अमृतघुटका परिच्छेद ११ ते १५ ... Amrut Gutaka 11 - 15
॥ श्रीराम समर्थ ॥
श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत
अमृतघुटका
परिच्छेद ११ ते १५
११. वासनाबीज नाहीसे होणे हीच ब्रह्मज्ञानाची खूण
बहुत सामर्थ्य मिळवूनि म्हणे 'मी सिद्ध' | जगामाजीं प्रसिद्ध |
दिवसा मशाली, उठवी मेलें प्रेत | पुढें न बोले कोणी एक |
समस्त राजे पादाक्रांत | आत्मस्तुतीं सदा डुल्लत |
तयाचें वासनाबीज जरी न मोडे | तयासी आत्मज्ञानी म्हणती वेडे |
वासनाबीज गेलें मुरोन | तेचि ब्रह्मज्ञानाची खूण |
दुधासि घातलें मुरवण | तयासि दूध म्हणेल कोण ॥११॥
(अशुद्ध ज्ञानाच्या मागे लागून मनुष्य आपला व दुसर्याला असा घात करून घेतो -)
एखादा माणूस (हठयोग, मंत्रविद्या वगैरे साधन करून) काही सामर्थ्य मिळवून 'मी सिद्ध झालो' असे म्हणतो. सिद्ध म्हणून जगामध्ये प्रसिद्धीही मिळवितो; दिवसा मशाली पाजळून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करतो; मेलेल्याला उठविण्यासारखे (अद्भुत वाटणारे) चमत्कार करतो; त्यामुळे त्याच्यासमोर बोलण्यासही कोणी धजत नाहे, राजे-महाराजे सुद्धा त्याचे अंकित होतात (मग इतरांची काय गोष्ट?) आणि स्तुतिपाठकांच्या स्तुतीच्या मदाने तो सदा डोलत असतो. पण त्याचे वासनाबीज शिल्लकच असते. त्यामुळे ज्यांना खरे काही कळत नसते ते सामान्य जनच तेवढे त्याला 'आत्मज्ञानी' समजतात (त्याला 'आत्मज्ञानी' म्हणणारे वेडेच समजावेत). वास्तविक पाहता, वासनाबीज पूर्णपणे जिरून जाणे, नष्ट होणे हीच ब्रह्मज्ञान झाल्याची खरी खूण होय. दुधाला विरजण घातले म्हणजे त्याचे दूध हे स्वरूप नष्टच होते. (त्याप्रमाणे वासनाबीज नष्ट झाले म्हणजेच जीवात्म्याचे जीवरूप नष्ट होऊन तो शिवरूप होतो).
टीप - पुष्कळ लोक योगविद्या, मंत्रविद्या असल्या विद्यांच्या साधनाकडे वळतात. त्यांत अभिप्रेत असलेल्या शक्ती पुरेशा अभ्यासाने प्राप्त झालेले लोकही आढळतात. पण (१) त्या शक्ती वापराव्या त्याप्रमाणात क्षीण होत जातात आणि (२) याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे ऐहिक हेतूसाठी त्यांचा उपयोग करण्याचा मोह झाल्याशिवाय रहात नाही. कधी कधी असा सिद्धी प्राप्त झालेला माणूस परहितासाठी, परोपकारासाठी म्हणून त्यांचा वापर करू लागतो. पण ही भावना शेवटपर्यंत टिकून राहणे अशक्यप्राय असते आणि खरा वासनानाश झालेला नसल्याने केव्हा ना केव्हा तरी त्या शक्ती स्वार्थलाभासाठी वापरण्याचा मोह उत्पन्न होतो. येथून अनाचाराला सुरूवात होऊन अखेरीस त्या व्यक्तीचा आध्यात्मिक अधःपात होतो.
