देहच ईश्वराचे निवासस्थान आहे Our body is the God's home
देहच ईश्वराचे निवासस्थान आहे
मानव देहात स्वस्वरूपाची प्राप्ती करायची असेल व
स्वतःचा उध्दार करायचा असेल तर सद्गुरूंनी दिलेला बोध
असावा लागतो. सुरवातीला हा बोध फक्त महादेवां जवळ होता.
महादेव सतत ध्यानात असतात. त्यांना ध्यान करताना पाहून
आदिमाया जगदंबेने प्रश्न केला कि, सर्व तुम्हाला महादेव
म्हणतात, तुमचे ध्यान सर्वजण करतात मग तुम्ही कोणाचे
ध्यान करता? व कसे करता? मातेच्या या प्रश्नाचे उत्तर
देण्यासाठी महादेवांनी क्रियायोगाची सुरूवात केली. प्रथम
बोध महादेवांनी पार्वती मातेला दिला. तोच बोध
मच्छींद्रनाथांनी श्रवण केला पुढे मच्छींद्रनाथांनी हा बोध
गोरक्षनाथांना दिला. अशा प्रकारे क्रियायोगाची सुरूवात
झाली आणि आजतागायत हि परंपरा चालू आहे.
मनुष्य २४ तासां मध्ये म्हणजे एका दिवसाला २१,६०० श्वास
घेतो व सोडतो. याच २१,६०० श्वासात जर जीवाने
गुरूंनी दिलेले नाम जपले तर तोच अजपा जाप होतो.
हि अजपा गायत्री मोक्ष मिळवून देते. या अजपा गायत्रीचे
उत्पत्तीस्थान कुंडलिनी आहे. श्वासातील
नादाची उत्पत्ती कुंडलिनीतूनच होते, जीवाचा जन्मताच
नाकाव्दारे श्वस चालू होतो पण त्याची जाणीव होणे यातच
खरे ज्ञानाचे रहस्य आहे हे जीवाला माहीत नसते. पण
याची जाणीव गुरूंनी दिलेले 'नाम' करून देते. नाम मिळणे
म्हणजेच गुरूंची अलौकिक शक्ती कानाव्दारे
शिष्याच्या शरिरात जाते व शिष्याची कुंडलिनी जागृत करते.
श्वासाने जो अहोरात्र जप शरिरात चालू असतो याची जाणीव
होते. प्रत्येक श्वास महत्वाचा असतो.
श्वासाच्या नामजपाने साधक अंर्तमुखी व्हायला लागतो.
अंर्तमुखी साधनेला सुरूवात करतो.
मनाचा चंचलपणा कमी व्हायला लागतो. जेवढे श्वास जागृत
अवस्थेत देह घेतो तेवढ्या श्वासात नाम जप झाला पाहिजे.
जपाला जेव्हढी एकाग्रता साधते तेव्हढे ध्यान होते.
या ध्यानाने चित्त शांत व स्थिर होते.
ॐकार
सृष्टी रचनेच्या आधी ईश्वर निर्गुण निराकार अवस्थेत होता.
म्हणजे फक्त शुध्द चैतन्य होते. त्या चैतन्यामध्ये स्फुरण
निर्माण झाले व प्रथम आकार झाला तो म्हणजे 'शून्य'.
या शून्यातून आकार, उकार, मकार, अर्धाकार आणि टिंबाकार
असा ॐकार तयार झाला.
मानवदेह ओंकारस्वरूपी आहे. मनुष्यदेह पंचतत्वापासून
निर्माण झालेला आहे. ती पाचही तत्वे ॐकारामध्ये आहेत. 'अ'
काराचा 'पिवळा' रंग आहे तो धरतीचे प्रतीक आहे. 'उ'
काराचा 'पांढरा' आहे तो पाण्याचे प्रतीक आहे. 'म'
काराचा 'लाल' रंग आहे तो अग्नीतत्वाचे प्रतीक आहे.
'अर्धाकाराचा' निळा रंग आहे तो वायूचे प्रतीक आहे.
'टिंबाकाराचा' काळा रंग आहे तो आकाशतत्वाचे प्रतीक आहे.
