कर्तव्याचे फळ विपरीत का मिळावे ?
कर्तव्याचे फळ विपरीत का मिळावे ?
एक अति वृध्द गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्रीमहाराजांना सांगू लागले.ते म्हणाले ,"महाराज,माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली.माझे तीन मुलगे त्यावेळी लहान होते.लोक लग्नाचा आग्रह करु लागले, पण सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुनःलग्न केले नाही.मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यालत्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढविले मुलांचे उत्तम चालले आहे.पण आता सुना आणि मुले मला म्हणतात, तुम्ही निघून जा.चालते व्हा. ते पुढे म्हणाले महाराज,स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करुन मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरित फळ का मिळावे?
म्हाताऱ्याची व्यथा पाहून आजूबाजूच्या मंडळीना ही वाईट वाटले. तेवढ्यात श्रीमहाराज प्रेमाने म्हणाले, "अरेरे,मुलांनी असे करणे अगदी गैर आहे. खरेच,ते त्याच्या हिताचे पण नाही. तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार चुक करीत आहेत.त्यांचे असू द्या.पण तूम्ही शेवटी जो प्रश्न विचारला.तो मात्र सायुक्तिक नाही.असा विचार करा की, कर्तव्य म्हणजे काय? मी जे करायला पाहीजे,त्याचे नाव कर्तव्य.आता मी जर ते करायलाच हवे, तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो, याचा संबंध येतोच कुठे? म्हणजेच फळाचा संबंध येत नाही, कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते. म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले.याचे समाधान वाटू द्या .आणि आजची स्थिति आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे. हे ओळखून त्या बद्दल खंत बाळगु नका.मनाला नामांत गुंतवा आणि आपले कल्याण करुन घ्या."प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, "मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते ?" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील ? समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार ? संत फार तर जरूरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्या्वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे." श्री राम समर्थ
Comments
Post a Comment