यासाठीच संत टाहो फोडून अट्टाहासाने भक्तिमार्गाचा उपदेश करतात. भक्ती याचा अर्थ भगवंताविषयी निरपेक्ष, निरतिशय प्रेम. नामसाधनाने हे प्रेम वाढत वाढत व शुद्ध होत होत अखेर अनन्यशरणागतीत, आत्मनिवेदनात त्याची परिणति होते, साधक पूर्णपणे तद्रूप, अविभक्त बनतो; याचाच अर्थ त्याचे वासनाबीज जळून जाते आणि तो आत्मज्ञानी होतो. या प्रक्रियेमध्ये प्रेमभाव हे सूत्र प्रथमपासून अखेरपर्यंत असल्याने शक्ती येते ती प्रेमरूपच असते, स्वार्थाचा संभवच उरत नाही, दुरूपयोग होणे अशक्यच असते. तेव्हा माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की, नुसत्या चमत्काराचे महत्व मानू नये. ध्येय भक्त होण्याचे ठेवावे आणि त्यासाठी नामस्मरणासारखे सुलभ व परिणामकारक साधन नाही. नामदेखील इतर कोणत्याही हेतूसाठी नसावे, नामासाठीच नाम घ्यावे. या मार्गात धोका तर नाहीच आणि ध्येय अत्यंत शुद्ध, अत्युच्च आहे.
१२. विश्वीं विश्वंभर आहे एक
(स्वस्वरूप सर्वत्र कसें पहावें)
वृक्ष आहे एक | पल्लव दिसती हजारों लाख |
तैसा विश्वीं विश्वंभर आहे एक | आपणासहित दुजा न दिसे देख ॥
धान्य भाजोनि काढिलें | परी तें दिसेना ऐसें नाहीं झालें |
तैसे जाळोनि वासनाबीज |
सुख दु:ख देहीं क्रमावा काळ | साधनीं असोनि जन रिझवावे सर्वकाळ |
कोणासि न वाटे वांकुडे | ऐसे शब्द बोलावे रोकडे |
वृत्ति असावी कल्पनारहित | सदा रहावें ध्यानस्थ ॥१२॥
एखाद्या मोठ्या वृक्षाला पाने लाखो दिसली तरी तो वृक्ष एकच, तद्वत् हे नानाविध चराचर विश्व जरी अथांग रूपांनी नटलेले दिसले तरी त्या सर्वांना भरून राहिलेला जो एकमेवाद्वितीय असा परमात्मा त्या एकाचाच तो आविष्कार होय. त्या विश्वंभराखेरीज आणखी दुसरे काही दिसत नाही (कारण दुसरे काही नाहीच; साधकाने त्याला जाणून घेण्याचे ध्येय ठेवावे). धान्य भाजून काढले तरी ते काही दिसेनासे होत नाही, दिसत राहतेच, मात्र ते पेरले असता उगवत नाही; त्याचप्रमाणे साधकाने वासनाबीज भाजून टाकावे (मग ते पुनर्जन्माला कारणीभूत होत नाही) आणि देह आहे तोपर्यंत (आनंदाने) सुखदु:ख भोगीत उर्वरित कालक्रमणा करावी. सर्वकाळ (अखंड) साधनात राहून लोकांना संतोष देत रहावे. बोलणे सत्य पण कोणाचे मन दुखावणार नाही असे गोड असावे. (परमात्म्याशिवाय इतर) कल्पनांना मनात थारा देऊ नये आणि त्या विश्वंभराच्या ध्यानात सदा मग्न असावे. ( असा मनुष्य देहाने सामान्य माणसासारखाच वावरतोसा दिसला, तरी तो वासनामुक्त असतो आणि म्हणून जन्ममरणबंधनरहित असतो.) ॥१२॥
१३. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे यासाठी आणखी दृष्टांत
उदकांत उठे बुद्बुदाकार |
बुद्बुदाकार नोहे पाणी | पाहूं जातां उदकाची अंगवणी |
उदक बुद्बुदाकार नोहे भिन्न | हा प्रत्यक्ष सर्वांसि येतसे अनुभव |
बुद्बुदाकार आहे देह | म्हणोनि साधन करणें आहे ॥१३॥
