी ॥ १०१ ॥
सुगंध पसरे गुरुकीर्तीचा कोस शेकडो दरवळला ।
आले धावत राव रंकहि गावे ओलांडित अखिला ॥ १०२ ॥
तो साठीसी येई माता म्हणती श्रीगुरु सांग मला ।
इच्छा आई ! तुझी कोणती पुरवावी ती या वेळा ॥ १०३ ॥
बाळ ! कोणती नुरली इच्छा तृप्त जहाले मन पूर्ण ।
एक राहिली काशीयात्रा देहसार्थका ती अजुन ॥ १०४ ॥
छान ! निघूया लगेच आपण विचार उत्तम यापरता ।
प्रपंच लुटवू आताच म्हणजे पूर्ण मोकळे ना चिंता ॥ १०५ ॥
मंत्र म्हणोनी सर्वा नावे तिथेच पाणी सोडियले ।
ठेउनि वरती तुलसीपत्रा घर यात्रेसी जोडियले ॥ १०६ ॥
किती करावी जननीसेवा लाज आणिली पुंडलिका ।
काशीयात्रा करूनी येती अयोध्येस ते सर्व आता ॥ १०७ ॥
अयोध्येस ये गीतामाई क्षीण जाहला देह अती ।
अपार केला दानधर्मही ये शेवटची घटिका ती ॥ १०८ ॥
पूर्ण जाहली मनोकामना मस्तक मांडीवार घेता ।
राम राम या शब्दे पोचे रामाचरणी प्रिय माता ॥ १०९ ॥
आई ! गेलिस तूही आता डोळे गळती विरहाने ।
रामा ! माता मम सांभाळी मुक्त करी तिज स्पर्शाने ॥ ११० ॥
आले फिरुनी गोंदवल्यासी उत्सव संपे रामाचा ।
अकस्मात गुरु म्हणती लोका आता चाललो कायमचा ॥ १११ ॥
निमिषारण्यी जाणे मजसी तिथे राहाणे नामसुखे ।
रामा माझ्या नका विसंबू घ्या नामाते तो राखे ॥ ११२ ॥
गुरू निघाले टांग्यामधुनी रडू कोसळे भक्तजनी ।
आले धावत कोणी मागे राममंदिरा आतूनी ॥ ११३ ॥
थांबा श्रीगुरु नका जाउहो मूर्ती रडती आत पहा ।
धारा डोळा अखंड त्यांच्या विरहे निघती की याया ॥ ११४ ॥
खरेच आले डोळा पाणी मम रामाच्या का विरहे ।
उगी राहा तू रामा ! माझे जाणे तिकडे राहियले ॥ ११५ ॥
बंद जाहाले येणे पाणी टिपले डोळे प्रेमाने ।
आनंद सर्वा गावा पोरा हाक ऐकिली रामाने ॥ ११६ ॥
आता येणे जाणे फिरणे हर्द्यासी वा हुबळीसी ।
चित्त चोरिले एका रामे राहाणे गावी पायासी ॥ ११७ ॥
गोमाता तर माता सकला सोडविणे तिज धर्म असे ।
गोशाळेसी येता स्वामी येती गाई धावतसे ॥ ११८ ॥
उठणे बसणे गाईमध्ये स्वये झाडणे गोशाळा ।
गाय आपुली माय लोकहो ! गळती डोळे या बोला ॥ ११९ ॥
व्याप वाढला गोंदवल्याचा दुथडी भरती ये नामा ।
येती जाती किती हजारो तोटा येथे ना प्रेमा ॥ १२० ॥
तोच चालली निरवानिरवी म्हणती श्रीगुरु मी पक्षी ।
जाणे उडूनी नेम नसे हो लागा नामा ते रक्षी ॥ १२१ ॥
उत्सव संपे श्रीरामाचा संजीवन ये मृता मना ।
चरणी मस्तक नामगुरूच्या जो तो ठेवी घ्या नामा ॥ १२२ ॥
दत्तजयंती हो शेवटची महासमाधी ये जवळी ।
श्रीगुरु म्हणती तारक तूचि रामा ! मम जन सांभाळी ॥ १२३ ॥
उषःकाल हो मंगलदायी अमृत-घटिका शुभ आली ।
मिटता डोळे धावे ज्योती देह सोडिला तात्काळी ॥ १२४ ॥
शोकाकुल हो सजीव निर्जीव गाव दर्शना ये लोटे ।
गेले कसले आठवा वचना नाम जिथे मम प्राण तिथे ॥ १२५ ॥
* * * * *
कर्ता-करविता श्रीरघुनाथ । करवुनि घेता श्रीहनुमंत ।
त्यांचे इच्छेनें सर्व होत । श्रीरामचरणार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम जयराम जयजय राम ॥
Comments
Post a Comment