जिजाऊ मॉ साहेब .. MaaSaheb JijaMata ...
'जिजाऊ मॉ साहेब’
12 जानेवारी हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांचा जन्मदिवस. इतिहासाच्या कालपटलावर आपल्या आपल्या कधी न भंग पावणार्या अभंग कार्याचा ठसा उमटवणार्या स्त्री व्यक्तिमत्त्वाचा गुणगौरव रिपोर्टरच्या शब्दात आजपासून तीन दिवस.
‘जिजाऊ मॉ साहेब’
जिथं कष्ट उपसले, मान पेरला तरी अपमानच उगवायचा. सूर्य उगवला काय आणि मावळला काय माणसाची जिंदगानी गुलामीतच जायची. आजच्या छप्पन इंच छातीपेक्षा निधड्या छात्या असूनही तेंव्हा नसल्यागत होत्या. शिवशिवते मनगट, पराचक्रकर्त्यांना मुजरा घालायचे. या महाराष्ट्राच्या मातीत धडाने माणसं असायची मात्र मनाने मुरदाड आणि निसत्व होती. पारतंत्र्य आणि गुलामीबद्दल कोणालाही तिटकारा येत नव्हता की राग-संताप होत नव्हता. स्वातंत्र्य गमावल्याबाबत खेद नव्हता की पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडून ठेवल्याचा अपमानही वाटत नव्हता. सह्याद्रीच्या कुषीत जन्मलेल्या भूमिपुत्रांना मुस्टकदाबी सहन करावी लागत होती. आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देता-देता रयत पिचली जात होती. हा अन्याय हा अत्याचार म्हणजे आपल्या नशिबाचे फळ म्हणत जो तो नशिबाला कोसत होता. आजचं मरण उद्यावर ढकलत होता. मर्दासारखे मर्द म्हणणारे मराठी मुलुखाचे लोक अक्षरश: गुलाम झाले होते. तर पारतंत्री राजवट आपला हैवानी खेळ खेळून दहशत माजवत होती. अशावेळी कोणीतरी या अन्यायी पातशाहीविरुद्ध आवाज उठवावा, स्वातंत्र्याचे स्वप्न पहावे, लेकी-बाळीच्या अब्रूचा रखवालदार म्हणून एखादा नर पुरुष जन्माला घालावा असं प्रत्येकाला वाटायचं मात्र प्रत्यक्षात असं स्वप्न बघण्याचं धाडसही कोणी करत नव्हतं. परंतु हे धाडस केलं, हे स्वप्न पाहितलं ते सर्वप्रथम जिजाऊ मॉ साहेबांनी. मराठी मुलुखात असलेल्या या प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी जिजाऊंनी स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला आणि आपल्या उदरातून शिवरायांना जन्म देऊन तो अमलातही आणला. जिजाऊ मॉ साहेबांचा स्वराज्य विचार ही मराठी मुलुखात नव्या युगाची नांदीच होती. एकीकडे चार पातशाहीचा दहशतवाद होता तर दुसरीकडे मनुवाद्यांनी स्त्रियांना गुलामीचं जिनं बहाल केलं होतं. मसल पॉवरची जेवढी दहशत होती तेवढीच धार्मिक दहशतवाद्याचीही दहशत होती. सर्वसामान्यातील सर्वसामान्य असलेला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा वर्ग सनातन्यांनी दैववादी बनवून टाकला होता. माणसा-माणसामध्ये जाती-जातीच्या उंच-उंच भिंती उभ्या केल्या होत्या आणि समाज एकप्रकारे बलहीन, सत्वहिन, अस्वाभिमानी आणि तेजोहिन बनला होता.
या परिस्थितीत जिजाऊ मॉ साहेबांनी प्रयत्नवादाची कास धरली. रयतेतला स्वाभिमान जागा केला. गमावलेल्या सत्वाला फुंकार घातली. त्यांच्यातले क्षत्रियत्व जागे केले. हे करण्यासाठी जिजाऊ मॉ साहेबांनी मसल पॉवरचा दहशतवाद संपवण्यापेक्षा सर्वप्रथम धार्मिक दहशतवादाचा नित्पात करण्याचे ठरवले अन् ती सुरुवात चारचौघांमध्ये सर्वप्रथम पुणे परगण्यातून केली.