पाण्यात बुडबुडा उठतो पण बुडबुडा पाणी नसते. विचार केला असता दिसून येते की, बुडबुडा पाण्याचा एक आविष्कार, एक स्वरूप आहे. पाणी बुडबुडा तत्वतः वेगळे नसून एकच असतात, हा उघड अनुभव सर्वांना येतो. आपला देह (आणि सर्व दृष्य विश्व) हा परमात्मरूपी पाण्यावरचा बुडबुडा आहे. (पण बुडबुडा शाश्वत नसतो, तसे दृष्य जगत हे अल्पकालिक असते.) बुडबुडा म्हणजे जसे पाणी नव्हे, त्याप्रमाणे देह व दृष्य विश्वही सत्यस्वरूप परमात्मा नव्हे. आपण अज्ञानाने देहाला मीपण देतो. नश्वर दृष्याला शाश्वत सत्य समजतो. हे अज्ञान घालविण्यासाठी (परमात्मचिंतनाचे, नामस्मरणाचे) साधन करणे आवश्यक आहे. ॥१३॥
उदकाची अंगवणी - देहाची सावली पडते, पण सावली म्हणजे देह नव्हे; ती देहाचे अंधुक व ठोकळ स्वरूप आहे, आणि तितक्यापुरतेच तिचे देहाशी समस्वरूपत्व आहे. तसेच बुडबुडा आणि उदक, दृष्य आणि अव्यक्त यांचे नाते समजावे. अव्यक्त परब्रह्माचे परमात्म्याचे स्वरूप व दृष्य विश्व यांचा संबंध मागील बिंदूंत वृक्षपल्लव दृष्टांताने व या बिंदूत उदक- बुद्बुदाकार दृष्टांताने स्पष्ट केला आहे.
१४. श्रोत्यांस विनंती; 'हे नोहे माझे पदरचे बोल'
आतां ऐका श्रोते जन | कोठें जरी चुकला असेल दीन |
माझें करावें समाधान | गुरूपुत्रांचे लक्षण |
हे नोहे माझे पदरचे बोल जाण | गुरूघरची आहे खूण ॥१४॥
श्रोते मंडळींनो, आता माझी एक विनंती ऐकावी. मी दीन आहे. मी आतापर्यंत जे सांगितले (व पुढे सांगणार आहे) त्यात काही चूक आढळल्यास ती मला दाखवून देऊन माझे समाधान करावे. गुरूकृपेने माझ्यात गुरूपुत्राचे लक्षण (गुरूने केलेल्या उपदेशाचे सार किंवा ठसा) आहे. मी सांगितले ते माझ्या पदरचे नसून हे माझ्या गुरूचे बोल होतो. १४
दीन - अशा विनयाने बिंदू २४ मध्येही श्रीमहाराज स्वतःला 'दीन' म्हणवितात. आपल्या बहुतेक अभंगांत 'दीन' किंवा 'दीनदास' असा ते स्वत:चा निर्देश करतात.
समाधान - स्वतःची चूक दाखवून दिल्याबद्दल राग न मानता उलट दुरूस्तीबद्दल कृतज्ञता, समाधानच व्यक्त करतात.
गुरूपुत्रांचे लक्षण - सद्गुरु म्हणजे मुक्तिदाता गुरू. तो शिष्याला ज्ञानजन्म देतो म्हणून गुरूशिष्यांत एक प्रकारे असे नाते असते व म्हणून शिष्याला 'गुरूपुत्र' असे म्हणतात; पण जो शिष्य गुरूचा उपदेश आत्मसात करतो व आपल्या जीवनाने त्याचे नाव उज्ज्वल करतो तोच खर्या अर्थाने गुरूपुत्र होय. शिष्य हा असा 'गुरूपुत्र' या पदवीस प्राप्त झाला म्हणजे गुरू त्याचे पुन: आध्यात्मिकदृष्ट्या नामकरणही करतात. अशा रितीने श्रीमहाराजांच्या गुरूंनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे व श्रीमहाराजांनी आपल्या दोघा पट्टशिष्यांचे 'आनंदसागर' व 'ब्रह्मानंद' असे नामकरण केलेले होते. जन्मदात्या आईबापांचे स्वभावादि गुणधर्म ज्याप्रमाणे मुलांत प्रकट होतात त्याप्रमाणे सद्गुरुच्या उपदेशाची लक्षणे खर्या गुरूपुत्राच्या आचारविचारात व्यक्त होतात; हेच 'गुरूपुत्राचे लक्षण' होय.