ॐकाराच्या जपाने संपूर्ण शरिराची शूध्दी होते. मनुष्य
शरिरामध्ये अनंत कोटी पेशी आहेत. दररोज १०८ ॐकार
म्हटल्याने थोड्या थोड्या पेशी चैतन्यमई व्हायला लागतात.
विचारही शुध्द होतात त्यासाठी ॐकार गुरूंकडून शिकून
घ्यावा व त्यातील वर्म जाणावे.
माता कुंडलिनी
माता कुंडलिनी साडेतीन हात वेटोळे घालून शरिरात
बसलेली असते. जेव्हा अईच्या शरिरात गर्भधारणा होते
तेंव्हा बाळाच्या टाळूतून माता कुंडलिनी आत प्रवेश करते.
कुंडलिनी शक्ती सर्पाकार असते. कुंडलिनी शक्तीला दोन मुखं
असतात. एक मुख सदैव जागृत असते ते मानवी शरिराचे सर्व
कार्य करत असते शरिरला ऊर्जा देत असते. दुसरे मुख
निस्तेज अचल आणि निद्रीस्त असते. शरिरातील
ज्या ठिकणापासून ब्रम्हाचा उगम असतो त्या दारावरच
ती झोपलेली असते. सद्गुरू जेव्हा बोध देतात
तेव्हा ती जागी होते. सद्गुरू बोधामुळे
ती सुषुम्नेचा दरवाजा फोडून मेरूदंडात प्रवेश करते
आणि ईश्वरी मार्गाला मार्गस्त होते. खालपासून वर पर्यंत
तिचे कार्य सुरू होते. जीवाला चैतन्य या कुंडलिनी शक्तीमुळेच
मिळते. तिचे कार्य सुरू झाले
की शिष्याचा आत्मज्ञनाचा मार्ग सुरू होतो. फक्त मनुष्य
देहातच कुंडलिनीमुळे ज्ञान प्रप्ती होते.
मनुष्य देहाची कुंडलिनी ही उभी असते ती जागृत
झाली की शरिरातील सात चक्रांचे भेदन करत करत ती वर
चढते. ती जेव्हा सहस्त्रार चक्रात पोहोचते तेव्हा तिचे
शिवाशी मिलन होते. ती वरती मार्गक्रमण करत
असताना देहाला निरनिराळे दृष्टांत होत राहतात. जो पर्यंत
माता कुंडलिनी निद्रीस्त असते तो पर्यंत जीवाला अज्ञान
असते. जीवाला ज्ञानी बनविणारी आणि ब्रम्हाशी एकरूप
करून देणारी माता कुंडलिनीच असते. चैतन्यरूप
भगवती म्हणजेच भक्तांच्या ईच्छा पूर्ण
करणारी माता कुंडलिनी होय.
न्यास
ज्या देहामुळे ईश्वराची प्राप्ती होते त्या देहाची पूजा करणे
म्हणजेच न्यास होय. देहच नसेल तर ईश्वराला प्राप्त कसे
करणार? ईश्वर आहे पण देह नसेल तर ईश्वराची प्रप्ती नाही.
ज्यावेळेस आपण ईश्वराला नमस्कार
करतो त्यावेळी तो प्रथम आपल्या शरिराला पोहोचतो.
न्यासामध्ये पायाच्या तळव्यापासून
डोक्याच्या भोवरर्यापर्यंत सर्व अवयव क्रमाक्रमाने पुजले
जातात. शेवटी डोक्याच्या भपवरर्यावर दोन्ही हात कळसराज
म्हणून जोडले जातात. देहच ईश्वराचे निवासस्थान आहे
आणि जेथे देवाचे वास्तव्य असते त्याला देऊळ म्हणतात.
म्हणूनच अनेक संतांनी देहालाच तिर्थस्थान, देऊळ
अशा उपमा दिल्या आहेत.
उदा. ।। देह देवाचे देऊळ । आत बाहेर निर्मळ ।।, ।।
काया ही पंढरी । आत्मा हा विठ्ठल ।।
मानवी शरिर हे देवाचे मंदिर आहे त्यामुळे ते पुजनीय आहे.
म्हणूनच न्यास प्रत्येक साधकासाठी अतिशय उपयुक्त आहे.
Comments
Post a Comment