केळी रोग उपाय

केळीवरील रोगांचे नियंत्रण

♥जिवाणूजन्य रोग : खोडसड/रायझोम रॉट
हा रोग "इर्विनिया' नावाच्या जिवाणूमुळे होतो. यामुळे याला इर्विनिया रॉट असेही म्हणतात. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त कंद आणि मातीद्वारे होतो.

♥लक्षणे - या रोगाची लक्षणे लागवडीनंतर साधारणतः दोन ते तीन महिन्यांनी दिसू लागतात. यामध्ये रोगग्रस्त झाडावरील खालची पाने मलूल होऊन ती अचानकपणे झुकू लागतात. रोगग्रस्त झाड जमिनीलगत सडण्यास सुरवात होते व त्या ठिकाणी गडद तांबडे किंवा पिवळे पाणथळ फुगवटे दिसून येतात. सडण्याची ही क्रिया कालांतराने वरील पाने व शेंड्याकडील वाढीच्या भागापर्यंत होते. जिवाणू संसर्गामुळे कंद हळूहळू कुजतात, मुळ्यांची संख्या कमी होते. मुळ्यांवरही वरीलप्रमाणे जखमा दिसून येतात व मुळ्यांची टोके वाळतात. अशी रोगग्रस्त झाडे जमिनीलगत कुजून हलक्‍या धक्‍क्‍याने अथवा वाऱ्याने कोलमडून पडतात. मात्र कंद व मुळ्या जमिनीतच राहतात.

नियंत्रणाचे उपाय ♥प्रगतशील शेतकरी♥

♥लागवड अतिवृष्टी अथवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी करू नये.

♥लागवडीसाठी रोगमुक्त बागेतूनच जोमदार व चांगल्या प्रतीचे कंद निवडावेत.

♥ प्रत्येक झाडास 600 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड
+
30 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन
+
600 मि.लि. क्‍लोरपायरीफॉस यांचे
200 लिटर पाण्यात द्रावण तयार करून
प्रत्येक झाडास 100 ते 200 मि.लि. सिंचन करावे.

(नियंत्रणाचे उपाय स्वजबाबदारीवर करावेत.)

संकलित!

-----
♥बुरशीजन्य रोग : करपा (सिगाटोका)
माती व हवेद्वारे "मायकोस्फेरिला म्युसिकोला' या बुरशीचे बीजाणू दूरपर्यंत वाहून नेले जातात आणि असे बीजाणू निरोगी झाडांच्या पानांवर पडून त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव होतो.

♥लक्षणे - केळीच्या खालच्या पानांवर सुरवातीला लहान लहान हिरवट, पिवळसर ठिपके अथवा रेषा दिसून येतात. पानांच्या उपशिरांदरम्यानचे हे ठिपके कालांतराने एकमेकांत मिसळून मोठ्या ठिपक्‍यांमध्ये रूपांतरित होतात. पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्‍याचा रंग तपकिरी-काळपट असतो. मध्यभागी काळसर रंगाची तर ठिपक्‍याभोवती पिवळसर रंगाची वलये तयार होतात. हे ठिपके सुरवातीस पानांच्या शेंड्याकडील भागांवर आढळून येतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण झाड करपल्यासारखे दिसते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील हरितद्रव्याचा ऱ्हास होतो. यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो, कार्यक्षम पानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाते. परिणामी पोषणाअभावी घडातील फळे लहान राहतात, अकाली पिकतात, तर कधी घड झाडातून निसटतात. यामुळे एकूणच उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान होते.

♥कारणीभूत घटक - करपा रोगाच्या प्रसारास दमट हवामान, हवेतील वाढती आर्द्रता, 25 ते 35 अंश से. तापमान या घटकांबरोबरच बागेतील पाण्याचा योग्य निचरा न होणे, लागवडीचे अंतर कमी असणे, तणनियंत्रणाचा अभाव, शिफारशीत खतमात्रांचा अभाव व असंतुलित वापर, बाग दुर्लक्षित असणे या गोष्टी कारणीभूत ठरतात.

♥प्रतिबंधात्मक उपाय
* शिफारशीत अंतरावरच लागवड करावी.
* बागेत पाणी साठू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा करावा.
* पाणीव्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
* बाग व भोवतालचा परिसर तणमुक्त ठेवावा.
* बागेतील पिले व पत्ती वेळच्या वेळी कापून त्याची बागेबाहेर योग्य विल्हेवाट लावावी.
* बागेस शिफारशीप्रमाणेच खत मात्रा द्याव्यात.
* पानाचा रोगग्रस्त भाग अथवा संपूर्ण पान कापून नष्ट करावे.
* बागेत रोगाची लक्षणे दिसल्यास 500 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा 1250 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा 1250 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 500 मि.लि. प्रॉपीकोनॅझोल यांपैकी एका बुरशीनाशकाची 500 मि.लि. स्टीकरसहित 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने वरीलपैकी एका बुरशीनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
-----
♥विषाणूजन्य रोग - पर्णगुच्छ / बनाना बंची टॉप
केळीवरील हा अत्यंत घातक रोग असून, त्याचा प्राथमिक प्रसार रोगबाधित कंदाद्वारे आणि प्रादुर्भावित कंदापासून केलेल्या उतिसंवर्धित रोपांपासून होतो. या रोगाचा दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो.सुरवातीला पानांवरती पिवळसर छटा दिसू लागते. कालांतराने ही पिवळसर छटा पानांच्या कडांवर दिसून येते. पानाची मध्यशीर, उप व दुय्यम शिरांवर आणि देठांवर अनियमित स्वरूपाच्या गडद हिरव्या रंगाचे ठिपके अथवा असमान लांबीच्या तुटक रेषा दिसून येतात. रोगग्रस्त झाडावरील पाने लहान, अरुंद व आखूड राहून झाडाच्या शेंड्यावर एकत्र जमा होतात. ही पाने एखाद्या उभट गुच्छाप्रमाणे दिसतात. पाने ताठर बनतात व वाकविल्यास मोडतात. अशा झाडांची वाढ होत नाही. झाडांना घड लागत नाहीत आणि आल्यास तो व्यवस्थित विकसित होत नाही.