१५. 'निर्गुणाची जाणोनि खूण | सगुणाचे करावें ध्यान |'
मागें सांगितलें निर्गुणाचें लक्षण | निर्गुणाची जाणोनि खूण |
सगुणाचें करावें ध्यान | काहीं करावा नित्यनेम |
जप ध्यान मानसपूजा आदिकरून | अध्यात्मश्रवण निरूपण |
तीर्थ, व्रत, होत, दान | प्रेमें मानावे भजन पुराण |
आदरें राखावे साधु ब्राह्मण | वेदशास्त्राची आस्था पूर्ण |
भूतदया समसमान | शान्ति असावी अति गहन |
प्राणिमात्रासी असावें लीन | मत्सर नसावा मनांतून |
ऐसे जाणोनि राहीं | श्रीरामचिंतन करीत जाई ॥१५॥
(मागील बिंदूमध्ये, आतापर्यंतचे विवेचन मान्य आहे असा श्रोत्यांचा अभिप्राय घेऊन विवेचन पुढे चालवितात)
मागे निर्गुणाचे लक्षण सांगितले (बिंदू १२ व १३). सगुण हे त्या निर्गुणाचीच खूण म्हणून जाणून सगुणाचे ध्यान करावे. जप, ध्यान, मानसपूजा इ. प्रकारचा काहीतरी नित्यनेम करावा. काही तरी अध्यात्मग्रंथ वाचनात ठेवावा. अधिकारी व्यक्तीकडून (निरूपणादि रूपाने) श्रवण करावा (आणि वाचल्या-ऐकलेल्याचे मनन करावे). (द्रव्य आणि शरीरशक्ती इ. ची अनुकूलता असल्यास) तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, होमहवन, दान करावे. हरिभजन, (हरिकिर्तन), पुराणश्रवण इ. बद्दल प्रेम असावे. (आपणांस शक्य असल्यास करावे. पण नसल्यास दुसरा कोणी करीत असेल त्याबद्दल आदर असावा.) (तसेच अनुकूलता असल्यास) साधुसंत, ब्रह्मवेत्ते, यांची आस्थेने सेवा करावी. त्यांचे रक्षण करावे. परामर्श घेत जावा, वेदशास्त्राबद्दल पूर्ण आदर बाळगावा. सर्व जीवांबद्दल दया आणि समबुद्धी असावी. (खोल डोहातील पाण्याप्रमाणे) अथांग, गाढ मनःशांति असावी. सर्व प्राणिमात्राशी लीनतेने वागावे. कोणाबद्दलही मनात द्वेषबुद्धी नसावी. या सर्व गोष्टी श्रीरामचिंतनाला साह्यभूत असतात हे ध्यानी धरून श्रीरामाचे अखंड चिंतन असावे. ॥१५॥
निर्गुणाची जाणोनि खूण - परमात्मा निर्गुण आहे हे तर खरेच, परंतु आपण सगुण असल्याकारणाने आपल्याला निर्गुणाचे खरे आकलन होत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही. 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' म्हणजे आपण गुणातीत झाल्यावरच निर्गुणाची खरी ओळख होते, किंबहुना दोन्ही एकरूपच होतात. परंतु तोपर्यंत, त्या परमात्म्याची खूण म्हणून, सगुणाचा आधार घेणे जरूर आहे. ही खूण म्हणजे देवाची वा सद्गुरुची मूर्ति, प्रतिमा, ग्रंथ, इ. प्रकारची असू शकते. सगुण भक्ती करीत असताना खरा 'मुख्य' देव निर्गुण आहे, सगुण हे त्याचे प्रतीक आहे, याची जाणीव ठेवणेही जरूर आहे.