एकाने धार्मिक दहशतवाद फैलवायचा
अन् दुसर्याने त्याची रि ओढून तो टिकवायचा
असा संतप्त प्रतिप्रश्न तेंव्हाच्या पंडितांना जेंव्हा उघडपणे केला तो काळ शहाजीराजे भोसलेंचा होता. शहाजीराजे भोसलेंकडे पुणे, सुपे, इंदोर, बारा मावळची जहागिरी होती. तेंव्हा शहाजीराजेंनी निजामांना विरोध केला. आदिलशाहलाही दणका दिला. संतापलेल्या आदिलशहाने मुरार जगदेव पंडित या ब्राह्मण सरदाराला शहाजीराजेंच्या पुणे परगण्यावर आक्रमण करायला लावले. मुरार जगदेवने साक्षात यम बनून या भागात दिसेल त्याला कापायला सुरुवात केली, जाळपोळ केली. शेतं जाळली, लुटालूट केली. मुरार जगदेवच्या या आक्रमणाने या भागातील लोक परागंदा झाले. पुणे परगणा ओसाड पडली. एवढ्यावरही मुरार जगदेव थांबला नाही. पुणे परगण्याच्या उजाड शहरावर उभी पहार ठोकली आणि त्या पहारीला फाटकी वहान (चप्पल) लटकवली. याचा धार्मिक शास्त्रानुसार अर्थ जो कोणी या ठिकाणी जमीन कसेल अथवा वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. या धार्मिक दहशतवादामुळे पुणे परगण्यात कोणीही राहायला यायना, जमीन कसेना, वस्ती होईना अशावेळी राजमाता जिजाऊ आपल्या बाल शिवाला घेऊन पुणे परगण्यात आल्या. लाल महाल बांधला आता या भागातील रयतेतला धार्मिक आणि मसल पॉवर दहशतवाद संपवायचा होता. जिजाऊंनी बाल शिवाजींच्या हस्ते नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि जमीन कसायला सुरुवात केली. तेवढ्यात वेदमूर्ती पुरुषोत्तम भट त्याठिकाणी आला अन् त्याने धर्मशास्त्राचा आधार सांगत जमीन नांगरू नका, जमीन कसू नका. जमीन नांगरली तर निर्वंश होईल, असे सांगितले. या वेळी संतापलेल्या जिजाऊंनी एकाने मसल पॉवरच्या जोरावर गाढवाचा नांगर फिरवायचा, धार्मिक दहशतवाद माजवायचा आणि दुसर्याने त्याचीच री ओढत हा धार्मिक दहशतवाद फोपवायचा. ही जमीन तुम्हाला दान दिली तर तुम्ही कसणार नाहीत का? सोन्यासारखं पिक काढणार नाहीत का? यावर वेदमूर्ती पुरुषोत्तमला उत्तर देता आलं नाही.
जिजाऊ मॉ साहेबांनी उपस्थित रयतेदेखत हा धार्मिक दहशतवाद धुडकावून लावला. ही अंधश्रध्दा आहे हे उघड सांगून त्याठिकाणी जमीन नांगरली आणि बघता बघता पुणे परगण्यात पुन्हा रयत आली. विषय एवढाच, राजमाता जिजाऊंनी अंधश्रध्देला कधीच महत्त्व दिले नाही. श्रध्देला, संस्काराला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याला त्यांनी महत्त्व दिलं. जिजाऊ नसत्याच तर स्वराज्याची चेतना निर्माण झाली नसती, मरगटलेले मन भरून आले नसते. दुबळे झालेल्या हातापायतलं बळ स्वराज्यासाठी लढायला पुन्हा मिळालं नसतं. राजमाता जिजाऊंनी आपल्या कार्यकाळामध्ये आदर्श पत्नी, आदर्श राजकारणी, आदर्श माता याचबरोबर अर्थकारण, समाजकारण, युद्धकारण यामध्ये आपली वेगळी छटा आणि पकड दाखवून दिली. बायाबापड्यांना बाटवल्याजाणार्या शत्रूंवर तुटून पडण्याचे आत्मबल रक्षणकर्त्यांना जिजाऊंनीच दिले. म्हणूनच जिजाऊ मॉ साहेब महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगाच्या पाठीवर आदर्श माता म्हणून चर्चेत आजही राहिल्या.
क्रमश:
खूप छान माहिती दिली राजमाता जिजाऊ जयंती भाषण मिळेल का
ReplyDelete