♥बनाना स्ट्रीक व्हायरस
भारतामध्ये अलीकडील काळात आढळून आलेल्या या रोगाचा प्राथमिक प्रसार प्रादुर्भावित कंदांमार्फत, तर दुय्यम प्रसार मोसंबी व उसावरील पिठ्या ढेकणामार्फत होतो. या रोगामध्ये केळीच्या पानावर सुरवातीला हरितद्रव्यरहित, पिवळसर सोनेरी रंगाच्या खंडित अथवा सलग रेषा दिसून येतात. कालांतराने तेथील उतींचा ऱ्हास होऊन या उती मृत होतात व या रेषा काळ्या पडतात. पानांव्यतिरिक्त देठावर, पानाच्या मागील बाजूस मध्य शिरेवर, पोग्यातील पानावर तसेच खोडावरसुद्धा वरीलप्रमाणे रेषा दिसून येतात. परिणामी पाने ठिसूळ बनून पानांची आतील बाजूस गुंडाळी होते, पानांच्या शिरा जाड होऊन झाडाची वाढ खुंटते, घडाचा दांडा कोरडा पडल्याने विकृत स्वरूपाचा घड तयार होतो.
पोगासड/ इन्फेक्‍शिअस क्‍लोरोसीसची लक्षणे दाखवणारा क्‍युक्‍युंबर मोझॅक व्हायरस
महाराष्ट्रात 1943मध्ये सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यामध्ये हा विषाणूजन्य रोग आढळून आला. या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदांमार्फत, तसेच बाधित कंदांपासून तयार केलेल्या उतिसंवर्धित रोपांपासून होतो. दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. मुख्य/ पोग्यातील पानाचे सडणे, पोगा मरणे, कालांतराने अंतर्गत खोडातील पेशी मृत होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या रोगाची प्राथमिक लक्षणे कोवळ्या पानावर आढळतात.
-------------
♥विषाणूजन्य रोगांचा प्रतिबंध
विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण करणे अवघड असल्याने त्यांचा प्रसार रोखणे, तसेच त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानीची पातळी नियंत्रणात राहील याबाबत प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्‍यक आहे.
* लागवडीसाठी रोगमुक्त, जोमदार व सशक्त कंद निवडावेत.
* रोपे खात्रीशीर नर्सरीतूनच घ्यावीत.
* विषाणूजन्य रोगाची लागण झालेली झाडे उपटून समूळ नष्ट करावीत. यामुळे या रोगाचा प्रसार नियंत्रित करता येतो.
* या रोगांचा प्रसार शोषणाऱ्या किडींमार्फतच होत असल्याने आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून या किडींचा प्रभावीपणे बंदोबस्त करावा.
* केळी पिकामध्ये, तसेच आजूबाजूला काकडी व इतर वेलवर्गीय पिकांची लागवड करू नये.
* मोठ्या प्रमाणात ऊस लागवड असलेल्या भागात केळी लागवड टाळावी.
* विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण अवघड असल्याने ते होऊ नयेत म्हणूनच योग्य ती दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.
* रोगांच्या लक्षणांचे योग्य निरीक्षण करून रोग ओळखावा आणि मगच त्याच्या नियंत्रणाचे उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
* रोगांचे वहन करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या कीटकांचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.
* लागवडीचे अंतर, योग्य खतमात्रा, पाण्याचे नियोजन, तणनियंत्रण आणि एकंदरीतच बागेचे व्यवस्थापन या गोष्टी रोगनियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

♥केळी पिकावर बुरशीजन्य, जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जिवाणूजन्य खोडसड रोगाची लक्षणे लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यांनी दिसू लागतात. बुरशीजन्य करपा रोगामुळे तर केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगांचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच त्यावर उपाययोजना करणे आवश्‍यक असते.

तज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे  नियंत्रणाचे उपाय स्वजबाबदारीवर करावेत.

संकलित!

Comments

  1. लावगडी नंतर ८ दीवसात काही झाडे सडु लागली क्रुपया उपाय सुचवा

    ReplyDelete
  2. केळी ची झाडे मनातुन मोडत आहेत उपाय सांगा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!