नित्यनेम - नियमितपणे, ठराविक वेळी करण्याची गोष्ट; परमार्थाच्या संबंधात नित्य म्हणजे शाश्वत जो परमात्मा, त्याचे स्मरण ज्यामुळे होईल, अशी नियमितपणे करण्याची साधने, त्याची उदाहरणे यामागोमागच दिलेली आहेत. ही सर्व साधने प्रत्येकाने करावीत असे नाही; द्रव्य शरीरस्वास्थ्य, मनोवृत्ति, परिस्थिती यांस अनुसरून जे जमेल तितके करावे. पण कोणतेही साधन (जसे पूजा, किंवा तिर्थयात्रा) करतांना प्राधान्य त्या साधनाला नसून साध्याला आहे हे विसरू नये. ही सर्व साधने आपल्याला भगवंताभिमुख करण्यासाठी आहेत; त्याला विसरून केकेली पूजा, तीर्थयात्रा किंवा दान, वगैरे कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी ती परमेश्वराकडे नेण्यास उपयोगी न पडतां उलट केवळ अभिमानाला (आणि म्हणून अधःपतनाला) नेणारीच ठरेल. कोणतेही साधन करताना भगवंताचा विसर होत नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. नामस्मरण ह्या साधनाला द्रव्य-आरोग्यादि काहींही बाह्य अनुकूलता लागत नाही; ते कोणत्याही वेळी, कोणत्याही स्थळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणाही व्यक्तीला सहज करण्यासारखे, आणि भगवत्स्मरणरूप असल्याने ते सर्वश्रेष्ठ आहे.
जप - संतसिद्धांनी किंवा सद्गुरुंनी उपदेशिलेला मंत्र (जसे ॐ नम: शिवाय, नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, इत्यादी) वारंवार मनात किंवा प्रकट उच्चारणे, नित्य किंवा नैमित्तिक जपसंख्या मोजण्यासाठी तसेच चित्त दुसरीकडे जाऊन मंत्राचा विसर न पडावा म्हणून ("स्मरणी") माळेचा उपयोग करतात. गुरूकडून ज्याला मंत्र मिळाला आहे त्याला त्या गुरूचा अनुग्रहीत म्हणतात. मंत्र प्रकट रितीने (वैखरीने) म्हटला तरी तो दुसर्याला ऐकून्न न जाईल एवढ्याच मोठ्याने म्हणावयाचा असतो. अंगठ्याजवळचे बोट व करंगळी वगळून बाकी तीन बोटात माळ धरून मंत्र एकदा म्हटला की अंगठ्याने किंवा मधल्या बोटाने एक मणि ओढावा. मेरूमण्यापासून सुरूवात करावी व मणि ओढीत पुनः तेथवर पोचले म्हणजे मा़ळ फिरवून उलट दिशेने सुरूवात करावी. मेरूमणि ओलांडू नये. अनुगृहीत व्यक्तीने दररोज स्नानानंतर काही खाण्यापूर्वी किमान जपसंख्या (निदान एक माळ) करावी. संकल्पानुसार व्यक्तीने किंवा सामुदायिकरित्या ठराविक मुदतींत ठराविक जप करण्याचीही पद्धत आहे. जपाच्या अभ्यासाने भगवंताबद्दलचे प्रेम वाढावे. कामनिक (म्हणजे मनांत इच्छा धरून केलेला) जप आध्यात्मिक दृष्ट्या इष्ट नाही. नामजप किंवा नामस्मरण हे केवळ नामासाठींच असावे. इतर काही हेतूने नसावे. कारण नाम म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच. त्याच्या मोबदल्यात मिळविण्यासारखे म्हणजे त्याच्या बरोबरीच्या किंमतीचे काही आहे असे वाटणे म्हणजे नामाची किंमत कमी लेखण्यासारखे आहे.
ध्यान - इष्ट देवतेच्या क्रिया, सद्गुरुंचे रूप, गुण, क्रिया यांचे एकाग्र चित्ताने अखंड चिंतन, रूप्, गुण व क्रिया यांची आठवण नामांत होतच असते, म्हणून नामस्मरणाने ध्यानाचाही कार्यभाग साधतो.
मानसपूजा - आपल्या उपास्यदेवतेची किंवा सद्गुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करणे. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध भावनेने अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर मूर्ति विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि. 'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी. आपली उपास्य देवता आपल्या सतत सन्निध आहे, आपल्याशी बोलत आहे, आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, ही भावना मानसपूजेने वाढते. मानसपूजा शक्यतो ठराविक ठिकाणी व ठराविक वेळी करावी; शक्य तर सततच उपास्यदेवता मनांत बाळगावी.
