५ ऑक्टोबर - अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ.

५ ऑक्टोबर अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ.

(संकलन -श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर सद्गुरु माऊलि यांच्या प्रवचनाचा भाग आहे.)

पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल ? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो.

खरोखर, भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच. ज्याचे विकार कमी, त्याला भगवंताची प्रचीती जास्त.
एकच राम चोहोकडे कसा असेल, हे म्हणणे भ्रमाचे आहे. सर्व अवतार एक भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदि आहे. राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा.

भगवंताला जन्ममरण नाही. तो तर सच्चिदानंद आहे; मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात.

एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी, खाकरा आला नसतानादेखील, आजोबा नुसते खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसूनसुद्धा 'तो आहे' ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो.
भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर, आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू.

मी जोवर साकारावर प्रेम करतो, तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झाले नाही, जिथे वेदांनी 'नेति नेति' केले, ते परमात्मस्वरूप संतांनी जाणले; म्हणून भगवंताला सगुणात आणले. हा आनंदस्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरूरी आहे.

माणसाला जे अत्यंत हितकारक असते, ते शांत आणि आनंदस्वरूप असले पाहिजे. सत्यस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही; म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी.

विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते; म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे.
मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्त्विकता उत्पन्न होईल, आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे 'सर्वस्व' अर्पण करणे, हेच यज्ञाचे खरे सार होय.

ज्याने स्वतःला ओळखले, त्याने भगवंताला ओळखले. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे.

भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीति ही पोरकी असते.
ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्‌व्यवसाय. देवाचे नाम घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे, आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात; आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा.

प्रपंचात जशी आसक्ति असते, तशीच रामचरणी ठेवणे, हीच रामभक्ति होय.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!