21 जानेवारी: नामाचा अनुभव GOD's name Experience

21 जानेवारी: नामाचा अनुभव

👉नामाचा अनुभव कोणता ? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसर्‍या कशात पाहू नये; म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी.
👉नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला.
👉नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुध्दी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे.
👉मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरूवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्‍न करावा. मग ते मनाने आतल्याआत होऊ लागते. 👉पहिल्यानेच आपल्या प्रयत्‍नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे.
👉नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल.
👉भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दु:खाची जाणीव नसल्यावर दु:ख असले म्हणून बिघडले कुठे ?
👉 काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादि संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. 👉विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव.
👉पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत; जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत; आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत.
👉 अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.
👉आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. 👉स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्यावाचून अडून बसू नये.
👉 भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे.
👉अखंड नामस्मरण ठेवायला सोवळयाओवळयाचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळे आहे.
👉उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे.
👉निरनिराळया देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचविण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरूरी आहे.
👉म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा.
👉 कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल.

🎁नाम घ्यायला स्वत:चीच आडकाठी असते.
ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.🎁

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!