आदिकरून - या शब्दाने नित्यनेमाचे अन्य प्रकार सूचित आहेत; उदाहरणार्थ, देवदर्शन, प्रदक्षिणा, वृद्धसेवा, इ.
देवदर्शन - भगवंताच्या मूर्तीच्या किंवा संतसज्जनांच्या दर्शनाने, त्यांच्या दृष्टिक्षेपाने, आपल्या मनावर, विचारांवर, आचारावर चांगले संस्कार होतात, पावित्र्याची आणि भगवत्प्रेमाची भावना जागृत होते.
प्रदक्षिणा -देवतेला आपल्या उजवीकडे ठेवून तिच्या भोवतीं फिरणे. देवतेच्या तसेच साधुसंतांच्या समाधीच्या आसपास त्यांच्या कृपेचे, उपासनेचे वलय असते. या वलयात वावरल्याने कृपेचा प्रसाद आपल्याला लाभतो. प्रदक्षिणा घालतांना मनांत अशी भावना धरावी की ही मूर्ति वा समाधि ही माझ्या मनाचे केंद्रस्थान असून, माझ्या आयुष्यांतल्या सर्व घटना व हालचाली मी तिच्या हाती सोपविल्या आहेत; कर्ता मी नसून सर्व कर्तेपण या देवतेकडे आहे; तिच्या इच्छेने व सत्तेनेच सर्व गोष्टी घडत असून मी माझी अशी अन्य काही इच्छा बाळगीत नाही. अनन्यशरणागतीचाच हा एक अभ्यास आहे.
अध्यात्मश्रवणनिरूपण - अध्यात्मपर विशिष्ट ग्रंथ (जसे दासबोध, तुलसीरामायण, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी) नियमाने वाचणे, पारायण करणे, निरूपण ऐकणे या गोष्टींना मननाची व आचरणाची जोड अवश्य पाहिजे; अन्यथा ते एक ढोंग किंवा करमणूक होईल.
तीर्थ - तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे, वारी करणे, इत्यादि यायोगे सत्संगलाभ होतो व भगवत्प्रेम वाढते. पण हा हेतू डोळ्यांपुढे न धरल्यास यात्रा म्हणजे केवळ स्थलदर्शन, शारिरीक कष्ट, द्रव्याचा खर्च आणि अभिमानाने इतरांना सांगण्याचा विषय होतो. श्रीमहाराज म्हणत, "तीर्थास गेलियाची खूण | काही पालटावा अवगुण ॥".
व्रत - नियमपूर्वक आचरण्याचे पुण्यकर्म; जसे उपवास, मौन, ब्रह्मचर्य, नि:स्वार्थ सेवा, मन ताब्यात ठेवण्यास शिकणे हा यांतला प्रधान हेतू असतो. उपवास म्हणजे (उप + वास) परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे. देव आपल्या जवळ आहे ही भावना करणे कमी किंवा न खाता उपाशी रहाणे यांत पोटाला थोडी विश्रांती, किंवा फराळाचे चमचमीत जिन्नस खाणे याने अजीर्ण, हा खरा उपवास नव्हे. त्या दिवशीं जास्त भगवच्चिंतन झाले तर खरा 'उप-वास'.
मौन - न बोलणे. मनांत जळफळ ठेवून अबोला धरणे हे मौन नव्हे. न बोलण्याने वाचणारी शक्ती, बुद्धी व वेळ परमात्मचिंतनाकडे लागावा व मन स्वस्थ व एकाग्र व्हावे हा मौनाचा खरा हेतू. हा हेतू सांभाळून गरजेपुरतें बोलले तर मौनभंग झाला असे समजू नये. भगवंताच्या नामाचा प्रेमपूर्वक उच्चार हा मौनांतच धरावा.
होम - अग्नि हा परमेश्वराचा प्रतिनिधी मानून हव्य वस्तू त्यास मंत्रपूर्वक अर्पण करणे. याने कृतज्ञता, त्याग व अर्पणबुद्धी हा मुख्य हेतू साधावा.
