26 जानेवारी - अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण.

२६ जानेवारी - अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण.

👉अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे; आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावे.
👉भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण राहतो ते भाडयाचे घर आहे. भाडयाचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो, तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे, याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे.
👉"मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो," असे मागावे.
👉परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे.
👉भगवंताचे स्मरण करणे, म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे.
👉प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे, हा परमार्थ; आणि परमात्म्यावाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान. हे ज्ञान बाणले म्हणजे मनुष्य खर्या अर्थाने परमात्मप्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला.
👉या साधनाने परमात्म्यावाचून दुसरे काही आवडेनासे होते; आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते; त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे.
👉अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषयवासना मेल्या असे नसते; तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अती सात्त्विक म्हणून जन्माला येईल.
👉सात्त्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय.
👉साधन प्राणाबरोबर असावे; प्राण जसे अभिमानरहित, अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमानरहित, अखंड चालावे. ते 'करता' कामा नये; 'करणे' म्हणजे अभिमान आला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते.
👉प्रपंचातली तळमळ सोडून वागावे.
👉गुरूआज्ञेत असावे.
👉अनंत जन्मांचा देहाशी सहवास, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते; तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्तीकमी होऊन नामावर प्रेम जडते.
👉योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्यप्रायच; आणि
👉कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो.
👉भक्तीत कष्ट नसतात, आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो.
👉योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकपुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरसमुलाप्रमाणे आहे.
👉 भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ, आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे.

🔔 नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ, वगैरे करून परमार्थ घडत नाही;आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे.🔔

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!