दान - अन्न, वस्त्र, निवारा, द्रव्य, भूमि, विद्या, श्रम, इत्यादि एखाद्या सत्पात्र व्यक्तीला किंवा समूहाला देणे. दान करताना 'मी दाता आहे' ही अभिमानवृत्ति नसावी, कारण आपल्याला जे मिळालेले आहे त्यासाठे आपण परिश्रम केलेले असले तरी ते भगवत्कृपेनेच मिळालेले असते. त्यातले आपल्या गरजेपुरतेच आपले समजून आपण वापरावे, अतिरिक्त असेल ते केवळ माध्यमाच्या भूमिकेने आपण सत्पात्री खर्च करावे, नावलौकिकासाठी केलेले दान व्यवहारांत जरी उपयुक्त असले तरी परमार्थदृष्ट्या गौण होय.
भजन - भगवत्प्रेम वाढावे, भगवंताची करुणा भाकावी, आपला भक्तिभाव वृद्धिंगत व्हावा, हा भजनाचा हेतू असावा. पुष्कळदा भजनाला अटीतटीच्या संगीत मैफिलीचे स्वरूप येते ते योग्य नव्हे; त्याने अभिमान, मत्सर, इत्यादि वाढण्याचा संभव असतो. भजन व त्याचाच भाग म्हणून फेर वगैरे धरणे याने प्रपंचचिंतेचा विसर पडतो, मन तल्लीन होते व सामूहिक भक्तिभाव वाढतो.
पुराण - भगवंताने दुष्टांचा संहार करून सुष्टांचे रक्षण केले त्याच्या कथा पुराणात व इतिहासात असतात. त्या ऐकून आपली सद्वृत्ति वाढावी हा पुराणश्रवणाचा हेतू.
वेदशास्त्राची आस्था पूर्ण - भक्तिमार्ग पत्करला की शास्त्राचे व नीतीचे नियम न पाळले तरी हरकत नाही असे समजणे बरोबर नाही. शास्त्र आणि नीतिधर्म यांच्या मर्यादा व नियम व्यक्तींच्या आणि समाजाच्या स्थैर्यासाठी, सुरळीत व्यवहारासाठी असतात. देश-काल-परिस्थितीस अनुसरून त्यात जरूर तो फरक व्हावा, पण मूलतत्वांना धक्का लागू नये. या नियमांच्या पालनाने मन स्वाधीन ठेवण्याचा अभ्यासही होतो आणि परमार्थ साधनास तो फार उपयोगी आहे.
भूतदया समसमान - सर्वांभूती भगवंत आहे ही भावना वाढीस लागावी यासाठी हा समभाव फार उपकारक आहे.
शांति - भगवंतावर विश्वास ठेवल्याने आणि त्याच्याच इच्छेने व सत्तेने सर्व घडते अशी दृढ श्रद्धा बाळगल्याने मन शांत, समतोल राहते, व्यवहार अधिक चांगला होतो आणि पारमार्थिक सुखाचा अनुभव येतो.
लीन - विनम्र वागणूक. याने निरभिमानता येते. प्रत्येकामध्ये भगवंत आहे अशी ज्याची दृढ भावना झाली तो स्वाभाविकच सर्वांशी नम्रपणाने वागेल. ज्याला निरभिमानी वृत्ति कमवायची आहे त्याने कोणालाही हीन लेखू नये, त्याच्यात वास करणार्या भगवंताची जाणीव ठेवून त्याच्याशीही नम्रतेचीच वर्तणूक ठेवावी.
मत्सर नसावा - सर्वांमध्येच भगवंत वास करीत आहे असे जो मानतो तो दुसर्याचा मत्सर कसा करील ?
या बिंदूत सांगितलेल्या गोष्टीतले मर्म जाणून रामचिंतन म्हणजे नामस्मरण करील त्या माणसाची साधनात झपाट्याने प्रगती होईल.
यात सांगितलेल्या सर्व गोष्टी श्रीमहाराजांनी स्वतः आचरल्या, इतरांना शिकविल्या आणि व्यक्तिशः आणि सामुदायिक रितीनेही करवून घेतल्या. हा बिंदू म्हणजे 'अमृतघुटक्याचा' गाभाच आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
* * * * *

Comments
Post a Comment